शेतकरी आंदोलन: भगत सिंहांच्या आठवणीत पिवळे कपडे घालून आंदोलनात सहभागी झालेल्या महिला

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Chinki Sinha

    • Author, चिंकी सिन्हा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

ती तिथे धीटपणे उभी होती. रस्त्याच्या मधोमध. रोहतक फ्लायओव्हरवर त्यांना थांबवण्यात आलं. सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी भठिंडाहून महिलांचा एक समूह ट्रॅक्टरच्याट्रॉलीवर बसून आला होता. या महिलांसाठी कृषी कायद्यातील हे काळे नियम आहेत. 'दिल्ली चलो'चा नारा ऐकून या कायद्यांचा निषेध करण्यासाठी या महिला आल्या आहेत.

रोहतक फ्लायओव्हरवर सरकारविरोधात ठिय्या आंदोलनाला बसलेल्या नऊ महिला आहेत. यात 72 वर्षांच्या वृद्ध महिलेचाही सहभाग आहे आणि 20 वर्षांच्या तरुणीचाही. अनेक लहान मुलंही या आंदोलनात दिसतात. हे लोक भठिंडातील चक राम सिंह वालायेथील होते. 28 डिसेंबरला गावाहून याठिकाणी आणखी काही महिला येणार आहेत.

इथे येण्यासाठी ट्रॅक्टरमधून यावे लागले. सुरुवातीला टिकरी बॉर्डर पार केले. यानंतर ट्रॅक्टर, ट्रॉली आणि ट्रकमधून प्रवास केला. दोन शेतकऱ्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये जागा दिली. रोहतक फ्लायओव्हर संपताच एका तरुण शेतकऱ्याने पिवळे कापड हलवले. इथे थांबण्याचा हा संदेश होता.

आम्ही विचारले महिला कुठे आहेत? तिथे बसल्या आहेत? या नऊ महिला कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या हजारो आंदोलकांचा भाग होत्या.

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Chinki Sinha

पिवळ्या कपड्यात आंदोलन

महिला आंदोलकांमध्ये सहभागी झालेल्या या 48 वर्षीय सुखजित कौर उन्हात बसलेल्या. खोलवर गेलेले डोळे. त्यांनी एका चुलीकडे इशारा केला. तिथे काही भांडी पडलेली होती. लाकडंही जमा करून ट्रॉलीच्या बाजूला ठेवले होते.

सुखजीत सांगतात, "हरियाणात आमचा सामना या बॅरिकेड्सशी झाला. त्यांनी आमच्यावर पाण्याचे फवारे सोडले होते. आम्हाला इथे आंदोलन करून आता अनेक दिवस झाले." ही जागा आता त्यांच्यासाठी घराप्रमाणे झाली आहे.

या नऊ महिला 26 नोव्हेंबरपासून येथे धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. ती सुद्धा आपल्या गावकऱ्यांबरोबर इथे आली. त्यापैकी काही जण आपल्या पतीसोबत आल्या. पण आंदोलनात त्या आपल्यापतीसोबत राहत नाहीत. आंदोलनात सहभागी होण्याची त्यांची स्वतंत्र पद्धत आहे.

गावात सुखजीत कौर यांच्याकडे दहा एकर जमीन होती. त्यांचा मुलगा आणि सून शेती करतात.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या 25 हजार महिलांमध्ये त्यांचा सहभाग आहे. या महिला भारतीय किसान युनियनच्या सदस्या आहेत. सुखजीत सांगतात, "आम्ही भगत सिंह यांच्या आठवणीत पिवळे कपडे घालतो. मी 20 वर्षांपूर्वी या युनियनशी जोडले गेले."

त्याठिकाणी तीन ज्येष्ठ महिला होत्या. लोखंडाच्या पायऱ्यांवरून चढत त्या ट्रॉलीमध्ये गेल्या. तरुण मुली त्यांना मदत करत होत्या.

कडाक्याची थंडी टाळण्यासाठी ट्रॉली पिवळ्या ताडपत्रींनी झाकलेल्या होत्या. ट्रॉलीच्या आतली चादर गुंडाळून एका बाजूला ठेवण्यात आली होती. आत बांबूचा एक छोटासा खांब होता, ज्यातून बल्ब टांगलेला होता.

बांबूच्या आणखी एका खांबांवर कापडे टांगले होते. दुसरीकडे एक छोटासा प्लँक होता आणि तिथे शॅम्पू पाऊच, डिटर्जंट आणि इतर काही वस्तू होत्या. एक छोटासा आरसाही होता. गाद्या होत्या. ट्रॉलीजवळ एक चूल होती. जागा नीटनेटकी दिसण्यासाठी स्वयंपाकघरातली ट्रॉलीखाली ठेवण्यात आली.

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Chinki Sinha

'जिवंत कसे राहणार?'

