अदार पुनावाला: 'कोरोना लशीसाठी पॉवरफुल लोकांकडून धमक्या येत होत्या' #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं, वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योगपती यांच्याकडून लशीसाठी दबाव-अदर पुनावाला
फोन कॉल्स ही वाईट गोष्ट आहे. विविध राज्यांतील बडे नेते, व्यापार मंडळांचे प्रमुख, उद्योगपती यांच्यासाठी समाजातील प्रभावशाली मंडळींचे लशीसाठी फोन येतात. कोव्हिशिल्ड लशीचा तात्काळ पुरवठा करा अशी मागणी होते असं धक्कादायक वक्तव्य सीरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा अदार पुनावाला यांनी केलं. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.
द टाईम्स यूकेला दिलेल्या मुलाखतीत अदार पुनावाला म्हणाले आहेत की, "याला धमक्या म्हणणं फार साधी गोष्ट ठरेल. या लोकांना असणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्याकडून वापरली जाणारी भाषा खरोखर खूपच विचित्र आहे. खरं तर हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. प्रत्येकाला आपल्याला लस मिळावी असं वाटतं आहे. मात्र आपल्याआधी इतरांना लस का दिली जातेय हे त्यांना समजत नसल्याने अडचण निर्माण होतेय."
अदार पूनावाला हे सध्या कुटुंबासोबत ब्रिटनमध्ये आहेत. सीरम इन्स्टिट्यूट आता देशाबाहेर लस निर्मितीचा प्लॅन्ट सुरू करण्याचेही नियोजन करत असल्याचंही ते म्हणाले.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींना भारत सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, आत्तापर्यंत देशात झालेल्या लसीकरणामध्ये सर्वाधिक लसीकरण हे अदार पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेल्या कोविशिल्ड लसीचं झालं आहे.
2. दिल्लीला ऑक्सिजन पुरवा नाहीतर कारवाईला सामोरं जा- दिल्ली उच्च न्यायालय
ऑक्सिजनअभावी दिल्लीतील परिस्थिती नाजूक बनली आहे. मात्र, वारंवार मागणी करुनही केंद्राकडून पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नसल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शनिवारी चांगलंच फटकारलं.
दिल्लीला आजच्या आज ऑक्सिजन पुरवा अन्यथा कोर्टाच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल कारवाईला तयार राहा असा कडक इशाराच न्यायालयाने केंद्राला दिला. केंद्रावर ताशेरे ओढताना ऑक्सिजन हा इगोचा विषय बनलाय का? अशी टिपण्णीही हायकोर्टानं केली आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
न्यायालयाने केंद्राला आदेश देताना म्हटलं की, "दिल्लीला कुठल्याही परिस्थितीत शनिवारी 490 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळेल याची खात्री करा. जर हे झालं नाही तर आदेश न पाळल्यानं तो कोर्टाचा अपमान असेल असे मानू असं न्यायालयाने सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, दिल्ली न्यायालयाने दिल्ली सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर केंद्राला म्हटलं, "आता पाणी आमच्या डोक्यावरुन जायला लागलं आहे. आता सर्व पुरे झालं. तुम्हाला दिल्लीसाठी ऑक्सिजन तयार ठेवावा लागेल, तुम्हाला याची पूर्तता करावीच लागेल," दिल्ली सरकारला सांगताना हायकोर्टानं म्हटलं, "केंद्र सरकार सोमवारी काय म्हणतंय ते पाहुयात. रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा लिंडे एअरकडून केलं जातो. मात्र, पुरवठादाराकडूनही काहीही प्रतिसाद आलेला नाही. रुग्णालयांना ऑक्सिजनची तीव्र गरज आहे."
3. रेमडेसिवीर लिहून देणाऱ्या रुग्णालयांवर प्रतिबंध आणा-अमोल कोल्हे
काही रुग्णालये रुग्णांना रेमडेसिवीर लिहून देतात. यामुळे रुग्णांचे नातेवाईकांना इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागते. असे करण्याला रुग्णालयांना मज्जाव करावा, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते.
सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमधील उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचे ऑडिट करावे, तसे झाल्यास ऑक्सिजनचा योग्य वापर होऊन बचत होऊ शकेल असेही त्यांनी सरकारला सूचवले आहे.
4. 2 वर्षांत 15 लाख कोटी रुपयांचे रस्ते वाहतुकीचं लक्ष्य-गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी म्हटले की, सरकार पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे आणि येत्या दोन वर्षांत 15 लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधकाम करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन (एनआयपी) सारखे प्रकल्प हे सन 2019 ते 2025 मधील प्रथम प्रकारचे आहेत आणि सरकार नागरिकांना जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा पुरविण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी वचनबद्ध आहे.'
'वर्ष 2025 पर्यंत एनआयपी अंतर्गत 111 लाख कोटी रुपयांच्या 7,300 पेक्षा जास्त प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाईल,' असे गडकरी म्हणाले. एनआयपीचा हेतू प्रकल्प तत्परता सुधारणे आणि महामार्ग, रेल्वे, बंदरे, विमानतळ, गतिशीलता, ऊर्जा, कृषी आणि ग्रामीण उद्योग यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे आहे.
5. माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीनचा कोरोनामुळे मृत्यू
एका हत्येप्रकरणी तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आरजेडीचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीनचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 'नवभारत टाईम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या शहाबुद्दीन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं कळताच त्यांना दिल्लीला हलवण्यात आलं.
शहाबुद्दीन यांच्यावर अपहरण, शस्त्रं बाळगणं, दंगल घडवून आणणे असे अनेक खटले दाखल आहेत. 1990 मध्ये ते बिहार विधानसभेत निवडून आले. 1995 मध्येही ते निवडणूक जिंकले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








