एपीजे अब्दुल कलाम यांना जनतेचे राष्ट्रपती का म्हटलं जायचं?

राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम

फोटो स्रोत, AFP

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

(देशातील अत्यंत लोकप्रिय राष्ट्रपती अशी ओळख असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचा आज (15 ऑक्टोबर) जन्मदिन आहे. त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा हा लेख.)

सरकार कोसळण्यापूर्वी इंदरकुमार गुजराल भाजपच्या 'कमकुवत' पंतप्रधान असल्याच्या टोमण्यांना कंटाळले होते. त्यामुळं भारतीय सुरक्षेला आपण किती महत्त्व देत आहोत, हे देशातील आणि जगभरातील लोकांना दाखवून द्यायचं असं त्यांनी ठरवलं.

त्यासाठी त्यांनी 'मिसाइल मॅन' नावानं प्रसिद्ध असलेल्या एपीजे अब्दुल कलाम यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यापूर्वी केवळ 1952 मध्ये सी. व्ही. रमण वगळता इतर कोणत्याही शास्त्रज्ञाला या पुरस्कारानं गौरवण्यात आलं नव्हतं.

1 मार्च, 1998 रोजी राष्ट्रपती भवनात भारतरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात कलाम काहीसे नर्व्हस होते. त्यामुळं ते त्यांच्या निळ्या टायला पुन्हा-पुन्हा हात लावत होते.

कलाम यांना अशा कार्यक्रमांची चीड यायची. कारण ज्या कपड्यांमध्ये त्यांना अवघडल्यासारखं वाटायचं तेच कपडे त्यांना अशा कार्यक्रमांत परिधान करावे लागायचे. सूट परिधान करणं त्यांना कधीच आवडलं नाही. एवढंच काय पण लेदर शूजऐवजी नेहमी स्पोर्ट्स शू परिधान करणंच त्यांना आवडायचं.

भारतरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्वांत आधी त्यांचं अभिनंदन करणाऱ्यांमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचाही समावेश होता.

वाजपेयी आणि कलाम यांची पहिली भेट ऑगस्ट 1980 मध्ये झाली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना आणि प्रोफेसर सतीश धवन यांना एसएलव्ही 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर काही प्रमुख खासदारांना भेटण्यासाठी आमंत्रित केलं होतं.

कलाम यांना या सोहळ्याबाबत समजलं तेव्हा ते घाबरून गेले. ते धवन यांना म्हणाले, "सर माझ्याकडं तर सूट किंवा बूट काहीही नाही. माझ्याकडं फक्त माझी चेर्पू (चप्पलसाठी वापरला जाणारा तमिळ शब्द) आहे." त्यावेळी सतीश धवन यांनी हसत त्यांना म्हटलं, "कलाम तुम्ही आधीच तुमच्या यशाचा सूट परिधान केला आहे. त्यामुळं कोणत्याही स्थितीत तिथं पोहोचा."

वाजपेयींचा कलाम यांना मंत्रिपदाचा प्रस्ताव

"त्या बैठकीत इंदिरा गांधींनी जेव्हा कलाम यांचा अटल बिहारी वाजपेयींना परिचय करून दिला तेव्हा त्यांनी हात मिळवण्याऐवजी त्यांनी थेट त्यांची गळाभेट घेतली. ते पाहताच इंदिरा गांधी हसल्या आणि त्यांनी वाजपेयींना टोमणा मारत म्हटलं, 'पण, अटलजी कलाम मुस्लीम आहेत.' त्यावर वाजपेयींनी उत्तर दिलं, 'हो पण ते आधी भारतीय आणि एक महान शास्त्रज्ञ आहेत," प्रसिद्ध पत्रकार राज चेंगप्पा यांनी त्यांच्या 'वेपन्स ऑफ पीस' या पुस्तकात याचं वर्णन केलं आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेई आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम

फोटो स्रोत, Hindustan Times

18 दिवसांनी वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले तेव्हा, त्यांनी कलाम यांना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला. कलाम यांनी यासाठी होकार दिला असता, तर वाजपेयींना एक सक्षम मंत्री मिळालाच असता, सोबतच संपूर्ण देशातील मुस्लीमांमध्ये, भाजप सरकार त्यांच्याकडं दुर्लक्ष करत नसल्याचा संदेशही आपोआप पोहोचला असता.

