कोरोना औषध : सांगलीतल्या कंपनीने दावा केलेलं 'अॅन्टीकोव्हिड सिरम' नेमकं काय आहे?

- Author, मयांक भागवत आणि स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठी
सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा इथल्या आयसेरा बायोलॉजीकल कंपनीला कोरोनावरच्या इंजेक्शनच्या मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी या कंपनीने आयसीएमआर कडे याबाबत परवानगी मागितली.
या अंतर्गत आता क्लिनिकल ट्रायल 1 साठी परवानगी मिळाली असल्याची माहिती कंपनीचे मुख्य संचालक दिलीप कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीला दिली. पहिल्या चाचणीसाठी 3 हॉस्पिटलमध्ये साधारण 100 ते 150 रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल.
याचा अहवाल पाठवल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीची परवानगी मिळू शकेल. असं कुलकर्णी यांनी सांगितले. या मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर या इंजेक्शनला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
औषधांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्रातील सांगलीच्या 'आयसेरा बायोलॉजिकल' ने कोव्हिड-19 वर इंजेक्शन तयार केल्याचा दावा कंपनीने केला होता. 'अॅन्टीकोव्हिड सिरम' च्या एक-दोन डोसनंतर कोरोनारुग्ण लवकर बरे होण्यास मदत मिळेल असा कंपनीने म्हटलं होतं.
प्राण्यांवर चाचणी केल्यानंतर, कंपनीने औषध महानियंत्रकांकडे या 'सिरम' ची मानवी चाचणी करण्यासाठी परवानगी मागितली होती. आता आयसीएमआरने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे.
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) गेल्यावर्षी, घोड्यांपासून बनवण्यात येणाऱ्या 'अॅन्टीसेरा' ची मानवी चाचणी सुरू केली होती. पण, याचे परिणाम अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. तर कोस्टारिकामध्ये 'अॅन्टीसेरा' कोव्हिडविरोधात प्रभावी नसल्याचं चाचणीत दिसून आलंय.
तज्ज्ञ म्हणतात, माणसांवर याचे साईड इफेक्ट दिसून येतात, ते पाहाणं महत्त्वाचं आहे.
'अॅन्टीसेरा' सिरम म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार 'अॅन्टीसेरा' सिरम बनवण्याची ही पद्धत फार जुनी आहे. रेबीज आणि इतर आजारांवरील औषध बनवण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो.
'अॅन्टीसेरा' बनवण्यासाठी कोरोनाव्हायरस घोड्याला टोचण्यात आला. घोड्याच्या शरीरात कोव्हिड-19 विरोधात लढण्यासाठी अॅन्टीबॉडी किंवा प्रतिजैविके तयार करण्यात आली. घोड्याच्या रक्तातून काढलेल्या अॅन्टीबॉडीज प्रक्रियाकरून शुद्ध करण्यात आल्या.
रक्तातील 'अॅन्टीसेरा' काढून संशोधकांनी हे इंजेक्शन बनवलं आहे.
मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी
कंपनीचा दावा आहे की प्राण्यांवर करण्यात आलेल्या चाचणीत 'अॅन्टीसेरा सिरम' प्रभावी असल्याचं आढळून आलंय.
आयसेरा बायोलॉजिकलचे संचालक नंदकुमार कदम म्हणतात, "कोव्हिडविरोधात 'अॅन्टीसेरा' च्या वापरासाठी औषध महानियंत्रकाकडे मानवी चाचणीची परवानगी मागितली आहे."

औषध महानियंत्रकांकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
टास्कफोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी औषध नियंत्रकांकडून परवानगी मिळाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल असं म्हंटलय.
'घोड्यांमधील अॅन्टीबॉडीज प्लाझ्मापेक्षा मजबूत'
भारतात कोरोनारुग्णांवर उपचारासाठी 'प्लाझ्मा थेरपी' चर्चेच्या केंद्रस्थानी होती. कोव्हिडमुक्त झालेल्यांच्या शरीरातून अॅन्टीबॉडीज काढून रुग्णांना दिल्यास फायदा होईल यावर संशोधन सुरू झालं.
आयसेरा बायोलॉजिकचे संचालक डॉ. दिलीप कुलकर्णी पत्रकारांना माहिती देताना म्हणतात, "कोरोनामुक्त झालेल्यांच्या प्लाझ्माला मोठी मागणी आहे. प्लाझ्मामुळे कोरोनारुग्ण बरे होतात. या अॅन्टीबॉडीज व्हायरसला नष्ट करतात. तशाच पद्धतीने संशोधन सुरू झालं."
तज्ज्ञ सांगतात, प्लाझ्मा थेरपी वादग्रस्त आहे. याचा फायदा होत नसल्याचं अनेक ट्रायलमधून स्पष्ट झालंय. याबाबत डॉ. कुलकर्णी यांना विचारल्यानंतर ते सांगतात, "केन्वल्झंट प्लाझ्मामधील अॅन्टीबॉडीज कमकुवत असतात. पण, घोड्यांमध्ये लाखांनी तयार झालेल्या अॅन्टीबॉडीज खूप मजबूत आहेत. ज्याचा फायदा रुग्णांना होईल."
प्लाझ्मा व्हायरस म्युटेट होण्यासाठी कारणीभूत आहे असं डॉ. शशांक जोशी म्हणात. तर, प्लाझ्माच्या अनियंत्रित वापरावरील नियंत्रणासाठी तज्ज्ञांनी आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिलंय.

