कोथरूडमध्ये गवा: नागरिकांच्या गर्दीमुळे कारवाईत अडथळा - वनविभाग

फोटो स्रोत, BBC/Rahul Gaikwad
पुणे शहरातल्या कोथरूड भागामध्ये आज (9 डिसेंबर) रानगवा शिरल्याने गोंधळ उडाला होता. काही तासांच्या प्रयत्नांनंतर या रानगव्याला जेरबंद करण्यात आलं, पण दुर्दैवाने या गव्याचा जीव गेलाय.
पुणे शहरातल्या कोथरूड भागामध्ये असणाऱ्या महात्मा सोयासटीमध्ये आज(9 डिसेंबर) सकाळी एक रानगवा शिरला. भर लोकवस्तीमध्ये हा गवा शिरल्याने त्याला पहायला गर्दी झाली, आणि हा गवा बिथरला.
या भागातून फिरणाऱ्या. बिथरून पळणाऱ्या या गव्याचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरलही झाले.
हा नर गवा 3 वा 4 वर्षाचा असावा आणि त्याचं वजन 700 ते 800 किलो असावं, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केलाय.

दरम्यान, वनविभागाचे कर्मचारी या गव्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करत होते, पण लोकांची गर्दी, आवाज यामुळे गवा बिथरलेला होता.
बिथरून पळणाऱ्या या गव्याने काही गेट्स तोडल्याचं स्थानिक रहिवाशांनी सांगितलं. धावताना अनेक ठिकाणी धडकल्याने हा गवा जखमीही झाला होता.

फोटो स्रोत, BBC/Rahul gaikwad
वनविभाग आणि महापालिका पथकाने या प्राण्याला पकडण्यासाठी 3-4 तास प्रयत्न केले. शेवटी गळ्यात दोरखंड टाकून आणि भूल देण्यासाठीचं इंजेक्शन देऊन या गव्याला जेरबंद करण्यात आलं.
पण दुर्दैवाने या गव्याचा मृत्यू झालाय.
जंगलातून चुकून शहरात येणारे प्राणी इथला आवाज, लोकं यामुळे गोंधळतात आणि त्यांच्यावर ताण येत असल्याचं पुण्याचे उप-वनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले, "आज तापमानही जास्त होतं. आपण ट्रँक्विलाईझ करण्याचा प्रयत्न करत असताना लोकांची त्याला पाहण्याची उत्सुकता आणि त्याच्या पाठी लागण्याचे प्रयत्न यामुळे तो बिथरला. त्याला ट्रँक्विलाईज करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या शरीराचं तापमान वाढलेलं होतं. या गव्याच्या मृत्यूची बाकीची कारणं शोधण्यासाठी पोस्ट मॉर्टम करायला टीम पाठवलेली आहे."

जंगलातून चुकून शहरात आलेल्या प्राण्यांशी लोकांनी विचारपूर्वक आणि सहानुभूतीपूर्वक वागण्याची गरज असल्याचंही उप-वनसंरक्षक राहुल पाटील यांनी म्हटलंय.
अशी घटना घडल्यास वनविभाग, पोलीस कर्मचारी, प्राण्यांचे डॉक्टर्स किंवा प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था यांना शांतपणे काम करू द्यावं, गोंधळ करू नये जेणे करून या प्राण्यावर आणि रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही तणाव येणार नाही, असंही ते सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








