कोरोना : गुळवेलीच्या गोळ्या घेतल्याने यकृतावर दुष्परिणाम होतात का?

फोटो स्रोत, surajps/getty images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोव्हिड-19 संसर्गाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'इम्युनिटी बूस्टर' म्हणून वापरल्या जाणाऱ्या, 'गिलॉय'मुळे काही रुग्णांच्या लिव्हरला (यकृत) इजा झाल्याचं आढळून आलंय. गिलॉय म्हणजेच मराठीतली - गुळवेल.
'जर्नल ऑफ क्लिनिकल अॅंड एक्सपरिमेंटल हिपॅटोलॉजी' मध्ये, हे संशोधन पब्लिश केलं आहे. संशोधनाच्या प्रमुख, हेपॅटोलॉजिस्ट डॉ. आभा नागराल सांगतात, "कोरोना काळात लोक गिलॉयचं भरमसाठ सेवन करत आहेत. त्यामुळे, आम्ही हे संशोधन करण्याचा निर्णय घेतला."
"गिलॉयचा संबंध यकृत निकामी होण्याशी जोडणं, दिशाभूल करणारं आहे. चुकीच्या माहितीमुळे, आयुर्वेदसारख्या प्राचीन उपचारपद्धतीची बदनामी होईल," असं आयुष्य मंत्रालयाने म्हटलंय.
कोरोनासंसर्गात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, अनेकांनी गिलॉयचं सेवन केलं. पण, 'गिलॉय' किंवा 'गूळवेल' म्हणजे नक्की काय? यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते? खरंच यकृत खराब होतं? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
'गिलॉय' किंवा गुळवेल म्हणजे काय?
आयुर्वेदतज्ज्ञांच्या माहितीनुसार, गिलॉय एक औषधी वनस्पती आहे. ज्याचा वापर, औषध म्हणून गेली कित्येक वर्ष करण्यात येतोय. ही वनस्पती कुठेही सहजरित्या उपलब्ध होते.
गिलॉयचं शास्त्रीय नाव 'टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया' असं आहे. तर, संस्कृतमध्ये गिलॉयला 'अमृता' असं म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये याला गुडुची असं म्हणतात.
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. श्रीराम सावरीकर सांगतात, "आयुर्वेदात आम्ही गुळवेलला 'रसायन' असं म्हणतो. हे एक 'इम्युनिटी बूस्टर' आहे." यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.
गिलॉयमुळे यकृताला इजा होते?
या अभ्यासात संशोधकांनी, सहा रुग्णांची माहिती दिलीये. ज्यांना गिलॉयच्या सेवनामुळे यकृताला इजा झाल्याचं आढळून आलं.

फोटो स्रोत, SvetaZi/getty images
संशोधक म्हणतात, एक 62 वर्षांची, टाईप-2 डायबिटीसग्रस्त महिला रुग्णालयात आली. एक दिवसाआड महिनाभर, 15 मिलीलीटर 'टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया' म्हणजे, गिलॉय सिरपचं सेवन केल्याची माहिती तिने दिली.
हेपॅटोलॉजिस्ट डॉ. आभा नागराल बीबीसीशी बोलताना सांगतात, "या महिलेच्या यकृताची तपासणी करण्यात आली. गिलॉयमुळे यकृताला इजा झाल्याचं दिसून आलं."
तर, सहा महिन्यांपासून गिलॉयची देठं पाण्यात उकळून, दररोज 15 मिलीलीटर पीत असलेल्या एका 38 वर्षीय पुरुषाला, "औषधांमुळे काविळ झाल्याचं तपासणीत आढळून आलं."
आणखी एका रुग्णाबाबत माहिती देताना संशोधक लिहीतात, "40 वर्षांचा कोणतीही सहव्याधी नसलेला व्यक्ती, काविळ झाल्याने रुग्णालयात आला. गिलॉय पाण्यात उकळून, त्यात लवंग आणि दालचिनी घालून, तो अर्क तीन महिन्यांपासून सेवन करत होता."
