NFHS 5: भारतात खरंच पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या वाढलीय का?

2011 ची जनगणना

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES

    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारत सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाची (NFHS) आकडेवारी जाहीर करण्यात आल्यानंतर एका आकड्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सर्वेक्षणात समोर आलं की, देशात 1000 पुरुषांच्या तुलनेत 1020 महिला आहेत. याआधी म्हणजेच 2011च्या जनगनणेत 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या 943 इतकी होती.

ही वाढ लक्षात घेण्याआधी सगळ्यात आधी हे समजून घ्यायाला हवं की, अशी तुलना संभ्रम निर्माण करणारी आहे. कारण राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण हे एक सर्व्हे आहे, तर जनगणना ही एकप्रकारची मोजणी आहे.

NFHS-5 मध्ये देशातल्या 6 लाख कुटंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं, तर जनगणना ही देशातल्या 125 कोटी लोकसंख्येची असते.

मुंबईत आरोग्यविषयक बाबींवर काम करणारी संस्था सेहतच्या संयोजक संगीता रेगे यांचंही असंच मत आहे. त्या दुसऱ्या एका बाबीकडेही लक्ष वेधतात.

त्या सांगतात, "NFHS आपल्या सर्वेक्षणात स्थलांतराचा विचार करत नाही. त्यामुळे मग घरोघरी जाऊन जे सर्वेक्षण केलं जातं, त्यात परगावी कामासाठी गेलेल्या पुरुषांमुळे महिलांची संख्या जास्त मिळू शकते."

सर्वेक्षणाचे आकडे चुकीचे आहेत का?

सरकारसाठी हे सर्वेक्षण 'इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स'नं केलं आहे.

संस्थेच्या मायग्रेशन अँड अर्बनायझेशन स्टडीजचे प्राध्यापक आर.बी.भगत यांनी मान्य केलंय की, महिला आणि पुरुषांचं लिंग गुणोत्तर जाणून घेण्यासाठी जनगणना ही सर्वांत आश्वासक पद्धत आहे.

त्यांनी म्हटलं, "सॅम्पल सर्व्हेमध्ये नेहमीच सॅम्पलिंगमध्ये चूक होण्याची शक्यता असते, ही चूक लोकसंख्या मोजताना होत नाही. आता पुढची जनगणना जेव्हा होईल तेव्हा 2011च्या तुलनेत लिंग गुणोत्तरांचं महिलांचं प्रमाण चांगलंच असेल. पण, माझ्या मते इतकी मोठी वाढ दिसणार नाही."

एका निकालानंतर जल्लोष करताना मुली

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES

'सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज'चे माजी संचालक संजय कुमार हेसुद्धा सर्वेक्षणाच्या निकालावर चकित झाले आहेत. पण, कार्यप्रणालीबाबत आश्वस्त आहेत.

ते सांगतात, "सॅम्पल सर्व्हे हा एका ठरावीक पद्धतीनं केला जातो आणि सॅम्पल जर लक्ष देऊन निवडलं तर ते लहान जरी असलं तरी बरोबर निकाल देऊ शकतं."

त्यांच्या मते, 1020:1000 हे आकडे समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील आणि ग्रामीण-शहरी भागातील निष्कर्षांचा अभ्यास करावा लागेल.

सर्वेक्षणात महिलांची संख्या जास्त का?

याचं एक कारण म्हणजे महिलांचं जीवनमान (लाइफ एक्सपेक्टेंसी अॅट बर्थ) जास्त असणं हे आहे, असं संगीता रेगे सांगतात.

भारताच्या जनगणना विभागाच्या 2013 ते 2017 अंदाजानुसार, भारतात महिलांचं जीवनमान 70.4 वर्षं आहे, तर पुरुषांचं 67.8 वर्षं आहे.

यासोबतच बाळंतपणात होणारा मृत्यूंच्या प्रमाणातही चांगली कामगिरी होताना दिसत आहे.