कलाम यांनी या प्रस्तावावर पूर्ण दिवसभर विचार केला. दुसऱ्या दिवशी ते वाजपेयींना भेटले आणि अत्यंत नम्रपणे त्यांनी यासाठी नकार दिला. 'संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि अणुचाचणी कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सध्या असलेली जबाबदारी पार पाडून, मी देशाची आणखी चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो,' असं ते म्हणाले.

दोन महिन्यांनी पोखरणमधल्या अणुचाचणीनंतर कलाम यांनी मंत्रिपद का स्वीकारलं नाही, ते स्पष्ट झालं.

राष्ट्रपतीपदासाठी वाजपेयींनीच केली निवड

10 जून, 2002 रोजी एपीजे अब्दुल कलाम यांना अन्ना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कलानिधी यांचा निरोप मिळाला. पंतप्रधान कार्यालय त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं पंतप्रधानांशी बोलणं व्हावं यासाठी लगेचच त्यांना कुलगुरूंच्या कार्यालयात बोलावण्यात आलं.

एपीजे अब्दुल कलाम

फोटो स्रोत, PRAKASH SINGH

पंतप्रधान कार्यालयात फोन लावताच, अटल बिहारी वाजपेयी फोनवर आले आणि म्हणाले, "कलाम साहेब देशाच्या राष्ट्पतीच्या स्वरुपात मला तुमची गरज आहे." कलाम यांनी वाजपेयींचे आभार मानले आणि या प्रस्तावावर विचार करण्यासाठी एका तासाचा वेळ मागितला. त्यावर "तुम्ही वेळ नक्की घ्या, पण मला तुमच्याकडून होकारच हवा आहे, नकार नाही," असं वाजपेयी त्यांना म्हणाले.

राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम

फोटो स्रोत, The India Today Group

सायंकाळपर्यंत एनडीएचे संयोजक जॉर्ज फर्नांडिस, संसदीय कामकाज मंत्री प्रमोद महाजन, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, कलाम यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

डॉक्टर कलाम दिल्लीला पोहोचले, तेव्हा विमानतळावर संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांचं स्वागत केलं.

कलाम यांनी एशियाड व्हिलेजमध्ये डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. 18 जून, 2002 रोजी कलाम यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना वाजपेयींनी त्यांची गंमत करत म्हटलं, 'तुम्हीही माझ्यासारखे अविवाहित आहात', त्यावर कलाम यांनी हसतच उत्तर दिलं, 'पंतप्रधान महोदय मी फक्त अविवाहित नाही तर ब्रह्मचारीही आहे.'

कलाम सूटमागची कहाणी

कलाम राष्ट्रपती बनल्यानंतर सर्वांत मोठी अडचण होती, ती म्हणजे ते परिधान काय करणार? अनेक वर्षांपासून निळा शर्ट आणि स्पोर्ट्स शू परिधान करणाऱ्या कलाम यांना राष्ट्पती म्हणून ते परिधान करणं शक्य नव्हतं.

राष्ट्पती भवनाचे एक खास टेलर होते. त्यांनी यापूर्वीच्या अनेक राष्ट्रपतींसाठी सूट शिवले होते. एकदिवस येऊन त्यांनी डॉक्टर कलाम यांचंही माप नेलं.

