लता मंगेशकरांच्या अंत्यदर्शनासाठी मराठी कलाकार उपस्थित नव्हते का?

लता मंगेशकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लता मंगेशकर
    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

भारतरत्न लता मंगेशकरांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधानांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत राजकारणी हजर होते. बॉलिवूडचे अभिनेते, हिंदी संगीत सृष्टीतले नावाजलेले गायकही दिसले, पण मराठी चित्रपटसृष्टीतले, संगीत क्षेत्रातले चेहरे का दिसले नाहीत? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय.

मराठी कलाकार शिवाजी पार्कवर उपस्थितच नव्हते की कॅमेऱ्यात दिसले नाहीत, असाही प्रश्न काहींना पडला. नेमकं काय घडलं हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटलं की तिच्यासह अन्य काही कलाकार शिवाजी पार्कवर गेले होते. पण प्रोटोकॉलमुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यांना अक्षरशः भांडून तिथे प्रवेश मिळवावा लागला.

हेमांगी कवीने नेमकं काय म्हटलं?

"सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून जाऊ दिलं नाही. खूप विनंती केली. मला या गेटवरून त्या गेटवर जा म्हणत राहिले. शेवटी एका PSI साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसाबसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप, मी आणि अभिजीत केळकर 4 वाजल्यापासून तिथं होतो. शेवटपर्यंत आम्हाला विनंती करूनही दर्शन मिळत नव्हतं. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांना ही मागे हटकलं जात होतं, तिथं माझी काय गत!"

अभिनेत्री हेमांगी कवीची प्रतिक्रिया

फोटो स्रोत, Facebook/Hemangi Kavi

फोटो कॅप्शन, अभिनेत्री हेमांगी कवीची प्रतिक्रिया

"आम्ही तिथे कुणी celebrity म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो. आम्हालाही शासकीय प्रोटोकॉल्स कळत होते. म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हाला सांगितलं वेळ नाहीये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरशः भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आलं नसावं!"

या सगळ्याबद्दल बीबीसी मराठीने अभिनेता अभिजीत केळकर याचीही प्रतिक्रिया जाणून घेतली. पोलीस त्यांचं काम करत होते, आपल्याला अखेर लतादीदींचं दर्शन घेता आलं, त्याबद्दल आपली कुठलीच तक्रार नाही असं सांगत लोक ज्याप्रकारे लगोलग सोशल मीडियावर व्यक्त होतात ते असंवेदनशील आहे असं अभिजीतने म्हटलं.

लता मंगेशकरांच्या अस्थी गोळा करताना आदिनाथ मंगेशकर

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, लता मंगेशकरांच्या अस्थी गोळा करताना आदिनाथ मंगेशकर

"माझा स्वतःचा सकाळी नाटकाचा प्रयोग होता. इतक्या मोठ्या व्यक्तीचं पार्थिव किमान एक दिवस तरी दर्शनासाठी ठेवलं जाईल असं मला वाटलं होतं. पण तसं झालं नाही. मला प्रयोगानंतर वंदना गुप्ते भेटल्या त्यांचा लगेचच प्रयोग होता त्यामुळे त्या येऊ शकणार नव्हत्या. कलाकार म्हणून ती कमिटमेंट पाळायची असतेच ना? मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांना गोव्यातून देवेंद्र फडणवीसांच्या विमानात येता आलं म्हणून त्या पोहोचल्या. नाहीतर लोकांनी महापौर का नाही आल्या असाही प्रश्न विचारला असता."

"दीदींचं वय, त्यांचं स्थान हे सगळं लक्षात घेता त्यांच्या निधनानंतर लगेच अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित करणं आणि त्यावर प्रतिक्रिया देणं हे दोन्ही मला असंवेदनशील वाटतं. माणूस म्हणून विचार करता येण्याचं जे आपलं वेगळेपण आहे, जे आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं करतं, ते आपण सोडून दिलंय का? इतक्या उत्कट भावनांचाही विचार केला जाणार नसेल तर मग का माणूस म्हणून घ्यायचं आपण स्वतःला? या उलटसुलट गोष्टी कुणीही व्यक्त झालं आणि कितीही व्यक्त झालं तर थांबतील असं मला वाटत नाही."

गायक नंदेश उमप त्या मराठी कलाकारांपैकी एक ज्यांना तिथे जाऊन लता मंगेशकरांचं अखेरचं दर्शन घेता आलं. बीबीसी मराठीशी बोलताना नंदेश उमपची बाजू काय होती?

"आम्ही जे मराठी कलाकार तिथे पोहोचलो होतो ते सर्व कलाकारांचं प्रतिनिधित्वच करत होतो ना? सगळं तसं अचानकच झालं, कुणी दौऱ्यावर असतं, कुणी बाहेर असतं, ते तिथे पोहोचू शकले नाहीत म्हणजे त्यांचं लताबाईंवर प्रेम कमी होतं असं तर म्हणता येणार नाही ना?"

शाहरुख खान अंत्यदर्शन घेताना

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, शाहरुख खान अंत्यदर्शन घेताना

पण बॉलिवूडच्या कलाकारांना प्रवेश दिला जात असताना मराठी कलाकारांना तो नाकारला जात होता याबद्दलही नंदेशनी खंत व्यक्त केली. "अशा प्रसंगी प्रोटोकॉल असतो आम्हाला मान्य आहे. पण ज्यांना VIP दालनात येऊ दिलं त्यांना सगळ्यांना किमान दर्शन तर घेऊ द्यावं. बॉलिवूडला का पाठवलं, मराठी कलाकारांना का नाही या वादात जाण्यात अर्थ नाही. तो काही सोहळा नव्हता. पण त्यांच्याबरोबर काम केलेल्या कलाकारांना त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी झगडावं लागलं याचं वाईट वाटतं."

मराठी कलाकारांची श्रद्धांजली

लता मंगेशकरांच्या जाण्याने जगभरातून हळहळ व्यक्त झाली. काही कलाकारांनी प्रत्यक्ष दर्शन घेतलं पण अनेकांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या.

गायक सुरेश वाडकर लतादीदींना गुरुस्थानी मानत. ते कायमच त्यांचा उल्लेख 'माँ सरस्वती' असा करत आले आहेत. सुरेश वाडकर यांनी 'भारताचा दागिना, सरस्वती माँ' लता मंगेशकर यांना गमावल्याचा शोक व्यक्त केला.

अभिनेते हृषिकेश जोशी यांनी लता मंगेशकरांचा तरुणपणीचा फोटो पोस्ट करत निःशब्द इतकंच म्हटलं.

संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनीही भावनिक पोस्ट लिहीली.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता