फूलनदेवी ते हाथरस : कधी थांबणार हे चक्र?

फूलन देवी

फोटो स्रोत, Jean-Luc MANAUD/Gamma-Rapho via Getty Images

    • Author, चिंकी सिन्हा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

या संपूर्ण परिसरात एक विचित्र साधेपणा आहे. संध्याकाळी चंबळ नदीकाठी उभे राहिलात की हा साधेपणा अंगावर येतो. या ओसाड परिसराला भेदत जाते ती चंबळ नदी.

इथली एक स्त्री आज या जगात नसली तरी इथल्या कथांमधून, गाण्यांमधून, कवनांमधून जिवंत आहे. जगासाठी ती दरोडेखोर, डाकू होती. मात्र, इथल्या लोकांसाठी मदतीला धावून येणारी 'देवमाणूस' होती.

'खालच्या जातीतल्या' त्या स्त्रीने इथे दबदबा असणाऱ्या ठाकूरांना आव्हान दिलं होतं. याच गावात तिचा जन्म झाला. दरोडेखोर होऊन तिने ठाकूरांचा सूड घेतला. या सर्वांचं वर्णन इथल्या लोकगीतांमध्ये आढळतं. लग्नकार्य, सण-उत्सवात तिच्या शौर्याच्या गाथा गाण्याच्या रुपात गायल्या जातात.

चंबल

फोटो स्रोत, CHINKI SINHA/BBC

तीन राज्यांमध्ये पसरलेला चंब परिसर

चंबळची ही विशाल ओसाड भूमी देशाच्या तीन राज्यांमध्ये पसरली आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश.

एकविसाव्या शतकात इथेही विकासकामं झाली. रस्ते बांधले गेले. मात्र, त्यामुळे परिसराचा कायापालट झाला म्हणायचं तर तसं काहीही घडलेलं नाही. इथली समाजाची घडी अजूनही तशीच आहे.

दुसरंच जग

दूर वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहावर नजर टाकली तर ती सर्वकाही गिळंकृत करण्यासाठी सरसावलेल्या अजगरासारखी वाटते. इथे येऊन वेगळ्याच जगात आल्याचा भास होतो.

जिथे जिथे 'खालच्या जातीतल्या' स्त्रीवर 'वरच्या जातीतल्या' पुरूषाकडून बलात्कार झाल्याची बातमी येते, तेव्हा फूलनदेवीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

हाथरस

फोटो स्रोत, Getty Images

फूलनप्रमाणे शस्त्र उचलण्याचा इशारा

उत्तर प्रदेशातल्या हाथरसमधल्या बलात्काराच्या घटनेचं उदाहरण घेता येईल. हाथरसमध्ये 19 वर्षांच्या एका दलित मुलीवर गावातल्या ठाकूरांकडून कथित बलात्कार करण्यात आला. त्यात तिचा मृत्यू झाला.

या घटनेचा निषेध करणाऱ्या अनेकांनी अत्याचार पीडित एखादी दलित मुलगी फूलनदेवीसारखं शस्त्रही उचलू शकते, असा इशारा दिला होता.

त्या घटनेविरोधात निघालेल्या मोर्चात, "आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला फूलनदेवीप्रमाणे शस्त्रही उचलता येतं", अशा घोषणा दिल्या गेल्या.

हाथरस प्रकरणात युपी पोलिसांनी रात्रीच्या अंधारात कुटुंबाच्या उपस्थितीशिवायच पीडितेवर अंत्यसंस्कार केले.
फोटो कॅप्शन, हाथरस प्रकरणात यूपी पोलिसांनी रात्रीच्या अंधारात कुटुंबाच्या उपस्थितीशिवायच पीडितेवर अंत्यसंस्कार केले.

मात्र, हाथरस प्रकरणानंतर #dalitlivesmatter हा हॅशटॅग आणि सोशल मीडियावर संताप व्यक्त करून सगळेच पुढे निघून गेले. दुसऱ्या बातमीच्या शोधात.

