ओमिक्रॉन: हायब्रीड इम्युनिटी म्हणजे काय? कोरोनाची तिसरी लाट यामुळे रोखू शकेल?

कोरोना उपचार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

कोव्हिड-19 चा नवा व्हेरियंट 'ओमिक्रॉन'मुळे भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीये.

डेल्टापेक्षा 'ओमिक्रॉन' तीन पटींनी जास्त संसर्गजन्य असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलीये. भारतात कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरियंटने धुमाकूळ घातला होता.

तज्ज्ञांच्या मते, डेल्टा व्हेरियंटमुळे मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या कोरोनासंसर्गामुळे तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती आणि लसीकरण अशी 'हायब्रीड' इम्युनिटी भारतात दिसून येतेय.

मग, 'हायब्रीड' इम्युनिटी ओमिक्रॉनची संभाव्य तिसरी लाट रोखू शकते? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हायब्रीड इम्युनिटी म्हणजे काय?

आजाराशी मुकाबला करण्यासाठी शरीर रोगप्रतिकारशक्तीचं कवच तयार करतं. इम्युनिटी दोन गोष्टींमुळे तयार होते.

  • लसीकरणामुळे तयार होणारी रोगप्रतिकारशक्ती
  • आजाराचा संसर्ग झाल्यामुळे विषाणूविरोधात लढण्यासाठी निर्माण झालेली इम्युनिटी

मग 'हायब्रीड' इम्युनिटी म्हणजे काय? पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॉलेजचे उपअधिष्ठाता आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. राजेश कार्यकर्ते याचा सोप्या भाषेत अर्थ समजावून सांगतात.

ते म्हणतात, "लसीकरणामुळे शरीरात निर्माण होणारी आर्टिफिशिअल अक्वायर्ड इम्युनिटी आणि आजाराचा संसर्ग झाल्यामुळे शरीरात तयार झालेली नॅचरल अक्वायर्ड इम्युनिटी या दोन्हींना एकत्रितपणे 'हायब्रीड' इम्युनिटी म्हणता येईल."

'हायब्रीड' इम्युनिटीला 'सूपर इम्युनिटी' असंही म्हटलं जातं.

कोरोना

फोटो स्रोत, Prakash singh

तज्ज्ञांच्या मते, एखाद्या आजारातून बरं झालेल्या व्यक्तीला, आजाराला कारणीभूत असलेल्या विषाणूविरोधी लस देण्यात आली, तर अशा लोकांच्या शरीरात तयार होणारी रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली असते.

उदाहरणार्थ, नैसर्गिकरित्या झालेला कोरोना संसर्ग आणि त्यानंतर मिळालेली कोरोनाविरोधी लस यामुळे रुग्णांच्या शरीरात 'हायब्रीड' इम्युनिटी तयार झालीये.

जगभरात कोरोना संसर्गानंतर मिळालेल्या कोरोनाविरोधी लशीमुळे तयार झालेल्या 'हायब्रीड' इम्युनिटीवर संशोधन सुरू आहे.

भारतातील सिरो सर्व्हे काय सांगतात?

कोरोना संसर्गाची दुसरी लाट भारतात फेब्रुवारी-मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात पसरली. कोव्हिड-19 चा डेल्टा व्हेरियंट त्सुनामीसारखा पसरला.

कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत लाखो लोकांना कोरोनासंसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.

भारतातील सर्वोच्च संशोधन संस्था इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने जुलै 2021 मध्ये देशभरात सिरो सर्व्हेक्षण केलं होतं. ज्यात कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात पसरलाय याबाबत माहिती गोळा करण्यात आली होती.

ज्यात, भारतातील 67 टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधी अॅन्टीबॉडी असल्याचं संशोधनात समोर आलं होतं.

  • दिल्लीत लोकांच्या शरीरातील कोरोनाविरोधी अॅन्टीबॉडीचं प्रमाण 97 टक्के
  • तर 90 टक्के मुंबईकरांच्या शरीरात कोरोनाविरोधी अॅन्टीबॉडीज आढळून आल्या होत्या

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, कोरोनाविरोधी लशीचा एक किंवा दोन्ही डोस घेतलेल्यांच्या शरीरात 90 टक्के तर, लस न घेतलेल्यांच्या शरीरात अॅन्टीबॉडीजचं प्रमाण 79 टक्के आढळून आलं होतं.

महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणतात, "मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये सिरो सर्व्हेक्षणात 90 टक्के लोकांमध्ये अॅन्टीबॉडीचं आढळून आल्यात. तर 88 टक्के लोकांना पहिला डोस मिळालाय."

हायब्रीड इम्युनिटी तिसरी लाट रोखू शकेल?

अमेरिका आणि युरोपात डेल्टासोबत 'ओमिक्रॉन' व्हेरियंट अत्यंत तीव्रतेने पसरतोय.

भारतात सद्यस्थितीत 'ओमिक्रॉन'चे फक्त 160 रुग्ण आढळून आले असले तरी, ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे भारतात तिसरी लाट येण्याची भीती मात्र कायम आहे.

