Bigg Boss Marathi: तृप्ती देसाई कोण आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
'सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉसच्या स्पर्धक तृप्ती देसाईंनी आपण लवकरच राजकारणात जाणार आहोत अशी घोषणा केली आहे. 2012 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर महानगर पालिका निवडणूक लढवली होती. असं म्हटलं जातं त्यामुळे त्या पुन्हा एकदा राजकारणात एंट्री मारणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
तृप्ती देसाई या बिग बॉस सिजन 3 - मराठीतील स्पर्धक होत्या. त्या आता बाहेर पडल्या आहेत. बाहेर पडताना सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांना त्यांनी आपल्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले आहे.
मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील नावाजलेल्या चेहऱ्यांसोबतच स्पर्धकांच्या यादीत असेही चेहरे आहेत ज्यांना 'बिग बॉस'च्या घरात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांपैकीच एक नाव होतं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचं.
'बिग बॉस'चे सूत्रसंचालक आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी तृप्ती देसाईंना 'बिग बॉस'च्या घरात येण्यामागचं कारण विचारलं. या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, समाजात माझी जी प्रतिमा निर्माण झाली आहे, त्या प्रतिमेच्या पलिकडे जाऊन मी व्यक्ती म्हणून कशी आहे हे लोकांना समजावं यासाठी 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
टीव्हीवर, सोशल मीडियावर लोकांनी मला कायम महिलांच्या हक्कांसाठी भांडताना, आंदोलनादरम्यान अटक होताना पाहिलं आहे. मी भांडखोर आहे अशी जी प्रतिमा निर्माण झालीये किंवा गैरसमज झालाय तो बदलण्यासाठी मी या शोमध्ये सहभागी झाले आहे, असं तृप्ती देसाईंनी म्हटलं.
महिलांना मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यांवरून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई परिचित आहेत. आजवर अनेक धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी आंदोलनं केली आहेत.
त्या पहिल्यांदा चर्चेत आल्या ते शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावण्यासाठी केलेल्या आंदोलनातून. पण फार कमी जणांना माहीत असेल की त्याआधी त्यांनी अजित पवारांसोबत पंगा घेतला होता.
तृप्ती देसाईंची दखल मीडियाने सर्वप्रथम घेतली ती त्यांनी अजित सहकारी बँक आणि पतसंस्थेविरोधात केलेल्या आंदोलनामुळे. ही बँक अजित पवारांच्या नावाने त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी सुरू केली होती. या बँकेत झालेल्या काही गैरप्रकारांविरुद्ध देसाई यांनी 2008 साली आंदोलन छेडलं होतं, असं पुण्यातल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने सांगितलं.
त्या आंदोलनादरम्यान आपल्याला धमक्या आल्या होत्या, असा दावाही देसाई करतात. 2009 साली त्यांनी काँग्रेसकडे निवडणुकीचं तिकिटही मागितलं होतं, पण ते त्यांना मिळालं नाही.
भूमाता रणरागिणी ब्रिगेड
तृप्ती मूळ कोल्हापूरच्या, पण त्यांचं कुटुंब नंतर पुण्यात स्थायिक झालं. पुण्याच्या SNDT महाविद्यालयातून त्यांनी होम सायन्सची पदवी घेतली.
पत्रकार अश्विनी सातव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं, "सुरुवातीला त्या अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनात दिसल्या. त्यानंतर त्यांनी बुधाजीराव मुळीकांच्या भूमाता ब्रिगेड या संस्थेत काम करायला सुरुवात केली."

फोटो स्रोत, TRUPTI DESAI
ही संघटना खरंतर शेतकऱ्यांच्या पत्नींच्या मदतीसाठी स्थापन केली होती आणि त्या वेळेस तिचा मंदिर प्रवेश आंदोलनाशी फारसा संबंध नव्हता, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन यांनी दिली होती.
अश्विनी म्हणतात की नंतर मुळीकांच्या संस्थेतून देसाई बाहेर पडल्या आणि 2010 साली स्वतःची भूमाता रणरागिणी ब्रिगेड स्थापन केली. "मुळीकांच्या संस्थेतून त्या बाहेर पडल्या असल्या तरी त्यांनी आपल्या संस्थेचं नाव त्यांच्या संस्थेशी साधर्म्य असणारंच ठेवलं आहे," हे चंद्रन यांनी सांगितलं.
या संस्थेमार्फत त्या महिलांच्या मंदिरप्रवेशाच्या हक्कांविषयी लढा देतात.
शनिशिंगणापूर आंदोलन
तृप्ती देसाईंची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली ती शनिशिंगणापूर आंदोलनाच्या निमित्ताने. देवस्थानातल्या मुख्य चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी तेव्हा ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्या विद्या बाळ आणि अॅड निलिमा वर्तक या न्यायलयीन लढाई लढत होत्या.
शनिशिंगणापूर महिला प्रवेश प्रकरणी त्यांनी हायकोर्टात अपील केली होती. आणि याच दरम्यान तृप्ती देसाईंनी या न्यायालयीन लढाईला रस्त्यावरच्या आंदोलनाचं रूप दिलं.

फोटो स्रोत, AFP
दरम्यान, विद्या बाळ आणि अॅड. वर्तकांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हायकोर्टाने महिलांसाठी चौथरा खुला केला. पण गंमत म्हणजे, तरीही शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर चढणाऱ्या तृप्ती देसाई पहिल्या महिला आंदोलक नव्हत्याच.
