मुंबई महानगरपालिका बजेट: शिवसेनेने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत यंदाचे वार्षिक बजेट सादर करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक रकमेचे बजेट मांडले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पालिकेत वार्षिक बजेट सादर करण्यात आले.
आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी तब्बल 39,038.83 कोटी रुपयांचे बजेट स्थायी समितीसमोर सभागृहात सादर केले. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे बजेट 16.74 टक्क्यांनी जास्त आहे.
कोरोना संकट काळात आणि लॉकडॉऊनमुळे पालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटकाही बसला आहे. वर्षभरात पालिकेचे महसुली उत्पन्न 5876.17 कोटी रुपयांनी घटले आहे. तर विकास नियोजन खात्यात 2679.52 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.
विकास कामांसाठी भरीव तरतूद
शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडसाठी बजेटमध्ये 2 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर गोरेगाव-मुलूंड लिंक रोडसाठी 1300 कोटी रुपयांची तरतूद आहे.
मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी पालिका विशेष निधी उभारणार आहे. यासाठी 5,876 कोटींचे अंतर्गत कर्ज घेतले जाईल अशी माहिती पालिकेने दिली आहे.

फोटो स्रोत, MCGM
मिठी नदीचा विकास आणि प्रदूषण रोखण्यासाठी 374 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 50 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
विकास कामांना मार्गी लावण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 1675 कोटी अंदाजे खर्च असलेल्या पुलांचे कामही यंदा मार्गी लावणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसंच जलवाहन बोगद्यांसाठी 399 कोटी रुपये तर मिठी नदी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 67 कोटी रुपये देण्यात आले आहे.
आरोग्य विभागाला प्राधान्य
कोरोना आरोग्य संकाटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आरोग्य विभासाठी 4,728 कोटी रुपयांचे बजेट जाहीर केले आहे. गेल्यावर्षी 5,226 कोटी रुपयांची सुधारित रक्कम आरोग्य विभागासाठी दिली होती.
आरोग्य विभागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी 822 कोटी रुपयांची तरतूद तर रुग्णालयांच्या बांधकामासाठी 1206 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई महानगरपालिकेच्या नर्सिंग शाळांचे रुपांतर नर्सिंग कॉलेजमध्ये होणार आहे. यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यासाठी 6 उपनगरीय रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर डिएनबी अभ्यासक्रम सुरू केला जाणार.
बजेटमध्ये महत्त्वाचा निर्णय
मुंबईत एमएमआरडीए, एसआरए, म्हाडा अशी विविध प्राधिकरणे मुंबईच्या विकास कामांसाठी स्थापन करण्यात आली आहेत. पण मुंबईचा विकास आणि नागरिकांच्या समस्येचे निवारण एकाच ठिकाणी होण्यासाठी सर्व प्राधिकरणे मुंबई महानगरपालिका अंतर्गत यावी असा प्रस्ताव पालिकेने राज्य सरकारला पाठवला आहे.
हा प्रस्ताव मंजूर झाल्यास राज्य सरकार अंतर्गत काम करणारी स्वतंत्र आस्थापने यापुढे मुंबई महानगरपालिकेअंतर्गत काम करतील. यासाठी मुंबई महानगरपालिका नियोजन प्राधिकरण उभारण्यात येईल.

फोटो स्रोत, Shahid shaikh
'बेस्ट' प्राधिकरणासाठी महानगरपालिका 750 कोटी रुपयांची मदत करणार. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या थकीत ग्रॅच्यूएटी 406 कोटी रुपयांचे कर्ज महापालिका बेस्टला देणार.
कर प्रणाली
500 स्क्वे.फूट घरांच्या मालमत्ता करात सरसकट सूट मिळणार नाही असं सांगत मालमत्ता करातील केवळ सर्वसाधारण कर माफ केल्याचे मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा स्पष्ट केले.
थकलेले मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरताना मिळणारी सवलतही पालिकेने आता रद्द केली आहे. तसंच थकलेले भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी पालिकेने सुरू केलेली अर्ली बर्ड योजना रद्द करण्यात आली आहे. यापुढे मुंबईतील प्रकल्पबाधितांना थेट रोख रक्कम मिळू शकणार आहे.
शैक्षणिक निर्णय
मुंबई महानगरपालिकेने 2,945 कोटी रुपयांचे शैक्षणिक बजेटही सादर केले. या बजेटमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांना यापुढे मुंबई पब्लिक स्कूलम्हणून संबोधले जाईल अशी घोषणा बजेटच्या माध्यमातून करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांसाठी साबण, सॅनिटायझरसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )








