कोरोना : डेल्टा प्लस व्हेरियंट त्रिपुरात दाखल, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, विकास पांडे
    • Role, बीबीसी न्यूज

कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेबाबत चर्चा होत असताना डेल्टा प्लस व्हेरियंट ईशान्येकडील त्रिपुरा या राज्यात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी काळात परिस्थिती आणखी बिघडू शकते, असं सांगत आरोग्य अधिकाऱ्यांनी राज्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

त्रिपुरामध्ये कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण हे डेल्टा प्लस व्हेरियंटचेच असल्याची माहिती मिळत आहे.

त्रिपुरा येथे कोव्हिड-19 चे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या डॉ. दीप देबबर्मा यांनी याविषयी अधिक माहिती दिली. ते सांगतात, शुक्रवारी (9 जुलै) 151 रुग्ण आढळून आले. त्यामध्ये 138 रुग्णांना डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचं प्रकरण समोर आलेलं त्रिपुरा हे पहिलंच राज्य बनल्याचं देबबर्मा यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "सध्याच्या आठवड्यात देशभरात कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्हीटी दर कमी आहे. राज्यात हा 5.5 इतका झाला आहे. पण राज्यात 90 टक्के रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट आढळून आला, हे चिंतेचं प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या व्हेरियंटला अत्यंत धोकादायक असल्याचं म्हटलं होतं."

त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं, शक्यतो घराबाहेर पडू नये. सध्याची परिस्थिती कोणत्याही वेळी धोकादायक ठरू शकते, असं देबबर्मा म्हणाले.

सध्याची स्थिती पाहता त्रिपुरामध्ये पुन्हा एकदा विकेंड लॉकडाऊन लावण्यात येईल, अशी शक्यता आहे.

कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटला रोखण्यासाठी राज्यात शुक्रवार रात्री 12 पासून सोमवार सकाळी 6 पर्यंत लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. सध्या त्रिपुराची राजधानी आगरतळासह शहरी भागात दुपारी 2 पासून संचारबंदी आहे.

तिसऱ्या लाटेपासून भारताचं संरक्षण होईल?

भारतामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेनं प्रचंड हानी केल्यानंतर, आता हळू हळू सर्व काही सुरू होत असून, पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र येत्या काही महिन्यांत तिसरी लाट धडकण्याचा इशारा आता तज्ज्ञ देत आहेत.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

न्यायालयांनी राज्यांना तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठीच्या तयारीबाबत विचारणा केली आहे. काही तज्ज्ञांनी आगामी 12-16 आठवड्यांमध्ये तिसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. तर इतर काही तज्ज्ञांनी कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरीएंटबाबत चिंता व्यक्त केली आहेत. त्यातच सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या डेल्टा प्लसचाही (Delta plus) समावेश आहे. आधीच्या लशीदेखील यासमोर कमकुवत ठरतील अशा चर्चा आहेत.

चिंतेची बाब म्हणजे, डेल्टा प्लस हा जीवघेण्या अशा दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार असलेल्या डेल्टा व्हेरिएंटशीच संबंधित आहे. भारतात तो सर्वप्रथम गेल्यावर्षी आढळला होता.

पण खरंच या भीतीमागं किती तथ्य आहे? विषाणूच्या साथीमध्ये लाटा या अपेक्षित असतातच, पण त्याचा प्रसार आणि तीव्रता किती असणार हे इतरही अनेक घटकांवर अवलंबून असतं.

कोरोनासंबंधी सुरक्षिततेचे नियम

भारतात गेल्या काही दिवसांत दररोज सरासरी कोरोना रुग्णांचा आकडा हा 50,000 च्या आसपास एवढा खाली आला आहे. मे महिन्यात कोरोनाच्या पीकदरम्यान हा आकडा 4,00,000 एवढा होता. राज्यांनी केलेल्या कडक लॉकडाऊनमुळं प्रामुख्यानं हा आकडा घटला.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

बाजारापेठांमध्ये होणारी गर्दी, निवडणुकांच्या सभा, धार्मिक सोहळे यांना दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरवण्यात आलं. पण त्याचबरोबर चुकीचे धोरणात्मक निर्णय, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात हलगर्जीपणा आणि तज्ज्ञांच्या इशाऱ्यांकडं दुर्लक्ष करणं हीदेखील इतर काही महत्त्वाची कारणं आहेत.