"त्यांच्या आधी प्रियंका जगताप आणि त्याच्यासोबत असणाऱ्या महिलांच्या गटाने सगळ्यांत आधी शनिशिंगणापूरला चौथऱ्यावर प्रवेश केला," अशी माहिती पत्रकार अश्विनी सातव यांनी दिली होती.
न्यायालयीन लढाईही नाही आणि चौथऱ्यावर सर्वप्रथम प्रवेशही नाही, असं असतानाही शनिशिंगणापूर चौथरा प्रवेशाचं श्रेय बऱ्यापैकी त्यांच्या पदरी पडलं.
राजकीय महत्त्वाकांक्षा
तृप्ती देसाईंच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, हे त्यांना जवळून पाहिलेल्या अनेक जाणकारांनी मान्य केलं आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक पक्षांचे उंबरेसुद्धा झिजवले आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK/TRUPTI DESAI
"मी त्यांना पहिल्यांदा एका राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरच पाहिलं होतं. तिथे आपली दखल घेतली जावी, असा त्यांचा प्रयत्न होता," असं प्रतिभा यांनी म्हटलं होतं "त्यानंतर त्या भाजपच्या कार्यालयात अनेकदा दिसल्या. म्हणजे अगदी प्रेस कॉन्फरन्स असेल तरी व्यासपीठावर त्या असायच्या वगैरे. मग काँग्रेसच्या कार्यक्रमात दिसल्या. जेव्हा राहुल गांधी पुण्यात आले होते, तेव्हा त्या सगळ्या कार्यक्रमात आवर्जून भाग घेताना दिसल्या."
प्रतिभा यांनी पुढे सांगितलं होतं, "जेव्हा आम आदमी पक्षाचा गवगवा सुरू झाला आणि हा पक्ष राजकारणात पुढे येऊ लागल्या, तेव्हा त्या मला 'आप'च्या व्यासपीठावरही दिसल्या. त्या असंही म्हणाल्या होत्या की आम आदमी पक्षाने मला तिकिट दिलं तर मी सुप्रिया सुळेंच्या विरोधातही लढेन. यावरूनच लक्षात येतं की त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा होती, किंबहुना आहे."
दुसऱ्या बाजूला पुण्यातल्या काही पत्रकारांना हेही वाटतं की राजकारणात यशस्वी होण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याची जी वृत्ती लागते ती त्यांच्यात नाही.
अश्विनी सांगतात की 2012 साली तृप्ती देसाईंनी पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर महानगरपालिकेची निवडणूक लढवली. पण त्यात त्या पराभूत झाल्या. "त्या कुठल्या एका पक्षाशी बांधील आहेत, असं मला नाही वाटतं. त्यांची पूर्वी अशी महत्त्वाकांक्षा असेलही पण आता तसं काही असेल, असं मला वाटत नाही. कारण त्यांची स्वतःची अशी कुठली भूमिका नाही, पुढे काय करायचं याचा ठाशीव कार्यक्रम नाही."
पब्लिसिटी स्टंट?
तृप्ती देसाईंवर एक आरोप असाही केला जातो की त्यांची आंदोलनं म्हणजे 'पब्लिसिटी स्टंट' असतात.
"तृप्ती देसाई प्रसिद्धीलोलुप आहेत. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, त्यामुळे त्या सातत्याने हिंदू धर्माच्या प्रथांविरोधात कार्य करतात. हाजीअली दर्गा आंदोलन त्यांनी मध्येच सोडून दिलं होतं. हिंदू धर्माव्यतिरिक्त त्या इतर धर्मांचा कठोर विरोध करत नाही," असं सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी म्हटलं होतं.
अश्विनी सातव यांनी नमूद केलं होतं, की तृप्ती देसाईंचा प्रसिद्धीसाठी अट्टहास असतो.
"पुण्यापासून जवळच एक देवाची हुबळी म्हणून एक गाव आहे. तिथेही कानिफनाथांच्या मंदिरात प्रवेश करायला महिलांना बंदी आहे. तृप्ती देसाई राहतात त्या पुण्यापासून हे गाव जवळच आहे. मग इथे महिलांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून त्यांनी काही का केलं नाही? कसंय, शनिशिंगणापूर, हाजी अली, कोल्हापूर, आता शबरीमला ही सगळी मंदिरं मोठी आहेत. तिथे काही केलं की लगेच मीडियात येतं," असं निरीक्षण सातव यांनी नोंदवलं.
"जेव्हा शनिशिंगणापूरनंतर त्यांना करायला काही नव्हतं तेव्हा त्यांनी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना मारहाण करणं, असले प्रकार केलेत. हेही प्रसिद्धीसाठीच होतं कारण याचे व्हीडिओही त्या स्वतःच बनवायच्या, अगदी माध्यमांना हवे असतील तसे एक दीड मिनिटांचे आणि स्वतःच माध्यमांकडे पाठवायच्या," सातव सांगतात.
तृप्ती देसाई त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले होतं. "आमचं काम राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आमच्या कामाला योग्य प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे टीकाकार आमच्यावर टीका करत आहे. आपला जीव धोक्यात घालून आम्ही हे काम करत आहोत. निदान या तरी गोष्टीचा टीकाकारांनी विचार करावा," असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