जसवीर कौर 70 वर्षांच्या आहेत. ट्रॉलीत बसलेल्या 70 वर्षांच्या चार स्त्रियांपैकी त्या एक होत्या. "आम्ही आंदोलनात सहभागी होण्याचे ठरवले. आम्ही शेतकरी आहोत."

2006 मध्ये एका आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्या जेलमध्ये होत्या. गावातील महिला त्यांच्या धाडसाचा आदर करतात. थंडी असो वा बॅरिकेड्स किंवा पाण्याचे फवारे त्यांना भीती वाटत नाही. त्या सांगतात, "ते आम्हाला हलक्यात घेत आहोत."

महिलांच्या या दलातील दहावा सदस्य एक लहान मुलगा होता. तो आपल्या आईसोबत आला होता. शाळेचा अभ्यास त्याने इथे बसूनच केला.

मुलाने सांगितले, "शेत आमचा वारसा आहे. त्यांनी आमचे शेत नेले तर आम्ही काय खाणार? जिवंत कसे राहणार?"

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Chinki Sinha

मुलींना जमीनीचा हिस्सा

या महिलांमध्ये सहभागी झालेल्या 20 वर्षाच्या अमनप्रीतने सांगितले, त्यांनी एमए केले आहे. पण अद्याप नोकरी मिळालेली नाही. ती आपल्या भावासोबत टिकरी बॉर्डरपर्यंत आली.

अमनप्रीतने सांगितले, त्यांनी आधी एमए केले आणि नंतर बीएड. पण नोकरी मिळाली नाही.

"सरकारने तीन कायदे बनवले आहेत. पण ते आमच्यासाठी योग्य नाहीत. आमच्याकडे आमची जमीन राहिली नाही तर आम्ही काय करणार"

आमच्या गावात मुलींनाही जमिनीत हिस्सा मिळतो असं अमनप्रीतने सांगितले. आता काळ बदलला आहे. महिला आता पडद्याआड राहत नाहीत.

अमनप्रीत

फोटो स्रोत, Chinki Sinha

फोटो कॅप्शन, अमनप्रीत

अमनप्रीतने लाल रंगाची नेलपॉलिश लावली होती. पिवळ्या रंगाची ओढणी घेतली होती. अमनप्रीतच्या पालकांनी तिला इथे पाठवले. ती इथे सहा महिन्यांसाठी रहावे लागेल अशी तयारी करून आली आहे. आंदोलनातील महिलांमध्ये काही त्यांच्या नातेवाईकआहेत तर काही मैत्रीणी.

पंजाबमधील शेतकरी दिल्ली चलो अभियानांतर्गत एकत्र आले आहेत आणि आता ते राजधानीच्या दिशेने प्रवास करत आहेत. महिला आंदोलनात वृद्ध स्त्रियाही आहेत. त्या काळजी घेण्याचे काम करतआहेत. सर्व काही शांततेत पार पडण्यासाठी खात्री करत आहे.

सुखजित कौर म्हणाल्या, गावातील अनेक महिला शेतकरी संघटनेच्या सदस्य आहेत. या महिला गेल्या अनेक महिन्यांपासून कृषी कायद्यांना विरोध करत आहेत.

पारंपरिक स्त्रीवादी दृष्टीकोनातून संघर्ष

आंदोलनात स्त्रियांचा सक्रिय सहभाग आहे, पण पारंपरिक स्त्रीवादी दृष्टिकोनाशीही त्या आजही झगडत आहेत. या महिला स्वत: ला शेतकरी म्हणतात. म्हणूनच त्या आंदोलनात शेतकरी म्हणूनहीसहभागी आहेत. युनीयनशीही त्यांचे नाते आहे. आपला समुदाय आणि धर्माशीही त्यांचा संबंध आहे आणि आपल्या जमिनीसाठीही त्या भूमिका घेत आहेत. अशा प्रकारे त्यांची एक ओळख दुसऱ्या अस्मितेशीजोडली जात आहे. म्हणूनच त्या एकावेळी अनेक गोष्टींना मान्यता देण्याचा आग्रह करत आहे.

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Chinki Sinha

गेल्या वर्षीच्या आंदोलनातही असाच एक पॅटर्न दिसून आला. अनेक मुद्यांशी जोडला गेलेला एक पॅटर्न.

सुखजीत सांगतात, "आता महिला शिकलेल्या आहेत. त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव आहे. प्रत्येक महिला दुसऱ्या महिलेशी प्रेरित आहे. आपण असेच शिकतो."

अमनप्रीतला या गोष्टीची जाणीव लवकर झाली. त्यांच्यासाठी संघर्ष हा सुद्धा शिक्षणाप्रमाणे महत्त्वाचा आहे. त्या जसबीर कौर यांच्याकडून हे शिकल्या. पतीच्या निधनानंतर जसबीर कौर यांनीच शेती सांभाळली.

जसबीरने सांगितले, "मी माझ्या पतीसोबत शेतीत काम करत होते. मी घर सुद्धा सांभाळायची. शेतीत डबा पोहचवायचे. पेरणी आणि सिंचनासाठी मदत करायचे."

