अमोल कोल्हे : एकांतवासात जातोय, घेतलेल्या निर्णयांचा विचार, कदाचित फेरविचार करणार

अमोल कोल्हे

फोटो स्रोत, facebook

अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी आपण एकांतवासात जात असल्याची घोषणा केली आहे. एकांतवासात गेल्यानंतर आपण घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचारही करणार असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं. त्यामुळेच चर्चेला उधाण आल्याचं दिसून येतं.

खासदार अमोल कोल्हे यांनी ही फेसबुक पोस्ट रविवारी (7 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजून 16 मिनिटांनी लिहिली. यामध्ये ते म्हणतात, "सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय...थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा!

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू...नव्या जोमाने, नव्या जोशाने!!"

शिवाय, फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतन शिबीरासाठी नाही, असं म्हणत अखेरीस एक टीपही दिली आहे.

अमोल कोल्हे

फोटो स्रोत, facebook

खासदार अमोल कोल्हे हे खरंतर मूळचे अभिनेते. त्यांनी टीव्ही मालिकेमध्ये केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. पुढे अमोल कोल्हे यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला काही काळ ते शिवसेनेत होते. पण लोकसभा 2019 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांच्या मतदारसंघातील लढतीने राज्याचं लक्ष वेधून घेतलं. अखेर अतिशय रंगतदार झालेल्या या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी तत्कालीन शिवसेना खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांना पराभूत केलं

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची कमान त्यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी अमोल मिटकरी यांच्यासमवेत शिवस्वराज्य यात्रेतून पक्षाचा जोरदार प्रचार केला. त्यांच्या प्रचारसभांना लोकांचा लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, असा दावा पक्षाने केला होता.

याशिवाय, लोकसभेतही अमोल कोल्हे पक्षाची बाजू ठामपणे मांडताना दिसतात. विशेषतः भाजपवर ते आक्रमक भाषेत टीका करत असल्याचं अनेक प्रसंगी दिसून आलं आहे.

गेले काही दिवस अमोल कोल्हे यांच्या नावाची फारशी चर्चा नव्हती. पण आजच्या या फेसबुक पोस्टमुळे कोल्हे यांच्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

ही पोस्ट करून त्यांनी एखादा अनपेक्षित निर्णय घेणार असल्याचे संकेत तर दिले नाहीत ना, अशी चर्चाही सुरू आहे.

कोल्हे यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने त्यांच्या पोस्टवर कमेंट्स केल्याचं दिसून येत आहे.

अभय भन्साळी म्हणतात, "अतिशय योग्य निर्णय शरीराचा आणि मनाचा थकवा घालवण्यासाठी विश्रांती हि हवीच ती पुर्ण झाली कि शरीर आणि मन पुन्हा ताजेतवाने होईल मग गगनभरारी घ्यायला आकाश पुन्हा मोकळे आहे. विश्रांती नंतर पुन्हा नवीन जोशासह लोकहिताची जास्तीतजास्त कामे तुमच्याकडून व्हावीत हीच सदिच्छा."

तर विवेक येवले पाटील नामक युझरने कोल्हे यांनी पोस्टवर प्रतिक्रिया देताना त्यांना चिमटेही काढले.

जनतेपेक्षा तुमचा जास्त वेळ इतरांच्या प्रचारासाठी गेला म्हटल्यावर ताणतणाव वाढणारच, अशा शब्दात पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)