कोरोना व्हायरस: मुंबई-पुणेसह महाराष्ट्रातील या 7 ठिकाणी संवेदनशील परिस्थिती

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात बसला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबई-पुण्यात आहे पण त्याच बरोबर ठाणे, नागपूर, नाशिक, बुलडाणा आणि उस्मानाबादमध्ये बिकट परिस्थिती आहे.

कोरोना व्हायरसची दुसरी लाट गेल्या वर्षीच्या पहिल्या लाटेपेक्षाही मोठी असल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं. संपूर्ण देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कवेत घेतलं आहे. सध्या प्रतिदिन सुमारे साडेतीन लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण देशात आढळून येत आहेत.

गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेचा फटका देशात महाराष्ट्राला सर्वाधिक बसला होता. यंदाही महाराष्ट्र कोरोनाची दुसरी लाट थोपवू शकला नाही. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रतिदिन सरासरी 65 हजारांच्या आसपास नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होताना दिसते.

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश असल्याचा अहवाल केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने गेल्या महिन्यात दिला होता.

हा अहवाल येऊन एक महिना उलटून गेला तरी राज्यातील परिस्थिती बदललेली नाही. राज्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाने मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरले आहेत. राज्यातील कोरोना लाटेचा सर्वोच्च बिंदू कधी येईल, याबाबत विविध संस्थांनी विविध प्रकारचे अहवाल प्रकाशित केलेले आहेत. याबाबत बीबीसीने केलेली बातमी तुम्ही येथे वाचू शकता.

2 मे रोजीचा अंदाज

सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या 20 एप्रिल रोजीच्या अहवालात 2 मे रोजीचा अंदाज व्यक्त केला होता. राज्यात प्रतिदिन सरासरी 65 हजार रुग्ण आढळून येत असताना याच वेगाने रुग्णवाढ राहिल्यास 2 मे रोजी काय परिस्थिती असू शकेल याची आकडेवारी आरोग्य विभागाने दिलेली आहे.

अहवालातील अंदाजानुसार, मुंबईत 2 मे रोजी 1 लाख 46 हजार 065 सक्रिय रुग्ण असू शकतात. या काळात सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांकरिता 3837 आयसोलेशन खाटा उपलब्ध असतील. पण ऑक्सिजन, ICU आणि व्हेंटिलेटरयुक्त खाटा मिळवण्यात रुग्णांना अडचणी येऊ शकतील. यादरम्यान, ऑक्सिजनच्या 6433, ICU 1477 तर 121 व्हेन्टिलेटर बेडचा तुटवडा जाणवू शकतो.

कोरोना टेस्ट

फोटो स्रोत, Getty Images

अंदाजानुसार पुण्यात 2 मे रोजी 1 लाख 85 हजार 162 रुग्ण असू शकतात. मात्र इतक्या क्षमतेने कोणत्याच प्रकारचे बेड उपलब्ध नसतील, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. यादरम्यान पुण्यात 34 हजार 528 आयसोलेशन खाटा, 13 हजार 118 ऑक्सिजन बेड, 2240 ICU बेड तर 518 व्हेन्टिलेटर बेड कमी पडू शकतात.

हीच परिस्थिती नागपूर, नाशिकसह नांदेड, लातूर आणि इतर ग्रामीण भागात पाहायला मिळू शकते.

रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून बेड, ऑक्सिजन बेड, व्हेन्टिलेटर यांची उपलब्धता, सक्रिय रुग्णसंख्या तसंच लसीकरण या सर्व बाबींचा विचार करता या जिल्ह्यातील परिस्थिती संवेदनशील असणार आहे.

आगामी काळात राज्यातील या 7 जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती असेल, यावर कोरोना लाटेचं भवितव्य अवलंबून असेल.

पुणे -

राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेदरम्यान पुणे शहर आणि जिल्ह्याला मोठा फटका बसल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत पुण्याची परिस्थिती गेले काही दिवस अतिशय बिकट होती. तसंच, बेड, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आदींच्या उपलब्धतेबाबतही समस्या निर्माण झाल्या होत्या. पण 19 एप्रिलपासून पुण्याची स्थिती थोडीफार सुधारत असल्याचं चित्र आहे.