महिलांनी कृषी कायद्याविरोधात लढणे गरजेचे आहे. कारण बदलांचा परिणाम त्यांच्यावर सर्वाधिक होतो. त्या सांगतात, "ही आमची जमीन वाचवण्याची लढाई आहे."

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Chinki Sinha

केवळ शेतीचा सहारा

काही स्त्रिया कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी जातात. तर काही घरात थांबतात. काही आपल्या गावात या कायद्यांविरुद्ध रॅली काढत आहे. लोकांना जागरूक करत आहेत.आंदोलनस्थळी रेशन पाठवत आहेत.

नऊ महिलांसोबत 12 वर्षाचा मुलगा आला होता. त्याचे नाव गुरजीत सिंह. त्याने पिवळ्या रंगाचे टि-शर्ट घातले होते. त्याने उजव्या बाजूला युनियनचा बिल्ला लावला होता. तो म्हणाला, " मी शेतकऱ्याचा मुलगा आहे."

ट्रॉलीत तळ ठोकून असलेल्या या स्त्रिया मोठ्या घरातील नव्हत्या. जसवीर कौर आणि 12 वर्षीय अमनदीप कौर (35) यांच्या आईसारख्या काही स्त्रियांनाही पती नाहीत.

अमनप्रीत कौर म्हणाली की, तिच्या कुटुंबाकडे फक्त तीन एकर जमीन आहे. तर अमनदीप कौर म्हणाल्या, तिच्याकडे फक्त पाच एकर जमीन आहे. आंदोलन सुरू झाल्यावर सासूबाईंनी त्यांनात्यांच्याबरोबर येण्यास सांगितले. "आम्ही श्रीमंत असतो तर आम्ही इथे येऊन या धरणे आंदोलनात का बसलो असतो," ती म्हणाली. पतीच्या निधनानंतर ती शेतात काम करत होती.

अमनदीप यांनी सांगितले, "शेती आम्हाला राजा बनवते असे नाही. यात तर नुकसान होते. पण ही एकच गोष्टी आहे जी आमच्याकडे आहे. ते वाचवण्यासाठी आम्ही लढू."

अमनदीप आणि अमनप्रीतसारख्या तरुणी धुणीभांडी आणि स्वयंपाक करत आहेत, तर मनजीत कौर (72) आणि गुरदीप कौर (60) यांच्यासारख्या वृद्ध स्त्रिया स्वयंपाकघराचे काम करत आहेत.

मनजीत कौर यांचे पती जगजित सिंह हे गावाचे प्रमुख आहेत. गावात त्यांची 20 एकर जमीन आहे. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची दोन मुलं शेती सांभाळत आहेत.

महिलांनी एकत्र राहत इथे आपले छोटेसे कुटुंब बनवले आहे. यापैकी काही महिला परत जातील तर काही पुन्हा इथे येतील. 'रंग दे बसंती चोला' गाणं गात या महिला भगत सिंह यांचं स्मरण करत होत्या.

जसबीर कौरने सांगितले, "पिवळा आमचा रंग आहे."

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Chinki Sinha

हसत हसत संकटांचा सामना

या महिलांनी सांगितले की, शौचालयासारख्या छोट्या-मोठ्या अडचणी आहेत. पण जवळच्या कारखान्यांनी त्यांना शौचालयाचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. त्या दररोज अंघोळ करतात. एवढ्या थंडीत बाहेर राहणं सोपं नाही. पण त्या हसत हसत राहत आहेत. गाणं गात आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

या महिला लंगर तयार करतात. आणि आळीपाळीने सर्व कामं करतात.

सुखजित कौर म्हणाल्या, "जोपर्यंत सरकार हे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहणार. आम्ही लोहरीपण इथेच साजरी करू. पिवळा स्कार्फ घालून आम्ही इथेच लोहरी पेटवू".

तर हे आहे या आंदलनाचे संपूर्ण चित्र. दिल्लीच्या सीमेवर महिला ट्रॉलीत राहत आहेत. काही जणी आपले ट्रॅक्टर घेऊन येथे आल्या आहेत, तर काही पुरुष आंदोलकांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीत आल्या आहेत. एकाट्रॉलीत नऊ महिला अडकल्या होत्या. नऊ महिला, एक लहान मुलगा आणि खूप धैर्य. एक पिवळी ट्रॉली. ही सर्वात चकचकीत जागा असल्याचं ती सांगत होती

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Chinki Sinha

जसबीर कौर सांगत होती, "पिवळ्या ताडपत्रीतून प्रकाश येत आहे. हा प्रकाश किती सुंदर दिसत आहे,"

"या कधीतरी आमच्यासोबत राहण्यासाठी. आम्ही तुम्हाला जेऊखाऊ घालू आणि किस्से पण ऐकवू."

या भावनेसह तुम्ही येथून बाहेर पडता. थोडं पुढे जाऊन मागे पाहिलं तर पिवळे झेंडे फडकवत असताना त्या दिसतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)