एपीजे अब्दुल कलाम

फोटो स्रोत, JOEL NITO

"काही दिवसांनी त्यांनी कलाम यांच्यासाठी, बंद गळा असलेले चार नवे सूट शिवून आणले. कसलाही विचार न करता कपडे परिधान करण्याची सवय असलेल्या कलाम यांचं रूप त्यामुळं पूर्णपणे बदलून गेलं. पण कलाम त्यानं आनंदी नव्हते. 'मला यामुळं श्वास घेता येत नाही. याला कापून काही बदल केला जाऊ शकतो का?" असं ते म्हणाले, असं कलाम यांच्या आत्मचरित्राचे लेखक आणि सहकारी अरुण तिवारी यांनी त्यांच्या 'एपीजे अब्दुल कलाम अ लाइफ' मध्ये म्हटलं आहे.

टेलरला काय करावं तेच कळत नव्हतं. तेव्हा कलाम यांनीच त्यांना सल्ला दिला. मानेजवळ सूट थोडा कापण्यास त्यांनी सांगितलं. तेव्हापासून असा कट असलेल्या सूटला 'कलाम सूट' म्हटलं जाऊ लागलं.

नव्या राष्ट्रपतींना म्हणजेच कलाम यांना टाय परिधान करायलाही आवडत नव्हतं. बंद गळ्याच्या सूट प्रमाणेच त्यांचा टाय मुळंही जीव गुदमरायचा. अरुण तिवारी लिहितात, 'एकदा तर मी त्यांना टायनं चष्मा स्वच्छ करताना पाहिलं. तुम्ही असं करायला नको, असं मी त्यांना म्हटलं. त्यावर ते म्हणाले की, टाय हे पूर्णपणे निरर्थक असं वस्त्र आहे. किमान मी याचा वापर तरी करतोय.'

रोज पहाटे नमाज पठण

अत्यंत व्यस्त राष्ट्रपती असलेले कलाम स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढायचेच. त्यांना रुद्र वीणा वाजवण्याची प्रचंड आवड होती.

'त्यांना वॉक करायलाही आवडत होतं. तेही सकाळी दहा वाजता किंवा दुपारी चार वाजता. ते सकाळी साडे दहा वाजता नाश्ता करायचे. त्यामुळं दुपारचं जेवण उशिरा करायचे. दुपारी साडेचार वाजता लंच तर डिनर शक्यतो रात्री 12 वाजेनंतर करायचे. डॉक्टर कलाम हे धार्मिक वृत्तीचे होते. रोज पहाटे म्हणजे 'फज्र'ची नमाज पठण करायचे. मी त्यांना अनेकदा कुरआन आणि गीता वाचतानाही पाहिलं होतं.'

राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम

फोटो स्रोत, House of kalam

स्वामी थिरुवल्लुवर यांचे विचार असलेलं 'थिरुक्कुरल' हे तमिळ पुस्तकही ते वाचायचे. ते पूर्णपणे शाकाहारी होते आणि दारुशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. ते कुठंही थांबले तरी त्यांच्यासाठी शाकाहारी जेवण देण्याचा आदेश देशभरात देण्यात आलेला होता.

त्यांना महामहीम किंवा 'हिज एक्सलंसी' म्हटलेलंही आवडत नव्हतं,' असं डॉक्टर कलाम यांचे माध्यम सचिव राहिलेले एस एम खान यांनी मला सांगितलं होतं.

पण तथाकथित भगव्या गटाकडं त्यांचा झुकाव होता अशी तक्रार काही जणांनी कायम केली. भारताच्या प्रत्येक मुस्लिमानं त्यांच्यासारखं असायला हवं, असा संदेश देण्याचा प्रयत्नही त्या गटानं केला होता.

जो या कसोटीवर खरा उतरणार नाही, त्याच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात, असंही म्हटलं गेलं.

राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम

फोटो स्रोत, Getty Images

कलाम यांनी भाजपच्या समान नागरी कायद्याच्या मागणीचं समर्थन केल्यानंही काही प्रमाणात गदारोळ झाला होता.

डावे आणि काही विचारवंतांच्या एका वर्गाला कलाम यांचं सत्य साईबाबा यांना भेटण्यासाठी पुट्टपर्थीला जाणंही खटकलं.

