नारायण राणे : 'फडणवीस मला कंटाळले नाहीत, सद्भावनेने दिल्लीला पाठवलं'

फोटो स्रोत, Getty Images
"मला माहीत नाही की देवेंद्र फडणवीस मला कंटाळले होते की काय म्हणून मला दिल्लीत पाठवलं. पण त्यांनी मला सद्भावनेने पाठवलं. प्रेमापोटी त्यांनी पाठवलं," असं जनआशीर्वाद यात्रेच्या सुरुवातीला भाषण करताना नारायण राणे यांनी म्हटलंय. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे अप्रत्यक्षपणे फडणवीस यांना टोमणा म्हणून पाहिलं जात आहे.
यावेळी भाषण करताना राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
"राज्यातली जनता उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला कंटाळली आहे. उद्धव ठाकरे हे त्यांच्या नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. आशेचा किरण म्हणून पुन्हा भाजपची सत्ता यावी असे जनतेला वाटत आहे," असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी केलम.
राणे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शनसुद्धा घेतलं. आपल्या जनआशीर्वाद यात्रेच्या पहिल्या दिवशी आपण बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर जाणार असल्याचं राणे यांनी जाहीर केलं होतं.
शिवसेनेच्या नेत्यांकडून सुरुवातीला त्यास थोडाफार विरोध झाला. पण अखेरीस राणे यांना स्मृतिस्थळावर जाण्यापासून रोखणार नसल्याचं शिवसेनेने स्पष्ट केलं.
'साहेब आज तुम्ही हवे होतात, मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही हवे होतात, तुमची खूप आठवण येते', असं स्मृतिस्थळाजवळ जाऊन आपण म्हटल्याचं राणे यांनी सांगितलं.
बाळासाहेब असते, तर आज डोक्यावर हात ठेवून त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला असता. असंच पुढे जात राहा, असा आशीर्वाद त्यांनी दिला असता, असं राणे म्हणाले.
नारायण राणे आज (19 ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास दिल्लीहून मुंबई येथे दाखल झाले. त्यानंतर अंधेरी परिसरातील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेस सुरुवात झाली.

राणे यांनी मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर राणे यांची यात्रा मार्गस्थ झाली.
यात्रेदरम्यान, खेरवाडी येथे नारायण राणे यांचं भाषण झालं. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह राणे यांचा पोटनिवडणुकीत पराभव करणाऱ्या माजी आमदार तृप्ती सावंत यासुद्धा उपस्थित होत्या.
महाराष्ट्रात आमचा जन्म झाला आहे. या भूमीवर फिरण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही दोन वर्षात राज्याला कसं मागे नेलं, हे आम्ही जनआशीर्वाद यात्रेतून लोकांना सांगू, आगामी महापालिका निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवू, असा इशारा नारायण राणे यांनी शिवसेनेला यावेळी दिला.

फोटो स्रोत, Getty Images
एक आठवडा चालणार यात्रा
19 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत ही यात्रा होणार आहे. नारायण राणे हे मुंबई शहर, उपनगर, वसई - विरार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत ही यात्रा असेल. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांची ही यात्रा महत्वाची मानली जात आहे. नारायण राणे यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी दिल्याचंही भाजपकडून सांगण्यात येत आहे.
आज नारायण राणे हे मुंबई शहरातल्या दादर, सायन, चेंबूर, चुनाभट्टी, गिरगावपासून ते हुतात्मा चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणी दौरा करतील. दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
20 ऑगस्टला मुंबई उपनगरातल्या शिवसेना प्रभावी असलेल्या भागात ते दौरा करणार आहेत. त्यानंतर एक दिवस वसई- विरार आणि तीन दिवस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा दौरा करतील.
नवे नेतृत्व रूजवण्याचा भाजपचा प्रयत्न?
केंद्रीय मंत्र्यांचा नव्याने प्रचार करण्यासाठी ही यात्रा प्रत्येक राज्यात काढण्यात आली आहे.
यामध्ये 'भाजपची जातीय, प्रांतीय समीकरणं निश्चित आहेत' असं जेष्ठ पत्रकार सुनिल चावके सांगतात.
सुनील चावके पुढे सांगतात, "केंद्रीय मंत्र्यांचा गाजावाजा करण्याची भाजपची जुनी पद्धत आहे. पण त्यांना काम करण्याचं स्वातंत्र्य किती आहे? लोकांची किती कामं या मंत्र्याकडून केली जातात? हे प्रश्न आहेत. नेतृत्व रूजवण्याचा हा जरी प्रयत्न असला तरी लोकांची कामं करणं हे महत्त्वाचं आहे. फक्त गाजावाजा करून नेतृत्व रूजवता येत नाही."

फोटो स्रोत, Twitter
याआधी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचाही असाच गाजावाजा केला. पण पुढे त्यांचा मतदारसंघात किती फायदा झाला हे उघड आहे.
त्यामुळे नेतृत्व हे प्रादेशिक पातळीवर लोकांनी स्वीकारल्याशिवाय रूजवता येणं शक्य नसतं. त्यात चार मंत्र्यांपैकी भागवत कराड सोडले तर तीन मंत्री हे बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा नव्याने प्रचार केल्याने फार फायदा होईल असं वाटतं नाही," असंही चावके म्हणतात.
राज्यात भाजपचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांकडे आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर हे नेते सोडले तर इतर नेते फार सक्रिय दिसत नसल्याचं अनेकदा बोललं जातं.
त्यात भाजपचे अंतर्गत मतभेद अनेकदा माध्यमांसमोर आले आहेत. त्यामुळे अंतर्गत वादामुळे पोखरलेली संघटना मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे का?

याबाबत जेष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "देवेंद्र फडणवीस हा भाजपचा चेहरा आहे. पण प्रादेशिक पातळीवर नवे नेते निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणता येईल."
"केंद्रीय मंत्री झालेले हे नेते काही नवीन नाहीत. भागवत कराड हे मुंडेंच्या काळापासून आहेत. नारायण राणे यांना मानणारा कोकणात एक वर्ग आहे.
भारती पवार या मूळ भाजपच्या नसल्या तरी आदिवासी भागात त्यांचं काम आहे. कपिल पाटील हे कल्याण ग्रामीणचे कित्येक वर्षे खासदार आहेत. त्यामुळे हे नेते जुनेचं आहेत. फक्त नव्या जबाबदार्यांसह त्यांचा प्रचार करण्याचा हा प्रयत्न आहे," असं नानिवडेकर म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








