संगणक परिचालक आंदोलन : '6 हजार रुपयांत घर कसं चालवायचं?'

- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
"आमच्या भरवशावर डिजिटल महाराष्ट्र पुरस्कार राज्याला तीनदा मिळालाय. आमच्या भरवशावर सरकारनं नाव कमावलंय आणि आता आम्हालाच सोडून द्यायला लागले. आम्हाला काही पोटपाणी आहे की नाही," ज्योती चौधरी यांनी राज्य सरकारला हा सवाल केला आहे.
ज्योती चौधरी या 2013 पासून जालना जिल्ह्यातल्या राममूर्ती गावात संगणक परिचालक (कॉम्प्युटर ऑपरेटर) म्हणून काम करत आहेत. गेल्या 9 दिवसांपासून संगणक परिचालकांचं मुंबईत आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाविषयी विचारल्यावर ज्योती सांगतात, "उद्धव ठाकरेंनी वचन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर तुमच्या मागण्या पूर्ण करू. पण, अजून काहीच केलं नाही. निवडून येईस्तोवर नुसती आश्वासनं दिली जातात."
IT महामंडळातून नियुक्ती मिळावी आणि त्याद्वारे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, तसंच किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावं अशी या आंदोलकांची मागणी आहे.
महिन्याला 6 हजार रुपये वेतन मिळतं, त्यात घर कसं चालवायच, असा सवाल ज्योती उपस्थित करतात.
त्या म्हणतात, "ग्रामपंचायतीतलं सगळं काम आम्ही करतो. जन्म-मृत्यू आणि वेगवेगळे दाखले देणं, ग्रामपंचायतीचा खर्च आणि वसुलीचा दररोजचा अपडेट ठेवणं ही सगळी कामं आम्ही करतो. याशिवाय शेतकरी कर्जमाफी किंवा इतर शासकीय योजनांची ऑनलाईन माहिती भरायचं कामंही आमच्याकडेच असतं. पण, याबदल्यात आम्हाला काय मिळतं तर महिन्याला 6 हजार रुपये इतकं वेतन. पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडवर सगळंच वाढलंय. या महागाईच्या काळात 6 हजार रुपयात घर कसं चालवायचं?"
ज्योती चौधरी यांच्या घरात 6 सदस्य असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्यावर अवलंबून आहे.

उद्धव ठाकरेंचं आश्वासन
संगणक परिचालकांनी नोव्हेंबर 2018मध्ये मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन केलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेत तुमच्या मागण्या पूर्ण करू, असं आश्वासन दिलं होतं.
त्यांनी आंदोलनाकांना म्हटलं होतं, "तुमच्याकडे डिजिटल तंत्रज्ञानाचं जे काही ज्ञान आहे ते संपूर्ण देशात महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं आहे. ती ताकद तुमच्यात आहे. मी तुम्हाला वचन देतो, तुमची साथ मी सोडणार नाही. माझ्या राज्यामध्ये तुमच्यावर अन्याय होणार असेल तर राज्याचं सरकार आणि राज्याचा उपयोग तरी काय? तुमच्या न्याय हक्कांच्या मागण्यांमध्ये शिवसेना तुमच्यासोबत आहे. तुमचे न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय मी राहणार नाही, हे वचन मी तुम्हाला देतो."
आता हेच वचन पूर्ण करण्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना काय अडचण आहे, असा सवाल महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे विचारतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "10 वर्षांपासून ग्रामपंचायतींमधील डिजिटलचं टोटल काम संगणक परिचालक करत आहेत. ग्रामीण भागातल्या 6 कोटी जनतेला घरपोच सुविधा उपलब्ध करून देत आहोत. अनेक आंदोलनं करूनही आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीये.
"आता आमचं 9 दिवसांपासून मुंबईत आंदोलन सुरू आहे, पण अद्याप सरकारनं दखल घेतलेली नाहीये. खरंतर आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि सध्या IT विभाग मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी 29 नोव्हेंबर 2018ला मागण्या पूर्ण करू म्हणून वचन दिलं होतं. आता ते वचन पूर्ण करण्यात त्यांना काय अडचण आहे?"
महाराष्ट्रात जवळपास 22 हजार संगणक परिचालक आहेत. सध्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना महिन्याला 6 हजार रुपये वेतन मिळत आहे.

मंगेश खरात (30) बुलडाणा जिल्ह्यातल्या अंभोरा-कुंभारी-जांभोरा या गटग्रामपंचायतीमध्ये 2011 पासून संगणक परिचालक म्हणून काम करत आहेत. ते स्वत: मुंबईतल्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
बीबीसी मराठीला त्यांनी सांगितलं, "आता ग्रामपंचायत स्तरावरची जवळपास सगळी कामं ऑनलाईन झाली आहेत. ती सगळी कामं संगणक परिचालक करतो. एमर्जन्सी असेल तर रात्ररात्र काम करावं लागतं. पण, बदल्यात खूप कमी वेतन मिळतं. आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. आता मुंबईत आंदोलन करत आहोत. पण, सरकार काहीच दखल घेत नाहीयेत."
केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार - हसन मुश्रीफ
संगणक परिचालकांच्या मागण्यांसदर्भात केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेणार आहोत, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
ते म्हणाले, "संगणक परिचालकांच्या प्रकरणी लवकरच केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची मी भेट घेणार आहे. कारण आता संगणक परिचालकांच्या खोलीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला 4 लाख रुपये केंद्र सरकार द्यायला लागलं आहे. त्याशिवाय भारत नेटचा मोठा कार्यक्रम आहे. म्हणून या येणाऱ्या निधीतूनच संगणक परिचालकांना किमान वेतन द्यावं, यासाठी मी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत."

हे वाचलंत का?
- मुंबईला वीज पुरवठा कोण करतात? मुंबईत वीज कधीच कशी जात नाही?
- चीनी सायबर हल्ल्यामुळेच मुंबईमध्ये 12 ऑक्टोबरला लाईट गेले होते?
- फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची होत आहे लाहीलाही, पुढे काय होणार?
- कोरोनाला रोखण्यासाठी काय आहे मुंबई महापालिकेचं 'मिशन झिरो'?
- कोरोनावर मात करण्यासाठी मुंबईकरांमध्ये तयार झालेली 'हर्ड इम्युनिटी' आहे काय?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )








