स्वतः बनवलेल्या हेलिकॉप्टरच्या पात्यांनीच केला घात, यवतमाळच्या 'रँचो'ची दुर्देवी कहाणी

इस्माईल

फोटो स्रोत, Nitesh raut

फोटो कॅप्शन, इस्माईल
    • Author, नितेश राऊत
    • Role, अमरावतीहून, बीबीसी मराठीसाठी

मुन्ना उर्फ इस्माईल...जेमतेम आठवी पास... पण मुन्नाने हेलिकॉप्टर निर्मीतीचा ध्यास घेतला होता. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत त्याने हेलिकॉप्टर बनवलंसुद्धा. पण ते उडवण्याचा प्रयोग करत असताना त्याच हेलिकॉप्टरच्या पात्यांनी त्याच्या स्वप्नांचा करुण अंत केला.

या घटनेनंतर यवतमाळ जिल्ह्यातील फुलसांवगी हे गावाची देशभर चर्चेचं कारण ठरलंय.

यवतमाळपासून 100 किलोमीटर किलोमीटर दूर असलेल्या फुलसांवगी गावात राहणारा शेख इस्माईल, शिक्षण फक्त आठवी पास, घरची परिस्थितीही अत्यंत बेताची होती. इस्माईल बाजारात वेल्डींगचे छोटेसे वर्कशॉप चालवायचा.

वेल्डिंग काम, अलमारी, बाईकला अत्याधुनिक आकार देण्याचा काम तो करायचां. मात्र एवढ्या गरिबीत इस्माईलने जगावेगळं करण्याचे स्वप्न सोडलं नाही. त्याच्या डोक्यात सतत काहीतरी करण्याच्या कल्पना असायच्या. काही वर्षांपूर्वी इस्माईलला हेलिकॉप्टर तयार करण्याची आयडिया सुचली. त्यासाठी तो कामालाही लागला.

इस्माईलचे वडील शेख इब्राहिम सांगतात "माझा मुलगा अत्यंत होतकरू होता. देशासाठी काहीतरी करण्याची त्याच्यात जिद्द होती. अब्बा, मी कुटुंबाचं नाव जगभर पोहोचवणार, असं तो मला नेहमी बोलून दाखवायचा. पण या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या आहे, असं मी त्याला कायम सांगायचो."

मात्र, इस्माईलला हेलिकॉप्टर तयार करण्याचा ध्यास लागला होता. हेलिकॉप्टरर निर्मितीसाठी लागणाऱे साहित्य घेण्यासाठी त्याच्याकडे पैसै नव्हते. म्हणून त्याने पत्रे विकले होते, असं वडील सांगतात.

वडील सांगून थकले, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने घरातंच एक छोटस वर्कशॉप तयार केलं. रात्री घरी आल्यावर त्याचं काम सुरु असायंच.

हेलिकॉप्टर

फोटो स्रोत, Nitesh raut

खेळण्यातलं हेलिकॉप्टर पाहून खरखुरं हेलिकॉप्टर तयार करण्याची आयडिया आली होती. त्याने खडूने हेलिकॉप्टरचं स्केच काढून भिंती रंगवायला सुरवात केली. भंगारातून हेलिकॉप्टरसाठी सुटे भाग गोळा करण्याचे काम त्याने सुरु केले. मात्र इस्माईलच्या या स्पप्नांवर त्याचे काका अक्रम यांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी पुतण्याला मदत केली.

अक्रम म्हणतात "इस्माईलने हेलिकॉप्टर तयार करण्याची कल्पना मला सांगितली. नुसती कल्पनाच नव्हे तर त्याने त्याचा सखोल अभ्यास केला. त्यामुळे मी देखील त्याला प्रोस्ताहन दिले. त्या दिशेने त्याचे काम सुरू झाले होते. बंगळुरुच्या एका कंपनीकडून त्याने काही सुटे भाग गोळा केले. काही भाग कामचलाऊ पद्धतीने मिळवले. हेलिकॉप्टर तयार करण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरू होती. यापुर्वी हेलिकॉप्टरची दोनदा ट्रायलही आम्ही घेतली. मात्र तेव्हा अपघात झाला नव्हता.

