देवेंद्र फडणवीस - शरद पवार भेट: प्रश्न, शक्यता आणि लपलेले अर्थ

फोटो स्रोत, @Dev_Fadnavis
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज( सोमवार 31 मे 2021) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अगोदर न ठरलेली वा तशी कोणतीही शक्यताही नसतांना अनपेक्षितरित्या घडलेल्या या भेटीनं अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या काही काळात महाराष्ट्रातलं राजकारण शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असं झालं आहे. विशेष: फडणवीस आणि अजित पवारांच्या 80 तासांच्या सरकारनंतर तर ते अधिकच तीक्ष्ण झालं आहे असं दोन्ही पक्षातल्या अनेकांचं आणि विश्लेषकांचंही मत आहे. मग अचानक फडणवीसांनी पवारांची घरी जाऊन भेट का घ्यावी?
स्वत: फडणवीसांनी ट्विट करुन आपण शरद पवारांना भेटल्याचं सांगितलं आणि फोटोही शेअर केला. त्याअगोदर फडणवीसांनी मुंबईच्या भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यातही या भेटीची काहीही कल्पना कोणाला आली नाही.
यानंतर फडणवीस थेट 'सिल्व्हर ओक'ला गेले. त्यांनी स्वत: ट्विट मध्ये ही केवळ औपचारिक भेट होती असं म्हटलं आहे. म्हणजेच त्यातून वेगळा राजकीय अर्थ काढू नका असं त्यांना सुचवायचं आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची स्थिती बघता, या भेटीकडे राजकीय चष्म्यातून न पाहणं शक्य नाही.
'रात्रीत सत्ता बदलू शकते' आणि 'महाविकास' आघाडीतली बदललेली समीकरणं
शरद पवारांवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आणि ते मोठ्या विश्रांतीनंतर राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे अनेक जण त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटताहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
तब्येतीची चौकशी करण्यासाठी फडणवीसांची भेट असेलही, पण ती केवळ त्याच कारणासाठी असेल असं नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलाची जी स्थिती आहे, ती पाहता या भेटीनंतर भुवया उंचावल्या जाणं स्वाभाविक आहे. सचिन वाझे प्रकरणानंतर उद्धव ठाकरे सरकार अडचणीत आलं. ते पडेल की काय अशी चर्चाही सुरु झाली.
देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात आणि बाहेरही या सरकारवर प्रचंड दबाव आणला. पण जेव्हा हे प्रकरण परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर अनिल देशमुखांभोवती केंद्रीत झालं, तेव्हा शरद पवार विरुद्ध फडणवीस असा सामना पाहायला मिळाला.

फोटो स्रोत, facebook
पवारांनी देशमुखांच्या बचावासाठी भूमिका घेतल्या, पण फडणवीसांनी त्यावर उत्तरं दिली. शेवटी देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. त्यांची चौकशी सुरु आहे आणि तिची टांगती तलवार आघाडी सरकारवर अद्यापही आहे. अशा स्थितीत फडणवीस आणि शरद पवारांची भेट झाली आहे.
दुसरीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणात राज्य सरकारला न्यायालयीन लढाईत अपयश आलं आहे. त्यामुळे या दोन्ही समाजांमध्ये असंतोष आहे. पदोन्नतीतल्या आरक्षण निर्णयावरूनही आघाडीतल्या पक्षांमध्येच बिनसलं आहे. कॉंग्रेसनं सरकारला एका प्रकारचा अल्टिमेटम दिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीही 7 जूनची डेडलाईन दिली आहे. या सामाजिक गणितांमुळे राजकीय गणितंही बदलू शकतात. या पार्श्वभूमीवरही ही भेट पाहायला हवी.
सोबत काहीच दिवसांपूर्वी 'लोक झोपलेले असतांना महाराष्ट्राचं सरकार बदलेल' असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हणून एक वातावरणनिर्मिती केली आहेच.
आम्ही पाडण्यापेक्षा हे सरकार त्याच्यातल्या विरोधाभासांनी पडेल असं देवेंद्र फडणवीस सातत्यानं म्हणत आले आहेत. पण भाजपचे पुन्हा सत्ता हस्तगत करण्याची मनसुबे लपून राहिले नाही आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या सूचक विधानाकडे आजच्या भेटीनंतर पुन्हा लक्ष जातं आहे.
शरद पवारांचा सेनेवर दबाव?
या भेटीनंतर असंही म्हटलं जातं आहे की हा पवारांचा उद्धव ठाकरेंवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे. गेले काही दिवस 'राष्ट्रवादी' आणि सेना यांचे सरकारमध्ये खटके उडत असल्याच्या बातम्या येत आहेत.
अजित पवार, जयंत पाटील यांनी काही निर्णयांवरून कॅबिनेटच्या बैठकीत उघड नाराजी व्यक्त केल्याची वृत्तं आहेत. शरद पवार यांनी जेव्हा 'वर्षा' निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी 'हे सरकार चालवणं ही एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही' असं पवारांना सांगितल्याच्या बातम्या आल्या.
शिवाय संजय राठोड प्रकरणात 'राष्ट्रवादी'नं घेतलेली भूमिका आणि अनिल देशमुख प्रकरणात शिवसेनेनं घेतलेली भूमिका यावरून या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांबद्दल आढी आहेच. त्यामुळेच फडणवीसांची भेट घेऊन पवार एका प्रकारचा दबाव वाढवता आहेत का, हा प्रश्न आहे.

