राज ठाकरे : मनसेचे 'सुरक्षा रक्षक' पथक 'स्टंटबाजी' आहे का?

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत उद्धव ठाकरे सरकारकडून कपात करण्यात आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आता राज ठाकरे यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार असल्याची घोषणा केली आहे.

मनसेने राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र रक्षक' पथक स्थापन केले आहे. या पथकात मनसेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. हे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.

मुंबईतील एमआयजी क्लब येथे 12 जानेवारीला दुपारी पार पडलेल्या मनसेच्या बैठकीपूर्वी राज ठाकरे यांच्यासोबत मोठ्या संख्येने मनसेचे 'सुरक्षा रक्षक' होते.

राज्य सरकारने राज ठाकरे यांना देण्यात आलेल्या झेड सुरक्षेत कपात करून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.

मनसेचे 'महाराष्ट्र सुरक्षा रक्षक पथक'

फोटो स्रोत, MNS

फोटो कॅप्शन, मनसेचे 'महाराष्ट्र सुरक्षा रक्षक पथक'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केल्याने राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. मनसेच्य़ा नेत्यांनींही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठाकरे सरकारला प्रत्युत्तर म्हणून मनसेचे सचिव नयन कदम यांनी राज ठाकरेंना सुरक्षा देण्यासाठी हे पथक तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र रक्षक' पथक कसे काम करणार?

राज्य सरकारने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सुरक्षा कमी केल्यानंतर मनसेकडून हे विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

मनसेच्या 'महाराष्ट्र सुरक्षा' पथकात 50 सदस्य आहेत. या पथकातील 15 'रक्षक' राज ठाकरे यांच्यासोबत कायम असतील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आलीय.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "सरकारने आकसापोटी राज ठाकरे यांची सुरक्षा कमी केली आहे. गेल्या वर्षभरात विविध संघटनेचे लोक त्यांचे प्रश्न घेऊन राज ठाकरे यांना भेटण्यासाठी येत होते. यामुळे सरकारला पोटदुखी झाली असावी म्हणून असा निर्णय घेतला आहे. आमचे खच्चीकरण करण्याचा सरकारचा हा डाव आहे. पण आम्हाला यामुळे काहीच फरक पडत नाही."

मनसेने अशी सुरक्षा व्यवस्था पुरवणारे पथक कार्यरत करण्यापूर्वी परवानगी घेतली का?

यासंदर्भात बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, "रक्षणासाठी कार्यकर्त्यांना अधिकृत प्रशिक्षण दिलेले नाही पण ते आमचे विश्वासू कार्यकर्ते आहेत आणि राज ठाकरे यांच्या रक्षणासाठी ते सज्ज आहेत. यासाठी कुणाचीही परवानगी घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही. कोणीही आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. कारण आमच्या सुरक्षेचे आम्ही बघून घेऊ ही आमची भूमिका आहे."

सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी मनसेचे हे 'सुरक्षा रक्षक' राज ठाकरेंच्या सोबत असणार का?

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

"मनसेच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रश्नच येत नाही. पण सरकारी किंवा इतर कार्यक्रमांवेळी राज ठाकरे यांच्यासोबत सरकारी सुरक्षा व्यवस्था असेलच आणि जवळपास हे रक्षकसुद्धा असतील," असेही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.

मनसेचे 'महाराष्ट्र रक्षक' पथक वादात?

सरकारी सुरक्षा व्यवस्थेत कपात झाल्यानंतर राजकीय नेते अशा पद्धतीने खासगी सुरक्षा रक्षक ठेऊ शकतात का? आपल्याच कार्यकर्त्यांना 'सुरक्षा रक्षक' म्हणून ठेवणं आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन फिरणं सर्वसामान्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे? असेही प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात काहीही गैर नाही. हे बेकायदेशीर ठरत नाही. पण अशा सुरक्षा रक्षकांनी कायदा हातात घेतला तर काय? असाही प्रश्न आहे. यामुळे फसवणुकीचे प्रकार होण्याचीही शक्यता असते. सार्वजनिक कार्यक्रम स्थळी राजकीय पक्षाच्या किती कार्यकर्त्यांना तुम्ही परवानगी देणार? त्याठिकाणी जमलेल्या सामान्य जनतेची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी असे कार्यकर्ते बळाचा वापर करू शकत नाहीत. तसेच सुरक्षा रक्षक असल्याचे भासवून इतर कोणी फसवणूकही करू शकतं. त्यामुळे सरकारने अशा खासगी सुरक्षा रक्षकांबाबत नियमावली तयार करणं गरजेचे आहे."

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज ठाकरे

राज्यघटनेनुसार राजकीय नेते आणि सामान्य नागरिक समान आहेत. राजकीय नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेबाबत अनेकदा प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत.