वैज्ञानिक विचारांना महत्त्व देणाऱ्या व्यक्तीच्या अशा वागण्यानं लोकांसमोर चुकीचा आदर्श निर्माण होत असल्याची त्यांची तक्रार होती.

कुटुंबाला राष्ट्रपती भवनात थांबवण्यासाठी मोजले साडे तीन लाख

डॉक्टर कलाम यांचा त्यांचे मोठे भाऊ एपीजे मुत्थू मराइकयार यांच्यावर खूप जीव होता. पण त्यांनी कधीही त्यांना स्वतः बरोबर राष्ट्रपती भवनात राहू दिलं नाही.

कलाम भारताचे राष्ट्रपती होते तेव्हा, त्यांच्या भावाचे नातू गुलाम मोइनुद्दीन दिल्लीत काम करत होते. पण ते तेव्हाही मुनिरकामध्ये भाड्याच्या एका खोलीत राहत होते.

एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती भवन

फोटो स्रोत, Hindustan Times

मे 2006 मध्ये कलाम यांनी त्यांच्या कुटुंबातील जवळपास 52 जणांना दिल्लीला आमंत्रित केलं. ते सर्व आठ दिवस राष्ट्रपती भवनात राहिले होते.

"कलाम यांनी त्यांच्या राष्ट्रपती भवनात राहण्याचं भाडं स्वतःच्या खिशातून दिलं होतं. अगदी चहाच्या एकेका कपाचाही हिशेब ठेवण्यात आला होता. ते सर्व एका बसमधून अजमेर शरीफलाही गेले होते. त्याचं भाडंही कलाम यांनी भरलं होतं. सगळे गेल्यानंतर कलाम यांनी त्यांच्या अकाऊंटमधून तीन लाख बावन्न हजारांचा चेक राष्ट्रपती कार्यालयाला पाठवला होता," असं कलाम यांचे सचिव राहिलेले पीएम नायर यांनी मला सांगितलं होतं.

राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आपल्या बंधुंसोबत

फोटो स्रोत, House of Kalam

डिसेंबर 2005 मध्ये त्यांचे मोठे भाऊ एपीजे मुत्थू मराइकयार, त्यांची मुलगी नाझिमा आणि त्यांचा नातू गुलाम हज यात्रेसाठी मक्का इथं गेले होते. सौदीतील भारताच्या राजदुतांना याबाबत समजलं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना फोन करून मदत देऊ केली.

त्यावर "माझ्या 90 वर्षीय भावाला कोणत्याही सरकारी मदतीशिवाय सामान्य यात्रेकरूप्रमाणं हज यात्रा करू द्यावी, ही माझी आपल्याला विनंती आहे," असं एपीजे अब्दुल कलाम म्हणाले.

इफ्तारचे पैसे अनाथाश्रमाला दान

नायर यांनी आणखी एक रंजक किस्सा ऐकवला. एकदा नोव्हेंबर 2002 मध्ये कलाम यांनी मला बोलावून विचारलं, "आपण इफ्तारच्या भोजनाचं आयोजन का करायचं? आपण ज्यांना आमंत्रित करत आहोत, तसंही त्यांना सर्वांची परिस्थिती चांगलीच आहे. या इफ्तारवर किती खर्च होतो."

राष्ट्रपती भवनाच्या विभागात फोन करून याची माहिती घेतली तर त्यावर अडीच लाखाचा खर्च होतो, असं सांगितलं. त्यावर कलाम म्हणाले, "आपण हा पैसा अनाथाश्रमाला का देऊ शकत नाही? तुम्ही अनाथाश्रमांची निवड करा आणि हा पैसा वाया जाणार नाही, याची काळजी घ्या."

अब्दुल कलाम

फोटो स्रोत, Hindustan Times

राष्ट्रपती भवनाकडून इफ्तारसाठी नियोजित पैशातून पीठ, डाळी, चादरी आणि स्वेटरची खरेदी करण्यात आली. 28 अनाथ आश्रमांमध्ये त्याचं वाटप करण्यात आलं. पण हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही.