डॉ. आभा नागराल पुढे म्हणतात, "आम्ही गिलॉय घेऊ नका असं म्हणत नाही. पण, ऑटो इम्युन (स्वयंप्रतिकार) डिसॉर्डरच्या रुग्णांमध्ये, रोगप्रतिकारशक्ती शरीरातील चांगल्या पेशींवर हल्ला करते. गिलॉय रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. शरीरात अधिक निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती यकृतावर हल्ला करण्यात सुरू करते."
त्यामुळे, गिलॉय डॉक्टरांच्या देखरेखीखाली देण्याची गरज आहे, असं डॉ. आभा म्हणतात.
गिलॉयचा संबंध लिव्हर खराब होण्याशी जोडणं चुकीचं - केंद्र
आयुर्वेदीक औषधांमध्ये वापरण्यात येणाऱ्या, गिलॉयचा (गुळवेल) संबंध, लिव्हर (यकृत) खराब होण्याशी जोडणं, म्हणजे दिशाभूल असल्याचं केंद्र सरकारने म्हटलंय.

फोटो स्रोत, Alona Siniehina/getty images
आयुष मंत्रालयाच्या माहितीनुसार, "गिलॉयचा संबंध यकृत खराब होण्याशी जोडणं, प्राचीन औषधोपचार पद्धतीसाठी आपत्तीजनक आहे. विविध आजारांवर उपचार करण्यासाठी गिलॉयची परिणामकारकता सिद्ध झाली आहे."
"लेखकांनी या औषधी वनस्पतींच्या अंतर्भूत घटकांचा, रुग्णांनी सेवन केलेल्या मात्रांचा विश्लेशक अभ्यास केला नाही. संशोधकांनी आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक होतं," असं केंद्रीय आयुष मंत्रालयाने म्हटलंय.
आयुष मंत्रालयाच्या माहितीनुसार,
- चुकीच्या औषधी वनस्पतीची ओळख केली तर, निष्कर्ष चुकीचे निघतात
- गिलॉयसारखंच (गुळवेल) दिसणारं 'टिनोस्पोरोक्रिस्पा'चा यकृतावर नकारात्मक परिणाम होतो.
- गुळवेलसारख्या औषधी वनस्पतीवर विषारी असा शिक्का मारण्यापूर्वी संशोधकांनी योग्य वनस्पतीचा अभ्यास करायला हवा होता.
- रुग्णांनी या औषधी वनस्पती कोणत्या इतर औषधासोबत घेतल्या याबाबत माहिती देण्यात आलेली नाही
"चुकीच्या माहितीमुळे आयुर्वेदशास्त्र बदनाम होईल," असं केंद्रीय आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे.
केंद्राच्या खुलाशावर संशोधक काय म्हणतात?
केंद्रीय आयुष मंत्रालयाने उपस्थित केलेले काही मुद्दे डॉ. आभा नागराल यांनी खोडून काढले आहेत.
त्या म्हणात, "हे रुग्ण, जुन्या औषधांसोबत गिलॉय हे एकच नवीन ड्रग घेत होते. त्यांना ऑटो इम्युन (स्वयंप्रतिकार) डिसॉर्डर होती. त्यामुळे, इतर कोणत्याही औषधाबाबत माहिती दिली नाही. हा मंत्रालयाचा दावा योग्य नाही."

फोटो स्रोत, dragana991/getty images
आयुष मंत्रालयाने म्हटलंय की, औषधी वनस्पतीची योग्य ओळख केली नाही. या आरोपांवर डॉ. आभा नागराल म्हणाल्या, "2 रुग्णांनी गिलॉयची औषधं बनवणाऱ्या मोठ्या कंपनीच्या गोळ्या आणि सिरप घेतलं. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला."
"मग, कंपनीच्या औषधात काही होतं का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा दावा खोडून काढताना डॉ. नागराल सांगतात, "आम्ही, आयुर्वेदच्या विरोधात नाही. पण, आयुष मंत्रालयाने लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवणं गरजेचं आहे की, हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या."
येणाऱ्या काळात, डॉ. आभा यांची टीम जास्त रुग्णांवर हे संशोधन करणार आहे.
आयुर्वेदतज्ज्ञ काय म्हणतात?