आणि इकडे हाथरसमध्ये पीडित कुटुंबीयांची अजूनही सीबीआयकडून चौकशी सुरू आहे आणि आरोपी गजाआड आहेत. पीडित कुटुंबाच्या घराबाहेर CRPF चे जवान तैनात आहे. मात्र, सीबीआय अहवाल कधी सादर करणार, याची माहिती कुणालाच नाही.

1980च्या दशकाच्या सुरुवातीला फूलन देवींना चंबळच्या खोऱ्यातील सगळ्यात खतरनाक डाकू मानलं जात असे.

फोटो स्रोत, GEORGE ALLEN & UNWIN

फोटो कॅप्शन, 1980च्या दशकाच्या सुरुवातीला फूलन देवींना चंबळच्या खोऱ्यातील सगळ्यात खतरनाक डाकू मानलं जात असे.

बेहमई - फूलनचं गाव

बेहमईपासून बसने हाथरसला जाण्यासाठी 5 तास लागतात. बेहमईमध्येच फूलनने 22 ठाकूरांना ठार केल्याचं सांगितलं जातं. मात्र, पुढे या हत्याकांडात आपला हात असल्याचं फूलनदेवीने नाकारलं होतं.

या भागात येताच चित्र एकदम बदलतं. गावाबाहेर एक मोडकं-तोडकं फाटक आहे. त्यावर बेहमई लिहिलं आहे. फाटकावरची काही अक्षरंही पुसलीही गेली आहेत.

सापासारखा अरुंद रस्ता नदीकाठी वसलेल्या या गावात घेऊन जातो. एकेकाळी हा संपूर्ण परिसर दरोडेखोरांच्या लपण्याचं सुरक्षित ठिकाण मानलं जायचं.

ठाकुर हत्याकांड स्मारक

ठाकूर हत्याकांड

त्या हत्याकांडात ठार झालेल्या लोकांच्या स्मरणार्थ गावात एक स्मारकही उभारलं आहे. या स्मारकावर 20 जणांची नावं कोरली आहेत.

या ओसाड परिसरातल्या डोंगरांमधून दरोडेखोरांची राणी फूलनदेवी या गावात आली होती. ठाकूर समाजाचं वर्चस्व असणाऱ्या 84 गावांपैकी एक आहे बेहमई.

बेहमईमध्येच फूलनदेवीने 30 ठाकूरांना घेरून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात 22 जणांचा मृत्यू झाला होता. 14 फेब्रुवारी 1981 चा तो दिवस होता. त्यावेळी फूलनदेवी फक्त 18 वर्षांच्या होत्या. ती 17 वर्षांची असताना बेहमईतल्या ठाकूरांनी तिच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी स्वतःची सुटका करत तिने पळ काढला आणि पुढे तिने स्वतःची टोळी तयार केली.

40 वर्षांचा काळ मोठा असतो. मात्र, गावकऱ्यांना तो दिवस आजही लख्ख आठवतो. इतर ठिकाणच्या लोकांच्या मते फुलनदेवीने सूड उगारला होता. त्यांच्या मते फूलन 'खालच्या जातीतली' एक शूर आणि आक्रमक स्त्री होती. आता तर फूलनदेवीला जाऊनही 20 वर्षं झाली आहेत.

बेहमई गाव

फोटो स्रोत, CHINKI SINHA/BBC

हत्याकांड खटल्याची प्रतीक्षा

गावाच्या बाहेरच काही लोक झाडाच्या सावलीत उभे आहेत. यातल्या प्रत्येकाच्या कुटुंबातली एक तरी व्यक्ती त्या दिवशी ठार झाली होती. त्यांनी मला स्मारकाला भेट देऊन यायला सांगितलं.

ज्या 20 जणांचं हे स्मारक आहे ते सर्व 16 ते 65 वयोगटातले होते. त्यातले 18 जण बेहमईचेच होते. तर दोघे शेजारच्या राजपुरा आणि सिकंदरा गावचे होते.