गेल्या एका आठवड्यापासून शहर-जिल्ह्यातील नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या पुणे जिल्ह्यात 1 लाख 4 हजार 561 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एका आठवड्यापूर्वी पुण्यात कोव्हिड रुग्णांना बेड मिळवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. पण आज परिस्थितीत किंचित सुधारणा झाल्याचं दिसून येतं.

लॉकडाऊन

फोटो स्रोत, Getty Images

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डनुसार पुण्यात मंगळवारी (27 एप्रिल) 227 ऑक्सिजन बेड तर 1158 आयसोलेशन बेड उपलब्ध होते. अनेक स्वयंसेवी संस्थांनी कोव्हिड केअर सेंटर उभारल्याने बेडची संख्याही वाढत आहे.

दुसरीकडे, पुण्यात अजूनही रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. याबाबत गेल्या आठवड्यात रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं. त्यानंतर प्रशासनाने रेमडेसिवीर औषधासाठी हेल्पलाईन बनवली. पण तरीही रुग्णांच्या नातेवाईकांना हे औषध मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. या औषधाच्या टंचाईची समस्या अजूनही सोडवली गेली नाही.

मुंबई -

13 एप्रिल 2021 ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू केले. त्यावेळी मुंबई परिसरातील दैनंदिन कोरोना रूग्णांची संख्या 16,596 इतकी होती, तर फक्त मुंबई शहरातील दैनंदिन कोरोना रूग्णांची संख्या ही 7,873 होती. हे कडक निर्बंध लागू करून 12 दिवस झाले. यानंतर मुंबईतल्या कोरोना रूग्णांची संख्या ही कमी होताना दिसली.

लॉकडाऊन

फोटो स्रोत, Getty Images

तत्पूर्वी, गेल्या महिन्याभरातील निवडक दिवसांमधील रुग्णवाढीची संख्या पाहूया. 4 एप्रिल रोजी एका दिवसात 11 हजार 163 रुग्ण आढळले होते, तर काल म्हणजे 26 एप्रिल रोजी एका दिवसात वाढलेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 840 वर आली.

पण असं असलं तरी मुंबईतील दाट लोकवस्ती आणि इतर बाबींकडे लक्ष दिल्यास येथील परिस्थिती संवेदनशील मानली जाते.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चाचण्यांच्या बाबतीत मुंबई राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. इथं प्रतिदशलक्ष 4 लाख 11 हजार 198चाचण्या झाल्या आहेत.

पहिल्या लाटेदरम्यान मुंबईमधील सर्वाधिक सक्रिय रुग्ण 34 हजार 259 इतके होते. पण 19 एप्रिल रोजी ही संख्या 85 हजार 321 इतकी नोंदवण्यात आली. एका आठवड्यात ही संख्या घटून 68 हजार 603 वर आली आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मुंबईत दहा ते बारा टक्के रुग्ण असतात. अशा स्थितीत मुंबईतील परिस्थितीवर राज्यातील बऱ्याच अंशी अवलंबून असणार आहे.

ठाणे -

ठाणे जिल्ह्यात 27 एप्रिलपर्यंत 72 हजार 302 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण होते. ठाणे जिल्ह्या आणि परिसरात ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार तसंच पनवेल आदी महापालिकांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतो.

मास्क

फोटो स्रोत, Getty Images

ठाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही 30.67 टक्के इतका आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा (25.55 टक्के) हा जास्त असल्याने ठाण्याकडे विशेष लक्ष असणार आहे.

शिवाय, ठाणे क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण आहे. राज्यात सर्वाधिक महानगरपालिक ठाणे जिल्ह्यातच आहेत.

अंदाजानुसार ठाण्यात 19 हजार 821 आयसोलेशन खाटा, 4949 ऑक्सिजन खाटा, 1267 ICU खाटा आणि 432 व्हेंटीलेटर्स यांची कमतरता भासू शकते. त्यामुळे येथील परिस्थिती जास्त संवेदनशील मानली जाते.

नागपूर -

गेल्या आठवडाभरात नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्ययंत्रणा अपुरी पडत आहे. नागपूर महानगर पालिकेच्या डॅशबोर्डवर माहितीनुसार शहरात गेल्या आठवडाभरात एकही वेंटीलेटर बेड नव्या रुग्णांसाठी उपलब्ध नव्हते.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

नागपूर शहरातील महानगर पालिका क्षेत्रात 551 वेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. महापालिका क्षेत्रात 4 हजार 521 एवढे ऑक्सिजन सपोर्ट असणारे बेड्स आहेत. 1 हजार 924 एवढे आयसीयु एवढे बेड्स आहेत. तर विना ऑक्सिजन सपोर्टचे 350 बेड्स उपलब्ध आहेत.

