उद्धव ठाकरे म्हणतात, 'उद्यापासून तरुणांचं लसीकरण,' पण लशी आहेत कुठे?

राज्यात आणखी कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. उद्यापासून 18-44 वयोगटाचं लसीकरण पुरवठ्यानुसार सुरू करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (30एप्रिल) महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, "केंद्राने लसीकरण करण्याची जबाबदारी आपल्यावर टाकली. आपल्याला 12 कोटी डोस लागतील. जीव महत्त्वाचा आहे. आपण एकरकमी पैसे देऊन लस घेण्याची तयारी आहे. पण लसीकरणाच्या पुरवठ्यावर मर्यादा आहे. मे महिन्यात केंद्राकडून 18 लाख डोसेस मिळणार आहेत. पण लस मिळण्याची तारीख मिळालेली नाही."
लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. 18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांसाठी 3 लाख लशी आल्याचं त्यांनी जाहीर केलं.
लशीचा जास्तीत जास्त पुरवठा करून द्यावा, असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे -
- जी काही बंधन आज लावलेली आहेत, त्याहीपेक्षा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का असं उच्च न्यायालयाने महाधिवक्तांना विचारलं होतं. मी तुम्हाला विचारतो. मला वाटतं ती वेळ आली असली, तरी तसा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज नाही.
- निर्बंध लावून काय झालं, तर रुग्णसंख्या कमी झाली. आपण जर बंधन घातली नसती तर आजच्या दिवशी महाराष्ट्रात 9.30 ते 10 लाख सक्रिय रुग्ण असू शकले असते. रुग्णवाढ उताराला लागलेली नाहीये. पण आपण ती 6-6.30 लाखापर्यंत थांबवली आहे. अजूनही काही काळ आपल्याला बंधन पाळण्याची आवश्यकता आहे.
- इतर राज्यांनी महाराष्ट्रापेक्षा चांगल्या गोष्टी केल्या असल्यास, त्याचं अनुकरण करण्यास आपण तयार आहोत.
- कोव्हिडची तिसरी लाट आली तर त्यावेळी ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी तरतूद करण्यात येत आहे.
- राज्य सरकार 275 PSA ऑक्सिजन प्लांट उभारत असून, केंद्र सरकारने 10 प्लांट्स दिले आहेत.
- पुढचे दोन महिने शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. राज्यात 290 शिवभोजन केंद्रं असल्याचं त्यांनी सांगितलं.
- सगळ्या जगात लाटांमागून लाटा येत आहेत. एकूण लाटा किती येणार, हे आपण किती काळजी घेतोय यावर अवलंबून आहे. दुसरी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल असं वाटलं नाही. उद्योग आणि कामगार नेत्यांशी मी बोललो. त्यांना काय करायचं याची सूचना दिली आहे. तिसरी लाट आपण सगळ्यांच्या सहकार्याने थोपवल्याशिवाय राहणार नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








