प्रियांका गांधी लखीमपूर खिरीमध्ये मारल्या गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांबाबत म्हणतात...

फोटो स्रोत, ANI
अनेक तासांच्या राजकीय घडामोडींनंतर अखेर प्रियांका गांधी आणि राहुल गांधी लखीमपूरला जाऊ शकले.
पण दोन दिवसांपूर्वी सोमवारी प्रियांका गांधी लखीमपूरला जाण्यासाठी उत्तर प्रदेशात पोहोचल्या, त्यावेळी त्यांना सीतापूरमध्ये अडवण्यात आलं होतं. त्याठिकाणी त्यांना एका गेस्टहाऊसमध्ये ठेवण्यात आलं. दोन दिवसांनी बुधवारी राहुल गांधीही लखीमपूरला जायला निघाले. मात्र, लखनऊ विमानतळावर त्यांना अडवण्यात आलं.
प्रियांका गांधींनी पोलिसांवर, त्यांना बेकायदेशीररित्या तब्यात ठेवल्याचा आरोप केला. तर राहुल गांधींनीही यूपी सरकारला त्यांना कैद्यांप्रमाणे नेण्याची इच्छा असल्याचं म्हटलं.
प्रियांका गांधी यूपी पोलिसांच्या ताब्यात असताना बीबीसी प्रतिनिधी विनीत खरे यांनी फोनद्वारे त्यांच्याशी चर्चा केली. लखीमपूरमध्ये पीडितांना भेटायला जाण्यापासून रोखण्यासाठी 60-70 तास बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवल्याचं प्रियांका यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- प्रियांका
काँग्रेस घटनेचं राजकारण करत असल्याचा आरोप होतोय, असं प्रियंका गांधी यांना विचारण्यात आलं. त्यावर "सगळ्यांत जास्त राजकारण भाजप करतंय. त्यांनी दुसऱ्यांना दोषी ठरवलं असून, ते स्वतःला राष्ट्रवादी म्हणतात," असं प्रियांका म्हणाल्या.
"मात्र, कोणते राष्ट्रवादी शेतकऱ्यांना अशाप्रकारे चिरडून जातात आणि त्यावर कारवाईही होत नाही? कोणते राष्ट्रवादी राज्यातील सगळ्या पोलिसांना एका महिलेला अडवण्यासाठी पाठतील, मात्र आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करणार नाहीत?"

फोटो स्रोत, ANI
"पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातील जे गृह राज्यमंत्री आहेत, त्यांच्या अंतर्गत संपूर्ण देशातील पोलीस खातं आहे. मग पोलिसांना त्याच मंत्र्यांना रिपोर्ट करायचं असेल, तर ते खरंच निःपक्ष कारवाई करू शकतील का? हे मला पंतप्रधानांना विचारायचं आहे."
"आमचा केवळ राजकीय उद्देश नाही तर हा आमचा नैतिक अधिकारही असावा असं कोणते राष्ट्रवादी म्हणतील? आम्ही सत्तेत आहोत तर, नैतिकेच्या आधारे त्या व्यक्तीला बरखास्त करायला हवं, म्हणजे संपूर्ण देशाला देशात न्याय असल्याचं समजेल, असं कोणते राष्ट्रवादी म्हणतील? चौकशीत त्यांचा मुलगा निर्दोष असेल तर त्यांना पुन्हा मंत्री बनवू शकता, यात एवढी मोठी अडचण काय आहे?" असे अनेक सवाल प्रियांका यांनी उपस्थित केले.
दबाव निर्माण करण्यात किती यशस्वी?
विरोधकांचं काम सरकारवर दबाव निर्माण करण्याचं असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. मात्र मग, अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्दयावर विरोधकांना सरकारवर दबाव निर्माण करता आलेला नाही, असं म्हणणं योग्य ठरणार नाही का, असंही प्रियांका यांना विचारण्यात आलं.