पण या पैकी गेल्या आठवडाभरात महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर माहितीनुसार ऑक्सिजन सपोर्ट असणारे बेड्स कधीही 40 च्या वर उपलब्ध नव्हते. तर ऑक्सिजन सपोर्ट असणारे बेड्स 50 च्या वर उपलब्ध नव्हते.

गेल्या आठवडाभरात नागपूर जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाचा आलेख जरी वाढता असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची सुद्धा संख्या वाढली आहे. मंगळवारी 27 एप्रिल रोजी 6 हजार 287 एवढे रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर शहर आणि ग्रामिण मिळून 101 रुग्णांचा मृत्यू झाला. यात महापालिका क्षेत्रातील 54 लोक तर ग्रामिण मधील 39 लोकांचा समावेश आहे.

24 एप्रिल रोजी एकूण बेड्‌सची संख्या 7144 इतकी झाली आहे. अर्थात सप्टेंबर 2020 नंतर 5 हजाप 630 बेड्‌स वाढविण्यात आले आहेत. सध्या नागपूर शहरात 4 हजार 653 बेड्‌स ऑक्सिजनसह असून 2 हजार 113 बेड्‌स आय.सी.यू.चे आहेत तर 542 बेड्‌स व्हेन्टिलेटर्स आहेत. ही संख्या पुन्हा वाढणार असून यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.

नाशिक -

गेल्या महिन्यात नाशिकमधील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट प्रचंड वाढला होता. तर 17 एप्रिलच्या एका अहवालानुसार प्रति दशलक्ष कोरोनाचा फटका बसलेल्या चार शहरांमध्ये नाशिक आघाडीवर होतं.

नाशिकमध्ये एका महिन्यात एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या 3947 इतकी होती. संपूर्ण महिन्यात शहरात 97 हजार 765 रुग्ण आढळून आले. दशलक्ष रुग्णसंख्येनुसार पाहिल्यास हा आकडा 46050 वर जातो.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटीच्या बाबतीत नाशिक इतर मोठ्या शहरांपेक्षा पुढे आहे. सध्या नाशिकचा पॉझिटिव्हिटी रेट 34.28 टक्के इतका आहे.

उस्मानाबाद -

कोरोना आता शहरी भागासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. उस्मानाबादचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 19 एप्रिल रोजी 39.25 नोंदवण्यात आला. याबाबतीत उस्मानाबाद पहिल्या क्रमांकावर आहे. खालोखाल परभणी, हिंगोली आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे.

येथील चाचण्यांचं प्रमाणही कमी असल्याचं पाहायला मिळतं. उस्मानाबादमध्ये प्रति दशलक्ष 91 हजार 791 चाचण्या होत आहेत. अशीच परिस्थिती राज्यातील इतर ग्रामीण भागात पाहायला मिळते. राज्य प्रशासनाने चाचण्यांच्या बाततीत मोठ्या शहरांवर लक्ष केंद्रित केलं असलं तरी ग्रामीण भागात चाचण्या पुरेशा प्रमाणात होत नसल्याने भविष्यात अडचणी वाढू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

बुलडाणा -

सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या अहवालात बुलडाणा जिल्ह्याचा विशेष उल्लेख केला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 11.14 आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा हा कमी आहे. राज्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 25.55 टक्के इतका आहे. पण असं असूनही बुलडाणामधील मृत्यूदर गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढला.

जिल्ह्यात चाचण्यांचं प्रमाणही कमी आहे. बुलडाणामध्ये प्रतिदशलक्ष फक्त 57 हजार 945 या प्रमाणात चाचण्या झाल्या आहेत. येथील रुग्णवाढीचं प्रमाणही 0.25 टक्के आहे. मात्र, दुसरीकडे बुलडाणाचा मृत्यूदर 4.76 इतका नोंदवण्यात आला. त्यामुळे बुलडाणामध्ये अधिकाधिक चाचणी होणं आवश्यक आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)