साडीचा इतिहास : बाहुबलीतील शिवगामीची साडी नेसण्याची पद्धत किती जुनी आहे?

फोटो स्रोत, Ramya Krishnan
- Author, पद्मा मीनाक्षी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मी लंडनच्या रस्त्यांवरून चालत चालत कडेला असलेल्या एका रेस्तराँमध्ये प्रवेश केला, त्यावेळी अचानक अनेकांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. सगळे आश्चर्यानं माझ्याकडे पाहत होते.
अचानक अशा नजरा वळलेल्या पाहून मलाही वेगळं वाटलं, पण तेवढ्यात माझ्याबरोबर असलेल्या मैत्रिणीनं माझी शंका दूर केली आणि सगळे माझ्या साडीकडे पाहत आहेत, असं तिनं सांगितलं. मी पारंपरिक भारतीय पद्धतीची साडी नेसली होती.
भारतामध्ये साडी परिधान करण्याची आणि साडीच्या विणकामाची समृद्ध अशी परंपरा आहे. प्रत्येक राज्यात साडी नेसण्याचे विविध प्रकार आहेत आणि काळानुसार त्यात बदलही होत गेलेले आहेत.
मात्र, संपूर्ण भारतात सर्वसाधारणपणे साडी नेसण्याची जी पद्धत अवलंबली जाते ती आमचीच आहे असा दावा कोणतंही राज्य करू शकत नाही.
मग, सर्वप्रथम ही पद्धत कशी आली आणि तिला काय म्हटलं जातं? बीबीसी तेलुगूनं टेक्सटाईल क्युरेटर, फॅशन डिझायनर आणि अभ्यासकांशी चर्चा करून साडी नेसण्याच्या प्रकारांमध्ये कसा बदल होत गेला याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अंगभर गुंडाळलेलं अखंड वस्त्र
"मैथिली संस्कृतीमध्ये बहुतांश महिला या एकवस्त्र (अंगभर गुंडाळलेलं अखंड वस्त्र) परिधान करत होत्या," असं दिल्ली विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापिका सविता झा यांनी सांगितलं.
"भारतीय संस्कृती ही प्रामुख्यानं स्त्रीप्रधान आहे जी अतिसूक्ष्मवादाला (minimalism) ला प्रोत्साहन देते आणि पुरुषप्रधान संस्कृती उपभोगवादाला प्रोत्साहन देते," असंही त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, KANAKAVALLI SILKS
"अनेक राज्यांमध्ये एकवस्त्र परंपरा असून मन्नारगुडीमध्ये राजगोपाल पेरुमल देवतेलाही एकवस्त्र पोशाख नेसवलेला आहे," असं चेन्नई येथील कॉस्ट्युम डिझायनर श्रीमती यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
"साडी परिधान करण्याच्या पद्धतीवरून व्यक्तीची प्रादेशिक ओळख समोर येते. राज्या-राज्यांमध्ये यात फरत आढळून येतो, तसंच काही राज्यांमध्येही यात तफावत असल्याचं पाहायला मिळते. उदाहरण द्यायचं झाल्यास मदिसरा पद्धतीची साडी, अय्यर पद्धतीची साडी," हे सांगता येतील असंही त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
साडी नेसण्याच्या या विविध पद्धती या संबंधित भूभागातील हवामान, स्थानिक विणकामाचा प्रकार, काम करण्यासाठीच्या परिस्थिती आणि महिलांचा आराम या सर्वावरून ठरत गेल्या असं त्यांनी सांगितलं.
मात्र, "भारताच्या अनेक भागांमध्ये (केरळ, ईशान्येकडील सहा राज्ये, राजस्थान आणि गुजरात) एकच वस्त्र परिधान करण्यातून साडीचा उदय झाला हे सांगणं मात्र ऐतिहासिकदृष्ट्या काहीसं अनिश्चित आहे.