या चुकांची पुनरावृत्ती केल्यास तिसरी लाट लवकर येऊ शकते, असं तज्ज्ञ म्हणत आहेत.

डॉ. चंद्रकांत लाहरिया हे साथरोग आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते, भारत सध्या अत्यंत नाजूक अशा स्थितीमध्ये आहे. यादरम्यान लोकांचं वर्तन कसं असेल यावर पुढच्या लाटेचं भवितव्य अवलंबून असेल.

राज्यांनी काळजीपूर्वक आणि हळू-हळू सेवा सुरू करणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले. "जर आपण सर्व सुरू करण्याची घाई केली आणि लोकांनी कोरोनासंबंधीचे सुरक्षिततेचे नियम (कोरोना सेफ्टी प्रोटोकॉल) पाळले नाही, तर कोरोनाचा संसर्ग अधिक वेगानं होण्यास मदत होईल."

सुरक्षिततेचे नियम हे स्थानिक पातळीवर पाळले जायला हवेत. जर बाजारपेठेत किंवा दुकानांमध्ये याचं पालन होत नसेल, तर त्यांना दंड ठोठावायला हवा, असा सल्लाही लाहरिया यांनी दिला.

नवीन व्हेरीएंट धोकादायक ठरू शकतो का?

दुसरी लाट ही प्रामुख्यानं डेल्टा व्हेरिएंटमुळं आली होती. जर लोकांमध्ये अशाच प्रकारे विषाणूचा प्रसार होत राहिला तर, भविष्यात अशाप्रकारचे आणखी व्हेरिएंट्स येऊ शकतात, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

डेल्टा प्लस असं नाव असलेला हा नवा व्हेरिएंट अधिक चिंतेचं कारण असल्याचं भारत सरकारनं म्हटलं आहे. पण तो तिसऱ्या लाटेसाठी जबाबदार ठरू शकतो, हे ठरवण्यासाठी पुरेशी माहिती अद्याप उपलब्ध नाही. मात्र ''काही आठवड्यांमध्ये परिस्थिती बदलू शकते'', असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

साथरोगतज्ज्ञ डॉ. ललित कांत यांनीही, जोपर्यंत विषाणूचा प्रसार होत राहील, तोपर्यंत नव्या व्हेरिएंट्सचा धोका कायम राहील, असं म्हटलं आहे. "अशा प्रकारचे व्हेरिएंट शक्य तितक्या लवकर शोधून, त्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे," असंही ते म्हणाले.

भारतात जूनपर्यंत 30000 नमुन्यांचं सिक्वेंसिंग करण्यात आलं आहे, पण यात वाढ होणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. डॉ. ए फतहुद्दीन यांनी कोरोनाच्या हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांच्या मते सध्याच्या लशी कोरोनाच्या माहिती असलेल्या व्हेरिएंटवर परिणामकारक आहेत. पण नव्या व्हेरिएंटवरही त्या परिणामकारक ठरतील याची खात्री नाही.

लस घेतल्यानंतरही काही जण यामुळं आजारी पडल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेषतः पहिला डोस घेतल्यानंतर अशी प्रकरणं समोर आली आहेत, असंही ते म्हणाले.

डॉ. फतहुद्दीन यांच्या मते आणखी लाट येणं अटळ आहे. पण, ''सिक्वेन्सिंग, नव्या व्हेरिएंटवर लक्ष ठेवणं आणि सुरक्षिततेच्या नियमांचे कठोर पालन अशा उपाययोजना केल्यास आपण ती लाट येण्याचा काळ लांबवू शकतो आणि त्याची तीव्रताही नियंत्रणात ठेवू शकतो.''

"आपण जर हे सर्व केलं नाही, तर आपल्याला अपेक्षित आहे त्याहीपेक्षा लवकर तिसरी लाट येऊन धडकेल," असं ते म्हणाले.

