गव्याच्या मृत्यूवर गिरीश कुलकर्णींची प्रतिक्रिया, 'आपण फार हिंस्त्र होत चाललो आहोत'

फोटो स्रोत, Getty Images
गावात एक प्राणी येतो आणि त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होते. वनविभागातले अधिकारी सांगतात की गर्दी करू नका प्राणी बिथरू शकतो पण गर्दी आटोक्यात येत नाही. परिणामी त्या प्राण्याची दमछाक होते आणि नंतर त्या प्राण्याचा मृत्यू होते.
एखाद्या चित्रपटाला साजेशी ही घटना आज पुण्यातील कोथरूडमध्ये घडली. मानव आणि प्राण्यातला संघर्ष हा नवा नाही पण तो कसा हाताळावा यावर भाष्य करणारा एक चित्रपट येऊन गेला आहे.
2008 साली उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'वळू' हा चित्रपट आला होता. गावात सोडलेल्या वळूला पकडण्याच्या अवतीभोवती त्याचं कथानक आधारित होतं.
'वळू' चित्रपटाचं लेखन गिरीश कुलकर्णी यांनी केलं होतं. चित्रपटाच्या कथेने सर्वांना विचार करण्यास भाग पाडलं होतं. आजच्या घटनेवरची गिरीश कुलकर्णी यांची प्रतिक्रियाही तितकीच विचार करायला लावणारी आहे. या घटनेच्या निमित्ताने बीबीसी मराठीने गिरीश कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला.
मानवाने संवेदनशील व्हायला हवे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
गिरीश कुलकर्णी म्हणतात, "एखादा माणूस रस्ता चुकून गावात आला, लहान मूल घर चुकून आजूबाजूला गेलं, तर आपण लगेच शोधाशोध करून त्याला रस्ता दाखवतो. त्याला त्याच्या घरी सोडतो.
"चुकलेला प्राणी जर आपल्याकडे आला तर त्याला कशी वागणूक द्यावी, याबाबत माणसाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. माणसाने संवेदनशील बनवण्याची गरज निर्माण झाली आहे.
"आपण फार हिंस्त्र होत चाललो आहोत. आमच्या कुतूहलापोटी, आमच्या उत्सुकतेपोटी, आमच्या हव्यासापोटी आपण हिंस्त्र होत आहोत. लोकांनी गर्दी केली आणि त्याला पळवलं.
"गवाच काय माणूसही सध्या घाबरलेला आहे. भयावह वर्तमान आहे. शहर माणसाला भीती घालतं. दडपून टाकतं. माणसाची ही कहानी आहे. मग या परिस्थितीत मुक्या जंगली प्राण्याचा काय चालेल?" असा सवाल त्यांनी केला.

फोटो स्रोत, Valu Movie
"अशा स्थितीत रागनवा मेला याचं नवल नाही. उलट तो मेला म्हणून सुटला असं म्हणावं लागेल. नाहीतर आपण कसंही त्याला मारलाच असता," असं ते उद्विग्नपणे कुलकर्णी म्हणतात.
"अशा घटना सातत्याने होत असतात. यापुढेही होत राहतील. मानव-बिबट्या संघर्ष आहे, मानव-वाघ संघर्ष आहे, त्यात आता रानगव्याचा समावेश झाला," असंच म्हणू शकतो.
"वन्यप्राण्यांचे वंशपरंपरागत मार्ग ठरलेले असतात. त्यांच्या अधिवासाचा कधीच विचार केला जात नाही. त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करतो. त्यांचं अस्तित्व लक्षात घेऊन कामं केली जात नाहीत. देशात इन्फ्रास्ट्रक्चरची इतकी अतोनात कामं चालू आहेत. या सगळ्यांचा फटका रानगव्याला बसला असेल. कळपातून वाट चुकून लांब आला असेल. त्यात त्याचा जीव गेला."
कोथरूडमध्ये नेमकं काय घडलं?
पुण्याच्या वर्दळीच्या आणि घनदाट लोकवस्तीच्या कोथरूड भागात धष्टपुष्ट असा रानगवा आढळून आल्याने बुधवारी सकाळी (9 डिसेंबर) पुणेकरांमध्ये खळबळ माजली होती.
अखेर महापालिका आणि वनविभागाच्या प्रयत्नांनी या रानगव्याला पकडण्यात आलं. पण उपचारादरम्यान या गव्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत असून रानगव्याच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बुधवारी सकाळी आठच्या सुमारास गल्ली क्रमांक 1 जवळ मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडलेल्या लोकांना सर्वप्रथम गवा दिसला. सुरुवातीला ती गाय असल्याचं त्यांना वाटलं पण लक्षपूर्वक पाहिल्यानंतर तो रानगवा असल्याचं लोकांना कळालं.

त्यानंतर नागरिकांमध्ये खळबळ माजली आणि तो रानगवा आपल्यावर हल्ला करेल, याची भीती मनात निर्माण झाली होती.
नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार कळवल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. सर्वप्रथम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी आलं.
त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गव्याची माहिती कळवली होती. तेसुद्धा मार्गावरच होते.
सुरूवातीला गवा शांत होता. तोपर्यंत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराला जाळी लावून घेतली. त्याला रानात जाण्यासाठी मार्ग तयार करून देण्यात येणार होता. मात्र, जमलेल्या गर्दीच्या गोंगाटामुळे गवा बिथरला. त्याने दहा फूट उंच जाळीच्या वरून उडी घेऊन पोबारा केला, असं पुण्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी गजानन पाथरूडकर यांनी सांगितलं.
यानंतर पुढील सहा ते सात तास गवा कोथरूड परिसरात इकडून तिकडे पळत होता. महात्मा कॉलनी, भुसारी कॉलनी नंतर पौड रोड भागात तो दाखल झाला.
गवा आटोक्यात येत नसल्याने त्याच्यावर इंजेक्शन मारण्यात आलं होतं पण गव्याने ते आपल्या शेपटीने उडवलं. पण नंतर इंजेक्शनच्या अंशाने त्याची हालचाल मंदावली आणि अखेर एका चिंचोळ्या ठिकाणी त्याला पकडण्यात आलं. वन अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्याला आणखी एक भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं, असं पाथरूडकर यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, BBC/Rahul gaikwad
लोकांच्या गर्दीमुळेच गवा भांबरला आणि त्यामुळे त्याने धावाधाव केली. प्रचंड थकल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असंही पाथरूडकर म्हणाले.
कोणत्याही घटनेची 'वर्दी' मिळाल्यानंतर लोक गर्दी करतात, सेल्फी काढत उभे राहतात. त्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होतात, त्यामुळे लोकांनी असं करणं टाळावं, असंही पाथरूडकर यांनी म्हटलं आहे.
गव्याला पकडण्यात आल्यानंतर लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. पण काही वेळानंतर गवा मृत्यूमुखी पडल्याची बातमी आली. त्यामुळे त्या गव्याप्रति हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गव्याला वाचवता आलं असतं का, अशी चर्चा होऊ लागली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
.