गावातल्यांना आजही तो दिवस चांगला आठवतो, ज्या दिवशी गावात रक्ताचे पाट वाहिले होते. या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागावा, अशी त्यांची इच्छा आहे. खटल्यालाही 10 वर्ष लोटली आहेत. या वर्षी जानेवारी महिन्यात न्यायालयाचा निकाल येणं अपेक्षित होतं. मात्र, एक पोलीस डायरी हरवल्यामुळे निकाल पुन्हा लांबणीवर पडला.

बेहमई गावात दोन कुटुंब सोडली तर संपूर्ण गाव ठाकूरांचंच आहे. या दोनपैकी एक घर ब्राह्मणाचं आहे आणि एक दलिताचं.

गावातल्या लोकांना माध्यमांकडून कुठलीच अपेक्षा नाही. गावातले लोक फूलनदेवीला खुनी मानतात.

बेहमई गाव

फोटो स्रोत, CHINKI SINHA/BBC

'दरवर्षी 14 फेब्रुवारीला वर्षश्राद्ध घातलं जातं'

ज्या दिवशी गावातल्या ठाकूरांना एका रांगेत उभं करून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यादिवशी बेहमईचे प्रधान जय वीर सिंह गावात नव्हते.

जय वीर सिंह सांगतात, "फूलन आपल्या टोळीसोबत इथल्या ओसाड डोंगरकपारीतून फिरायची. श्री राम आणि लाला राम (ते दरोडेखोर ज्यांनी फूलनचा प्रियकर विक्रम मल्लाहला ठार केलं होतं) हे दोघंही आमच्या गावचे नव्हते. त्यांचं गाव दमनपूर आमच्या गावापासून दहा किमी अंतरावर आहे. भाजप सरकार आल्यावर आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आम्हाला होती. मात्र, आम्ही आमचा न्यायाचा लढा सुरूच ठेवू. त्यांना त्यांच्या पापाचं फळ तर मिळायलाच हवं."

फूलनदेवीवर कसलाच अत्याचार झाला नव्हता, असा जय वीर सिंह यांचा दावा आहे. पोलीस आणि प्रसारमाध्यमांनी ही कहाणी रचल्याचा त्यांचा आरोप आहे.

जय वीर सिंह म्हणतात, "प्रत्येक सणाला आमच्या विधवा रडतात, आमच्या मुलांचे डोळे पाणावतात. दरवर्षी 14 फेब्रुवारीला आम्ही वर्षश्राद्ध घालतो."

एकेकाळी फूलनदेवी भारताची 'मोस्ट वॉन्टेड दरोडेखोर' होती. सरकारने तिच्यावर 10 हजार रुपयांच बक्षीस ठेवलं होतं.

बेहमई गावचे प्रधान जय वीर सिंह सांगतात, "त्या काळी पोलीस आणि दरोडेखोर यांना ओळखणं फार अवघड असायचं. दोघंही खाकी कपडे घालायचे. ते पिण्याचं पाणी किंवा जेवण घेण्यासाठी गावात यायचे. कायद्याने ते गुन्हेगार होते. त्यामुळे हा सर्व डोंगराळ भाग त्यांच्या लपण्यासाठी अतिशय योग्य होता."

बेहमई गाव

फोटो स्रोत, CHINKI SINHA/BBC

फूलनदेवीचं गाव

लोखंडी गेटवर 'वीरगती प्राप्त झालेल्या शूर फूलनदेवीचं हे घर आहे' असं वाक्य कोरलं आहे. एकलव्य सेनेने इथे फूलनदेवीचा एक पुतळाही उभारला आहे.

फूलनदेवीनेच एकलव्य सेनेची स्थापना केली होती. 'खालच्या जातीतल्या' लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. या घरात फूलनदेवीच्या आई मूला देवी आजही राहतात.

साडी नेसून हात जोडून उभ्या असलेल्या फूलनदेवीच्या या पुतळ्याकडे बघून खाकी वर्दी घालून हातात बंदूक घेतलेली, जिच्या कमरेला सतत पिस्तुल असायचं आणि केस उडू नये म्हणून कायम माथ्यावर लाल गमछा असायचा, ही तीच स्त्री आहे यावर विश्वासही बसत नाही.

