संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

फोटो स्रोत, facebook
शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यासही कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे.मुख्यमंत्र्यांकडून आजच (गुरुवार, 4 मार्च) दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झालं होतं. त्यांनी तो आजच्या आज मंजूर केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एक दिवस आधी म्हणजे (रविवार, 28 फेब्रुवारी) संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवताना या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी अशी माझी मागणी संजय राठोड यांनी केली आहे.
या प्रकरणात राजकारण करण्यात आलं, ते लोकशाहीच्या विरोधात आहे, असं संजय राठोड यांनी म्हटलंय.
राजीनामा दिल्यानंतर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत संजय राठोड म्हणाले, "मी माझा राजीनामा दिला आहे. आमच्या बंजारा समाजातली तरुणी पूजा चव्हाण हिचा काही दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूवरून भाजपने प्रसार माध्यमं आणि समाज माध्यमांच्या माध्यमातून अतिशय घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. माझ्या समाजाची, वैयक्तिक माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार झाला."
"गेल्या 30 वर्षांपासून मी सामाजिक, राजकीय जीवनात सक्रीय आहे. ते उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, तपास व्हावा, ही माझी मागणी आहे. मी बाजूला राहून ही चौकशी व्हावी, ही माझी भूमिका आहे. सत्य समोर यावं, ही माझी भूमिका आहे. हेच मी मुख्यमंत्र्यांकडे बोललो आणि राजीनामासुद्धा दिलेला आहे."
पर्याय नाही म्हणून राजीनामा - फडणवीस
तर सरकारकडे आता उपाय उरला नाही, म्हणून राजीनामा घेण्यात आला, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

फोटो स्रोत, Sanjay Rathod/FACEBOOK
तसंच पूजा चव्हाण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणात तात्काळ एफआयआर दाखल करावा, असंही ते म्हणाले.
"खंरतर हे प्रकरण बाहेर आल्यानंतर पहिल्याच दिवशी राजीनामा द्यायला हवा होता. याचं कारण ज्या प्रकारचे पुरावे या प्रकरणात पाहायला मिळालं ते खूप भयानक आहे. त्यामुळे मंत्रिपदावर राहणं चूक होतं. पण, कुठेतरी आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, अशी अवस्था वाटल्यामुळे हा राजीनामा आला नाही."
"या प्रकरणात एवढे पुरावे असूनही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. एफआयआर दाखल केला नाही. त्या पोलिसांवर काय कारवाई करणार? त्यांच्यावर कारवाई का होत नाही? आमचं असं म्हणणं आहे की हा उशिरा आलेला राजीनामा आहे, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आमच्या चित्राताई वाघ, आमची महिला आघाडी आणि तुमच्यासारख्या प्रसार माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे अखेर राजीनामा घेणं भाग पडलेलं आहे. मात्र, केवळ राजीनामा घेऊन उपयोग नाही. या प्रकरणात तात्काळ एफआयआर दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे."
राठोडांवर गुन्हा दाखल करा - चित्रा वाघ
पूजा चव्हाण प्रकरण लावून धरणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना केवळ राजीनामा देऊन उपयोग नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे.