तज्ज्ञ सांगतात, कोरोनासंसर्ग आणि लसीकरण यामुळे भारतात कोट्यावधी लोकांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार झालीये. मग प्रश्न पडतो हायब्रीड इम्युनिटी ओमिक्रॉनची तिसरी लाट रोकू शकेल?

दिल्लीच्या इंन्स्टिट्युट ऑफ जिनोमिक्स एंड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, "लोकांच्या शरीरात तयार झालेली हायब्रीड इम्युनिटी ओमिक्रॉन व्हेरियंटची संभाव्य लाट रोखण्यासाठी नक्कीच उपयोगी आणि फायदेशीर ठरू शकेल." पण, याचा नक्की किती फायदा होईल हे काही दिवसांनंतर स्पष्ट होईल.

भारतात 82 कोटीपेक्षा जास्त लोकांना लशीचा एक डोस आणि 55 कोटींपेक्षा जास्त लोकांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

ऑल इंडिया इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस हैद्राबादचे संचालक डॉ. विकास भाटिया सांगतात, "भारतात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात हायब्रीड इम्युनिटी तयार झालीये."

कोरोना चाचणी

फोटो स्रोत, PA Media

ओमिक्रॉन व्हेरियंट तीन पटींनी जास्त संसर्गजन्य आहे. मग, हायब्रीड इम्युनिटीचा फायदा होईल? ते म्हणाले, "संशोधनातून ही गोष्ट पुढे आलीये की ज्या लोकांमध्ये हायब्रीड इम्युनिटी आहे. त्यांना ओमिक्रॉन व्हेरियंटपासून चांगली सुरक्षा मिळाली आहे."

अमेरिका आणि युरोपसह जगभरातील अनेक देशात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आलेत. भारतात सद्य स्थितीत डेल्टा आणि डेल्टा डेरिव्हेटिव्हज् म्हणजे डेल्टाच्या इतर व्हेरियंटचे जास्त रुग्ण आढळून येत आहेत.

डॉ. राजेश कार्यकर्ते पुढे सांगतात, "नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती शरीरातील म्युकस मेंब्रेनला IgA या प्रकारच्या अॅन्टीबॉडी संरक्षण देते आणि इंजेक्शनद्वारे दिल्या गेलेल्या लसीमुळे IgM आणि IgG या प्रकारच्या अॅन्टीबॉडीज तयार होतात. या शरीरातील रक्त आणि टिश्यूंना संरक्षण देतात."

नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी काहीसा वेग लागलो. विषाणू हावी झाला तर इम्युनिटी बिघडवू शकतो. त्यामुळे नैसर्गिक इम्युनिटी चांगली असेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरणावर भर दिला पाहिजे.

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. लीना गजभर बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "लसीकरण आणि नैसर्गिकरित्या झालेल्या कोरोनासंसर्गानंतर मिळालेल्या इम्युनिटीमुळे. कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरा लाट थोडी कमी तीव्रतेची असायला हवी."

केरळच्या सेंटर फॉर आर्थरायटीस आणि रुमॅटीझमचे संचालक डॉ. पद्मनाभ शेनॉय यांच्यामते भारतात ओमिक्रोनची तीव्र लाट येणार नाही. ट्विटरवर ते लिहीतात, "भारतात ओमिक्रोनची लाट येईल. पण इतर देशांच्या तुलनेत ही तीव्र नसेल. देशात कोरोनासंसर्ग आणि लसीकरणामुळे लोकांमध्ये हायब्रीड इम्युनिटी तयार झालीये."

हायब्रीड इम्युनिटीमुळे संरक्षण मिळेल?

हायब्रीड इम्युनिटीमुळे कोरोनापासून संरक्षण मिळेल का? हे समजावून देण्यासाठी डॉ. कार्यकर्ते खालील उदाहरण देतात

  • कोरोनासंसर्ग झाल्यानंतर लस देण्यात आली तर, नैसर्गिक इम्युनिटी आणि लशीमुळे संरक्षण मिळेल. त्यामुळे अंदाज आहे की या परिस्थितीत आजार होण्याची शक्यता कमी असेल किंवा आजार गंभीर होणार नाही
  • पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनासंसर्ग झाला आणि त्यानंतर लशीचा दुसरा डोस मिळाला तरीदेखील इम्युनिटीमुळे संरक्षण मिळण्याची शक्यता आहे

त्यामुळे तज्ज्ञ म्हणतात, या परिस्थितीत येणाऱ्या व्हेरियंटला तोंड देण्यासाठी हायब्रीड इम्युनिटीची आपल्याला मदत होईल अशी सद्य स्थितीत आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो

गेल्या काही दिवसांपासून भारतात लोक कोरोना संपल्यासारखं वागत आहेत. डॉ. कार्यकर्ते सांगतात, "हायब्रीड इम्युनिटी आपल्याला मदत करेल किंवा नाही माहित नाही. पण सर्वांनी मास्कचा वापर केला पाहिजे. लस घेतलीच पाहिजे आणि बंद खोलीत हवा खेळती राहिली पाहिजे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)