कोरोना लस घेतल्यानंतर मुंबईतील डॉक्टरांना त्रास, उपचारानंतर तब्येत स्थिर

फोटो स्रोत, Reuters
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी
मुंबई महापालिकेच्या व्ही एन देसाई रुग्णालयात लस घेतल्यानंतर एका डॅाक्टरांना त्रास होऊ लागला होता. या डॅाक्टरांवर तात्काळ रुग्णालयात उपचार करण्यात आले.
"रुग्णालयात दाखल डॅाक्टरांची तब्येत स्थिर आहे. उद्या सकाळी या डॅाक्टरांना डिस्चार्ज देण्यात येईल," अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी दिली.
कोविन अॅप सुरू झालं आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी महापालिकेच्या वॅाररूममधून फोन केले जाणार आहेत," असं काकाणी पुढे म्हणाले.
दुसरीकडे, अनेकांच्या मनात लशीबद्दल शंका आहे. हेच लक्षात घेऊन बीबीसी मराठीनं, कोणत्याही लशीचे काही दुष्परिणाम असतातच, ते काय असू शकतात आणि या लशी किती सुरक्षित असू शकतात, याबद्दल आता सविस्तर आढावा घेतला होता.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांच्या लशींची अंतिम टप्प्याची चाचणी सुरू आहे. या दोन्ही लशींना तातडीच्या वापरासाठी मान्यता मिळावी म्हणून अर्जही केले गेले.
पण औषध महानियंत्रकांनी या लशींची परिणामकारकता आणि सुरक्षितता याबद्दल आणखी माहिती मागवलीय. असं का केलं गेलं? आणि मुळात लस सुरक्षित आहे हे आपल्याला कसं कळतं?
कोव्हिडची लस घेणं सुरक्षित आहे का?
लशीची सुरक्षितता ठरवण्यासाठीच्या चाचण्या प्रयोगशाळेत सुरू होतात. पेशींवर आणि प्राण्यांवर त्या लशीच्या चाचण्या घेतल्या जातात आणि तिथे एकदा खातरजमा झाली की त्यानंतर मानवी चाचण्या करायला सुरुवात होते.

फोटो स्रोत, iStock
प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांमधून सुरक्षिततेबद्दल खात्रीलायक माहिती हाती आली की मग ती लस किती परिणामकारक आहे याचा अभ्यास सुरू होतो, मग मोठ्या प्रमाणावर मानवी चाचण्या केल्या जातात.
फायझर बायोएनटेकच्या लशीच्या 40,000 लोकांवर चाचण्या केल्या गेल्या. ऑक्सफर्डच्या चाचणीत 20,000 स्वयंसेवक सहभागी झाले होते. या चाचण्यांमध्ये काहींना लस दिली गेली तर काहींना डमी ट्रीटमेंट मिळाली म्हणजेच प्लासिबो दिले गेले.
कोव्हिडची लस बनवण्यासाठी विक्रमी वेळेत काम केलं जात आहे. सर्वसाधारणपणे लस बनवण्यासाठी अनेक वर्षांचा काळ जातो, पण कोव्हिडची लस काही महिन्यांतच तयार केली गेली. पण असं करताना सुरक्षिततेबद्दलचे नियम मात्र शिथील केले गेले नाहीत असं शास्त्रज्ञ सांगतायत. सर्व निकाल आणि निष्कर्षांची स्वतंत्रपणे पडताळणी केली जाते, याला पीअर रिव्ह्यू असंही म्हटलं जातं.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

दुष्परिणाम हाताळण्याची भारताची योजना
लसीकरण तर काळाची गरज आहे, पण लशीचे काही साईड इफेक्ट्सही असू शकतात. कोव्हिड लसीकरणाच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल भारत सरकारची भूमिका काय आहे याबद्दल बोलताना आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी एक आराखडा सांगितला. त्यात सर्व राज्यांना पुढीलप्रमाणे सूचना करण्यात आल्या आहेत.
1. लसीकरणाच्या ठिकाणी संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घेणे.
2. सौम्य, मध्यम आणि गंभीर दुष्परिणामांच्या नियोजनासाठी तयारी करणे.

फोटो स्रोत, Bjp
3. ब्लॉक पातळीवर किमान एक AEFI सेंटर म्हणजे लसीकरणानंतर उद्भवणारे दुष्परिणाम हाताळण्यासाठीचे केंद्र उभारावे.
4. Adverse Effects Following Immunisation Centre प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, खासगी दवाखाने किंवा वैद्यकीय तसंच निमवैद्यकीय कर्मचारी असलेले ठिकाण असू शकतं.
5. प्रत्येक लसीकरण केंद्र एका AEFI शी संलग्न असले पाहिजे.
6. कोणत्याही दुष्परिणामांची माहिती Co-WIN मार्फत करावी.
चाचण्यांदरम्यान दिसलेले 'साईड इफेक्ट्स'
काही महिन्यांपूर्वी ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनेकाच्या लशीच्या चाचण्या एका टप्प्यावर थांबवल्या गेल्या होत्या. लशीच्या चाचणीतल्या हजारो स्वयंसेवकांपैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतर त्यामागे लशीचा संबंध होता का हे तपासलं गेलं.
पण त्या व्यक्तीच्या मृत्यूला लस कारणीभूत नव्हती, असं स्पष्ट झाल्यानंतर या चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. चीनच्या सायनोव्हॅक लशीच्या चाचण्यांदरम्यान ब्राझीलमध्ये एकाचा मृत्यू झाला तेव्हा त्याही चाचण्या थांबवल्या गेल्या, पण नंतर त्यातही हा मृत्यू लशीमुळे झाला नव्हता असाच निष्कर्ष निघाला.