फोटो स्रोत, facebook
संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत चित्रा वाघ म्हणतात, "राज्याने या प्रकरणाकडे केवळ पूजा चव्हाण आणि संजय राठोड या नजरेतून बघू नये. हा प्रश्न राज्यातल्या सर्व मुलींच्या सुरक्षेचा आहे. पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, समाजाला ढाल करून कशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. हे असंच सुरू राहिलं तर राज्यातल्या कुठल्याच मुलीला न्याय मिळणार नाही."
त्या पुढे म्हणाल्या, "संजय राठोडने केवळ राजीनामा द्यावा, हे ध्येय नाही. त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. एफआयआर, ऑडियो क्लीप आणि इतर सर्व पुरावे समोर असताना पोलीस कुणाच्या दबावाखाली आहेत? महिला सुरक्षेचा विषय राजकारणा पलिकडचा आहे."
अन्यायकारक कारवाई - जितेंद्र महाराज
संजय राठोड यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक आहे आणि विरोधी पक्षांच्या दबावामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "या प्रकरणाची चौकशी न होताच विरोधी पक्षांच्या दबावामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे आणि मुख्यमंत्र्यांना तो स्वीकारावा लागला आहे. संजय राठोड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक आहे, अशी आमची आणि समाजाची भावना झालेली आहे."
आपल्या पुढच्या भूमिकेविषयी बोलताना महंत जितेंद्र महाराज म्हणाले, "सध्या कोरोना संसर्ग आहे तो कमी झाला की धर्म पिठाची एक मोठी बैठक घेण्यात येईल आणि समाजातली अस्वस्थता दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू."
या बैठकीला संजय राठोड येणार का या प्रश्नावर सध्या तरी याबाबत त्यांनी कुठलीही अधिकृत माहिती दिली नसली तरी त्या बैठकीला येतील, असं महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितलं.
'रेणू शर्मा प्रकरणही लावून धरणार'
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, "हा दबावामुळे दिलेला राजीनामा आहे. खरंतर याआधीच राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, केवळ राजीनामा देऊन चालणार नाही. पूजा चव्हाण हिला न्याय मिळायला हवा. त्यासाठी संजय राठोड यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास झाला पाहिजे. नैतिकतेची बूज ठेवून उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो. पण, हे आधीच झालं असतं तर जास्त बरं झालं असतं."
दरम्यान, जे धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलं ते धाडस शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबतीत दाखवायला हवं होतं, असं म्हणत भाजप रेणू शर्मा प्रकरणही लावून धरणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले, "वनमंत्री संजय राठोड यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला राजीनामा 'टु लिटील टू लेट' आहे. खूप उशिराने राजीनामा घेतल्याने मुख्यमंत्र्यांचा सुसंस्कृतपणाचा बुरखा हा पूर्णपणे गळून पडला आहे. 18 दिवस पुरावे नष्ट करायचं काम झालं. याला जबाबदार कोण, हा प्रश्न आम्ही उद्याच्या अधिवेशनात विचारू. तात्काळ एफआयआर दाखल करून अरूण राठोड, संजय राठोड, मध्यरात्री 2 वाजता पूजाचा गर्भपात करणारे डॉक्टर या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांचे जबाब घेतले गेले पाहिजे. तोपर्यंत भाजप हे आंदोलन थांबवणार नाही."
संजय राठोड कोण आहेत?
संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं.
संजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली.
शिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला 'संत गाडगे बाबा विमानतळ' हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
त्यानंतर त्यांनी यवतमाळच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान दिलं.
अगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले.
2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला.
राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली. सध्या संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री आहेत.
यापूर्वी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांना काम करू दिलं जात नाही, असं म्हणत राठोड यांनी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र वापरलं होतं.
'ग्रामीण भागातील शिवसेनेचं नेतृत्व'
संजय राठोड हे ग्रामीण भागातील आमदार आहेत, असं मत ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव यांनी व्यक्त केलं.राठोड यांच्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना ते सांगतात, "संजय राठोड ज्या मतदार संघातून येतात तो मतदार संघ कायम बंजारा, कुणबी बहुल राहिलाय. बंजारा मतं ही त्यांच्या विजयासाठी नेहमी निर्णायक राहिली आहे. या मतदार संघामधली बंजारा मतं संजय राठोड यांनी शिवसेनेच्या बाजूने फिरवली. बंजारा नेतृत्व म्हणून संजय राठोड हे जरी पुढे आले असतील, तरी त्यांनी समाज उपयोगी कामं किती केले, यावर वादविवाद होतील. ग्रामीण भागातील शिवसेनेनं उभं केलेलं नेतृत्व म्हणून संजय राठोड यांच्याकडे पाहता येईल."

फोटो स्रोत, Sanjay Rathod/FACEBOOK
पुढे बोलताना ते सांगतात "गेल्या 20 वर्षांमध्ये आपण जर शिवसेनेचा कार्यकाळ बघितला खासकरून युती सरकारच्या काळातला कार्यकाळ बघितला, तर विदर्भामध्ये यवतमाळमधील दारव्हा दिग्रस या भागात शिवसेना वाढली ती संजय राठोड आणि भावना गवळी यांचे वडील पुंडलिक दादा गवळी यांच्यामुळे.
संजय राठोड यांचा राजकीय प्रवास सामान्य कुटुंबातून मंत्रिपदापर्यंत झाला, असं मत हितवादचे जिल्हा प्रतिनिधी दिनेश गंधे व्यक्त करतात.
ते सांगतात, "संजय राठोड यांना राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी संपर्क वाढवला. आरोग्य सेवेत त्यांनी मोठं काम केलंय. तात्या लहाने यांच्याकडून घेतलेल्या शिबिरात त्यांनी हजारो लोकांचे डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेतली. यवतमाळ शहरात एवढे दिग्गज नेते असतांना स्वबळावर त्यांनी महाराष्ट्रात ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी मोठे आंदोलन केली."

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