गिलॉयमुळे यकृत खराब होतं किंवा लिव्हरवर परिणाम होतो. या संशोधनावर भाष्य करताना आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. श्रीराम सावरीकर सांगतात, "संशोधकांना गिलॉयमुळेच यकृत खराब झाल्याचे स्पष्ट पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे, गिलॉयचा लिव्हरवर परिणाम होतो असं म्हणणं योग्य ठरणार नाही."
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या माहितीनुसार, गूळवेलीचे (गिलॉय) अनेक प्रकार आहेत. त्यामुळे, यकृताला इजा झालेल्या रुग्णांनी कोणत्या प्रकारची गूळवेलीचं सेवन केलं होतं हे तपासलं पाहिजे. रुग्णांनी सेवन केलेली गूळवेळ विषारी होती का? याचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
डॉ. सावरीकर पुढे म्हणतात, "या रुग्णांनी गिलॉय किती मात्रेमध्ये किती दिवस घेतलं, याचा खुलासा होण्याची गरज आहे. याची संपूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत गिलॉयमुळे लिव्हर खराब झालं असं म्हणता येणार नाही."
आयुर्वेदाचार्य सांगतात, प्रत्येक औषधाची शरीरात पचण्याची क्रिया ही लिव्हरमधून होते. त्यामुळे, औषधांचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, गिलॉयचा थेट संबंध संशोधक स्पष्ट करू शकलेले नाहीत.
आयुर्वेदतज्ज्ञांच्या माहितीनुसार, FDA ने गिलॉयचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नूतन पाखरे म्हणतात, "संशोधनात आढळून आल्याप्रमाणे, गिलॉयचे फार जास्त गंभीर दुष्परिणाम नाहीत. पण, लोकांनी अतिप्रमाणात याचं सेवन केलं तर, फायदेशीर नाही."
गिलॉयचे फायदे कोणते?
आयुर्वेदतज्ज्ञांच्या माहितीनुसार, गिलॉयची शरीरात चांगले टिश्यू (नव्या पेशी) निर्माण करण्यासाठी मदत होते.
डॉ. नूतन पाखरे आयुर्वेदतज्ज्ञ आहेत. आयुर्वेदात सांगण्यात आलेल्या गिलॉयच्या फायद्यांबाबत त्या म्हणतात,
- श्वसनसंस्थेच्या आजारांवर गिलॉय परिणामकारक आहे.
- मधुमेहींमध्ये साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी
- ताप आला असेल तर गिलॉयचं सत्व देऊ शकतो.
- पचनशक्ती वाढवण्यासाठी याचा फायदा होतो.
- अॅन्टी इन्फ्लमेटरी आहे.
"डॉक्टरांच्या सल्लाशिवाय आयुर्वेदीक औषधं घेऊ नका"
कोरोनासंसर्गाचा काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लाखो लोकांना काढे, आयुर्वेदिक आणि इतर औषध घेतली. ज्यात, अनेकांनी गिलॉयचा समावेश केला होता.
बोरीवलीमध्ये रहाणारे अमित जाधव (नाव बदललेलं) गेल्या तीन महिन्यांपासून गिलॉयच्या गोळ्या घेत आहेत. ते म्हणतात, "मित्रांकडून मला गिलॉयबाबत माहिती मिळाली. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक मित्र या गोळ्या घेतात. त्यामुळे, मी देखील गिलॉय घेणं सुरू केलं."
आयुर्वेदिक औषधांना काहीच साईडइफेक्ट नसतो. त्यामुळे, डॉक्टरांना न विचारता गोळ्या सुरू केल्याचं ते पुढे सांगतात.
डॉ. सावरीकर म्हणतात, "गिलॉय किंवा गुळवेल एक औषध आहे. हे फूड सप्लिमेंट किंवा आहार नाही. त्यामुळे, औषध आयुर्वेदीक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका."
"लोकांमध्ये गैरसमज आहे, आयुर्वेदिक औषधांचे दुष्परिणाम होणार नाहीत. त्यामुळे याचा कसाही वापर सुरू आहे. हे औषध योग्य काळासाठी आणि योग्य प्रमाणात घेतलं, तरच उपयोग होतो," असं ते पुढे म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