मुलांच्या लिंगगुणोत्तरात वाईट कामगिरीत करणारं राज्य हरियाणातील एक शाळा

फोटो स्रोत, MINT

फोटो कॅप्शन, मुलांच्या लिंगगुणोत्तरात वाईट कामगिरीत करणारं राज्य हरियाणातील एक शाळा

आरोग्य मंत्रालयानं लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, सर्वेक्षणात समोर आलंय की, 2014 ते 2016 दरम्यान दरवर्षी 1 लाख मुलांच्या जन्मामागे 130 महिलांचा मृत्यू होत होता. 2016 ते 2018 दरम्यान ही संख्या 113 वर पोहोचली आहे.

महिलांविषयी सर्वेक्षणात माहिती देण्याचं वाढलेलं प्रमाण हेसुद्धा यामागचं एक कारण असू शकतं, असं प्राध्यापक भगत यांना वाटतं.

ते सांगतात, "यापूर्वी महिलांना कुटुंबात महत्त्व दिलं जात नव्हतं. पण, गेल्या काही दशकांपासून महिलाकेंद्री सरकारी योजना आल्यानंतर अधिकृतरित्या महिलांचं नाव नोंदवण्याची पद्धत वाढली आहे. यामुळे मग महिलांचीही मोजणी या सगळ्या सरकारी प्रक्रियेत होत आहे."

लिंगचाचणी आणि भ्रूणहत्या खालावल्या?

NHFS 5 नुसार, जन्मावेळेचं लिंग गुणोत्तर (सेक्स रेशो अॅट बर्थ) 929:1000 इतकं आहे.

'सेक्स रेशो अॅट बर्थ' काढताना गेल्या 5 वर्षांत जन्म झालेल्या मुलांचं लिंग गुणोत्तर काढलं जातं.

प्राध्यापक भगत यांच्या मते, "लिंग चाचणी आणि भ्रूण हत्येविषयी जाणून घेण्यासाठी 'सेक्स रेशो अॅट बर्थ' चांगला पर्याय आहे. पण तो अद्याप कमी असल्यानं त्यासाठी अजून खूप काम करणं गरजेचं आहे, असं यातून दिसून येतं."

जन्मावेळी मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण कमी होण्याच्या काही शास्त्रीय कारणांकडेही संगीता रेगे लक्ष वेधतात.

लिंग गुणोत्तर

फोटो स्रोत, NARINDER NANU

त्या सांगतात, "अनेक शोधांमध्ये असं दिसून आलंय की, ऐतिहासिकरित्या पहिलं बाळ मुलगा असण्याची शक्यता जास्त राहिली आहे. तसंच मुलाच्या जन्मावेळी गर्भपात होण्याची शक्यता अधिक राहिली आहे. जसजसं आधुनिक तंत्रज्ञान आलं, छोट्या कुटुंबाची पद्धत पुढे आली. तसंच गर्भनिरोधकांचा वापर वाढला आहे. त्यामुळे मग नवजात बालकांमध्ये मुलांचं प्रमाणही वाढलं आहे."

आकड्यांवर नजर टाकल्यास हेही लक्षात ठेवायला हवं की, 2011च्या जनगणनेनुसार 6 वर्षांपर्यंतच्या लहान बाळांचं लिंग गुणोत्तर आतापर्यंत सगळ्यात कमी 919 इतका होतं.

NHFS-5 च्या लिंग गुणोत्तराच्या आकड्यांमुळे सगळे जाणकार संभ्रमात आहेत. पण, येणाऱ्या काळासाठी उमेदही बाळगून आहेत.

आरोग्य आणि लोकसंख्येवर काम करणारी संस्था पॉप्युलेशन फर्स्टच्या संचालक ए.एल. शारदा 'टू गुड टू बी ट्रू' असं संबोधत सामाजिक विचारात आता बदल दिसत असल्याचं सांगत आहे.

त्या सांगतात, "2031च्या जनगणनेकडून मला खूप अपेक्षा आहेत. आता जी पीढी शाळेत आहेत त्यांनी तोवर लग्न केलेलं असेल, ते पालक बनतील आणि जो बरोबरीचा विचार सरकारी योजना आणि इतर मोहिमांमधून माडंला जात आहे, त्याला ते समोर घेऊन जातील."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)