पुणे कोरोना निर्बंध : पुण्यात उद्यापासून दिवसभर जमावबंदी, हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहणार

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

पुणे जिल्ह्यात आजपासून (3 मार्च 2021 पासून) पुढच्या 7 दिवसांसाठी दिवसभर जमावबंदी तसंच संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केला आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या पुण्यात सर्वाधिक चाचण्या करण्यात येत आहेत. आगामी काळात चाचण्यांची संख्या वाढवण्यात येईल. त्याचप्रमाणे आरोग्य सुविधाही वाढवली जाईल.

बेडची संख्याही वाढवण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक बेड वाढवण्यात येणार आहेत. 5 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं सौरभ राव यांनी सांगितलं.

रुग्णांचं प्रमाण वाढल्या तर काही रुग्णालये केवळ कोव्हिड उपचारासाठी ठेवण्यात येतील. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील अधिक आहे, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

गेल्या 10 दिवसात राज्यात सर्वाधिक लसीकरण पुण्यात झालं. याला अधिक गती दिली जाईल. प्रतिदिन 75 हजार नागरिकांना लस देण्याचं उद्दीष्ट प्रशासनाने ठेवलं आहे.

पुढील 100 दिवसांत 18 वर्षांच्या वरील नागरिकांचं लसीकरण करण्याबाबत विचार आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असंही राव म्हणाले.

काय सुरू, काय बंद राहणार?

  • हॉटेल, रेस्टॉरंट, बार पुढील 7 दिवसांसाठी बंद, पार्सल सेवा सुरू राहणार.
  • मॉल्स, सिनेमा हॉल बंद, पीएमएल सुद्धा बंदधार्मिक स्थळ, आठवडे बाजार बंद असणार.
  • भाजी मंडई मध्ये सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळावे लागणार.
  • लग्न आणि अंत्यविधी सोडून कुठल्याच कार्यक्रमाला परवानगी नाही.
  • ऑफिसेस सुरू राहणार, 6 नंतर त्या कर्मचाऱ्यांना अडवणार नाही, मात्र आयकार्ड बाळगावे लागणार.

गिरीश बापट यांच्या सूचना

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी यावेळी प्रशासनाला काही सूचना केल्या.

सामान्य नागरिकांवर कारवाई करताना पोलिसांनी काळजी घ्यावी. ग्रुपने बसणाऱ्या लोकांनी कायदेशीर कारवाई करावी. पण त्यांनी मारहाण करू नये, अशी सूचना बापट यांनी दिली.

पोलिसांच्या मदतीला स्वयंसेवी संस्था, दक्षता समिती असेल. बेडसची संख्या वाढवण्यासाठी एमबीबीएस, रिटायर्ड डॉक्टर यांना मदतीला घ्यावे. केंद्र सरकार जेवढी लागेल तेवढी लस देईल. असंही बापट म्हणाले.

पीएमपीएल बंद करू नये, ती 40 टक्क्यांनी सुरू राहावी. कामगारांसाठी पीएमपीएमएल ची व्यवस्था करायला हवी. हॉटेल्स बंद न करता उभे राहून खाण्याची व्यवस्था करावी. हातगाड्यांवर पाच पेक्षा जास्त लोक एकावेळी नको. संचारबंदी 8 नंतर सुरू ठेवायला हवी होती. दिवसभर जमावबंदी असावी, असं मत बापट यांनी मांडलं आहे.

यावर काय निर्णय होतो, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)