यावर प्रतिक्रिया देताना डॉ. कुलकर्णी सांगतात, "यामध्ये व्हायरसला म्युटेट होण्याचीसाठी वाव मिळणार नाही. यामुळे व्हायरस नष्ट होतात."
कोणत्या रुग्णांना दिलं जाणार इंजेक्शन?
कोरोनाचा मध्यमं आणि गंभीर संसर्ग झालेल्यांना या इंजेक्शनचा एक किंवा दोन डोस देण्यात येतील, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलीये. डॉ. कुलकर्णी पुढे माहिती देतात, सिरम इंन्स्टिट्युटने या अॅन्टीबॉडीजची चाचणी विविध म्युटेशनवर केली आहे.
कंपनीचे संचालक नंदकुमार कदम सांगतात, "कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या तयार अॅन्टीबॉडीज रुग्णांना मिळाल्यास, त्यांची रिकव्हरी होण्यासाठी मदत होते. आम्ही, व्हायरसचे व्हायटल अॅन्टीजीन ओळखून त्याविरोधात अॅन्टीबॉडीज तयार केल्या आहेत."
साईड इफेक्टचा धोका आहे?
इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "ही पद्धत फार जुनी आहे. पूर्वी रेबीजविरोधी लस अशा पद्धतीने बनवण्यात येत होती. मात्र, आता नवीन पद्धतींमुळे ही मागे पडलीये."
तज्ज्ञांच्या मते, या पद्धतीने बनवण्यात येणाऱ्या औषधांचे साईड इफेक्ट होण्याचा धोका आहे.
"या पद्धतीने बनवण्यात येणाऱ्या लशीच्या अनेक रिअॅक्शन येत होत्या. सिरममध्ये काही घटक असतात, जे माणसाला चालत नाहीत. ज्यांची रिअॅक्शन होऊ शकते," असं डॉ. भोंडवे म्हणाले.
ते पुढे सांगतात, "हे उपयुक्त ठरतं. पण, त्याचे साईड इफेक्ट महत्त्वाचे आहेत. माणसांमध्ये दुष्परिणाम दिसून येतात. मानवी चाचणीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर याची विश्वासार्हता आणि सुरक्षितता यावर बोलता येईल."
तज्ज्ञांनी उपस्थित केलेले प्रश्न आम्ही आयसेराचे संचालक नंदकुमार कदम यांना विचारले.
ते म्हणाले, "अॅन्टीसेरा' बनवण्याची प्राणाली बदलली आहे. ज्यामुळे साईड इफेक्ट होण्याची शक्यता कमी आहे. औषधात गरज नसलेल्या अॅन्टीबॉडीज आणि प्रोटीन काढून टाकल्याने दुष्परिणाम होण्याची शक्यता नाही."

फोटो स्रोत, Getty Images
तर डॉ. कुलकर्णी यांच्या माहितीनुसार, "औषधात प्रोटीनची मात्रा जास्त असेल तर साईड इफेक्ट जास्त होतो. या औषधात अत्यंत कमी प्रमाणात प्रोटीन आहे. 'अॅन्टीसिरम' मध्ये रिअक्शन येण्याची शक्यता आहे. पण याचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि त्यावरही उपचार आहेत."
ICMR ची 'अॅन्टीसेरा' चाचणी
पीटीआयच्या माहितीनुसार, इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने गेल्यावर्षी हैद्राबादच्या बायोलॉजिकल-ई कंपनीसोबत 'अॅन्टीसेरा' चाचणी सुरू केली होती. याच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीला औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ICMR ने ट्विटकरून, संसर्ग प्रतिबंध आणि कोव्हिड उपचारासाठी शुद्ध 'अॅन्टीसेरा' बनवल्याचा दावा केला होता. रेबीज, हेपिटायटीस-बी अशा व्हायरस आणि जीवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गात आजार नियंत्रणासाठी या पद्धतीचा वापर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.
पण, या ट्रायलचं पुढे काय झालं? त्याचे परिणाम काय? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
कोस्टिराकामधील चाचणीचा परिणाम काय?
द टिको टाईम्सच्या माहितीनुसार, दक्षिण अमेरिकेतील कोस्टरिकामध्ये घोड्यांच्या प्लाझ्मापासून बनवण्यात येणाऱ्या सिरमचा कोव्हिड रुग्णांवर काय परिणाम होतो यावर अभ्यास करण्यात आला होता.
पण, या संशोधनाचे अपेक्षित परिणाम आढळून आले नसल्याचं कोस्टारिकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.
कोस्टारिका सोशल सिक्युरिटी सिस्टिमच्या अध्यक्ष रोमन मकाया यांनी पत्रकारांना, क्लिनिकल ट्रायलमध्ये या सिरमचा फार कमी परिणाम कोव्हिड रुग्णांवर झाल्याची माहिती दिली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