लसीकरण आणि हर्ड इम्युनिटी पुरेशी आहे?

कोरोनाची लागण झाल्यानं निर्माण झालेली रोगप्रतिकार शक्ती (हर्ड इम्युनिटी) आणि लसीपासून मिळालेलं संरक्षण, या दोन्हीमधून भारतातील लोकसंख्येच्या किती प्रमाणात नागरिकांना सुरक्षा मिळाली आहे, यावरही तिसऱ्या लाटेचा परिणाम अवलंबून असेल.

भारतात 9 ते 22 जून दरम्यान दररोज सरासरी 32.5 लाख डोस देण्यात आले आहेत. पण 2021 पर्यंत देशातील सर्व पात्र लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं, उद्दीष्ट गाठण्यासाठी हा आकडा रोज 85-90 लाख डोसपर्यंत जाणं गरजेचं आहे.

आतापर्यंत केवळ 4% नागरिकांचं पूर्णपणे लसीकरण झालेलं आहे, तर जवळपास 18% नागरिकांना एक डोस मिळाला आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

यापूर्वी कोरोनाची लागण झालेल्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळणार असलं तरी, लसीकरणाचा वेग वाढला नाही, तर लाखो नागरिक असुरक्षितच असतील, असं डॉ. लाहरिया म्हणाले आहेत.

पण, कोरोनाची लागण झाल्यामुळं शरिरात विषाणू विरोधात लढणारी प्रतिपिंडं तयार झालेल्या भारतीयांचा नेमका आकडा मिळवणं कठीण आहे. अनेक शहरं आणि गावांमधील लोकांना तर चाचण्याच करता आल्या नाही, त्यामुळं त्यांना कोरोनाची लागण झाली होती किंवा नाही हे समजण्याचा मार्गच नाही. कोरोनाच्या मृत्यूचे आकडेही कमी दाखवण्यात आले आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळं विषाणू विरोधात रोगप्रतिकार शक्ती निर्माण झालेल्यांची संख्या 55-60% दरम्यान असू शकते, असं डॉ. लाहरिया यांनी म्हटलं आहे.

गणितीय मॉडेल मांडणारे अभ्यासक गौतम मेनन यांनी तर हे प्रमाण 60-70 % एवढं असू शकतं असं म्हटलं आहे. मेनन हे अशोका विद्यापीठात भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राचे प्राध्यापकही आहेत. भारतात पुन्हा दुसऱ्या लाटेप्रमाणं कोरोनाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार नाही, अशा विश्वास ते व्यक्त करतात.

कोरोना

मात्र त्याचवेळी गाफिल राहायचं नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

"आपल्या लोकसंख्येतील एका मोठ्या आकडेवारीला आधीच कोरोनाची लागण होऊन गेलेली असली तरी, 20-30% अजूनही शिल्लक आहेत. यात प्रामुख्याने ज्येष्ठ आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांचा समावेश आहे. त्यामुळं आपण बारकाईनं लक्ष ठेवून, कोरोनाच्या संख्येत कुठं वेगाने वाढ होत आहे का, हे पाहिलं पाहिजे," असं मेनन म्हणाले.

भारतात अजूनही मोठ्या लोकसंख्येला कोव्हिड आणि त्याच्या नव्या आणि अधिक घातक व्हेरिएंट्सपासून धोका आहे. त्यामुळं याकडं दुर्लक्ष करता येणार नाही, यावर सर्वच तज्ज्ञांचं एकमत आहे. त्यामुळं "तिसरी लाट अटळ असली तरी, ती किती दिवस लांबवायची आणि तिचा परिणाम मर्यादित कसा ठेवायचा, हे आपल्यावरच अवलंबून आहे," असं डॉ. फतहुद्दीन यांनी म्हटलं आहे.

"सुमारे एका वर्षापेक्षा अधिक काळापासून, या लढ्यामध्ये लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा विचार करा. आम्हीही आता थकलो आहोत. आम्हाला हार मानायला लावू नका, कारण तिसऱ्या लाटेचा सामना आम्ही करू शकू, याची मला खात्री नाही, " अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)