फोटो स्रोत, Pti
या भेटीबद्दल फडणवीसांनी स्वत:च सांगितलं, त्यामुळे त्यात गुप्त असं काही नाही. पण याअगोदर जेव्हा वाझे प्रकरणानं मुंबई आणि दिल्लीतलं राजकारण तापलं होतं तेव्हा शरद पवार, प्रफुल पटेल आणि अमित शाह यांची अहमदाबाद इथं गुप्त बैठक झाल्याच्या बातम्या आल्या.
'राष्ट्रवादी'नं त्या नाकारल्या, पण अमित शाहांनी मात्र त्याचा स्पष्ट इन्कार केला नाही. याशिवाय फडणवीसांचं सरकार असतांनाही 2018 मध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेसाठी गुप्त बैठका झाल्याचे गौप्यस्फोट याआधी झालेले आहेत.
2014 मध्ये जेव्हा भाजप सत्तेपासून थोडीच लांब होती तेव्हा सेनेवरचा दबाव वाढवत पवारांनी भाजपाला पाठिंबा देऊ केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवार सेनेला एक संदेश देऊ पाहात आहेत का?
'बेरजेचं' राजकारण
या भेटीनंतर लगेचच काही निश्चित राजकीय हालचाली घडतील, असं म्हणता येत नसलं, तरीही शरद पवार आणि त्यांच्यासारखं बेरजेचं राजकारण करायला देवेंद्र फडणवीस तयार आहेत का, असा प्रश्नही आहे.
पवारांनी कायम बेरजेचं राजकारण केलं आणि त्यासाठी राजकारणात कुणाला कायमचा शत्रू मानलं नाही असं म्हटलं जातं. त्यामुळेच ते विविध आघाड्या आणि राजकीय शक्यता प्रत्यक्षात आणू शकले. त्यामुळेच सेनेसोबत सत्ता ते स्थापू शकले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कायम शत्रुत्वाची नाही असं म्हटलं जातं.
फडणवीसही त्याच दिशेनं जाऊन या भेटीनंतर आपण सगळ्या प्रकारच्या बेरजेला तयार आहोत, आपल्यात वितुष्ट नाही असा संदेश देऊ पाहताहेत का, ही पण शक्यता बोलली जाते आहे.
"माझ्या मते हा केवळ फडणवीस म्हणताहेत त्या प्रमाणे हा कर्टसी कॉल आहे. तब्येतीची विचारपूस केली गेली असेल. पण त्याशिवाय काही मुख्य मुद्द्यांवर चर्चा नक्की झाली असेल. ते म्हणजे, मराठा आरक्षणावर पुढची प्रक्रिया काय असू शकते, संभाजीराजे ज्या पद्धतीनं आक्रमक झालेत त्याबद्दल, ओबीसींच्या आरक्षणाचा जो निकाल आला आहे आणि पदोन्नतीच्या आरक्षणात कॉंग्रेस जी आग्रही भूमिका घेतं आहे, याबद्दल नक्की बोलणं झालं असेल. फडणवीस मुख्यमंत्री असतांनाही पवार वेळ घेऊन अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी भेटायचे," असं राजकीय पत्रकार संजय जोग म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण त्यांना यातून काही राजकीय समीकरणं तयार होतील असं वाटत नाही. "मुळात आता देशभर भाजपाविरोधात वातावरण असतांना ते असं काही करणार नाहीत. पवार बंगाललाही जाणार होते, पण त्यांच्या तब्येतीचं कारण होतं. आता केरळमध्ये 'एलडीएफ'मध्ये त्यांच्या पक्षाचा एक मंत्री आहे. अशा वेळेस ते भाजपासोबत जाणार नाहीत," असं संजय जोग यांना वाटतं.
राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते या भेटीतून काही राजकीय उलथापालथी अपेक्षित नसल्या तरीही फडणवीसांनी बरेच संदेश त्यातून दिले आहेत.
"एक म्हणजे उद्धव स्वत:हून पवारांना भेटायला गेले नाहीत, पण मी स्वत:हून भेटून आलो, हे स्पष्ट दिसलं. शिवाय राजकारणापलिकेडे जाऊन आदरभाव जपणारं वर्तन म्हणूनही त्याकडे पाहिलं जाईल. म्हणजे जे राजकीय वैर त्यांच्या आहे असं म्हटलं जातं, त्यापलिकडे जाऊनही मी संबंध जपू शकतो, असं एका प्रकारे फडणवीस सांगत असावेत. मी दुस्वास करणारा नाही, संबंध जपणारा आहे असा तो संदेश आहे.
"त्यासोबत मला वाटतं, की ते दोघेही प्रभावी प्रशासक आहेत. त्यामुळे राज्य सध्या अभूतपूर्व संकटांचा सामना करतं आहे. त्यामुळं ते या विषयांवर बोलले असावेत आणि त्यांच्या या चर्चेचा राज्याला फायदाही होऊ शकतो," असं नानिवडेकर म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