इस्माईल

फोटो स्रोत, Nitesh raut

इस्माईलला वन सिटर हेलिकॉप्टर तयार करून त्याच पेटंटची नोंदणी करायची होती. या प्रयोगानंतर सहा सीटर हेलिकॉप्टर तयार करण्याची त्याची तयारी होती. सिंगल सीटर हेलिकॉप्टर तो प्रयोगशाळेला दान करणार होता. तर सहा सीटर विमान सामाजिक कामासाठी वापरणार होता.

घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे टाकाऊ वस्तूपासून हेलिकॉप्टरची सांगाडा तयार केला. पाईप पासून बॉडी तयार केली. त्याला 800 सीसी मारुतीचे इंजिन लावले. पैसे नव्हते म्हणून 8.50 हजारांचे टेलरोटर त्याने स्वतः तयार केले. हेलिकॉप्टरला उडण्यासाठी तयार केलेलं ब्लेडचे साहित्य हैदराबाद येथून मागवले होते. या सगळ्या गोष्टींसाठी त्याला अडीच लाख रुपयाचा खर्च आला.

इस्माईल सोबतचे अनुभव शेयर करताना काका अक्रम सांगतात 'या प्रयोगावर इस्माईलने 1500 ते 1600 तास काम केलं. अनेकदा वस्तू खराब व्हायच्या. पण तज्ञ कारागिरांना दाखवून त्यावर तोडगा निघायचा. अॅव्हरेज चांगला मिळावा असाही त्याचा प्रयत्न होता. 800 सीसीच्या इंजिनवर 22 किलोच्या हेलिकॉप्टरचे 2 ब्लेड कसे फिरणार हा मोठा प्रश्न होता. त्यामुळं डिझाईन बदलून आम्ही वजन कमी केलं.

दरम्यान अनेक कंपनीकडून त्याला ऑफर येत होत्या, मात्र इस्माईलने ती ऑफर धुडकावून लावली. माझा पेटंट चोरला जाईल, अशी भीती त्याला होती. त्यामुळं स्वतःच हेलिकॉप्टर उडवून त्याच्याच नावाने पेटंट रजिस्टर करायचं होतं.

आता हेलिकॉप्टर उडण्यासाठी तयार होतं. त्याने सगळ्या तांत्रिक बारकाव्यांची तपासणी केली. पण इस्माईलची ती 10 ऑगस्टची ट्रायल शेवटची ठरली. ट्रायल घेताना हेल्मेट घालण्याचे इस्माईल विसरला. ही चूक त्याच्या जीवावर बेतली. हेलिकॉप्टरच्या पंखाने त्याचा जीव घेतला

इस्माईल सोबत काम करणारा त्याचा मित्र शेहवाज या हेलिकॉप्टर ट्रायलच चित्रीकरण करत होता. अत्यंत जिवाभावाचा मित्र गमावल्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर होतं. तो म्हणाला "रेडिएटर जाम होतं त्यासाठी मी उमरखेडला गेलो. जाम काढला, ऑइलिंग केलं. रात्री 12.30 वाजता आम्ही ट्रायल सुरू केली. कॅमेरा सेट करून ठेवला होता. माझ्या जवळ टॉर्च होता. काही त्रुटी आल्यास टॉर्च दाखव अस ठरलं होतं. आम्ही दूर उभे झालो. पण काही मिनिटातच पाते तुटली आणि अपघात झाला".

इस्माईल गेला मात्र त्याने पाहिलेल्या स्वप्नांचा अंत होऊ नये, त्याचं स्वप्न कुणीतरी पूर्ण करावं, इस्माईलचे जाणं व्यर्थ जाऊ नये, एवढीच इच्छा त्याच्या वडिलांची आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)