कलाम यांनी मला पुन्हा बोलावून घेतलं. ते खोलीत एकटेच होते. ते मला म्हणाले, "हे सामान तर तुम्ही सरकारी पैशातून खरेदी केलं आहे. यात माझं योगदान काहीच नाही. मी तुम्हाला एक लाखांचा चेक देत आहे. त्याचाही या पैशासारखाच वापर करा. पण मी पैसे दिले हे कुणालाही सांगू नका."

बिगर राजकीय राष्ट्रपती

त्यांच्या बरोबरीचं असं कुणाला म्हणायचं झाल्यास डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं नाव समोर येतं. पण डॉ. राधाकृष्णन हेदेखील पूर्णपणे बिगर राजकीय नव्हते. ते सोव्हिएत संघात भारताचे राजदूत राहिलेले होते.

एपीजे अब्दुल कलाम हे रशियाच्या दौऱ्यावर असताना 22 मे च्या मध्यरात्री त्यांनी बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परवानगी दिली होती. या घटनेत त्यांची राजकीय अनुभवहीनता सर्वांसमोर आली.

राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम

फोटो स्रोत, Hindustan Times

बिहार विधानसभा निवडणुकीत एकाही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळं राज्यपाल बुटा सिंह यांनी कोणत्याही पर्यायांवर विचार न करता बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली.

केंद्रीय मंत्रिमंडळानं एका बैठकीनंतर लगेचच मॉस्कोला राष्ट्रपतींच्या सहीसाठी शिफारसीचा फॅक्स केला. कलाम यांनीही रात्री दीड वाजता जराही उशीर न लावता त्यावर सही केली.

पण पाच महिन्यांनी सुप्रीम कोर्टानं हा आदेश घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला. त्यामुळं युपीए सरकार आणि कलाम यांच्यावर प्रचंड टीका झाली.

कलाम यांनी त्यांच्या 'अ जर्नी थ्रू द चॅलेंजेस' मध्ये याचा उल्लेख केला आहे. कलाम सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं एवढे व्यथित झाले होते की, त्यांनी या मुद्द्यावरून राजीनामा देण्याचा निर्णय केला होता. पण तसं केल्यास देशात वादळ येईल, असं म्हणत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना तसं करण्यापासून रोखलं होतं.

मोराच्या ट्युमरवर उपचार

कलाम हे अत्यंत संवेदनशील होते. एकदा थंडीमध्ये ते राष्ट्रपती भवनाच्या गार्डनमध्ये फिरत होते. सुरक्षारक्षकांच्या केबिनमध्ये हिटींगची सोय नव्हती.

त्यामुळं कडाक्याच्या थंडीत सुरक्षा रक्षकाला कापरं भरलं होतं. त्यांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना बोलावलं आणि सुरक्षा रक्षकांच्या केबिनमध्ये थंडीसाठी हिटर आणि उन्हाळ्यासाठी पंखे लावण्याची व्यवस्था केली होती.

मोर

फोटो स्रोत, Hindustan Times

एसएम खान यांनी आणखी एक किस्सा ऐकवला.

एकदा मुघल गार्डनमध्ये फिरताना त्यांनी एक मोर तोंड उघडू शकत नसल्याचं पाहिलं. त्यांनी लगेचच राष्ट्रपती भवनातील प्राण्यांचे डॉक्टर सुधीर कुमार यांना बोलावलं. त्यांनी मोराची तपासणी करण्यास सांगितलं.

तपासणी केल्यानंतर समजलं की, मोराच्या तोंडात ट्युमर होता. त्यामुळं त्याला तोंड उघडता किंवा बंद करता येत नव्हतं. त्याला काहीही खाता येत नव्हतं आणि त्यामुळं त्याला फार त्रास होत होता.

कलाम यांच्या सांगण्यावरून डॉक्टर कुमार यांनी मोरावर लगेचच शस्त्रक्रिया केली आणि त्याचा ट्युमर काढला. त्या मोराला काही दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आणि पूर्ण बरं झाल्यानंतर पुन्हा त्या मोराला मुघल गार्डनमध्ये सोडण्यात आलं.

