टोकियो ऑलिपिंकः नवीन पटनाईक हॉकी संघांना का मदत करतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, एम मणिकंदन
- Role, बीबीसी तमिळ
जेव्हा-जेव्हा भारतीय हॉकी संघ कुठलाही सामना जिंकतो ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक त्यांचं आवर्जून अभिनंदन करतात.
ते स्वतः खेळाडूंना कॉल करून त्यांच्याशी फोनवर बोलतात. कधी-कधी अभिनंदनाचा व्हीडिओ करून पाठवतात.
ओडिशाचे मुख्यमंत्री हॉकीमध्ये इतका रस का दाखवतात? भारतीय हॉकी संघ आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यात काय संबंध आहे?
भारतीय महिला आणि पुरूष दोन्ही हॉकी संघांचे उपकप्तान ओडिशाचे आहेत. मात्र, मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या खेळात इतका रस घेण्यामागचं एवढंच एक कारण नाही.
गेल्या काही वर्षांपासून उत्तमोत्तम हॉकी खेळाडू तयार व्हावेत, यासाठी ओडिशामध्ये बरेच प्रयत्न सुरू आहेत.
राज्य हॉकी संघाव्यतिरिक्त ओडिशा सरकार राष्ट्रीय हॉकी संघाचेही प्रायोजक आहेत.
सहारा कंपनीने 2018 साली प्रायोजकत्व थांबवल्यानंतर ओडिशाने ही जबाबदारी उचलली.
राष्ट्रीय पुरूष संघ, महिला संघ, ज्युनियर संघ आणि सीनिअर संघाचा खर्च ओडिशा सरकार उचलतं.
राष्ट्रीय संघासाठी ओडिशाने आतापर्यंत 150 कोटी रुपये खर्च केले आहेत. एखाद्या राज्याने राष्ट्रीय संघाचा खर्च उचलण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पटनाईक यांनी प्रायोजकत्व घेत असल्याचं सांगताना ओडिशा राष्ट्र कल्याणासाठी ही जबाबदारी उचलत असल्याचं म्हटलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
नवीन पटनाईक विद्यार्थीदशेत स्वतः शाळेच्या संघाचे गोल कीपर होते. त्यामुळे त्यांचं सरकारही हॉकीला प्रोत्साहन देत आलं आहे. ओडिशामध्ये 20 हून जास्त स्पोर्ट्स हॉस्टेल्स आहेत. त्यापैकी दोन खास हॉकीसाठी आहेत.
राजधानी भुवनेश्वरमधल्या कलिंगा स्टेडियममध्ये हॉकीची प्रतिभा असणारे खेळाडू निवडून त्यांचं कौशल्य विकसित करण्यासाठी खास केंद्र आहे.
या केंद्राच्या राज्यभरात शाखा आहेत आणि तिथूनही नवीन खेळाडूंना पुढील कौशल्य विकासासाठी या स्टेडियममध्ये आणलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या पाच वर्षांपासून ओडिशा सरकार आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांचं आयोजन करत आहे. त्यांनी 2018 साली वर्ल्ड कप हॉकी स्पर्धाही प्रायोजित केली होती. या स्पर्धेचे सर्व सामने ओरिसामध्ये आयोजित करण्यात आले होते.
हे सामने 'ओडिशा मेन्स हॉकी वर्ल्ड कप' या बॅनरखाली खेळवले गेले. ओडिशा सरकार 2023 सालचे वर्ल्ड कप सामनेही आयोजित करणार आहे.
या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघाला यजमान राष्ट्र म्हणून सहभागी होण्याची परवानगी होती.
पुढील ऑलिंपिकसाठी ओडिशातील राउलकेलामध्ये 20 हजार आसन क्षमता असलेलं स्टेडियम उभारण्याचं काम सुरू आहे. या स्टेडियमसाठी 356.38 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
इंग्रजांविरोधात लढा देणारे क्रांतीकारी जननायक बिरसा मुंडा यांचं नाव या स्टेडियमला देण्यात येणार आहे. भारतातील हे सर्वात मोठं हॉकी स्टेडिअम असणार आहे.
ओडिशा सरकारला हॉकीविषयी असणाऱ्या या विशेष प्रेमामागे आणखी एक अनोखं कारण आहे. एकदा नवीन पटनाईक म्हणाले होते, "राज्यातली आदिवासी मुलं हॉकी स्टिक पकडूनच चालायला शिकतात." ओडिशातील जनतेला हॉकीविषयी कमालीची आत्मियता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यंदा ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरूष आणि महिला दोन्ही हॉकी संघांनी उत्तम खेळ करत इतिहास रचला आहे.
पुरूष संघाला सेमिफायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी जर्मनीला नमवत ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. तब्बल 41 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने ही चमकदार कामगिरी करून दाखवली.
भारतीय पुरूष हॉकी संघाने पटकावलेलं हे 12 वं पदक आहे. यात 8 गोल्ड, 1 सिल्व्हर आणि 3 ब्रॉन्झ मेडलचा समावेश आहे.
या विजयासोबतच भारतीय संघाने ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम संघाचा दर्जा कायम ठेवला आहे.
1928 ते 1958 या काळात भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत सलग 6 वेळा गोल्ड मेडल पटकावले होते.
1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकपर्यंत ही परंपरा अखंडपणे सुरू होती. मात्र, त्यानंतर भारतीय हॉकी संघाची पिछेहाट सुरू झाली.
भारताने आपलं अढळ स्थान परत मिळवण्याचा खूप प्रयत्न केले. पण, सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले.
2008 साली भारतीय हॉकी संघाचा दारुण पराभव झाला. या वर्षी भारतीय संघाला ऑलिम्पिकसाठी पात्रदेखील ठरता आलं नाही.
लंडन ऑलिंपिकमध्ये भारताने 12 वं तर रियो ऑलिंपिकमध्ये आठव स्थान मिळवलं होतं. ते मेडल जिंकण्याच्या आसपासही पोहचू शकले नव्हते.
मात्र, यावेळी भारतीय पुरूष आणि महिला दोन्ही हॉकी संघांनी केलेल्या दिमाखदार कामगिरीमुळे ओडिशाचं नाव चमकू लागलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