"अजूनही दोन किंवा तीन वस्त्रं परिधान करण्याच्या पद्धती सुरू आहेत," असं 'सारीज, ट्रेडिशन अँड बियाँड' पुस्तकाच्या लेखिका आर. कपूर चिश्ती यांनी अधोरेखित केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सहाव्या शतकाच्या सुरुवातीला एका पोर्तुगीज प्रवाशानं साडीबाबतचा उल्लेख केला आहे.
"येथील महिला अतिशय पातळ असं सुती किंवा रेशमी, शुभ्र रंगाचं, पाच यार्ड लांब, अखंड वस्त्र परिधान करतात. त्याचा एक भाग शरिराच्या खालच्या भागाला गोलाकार गुंडाळलेला असतो आणि दुसरा भाग त्यांच्या स्तनांवरून खांद्यावर गेलेला असतो. त्यामुळं एक हात आणि खांदा हा उघडाच राहतो," असं वर्णन त्यानं केलं आहे.
मंदिरांमध्ये मूर्तींचं बारकाईनं निरीक्षण केल्यास दोन्ही पायांच्या मध्ये खोचलेली साडी पाहायला मिळते (तिला कुचा पद्धती म्हणतात), असं चेन्नईमधील आर्ट परफॉर्मर अनिता रत्नम यांनी सांगितलं.
प्रचंड गाजलेल्या बाहुबली चित्रपटामध्ये अभिनेत्री राम्या कृष्णन यांनी अशा प्रकारची कुचा पद्धतीची साडी परिधान केल्याचं पाहायला मिळालं होतं.
"यासाठी 11 ते 13 वार साडी वापरली जाते असं," चित्रपटाच्या कॉस्ट्युम डिझायनर प्रसंती त्रिपीरनेनी यांनी द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
साडी नेसण्याची सर्वांत लोकप्रिय पद्धत कशी विकसित झाली?
"साडी हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासाठी एक शस्त्र आहे," असं सागरिका घोष यांनी त्यांच्या 'इंदिरा द मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकात म्हटलं आहे.
2018 मध्ये झालेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये त्यांनी इंदिरा गांधींची विविध विणकामांबद्दल असलेली आवड याबाबत माहिती दिली होती.
"इंदिरा गांधी प्रचारावर असताना त्यांनी गर्दीतील एका मुलीकडे पाहत, त्यांच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना त्या मुलीनं कोणत्या प्रकारची साडी नेसली आहे, याबाबत विचारणा केली होती. अधिकाऱ्यानं ते सिल्क असल्याचं सांगितलं तेव्हा इंदिरा गांधींनी ते कोईम्बतूर कॉटन असल्याचं उत्तर दिलं होतं," असं सागरिका यांनी लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये सांगितल्याचं 'द हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तात म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
"एअर इंडियाच्या एअर होस्टेसपासून ते घरातील गृहिणी ज्या पद्धतीची साडी नेसतात, त्या प्रकाराला निवी म्हणतात," असं श्रीमती यांनी सांगितलं.
"रविंद्रनाथ टागोर यांच्या वहिनी ज्ञानोदानंदिनी यांनी निवी हा साडी नेसण्याचा प्रकार प्रसिद्ध केला. ज्ञानोदानंदिनी सरकारी नोकरीत असलेल्या पतीबरोबर 1870 च्या दरम्यान बॉम्बे (आताचे मुंबई)ला गेल्या त्यावेळी त्या पारशी पद्धतीची साडी नेसायला शिकल्या. त्याकाळी स्थानिक बंगालींमध्ये साडी नेसण्याची ही पद्धत बाहेर फिरताना फारशी योग्य समजली जात नव्हती," असं आर. कपूर चिश्ती यांनी लिहिलं आहे.
त्या कोलकात्याला पोहोचल्या तेव्हा त्यांनी साया किंवा पेटिकोट आणि केमिस ब्लाऊज तसंच जॅकेटसह साडी नेसण्याची ही पद्धत शिकवण्यास तयार असल्याचं अनेक महिलांना सांगितलं.