फोटो स्रोत, Getty Images
लशीमुळे तुम्ही आजारी पडाल का?
लशींमध्ये विविध घटक असतात. काही लशींमध्ये त्या विवक्षित आजाराचा अत्यंत सौम्य स्वरुपाचा विषाणू असतो, काहींमध्ये त्याच्याशी साधर्म्य असलेला विषाणू असतो.
लस अधिक स्थिर व्हावी म्हणून त्यात काही असे पदार्थ घालतात ज्यांची आपण कल्पनाही नाही करू शकत. जसं की अल्युमिनियम किंवा ब्रेडचा चुरा. पण हे अशाच प्रमाणात घातले जातात जेणेकरून आपल्या शरीराला अपाय होणार नाही.

फोटो स्रोत, Science Photo Library
लस टोचणं म्हणजे शरीरात तो आजार घुसवणं असा अर्थ होत नाही, त्याचा सोपा अर्थ आहे तुमच्या शरीराला त्या विषाणूशी लढण्याची प्रतिकारशक्ती विकसित करण्याचं प्रशिक्षण ती लस देत असते.
वेगवेगळ्या कोव्हिड लशींच्या चाचण्यांदरम्यान वेगवेगळे दुष्परिणाम पाहायला मिळाले आहेत.
अमेरिकेत फायझर-बायोएनटेकच्या लशीचे डोस द्यायला सुरुवात झाली आहे. त्याचे संभाव्य दुष्परिणाम अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभाग म्हणजे FDA ने सांगितले. यात लस टोचलेल्या ठिकाणी सूज येणं, थकवा, डोकेदुखी, स्नायूदुखी, हुडहुडी भरणं, सांधेदुखी आणि ताप यांसारखे दुष्परिणाम आहेत.
यातली काही लक्षणं ही खुद्द कोव्हिडचीच लक्षणं असल्याने घाबरून जाणं साहजिक आहे. पण ही आजाराची लक्षणं नसून आपलं शरीर त्या विषाणूचा प्रतिकार करण्याची क्षमता विकसित करत असल्याची लक्षणं आहेत, असं तज्ज्ञ सांगतात.
कोव्हिड झालेल्यांनी लस घेणं किती सुरक्षित?
आता अशा लोकांचं काय ज्यांना कोव्हिडची लागण होऊन गेलीय आणि ते त्यातून बरेही झालेत? ज्यांना कोव्हिड होऊन गेलाय त्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झालेल्या असतात पण त्या आपल्याला किती काळ सुरक्षित ठेवू शकतात?
आजार होऊन गेल्याने तयार झालेली रोगप्रतिकारकशक्ती दीर्घकाळ टिकतेच असं नाही, लसीकरणामुळे जास्त संरक्षण मिळू शकतं. त्यामुळे अनेक ठिकाणी ज्यांना आजार होऊन गेलाय त्यांचंही लसीकरण केलं जाणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ज्यांना लाँग कोव्हिड आहे, म्हणजे ज्यांचा आजार बरा झाला असला तरी त्याची लक्षणं दीर्घकाळ टिकून राहणार आहेत अशा लोकांना लस देणंही सुरक्षित आहे, असं सांगितलं जातंय. पण जे कोव्हिडचे रुग्ण अजून बरे झालेले नाहीत त्यांना लस दिली जाऊ नये.
'हर्ड इम्युनिटी'चं काय?
जर अनेक लोकांना लस मिळाली तर आपोआपच ज्यांना मिळाली नाहीय ते पण सुरक्षित होतील नाही का? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. कोव्हिडची लस लोकांचा आजार गंभीर होण्यापासून वाचवते इतकं तर निश्चित आहे, पण ते किती काळ आणि किती प्रमाणात याबद्दल ठोस माहिती अजूनतरी हातात आलेली नाही.

फोटो स्रोत, EPA
जर मोठ्या प्रमाणावर लोकांना लस दिली गेली तर हा व्हायरस पसरण्यापासून रोखता येईल आणि कदाचित येणाऱ्या काळात त्याचा पूर्ण नायनाटही करता येईल, पण या पुढच्या गोष्टी आहेत. सध्यातरी लस मिळाली असली तरी संसर्ग होऊ नये म्हणून आपण घेतो ती इतर सर्व काळजी घेणं गरजेचं असणार आहे.
कोरोना लस आणि फेक न्यूजचा भडिमार
कोरोनाच्या लशीच्या चाचण्या सुरू होत्या तेव्हाच दुसरीकडे या लशींबद्दल भरमसाठ प्रमाणात फेक न्यूज पसरायला लागल्या.
या लशीतून आपल्या शरीरात मायक्रोचिप बसवण्याचा आणि आपल्यावर पाळत ठेवण्याचा बिल गेट्सचा प्लॅन आहे, लशीत अर्भकांचे टिशू वापरले जातात, लशीमुळे आपल्या DNA ची रचना बदलून जाते यांसारख्या अनेक निराधार बातम्या खासकरून सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जायला लागल्या.
यानंतर फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्म्सनी लशींबद्दलच्या तथ्यहीन आणि निराधार दाव्यांवर कडक पावलं उचलायला सुरुवात केली.
भारतात लवकरात लवकर लसीकरण सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जातेय. लशीचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात हे खरं आहे. पण जीवाला धोका उत्पन्न होईल अशी शक्यता असलेल्या कोणत्याही लशीला मुळात मान्यताच दिली जात नाही त्यामुळे तशी भीती बाळगण्याचं कारण नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








