सातबारा उताऱ्याचा जन्म नेमका कसा झाला?

फोटो स्रोत, aapleabhilekh.mahabhumi.gov.in
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
सातबारा उतारा म्हणजे शेतकऱ्याचा जीव की प्राण. वंशपरंपरेनं आपल्याकडे आलेली जमीन असो की स्वत: कष्ट करून एक एकराची 10 एकर केलेली जमीन असो, सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद केलेली असते.
शेतकऱ्याचा जमिनीवरील मालकी हक्क सांगणारा कागद असतो सातबारा उतारा. सातबारा उताऱ्यातील गाव नमुना 7 संबंधित शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याची माहिती नोंदवलेली असते, तर गाव नमुना 12 ही पिकांची नोंदवही असते.
गाव नमुना 12 वर शेतकऱ्यानं त्याच्याकडे असलेल्या जमिनीवर कोणती पिके घेतली आहेत, याची माहिती दिलेली असते. असं असलं तरी अनेकांना फक्त सातबारा उताऱ्याच्या जन्माविषयीच्या आख्यायिका तेवढ्या माहित असतात.
पण, सातबारा उताऱ्याचा जन्म कसा झाला, सातबारा उताऱ्याचा प्रवास कसा होता आणि साताबारा उताऱ्यासंबंधित आख्यायिकांचं वास्तव काय आहे, याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.
सातबारा उतारा आणि आख्यायिका
सातबारा या नावाविषयीच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
पहिल्या आख्यायिकेनुसार, अहिल्याबाई होळकर यांनी सरकारी खर्चानं गरीब माणसांच्या दारात 12 फळझाडं लावली होती. त्यातली 7 फळझाडं त्या गरीब माणसाची आणि 5 सरकारची. त्या गरीब माणसावर या फळझाडांची निगा राखण्याची जबाबदारी दिली होती.
या 12 झाडांना येणाऱ्या फळांपैकी 7 झाडांची फळे ही त्या गरीब माणसानं घ्यायची आणि उरलेल्या 5 झाडांची फळे ही इतर गरिबांना वाटण्यासाठी सरकारला द्यायची, असं ठरवलं गेलं.
या झाडांच्या नोंदीसाठी एक विशेष सरकारी दप्तर निर्माण करण्यात आलं आणि मग तेव्हापासून या झाडांच्या नोंदीच्या उताऱ्याला सातबाऱ्याचा उतारा असं म्हणण्याचा प्रघात पडला, तो आजपर्यंत चालू आहे.

फोटो स्रोत, PUNNET KUMAR/BBC
सातबारा उताऱ्याविषयीची दुसरी आख्यायिका सांगते की, एका कायद्याच्या कलम 7 आणि 12 मध्ये जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात उल्लेख आहे. म्हणून मग या 7 आणि 12 व्या कलमामुळे जमीन मालकीच्या कागदाला सातबारा असं नाव पडलं.
सातबारा उताऱ्याशी संबंधित अशा आख्यायिका तुम्हाला वाचायला मिळतील, पण वास्तव काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही महसूल कायद्याची जाण असलेल्या तज्ञांशी संपर्क साधला.
याविषयी परभणीचे उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी सांगितलं, "सातबारा उताऱ्याशी संबंधित या सगळ्या दंतकथा पसरवण्यात आल्या आहेत. सातबारा उताऱ्यात गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 एकाच पत्रकात असल्यामुळे त्याला सातबारा उतारा म्हटलं जातं. यापलीकडे दुसरं काहीही नाहीये."
तर अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्याचे मंडळ अधिकारी मोहसिन शेख सांगतात, "महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या खंड 4 नुसार, तलाठी दप्तरात गाव नमुना 1 ते गाव नमुना 21 हे नमुने तयार झाले. त्यामध्ये सात आणि 12 नंबरचा नमुना हा जमिनीशी संबंधित असल्यामुळे तो एकत्रित केल्यामुळे त्याला सातबारा म्हणतात. बाकी त्याच्या नावाशी 7 कलम आणि 12 कलम असा काही संबंध नाही."
सातबारा उताऱ्याचा प्रवास
1910 साली बंदोबस्त योजना आली. या योजनेत जमिनीची मोजणी करून जमिनीचे अभिलेख तयार करण्यात आले. त्यात प्रत्येक क्षेत्रास एक नंबर दिला गेला, ज्याला सर्व्हे नंबर म्हटलं जातं.
या योजनेअंतर्गत तयार झालेल्या जमिनीच्या अभिलेखांना 'कडईपत्रक' असं म्हणतात. सातबारा येण्यापूर्वी या कडईपत्रकात जमिनीची माहिती दिली जात होती.

1930 साली इंग्रजांनी जमाबंदी केली. जमाबंदी म्हणजे जमिनीवर अधिकृतरित्या वसूल बसवण्यात आला, आकारणी ठरवण्यात आली. जमिनीची मोजणी होऊन नवीन खातेपुस्तिका तयार झाली. त्यातून मग 1930 साली सातबारा उताऱ्याचा नवीन नमुना जन्मास आला.
1930 साली इंग्रजांनी जमाबंदी केल्यापासून आजतागायत जमाबंदी झालेली नाही.
सातबारा उताऱ्यात काय असतं?
सातबाऱ्यावर सुरुवातीला गाव नमुना 7 आणि खाली गाव नमुना 12 असतो.
गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, हे नमूद केलेलं असतं.
यामध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात गट क्रमांक दिलेला असतो आणि त्यानंतर कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत ही जमीन येते, ते सांगितलं असतं. भूधारणा पद्धतीचे एकूण 4 प्रकार पडतात.
भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीतमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.
भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही. यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इ. जमिनींचा समावेश होतो.

तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या 'सरकार' या प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.
चौथ्या प्रकारात 'सरकारी पट्टेदार' जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वार दिल्या जातात.
सातबाऱ्यावर तुमच्याकडे किती जमीन आहे ते हेक्टर आरमध्ये दिलेलं असतं. ती जिरायती आहे, बागायती आहे का तेसुद्धा सांगितलेलं असतं. एकूण क्षेत्र किती ती सांगितलेलं असतं. त्याखाली पोट खराब म्हणजेच लागवडीस अयोग्य अशा जमिनींची माहिती दिलेली असते.
त्यानंतर भोगवटादाराचं नाव म्हणजे ती जमीन कुणाच्या मालकीची आहे, ते सांगितलेलं असतं. त्यासमोर या जमिनीवर किती कर म्हणजेच शेतसारा आकारला जातो ते सांगितलं आहे.
त्यानंतर खाली गाव नमुना -12 असतो. ही पिकांची नोंदवही असते.
यात तुम्ही कोणत्या वर्षी कोणती पीकं घेतली, ती किती क्षेत्रावर घेतली आणि त्यासाठी जलसिंचनाचा स्रोत काय आहे, हे नमूद केलेलं असतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