महिलाही याकडे आकर्षित झाल्या आणि तेव्हापासून साडी नेसण्याची ही निवी पद्धत सुरू झाली असं लेखिकेनं म्हटलं आहे.
साडी नेसण्याची शहरी पद्धत ही 1870 च्या नंतर समोर आलेली असून चित्रा देवी यांच्या 1970 मधील 'ठाकूर बरीर ओंदर महल' या पुस्तकात त्याचं वर्णन आहे. रितेन मझुमदार यांनी नंतर या पुस्तकाचा अनुवाद केला होता.
राजघराण्यातील महिलांनी फॅशन ट्रेंड सेट केला का?
राजस्थान, बडोदा आणि इतर राजघराण्यातील राणी गायत्री देवींसारख्या महिलांनीदेखील त्यांच्या शिफॉन, चंदेरी अशा प्रकारच्या साड्यांद्वारे फॅशन ट्रेंड सेट केला असं अभिनेत्री समांथासाठी कॉस्ट्युम डिझाईन करणाऱ्या फॅशन डिझायनर प्रितम झुकलर यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
अनिता रत्नम यांच्या मते, "रवी वर्मा यांच्या चित्रांमधून समोर येणारी पात्रं ही साडी नेसण्याची आधुनिक पद्धत दर्शवणारी नाहीत. भारतीय महिला आणि साडी परिधान करण्याचा आदर्श प्रकार त्यांनी दाखवला असून त्यांच्या पात्रांचे चेहरे हे प्रामुख्यानं दक्षिण भारतीय ऐवजी उत्तर भारतीय महिलांसारखे आहेत."
ब्लाऊजची संस्कृती
भारतीय समाजामध्ये महिला या ब्लाऊजशिवायच साडी नेसत असत. देशामध्ये मुस्लीम राजवटीनंतर शिवणकामाची संकल्पना समोर आली, असं पद्मश्री पुरस्कार विजेत्या उषा किरण खान यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितल.
मात्र, संगम संस्कृतीमध्ये शिंपी अस्तित्वात होते, असं श्रीमती सांगतात. दक्षिण भारतात ब्लाऊज परिधान करण्याची संस्कृती ही नवी नाही, असं त्या सांगतात.
"आजही देशातील अनेक आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिला ब्लाऊज परिधान न करताच केवळ साडी नेसतात. अगदी ब्रा आणि पेटिकोट हेदेखील भारतीय संस्कृतीचा भाग नाहीत. ब्रिटिश काळामध्ये त्यांचा समावेश झाला," असं अनिता रत्नम म्हणाल्या.

फोटो स्रोत, ANITA RATNAM
मोहम्मद अली जिन्नाह यांच्या पत्नी रतन बाई जिन्नाह या त्यांच्या शिफॉन साड्या आणि स्लीव्हलेस ब्लाऊज यासाठी ओखळल्या जात होत्या, असं शीला रेड्डी यांनी 'मिस्टर अँड मिसेस जिन्नाह' या पुस्तकात म्हटलं आहे.
तत्कालीन बॉम्बेचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांनी आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमादरम्यान या दाम्पत्याला आलेल्या अनुभवाचं वर्णन रेड्डी यांनी 2018 च्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये केल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं होतं.
"लेडी विलिंग्डन यांना रतन बाई यांनी परिधान केलेली वस्त्रं आवडली नाही, त्यामुळं त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्यासाठी एक शॉल आणून द्यायला सांगितलं. त्यांना थंडी वाजत असेल असं त्या म्हणाल्या होत्या."
"मात्र, जिन्नाह यांनी त्यांना लगेचच उत्तर दिलं होतं. माझ्या पत्नीला थंडी वाजली तर ती तुम्हाला सांगेल, असं म्हणत ते तिथून निघून गेले होते."
