शरद पवार : 'महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला कधीच यश मिळणार नाही' #5मोठ्याबातम्या

ळरद पवार

फोटो स्रोत, @PawarSpeaks

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपला कधीच यश मिळणार नाही - शरद पवार

"महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

टीव्ही मराठीच्या बातमीनुसार, शरद पवार यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं, "आधी त्यांना दोन महिन्यात ठाकरे सरकार पाडायचं होतं. नंतर सहा महिन्यात सरकार पाडणार होते. नंतर पुन्हा आठ महिन्यात सरकार पाडणार होते. पण काहीच झालं नाही. उलट ठाकरे सरकारने एक वर्षही पूर्ण केलं आहे. सरकार स्थिर असून आपला कार्यकालही पूर्ण करेल."

पवारांनी यावेळी ईडीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं.

ईडीमार्फत कारवाई म्हणजे हा सत्तेचा दुरुपयोग आहे, असं पवार म्हणाले.

2. शीतल आमटेंचा श्वास रोखल्यामुळे मृत्यू

आनंदवनच्या CEO डॉ. शीतल आमटे यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवालातील निष्कर्ष असल्याची चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी माहिती दिली आहे. यासोबतच डॉ. शीतल यांचा मृत्यू प्राथमिकदृष्ट्या घातपात वाटत नसल्याचं मत देखील पोलिसांनी व्यक्त केलंय.

डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर तब्बल एक महिन्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी बुधवारी पत्रकार परिषद घेवून आतापर्यंतच्या तपासातील बाबी समोर ठेवल्या.

पोलीस तपासात डॉ. शीतल आमटे मानसिक तणावात असल्याचं आणि त्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून नागपूर येथील मानसोपचार तज्ज्ञाकडे औषधोपचार घेत असल्याचं निष्पन्न झालं आहे. यादरम्यान त्यांनी जून 2020 मध्ये झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यांना नागपूरच्या वोकार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होतं, असंही समोर आलंय. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

शीतल आमटे

3. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल केंद्र सरकारच्या सेवेत जाणार आहेत. सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्यागिक सुरक्षा बलाच्या (CISF) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.

पुणे मिररच्या बातमीनुसार, आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेमंत जयस्वाल हे 1987च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.

ते सध्या पोलीस महासंचालक (विधी व तंत्रज्ञान) इथं काम पाहत आहेत.

कपिल गुज्जर

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, कपिल गुज्जर

4. शाहिनबागेत गोळीबार करणाऱ्याला सदस्यत्व दिल्यामुळे भाजपवर नामुष्की

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) शाहीनबाग परिसरात निदर्शनं सुरू असताना हवेत गोळाबार करणाऱ्या कपिल गुज्जर भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र काही वेळातच त्याचं सदस्यत्व भाजपनं रद्द केलं आहे. द वायरनं या संदर्भात बातमी दिली आहे.

भाजपचे गाझियाबाद महानगरचे अध्यक्ष संजीव शर्मा यांनी सांगितलं, आम्हाला त्याचा शाहीनबाग प्रकरणात सहभाग असल्याची माहिती नव्हती. शाहीनबाग प्रकरणातील त्याच्या सहभागाबाबतची माहिती मिळताच त्याचे सदस्यत्व तातडीने रद्द करण्यात आले.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने सुरू असताना कपिलने हवेत गोळीबार केला होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

आयकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक चित्र

5. ITR भरण्यास 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल म्हणजेच ITR भरण्याची अंतिम मुदत तिसऱ्यांदा वाढविण्यात आली आहे. व्यक्तिगत करदात्यांना त्यामुळे 31 डिसेंबर 2020 ऐवजी आता 10 जानेवारी 2021 पर्यंतची वाढीव मुदत मिळाली आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून घेण्यात आला.

29 डिसेंबररपर्यंत 4.54 कोटी विवरणपत्रे करदात्यांकडून दाखल केल्याचं प्राप्तिकर विभागानं सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)