टांझानियाच्या मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया

15 ऑक्टोबर 2005 ला 74व्या वाढदिवशी कलाम हैदराबादेत होते. त्यांच्या दिवसाची सुरुवात हृदय रोगानं पीडित असलेल्या टांझानियातील काही मुलांच्या भेटीनं झाली.

हैदराबादच्या केअर रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांनी प्रत्येक मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्यांना चॉकलेटचा एक डबा भेट दिला. दिल्लीहून त्यांनी ते चॉकलेट आणले होते.

अफ्रीकेचे मूळ नीवासी

फोटो स्रोत, TCHANDROU NITANGA

बाहेर बसलेले आंध्र प्रदेशचे राज्यपाल सुशील कुमार शिंदे, मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू त्यांची वाट पाहत होते. या मुलांना त्यांच्यापेक्षा जास्त महत्त्व का दिलं जात आहे? हे त्यांना समजतच नव्हतं.

याबाबतचा एक किस्सा अब्दुल कलाम यांचे सहकारी अरुण तिवारी यांनी लिहिला आहे.

"सप्टेंबर 2000 मध्ये टांझानियाच्या दौऱ्यावर असताना कलाम यांना समजलं की, त्याठिकाणची जन्मतः हृदयरोगानं पीडित असलेली मुलं उपचाराविना मरत आहेत. तिथून परतल्यानंतर त्यांनी मला म्हटलं की, काहीही करून ही मुलं आणि त्यांच्या आई यांना दारेस्सलामहून हैदराबादला मोफत आणण्याची व्यस्था करा.

त्यांनी मला व्ही तुलसीदास यांच्याशी बोलण्यास सांगितलं. त्यावेळी ते एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. ते यासाठी मदत करायला तयार झाले. त्यानंतर केअर रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर सोमा राजू आणि तिथले प्रमुख हार्ट सर्जन डॉक्टर गोपिचंद मन्नाम यांनीही मोफत उपचार करण्याची तयारी दर्शवली.

भारतातील टांझानियाच्या उच्चायुक्त इव्हा न्झारो या मुलांना आणण्यासाठी दारेस्सलामला गेल्या. 24 मुलांना त्यांच्या आईसह दारेस्सलामहून हैदराबादला आणण्यात आलं.

केअर फाऊंडेशननं पन्नास लोकांच्या थांबण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था केली. ते सर्व लोक एक महिना हैदराबादेत राहिले. त्यानंतर उपचार करून सुखरुप टांझनियाला परतले," असं अरुण तिवारी यांनी एपीजे कलाम यांच्यावरील पुस्तकात लिहिलं आहे.

सॅम मानेक शॉ यांची भेट

कलाम यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांनी 1971 च्या युद्धाचे नायक फील्ड मार्शल सॅम मानेक शॉ यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

एपीजे अब्दुल कलाम

फोटो स्रोत, STR

फेब्रुवारी 2007 मध्ये त्यांना भेटायला उटीलाही गेले. त्यांना भेटल्यानंतर कलाम यांच्या लक्षात आलं की, मानेक शॉ यांना फील्ड मार्शल सारखा किताब तर देण्यात आला आहे. पण त्याबरोबर मिळणारे भत्ते आणि सुविधा मात्र देण्यात आलेल्या नाहीत.

दिल्लीला परतल्यानंतर त्यांनी यासाठी काहीतरी करायचं ठरवलं. फिल्ड मार्शल मानेक शॉ यांच्या बरोबरच मार्शल अर्जन सिंह यांनाही, ज्या दिवशी त्यांना पदं मिळाली तेव्हापासूनचे सर्व प्रलंबित भत्ते देण्यात आले.

(बीबीसी हिंदीमध्ये हा लेख सर्वप्रथम 27 जुलै 2020 ला एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनाला प्रकाशित झाला होता.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)