साडी नेसण्याच्या पद्धतीत झालेला बदल
साडी नेसण्याची पद्धत प्रत्येत राज्यानुसार बदलत असली तरी, सहा वार साडी ही देशाला एकत्र आणणारा पोशाख आहे, असं या विषयातील अभ्यासक म्हणतात.
बदलत्या काळानुसार साडी नेसण्याची पद्धतही बदलत गेली. आखूड पदर ते लांब पदर असे महिलांच्या सोयीनुसार त्यात बदल होत गेल्याचं पाहायला मिळतं.
चिश्ती यांच्या पुस्तकात साडीच्या या बदलत गेलेल्या प्रकारांची नोंद करण्यात आलेली आहे.

फोटो स्रोत, SACHIN KALUSKAR
मयूरभंजच्या महाराणी सुचारू देवी या 1903 मध्ये दिल्ली दरबारामध्ये निवी पद्धतीनं साडी नेसून गेल्या होत्या, असंही नमूद करण्यात आलेलं आहे.
एक काळ असाही होता, जेव्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई सारखी महिला दोन्ही पायांच्या मधून खोचलेली साडी परिधान करून घोडेस्वारी, पोहणे हे सर्व करत होत्या. ही साडी न शिवलेल्या शॉर्ट्ससारखीच होती. मध्य प्रदेशच्या शाजापूर आणि आंध्रप्रदेशच्या कोतापल्ली याठिकाणी पँटालून फॅशनप्रमाणे लांब साड्या नेसल्या जात होत्या, याचाही उल्लेख आहे.
मात्र, नेसण्यासाठी सोपी असल्याने निवी ही पद्धत अधिक लोकप्रिय ठरली आहे असं दिल्ली येथील टेक्सटाईल क्युरेटर संध्या रमण यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, SANDHYA RAMAN
इन्स्टाग्राम आणि फेसबूक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळं तर याची लोकप्रियता आणखी वेगळ्या स्तरावर नेली आहे. अनेक महिला साडी सिस्टर्स, sareespeak असे ग्रुप तयार करत आहेत.
अनेक महिला त्यांचे कलेक्शन सादर करून इनफ्लुएन्सर बनल्या आहेत.
मात्र, हातमाग हा लक्झरी प्रकार बनला असून विणकामासाठी लागणाऱ्या खर्चामुळं अनेकांना ते परवडतच नाही, असं संध्या रमण यांनी म्हटलं.
त्यात देशात 1990 मध्ये झालेल्या आर्थिक सुधारणांमुळं पॉवरलूम आले आणि वस्त्रोद्योगाला नवं रुप मिळालं.
एकवस्त्र ते पॉकेट साडी
पुरुषांना त्यांच्याकडे असलेलं सामान खिशात ठेवता येतं तर महिलांनी त्यासाठी स्वतंत्र बॅग का बाळगावी? या विचारातून कोलकात्याच्या 18 वर्षीय तारीणी सराफ यांना महिलांसाठी पॉकेट (खिसे असलेली) साडी डिझाईन करण्याची कल्पना सुचली.

फोटो स्रोत, TAARINI SHARAF
त्यांनी yourpocket.org नावाने चळवळ सुरू केली आणि साडीच्या माध्यमातून महिला सबलीकरण सुरू केलं. त्यांनी "sanitary pad in my pocket" (सॅनिटरीपॅड माझ्या खिशात) नावाचाही एक प्रकल्प सुरू केला.
सूतगिरणी ते बोर्ड रूम
"सहा वार साडी ही हळुहळू सूतगिरण्यांमधून अगदी कंपन्यांच्या बोर्ड रूम, लॉ चेंबर्स आणि कॉर्पोरेट हाऊसेसपर्यंत पोहोचली आणि तिनं तिची वेगळी ओळख निर्माण केली," असं अनिता म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
"भारतातील पारंपरिक विणकरांनी विणलेली साडी नेसल्यास आणि भारतीय डिझाईनचा प्रचार केल्यास साडी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत होईल," असं प्रितम म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