फोटो स्रोत, Hindustan Times
त्यावर, "आम्ही सातत्यानं सरकारवर दबाव आणत आहोत. गेल्या तीन चार वर्षांमध्ये आपण अखिलेश यादव आणि मायावती यांना कधी सरकारवर दबाव आणताना पाहिलंय का? मात्र तुम्ही काँग्रेसबाबत असं म्हणू शकत नाही," असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
"हाथरस, उन्नाव, शाहजहांपूर अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही होतो. काँग्रेसनं आंदोलनं केली. संपूर्ण राज्यात कित्येक कार्यकर्त्यांना अटक झाली. बसपा, समाजवादी पार्टी त्यावेळी कुठं होती. आम्ही प्रत्यक्ष लोकांमध्ये गेलो आणि त्यांचा आवाज सर्वांसमोर मांडला. आम्ही सतत संघर्ष केला आहे. काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला नाही, असं तुम्ही म्हणून शकत नाही."
"मात्र, आपल्या देशात माध्यमं ते दाखवयला तयार नाहीत, ही अडचण नक्कीच आहे. माध्यमं भेदभाव करतात. बहुतांश माध्यमांची प्रतिमा ही सरकारचा प्रचार करणारी माध्यमं अशी बनली आहे," असा आरोप प्रियांका यांनी केला.
'कमकुवत विरोधक' बाबत काय म्हणाल्या प्रियांका?
विरोधक कमकुवत असल्याचं सातत्यानं म्हटलं जात आहे. त्यामुळं सरकार जे काही करतं, त्यासाठी दुबळा विरोधीपक्ष जबाबदार असणं हेही कारण आहे का? दुबळे विरोधक ही पंतप्रधानांची जमेची बाजू आहे का? असा सवाल प्रियांका गांधींना विचारण्यात आला.

फोटो स्रोत, Barcroft Media
प्रियांका यांनी मात्र हा दावा फेटाळला. "मला वाटतं विरोधी पक्ष त्यांच्या राज्यांत, त्यांच्या परीनं प्रयत्न करतात. काँग्रेस पक्ष सातत्यानं प्रयत्न करतो. आम्ही नेहमी संघर्ष करत आहोत. आम्हाला आज एका मोठ्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. सरकारनं कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे. मंत्र्यांची हकालपट्टी व्हावी अशी आमची इच्छा आहे. या प्रकरणातील सर्व दोषींना अटक व्हावी, असं आम्हाला वाटतं. इतर मुद्द्यावर आपण नंतर बोलू शकतो."
निवडणुकीवर परिणाम होणार का?
या घटनेकडे निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पाहत नसल्याचं प्रियांका म्हणाल्या. "कशा प्रकारे जीपखाली चिरडून निर्घृण लोकांची हत्या केली, याचा व्हीडिओ तुम्ही पाहिला असेल. संपूर्ण देश पाहत आहे. त्यामुळं हा निवडणुकीचा मुद्दा नाही. सगळ्यांच्या मनात संताप आहे. न्याय व्हावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. अशा प्रकारच्या घटना घडतील आणि न्याय होणारच नाही, अशी आपल्या देशाची प्रतिमा बनावी, अशी कुणाचीही इच्छा नाही."
इतर पीडित कुटुंबांनाही भेटणार का प्रियांका?
लखीमपूरमध्ये चार शेतकऱ्यांशिवाय इतर पाच जणदेखिल मारले गेले आहेत. काही माध्यमांनी ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलं आहे.
या कुटुंबांनाही भेटणार का? असं प्रियांका यांना विचारण्यात आलं.
"मी आधीच म्हटलं आहे की, हिंसा कुणाबरोबरही झाली तरी चुकीचीच आहे. त्यांच्याप्रती देखील माझ्या संवेदना आहेत. सकाळी मला विचारण्यात आलं की, मला कुणा-कुणाला भेटायचं आहे. त्यावर मी म्हटलं की, त्यांची तयारी असेल तर मीही त्यांना भेटायला तयार आहे. ज्यांना वेदना होतायत, ज्यांनी नातेवाईक गमावले आहेत, सर्वांप्रती आमची सहानुभूती आहे. मग ते भाजपचे असो वा कोणीही असो," असं प्रियंका म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