"एखादा राजकीय पक्ष आपल्या नेत्याची सुरक्षा स्वत: करू पाहत आहे ही चांगली गोष्ट आहे. पण मुळात सामान्य जनतेत फिरण्यासाठी सुरक्षा लागते यावरूनच नेत्याच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित होतो," असंही मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

कायद्याच्या दृष्टीकोनातून असे सुरक्षा रक्षक पथक नेमण्यात काहीच गैर नाही असे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना वाटते. ते सांगतात, " नेत्याच्या सुरक्षेसाठी असे खासगी सुरक्षा रक्षक नेमणे यात काही गैर नाही. हे बेकायदा आहे असे मला वाटत नाही."

'हा तर मनसेचा स्टंट'

विविध खासगी कंपन्यांच्या वेबसाईट्सवर मराठी भाषेतून माहिती दिली जावी या मागणीसाठी मनसेकडून गेल्या काही दिवसांमध्ये पोस्टरबाजी, कंपनीच्या फलकांवर रंगाने लिहिणे, धडक मोर्चा अशी आंदोलनं करण्यात आली.

मुंबई महानगर पालिका, मुंबई, फडणवीस, राज ठाकरे
फोटो कॅप्शन, राज ठाकरे

यापूर्वीही मनसे कार्यकर्त्यांवर 'स्टंटबाजी' केल्याची टीका करण्यात आली आहे. मनसेचे 'महाराष्ट्र रक्षक' पथक हा सुद्धा एक 'स्टंट' आहे का?

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "मनसेचा मूळ स्वभाव हा शॉर्ट कट किंवा स्टंटबाजीचा असल्याचे दिसून येते. आपल्या नेत्यासाठी असे पथक तयार करणे म्हणजे हे राजकीय प्रत्युत्तर आहे. राजकारणापलीकडे यात काहीही नाही. आमचा नेता बलाढ्य आहे, आम्ही सरकारपुढे ओंजळ पसरत नाही. हे दाखवण्याचा हा प्रकार आहे."

राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंना आपला आदर्श मानत असल्याचे सांगतात पण बाळासाहेबांना कधीही सुरक्षा पथक तयार करण्याची गरज भासली नव्हती असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केले.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "हा शंभर टक्के स्टंट आहे. आपण राजकारणात लोकांसाठी काय करतो? आपला जनसंपर्क किती आहे? यापेक्षा आपल्या भोवती सुरक्षा रक्षकांचा गराडा किती मोठा आहे. यावर आपलं महत्त्व अवलंबून आहे असं समजण्याचा काळ आला असून त्याचे उघडपणे दर्शन राज ठाकरेंच्या या कृतीतून होते."

राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे

"बाळासाहेब ठाकरे माझे आदर्श आहेत असं राज ठाकरे कायम म्हणतात. पण बाळासाहेब ठाकरेंना सामान्य शिवसैनिकही अगदी सहज भेटू शकत होता. शिवसैनिक माझे कवचकुंडल आहेत असं बाळासाहेब म्हणायचे. पण त्यासाठी पथक तयार करण्याची कधीही गरज भासली नाही. मग राज ठाकरेंना सुरक्षा रक्षकांचा हा गराडा आवश्यक कसा वाटतो?"

सरकारच्या सुरक्षेची गरज नाही मग महाराष्ट्र रक्षकांचीही गरज का भासते? असा प्रश्न हेमंत देसाई यांनी उपस्थित केला.

ते सांगतात, "कोरोना काळात लॉकडॉऊनमुळे राज्याची अर्थव्यवस्था खालावली आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याने स्वत:च सरकारी खर्च कमी करण्यासाठी सुरक्षा कमी करायला हवी होती. पोलिसांवरही प्रचंड ताण येतो. त्याचाही विचार करणं गरजेचे आहे."

मनसेकडून सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांची तयारी सुरू झालीय. पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि नियोजन सुरू आहे.

"सध्याच्या घडीला मनसेने आपल्या संघटनाबांधणीकडे लक्ष देणं गरजेचे आहे. असे तात्पुरते पर्याय शोधण्यापेक्षा आपला पक्ष मुंबईबाहेर कसा वाढेल त्यासाठी काम केले पाहिजे. केवळ एका नेत्याभोवती पक्ष सुरू आहे. दिल्लीत तीव्र शेतकरी आंदोलन सुरू असूनही मनसेकडून त्यासंदर्भात एकही प्रतिक्रिया आलेली नाही. ग्रामीण भागात जनतेसमोर अनेक समस्या आहेत त्याची दखल पक्षाकडून घेतली जात नाही." असंही हेमंत देसाई सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)