मृत्यूनंतर एकलव्य सेनेने फूलनदेवीचा साडी नेसून हात जोडून उभा असलेला पुतळा बनवला. यातून ती एक संत होती, असा संदेश देण्याचा प्रयत्न दिसतो. खरंतर हा फुलनदेवीचा राजकीय अवतार आहे.

फूलन देवी

फोटो स्रोत, chinki sinha/bbc

देवीप्रमाणे होते फूलनदेवीची पूजा

फूलनदेवीचं गाव मुख्य मार्गापासून काही अंतरावर नदीलगत आहे. नदीकाठी वसलेल्या या गावात फूलनदेवी खरोखरीच देवीसमान पूज्य आहेत. तर नदी पलिकडच्या गावासाठी फुलनदेवी एक खुनी आहे.

फूलनदेवीच्या गावातही एक स्मारक आहे. फुलनदेवीने ठाकूरांवर सूड उगारल्याचं प्रतिक म्हणून हे स्मारक उभारण्यात आलं आहे. ते ठाकूर ज्यांनी शतकानुशतकं खालच्या जातींचं शोषण केलं. त्यांच्यावर अत्याचार केले.

मात्र, या दोन गावचे लोक कधीच एकमेकांना भेटत नाहीत. दूरच राहतात. आजही ही परंपरा कायम आहे.

अनिल कुमार

फोटो स्रोत, CHINKI SINHA/BBC

गाण्यांमधून आजही जागवल्या जातात फूलनदेवींच्या आठवणी

अनिल कुमार फूलनदेवींचे सहकारी होते. अनिल कुमार यांनी मिर्जापूरमधून निवडणूक लढवली त्यावेळी फूलनदेवींनी त्यांचा प्रचार केला होता. ते सांगतात तेव्हापासून आजपर्यंत फारसा काही बदल झालेला नाही.

अनिल कुमार 'बिहड की रानी'चं म्हणजेच फुलनदेवीचं गीत गातात. फूलनदेवी त्यांच्याच समाजाच्या होत्या. या गाण्यातून फुलनदेवीच्या अटकेची गोष्ट सांगण्यात आली आहे.

मल्लाह जातीत फूलनदेवीचा जन्म झाला. या जातीत आजही लग्नकार्यात फूलनदेवीच्या शौर्याच्या कहाण्या असलेली गाणी गायली जातात. सण-उत्सवातही फूलनदेवीची कवणं गायली जातात. विशेषतः ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या दुर्गोत्सवात.

फुलनदेवी आपल्या खिशात दुर्गेची छोटी मूर्ती ठेवायच्या, असं सांगतात. फुलनदेवींनी आत्मसमर्पण केलं त्यावेळी ज्या बातम्या प्रकाशित झाल्या त्यातही फूलनदेवींजवळ दुर्गेची प्रतिमा असल्याचं सांगण्यात आलं होतं.

फूलनदेवी आणि त्यांची टोळी गरिबांमध्ये चांगलीच लोकप्रिय होती. गरिबांसाठी फूलनदेवी त्यांच्या तारणहार होत्या.

अनिल कुमार सांगतात, "त्या गावात यायच्या तेव्हा मुलींच्या लग्नासाठी दागिने घेऊन यायच्या. गरिबांना पैसे वाटायच्या."

फूलन देवी

फोटो स्रोत, RAJENDRA CHATURVEDI/BBC

फूलनदेवीच्या कथा

फूलनदेवीने भिंडमधल्या एका गावात आत्मसमर्पण केलं, तोपर्यंत त्या कशा दिसतात हे कुणालाही माहिती नव्हतं.

पोलिसांकडेही त्यांचा एकही फोटो नव्हता. फूलनदेवीने काही अटींसह पोलिसांसमोर शस्त्र ठेवली. मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांनी त्यांच्या या राजकीय खेळीचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये उत्तम वार्तांकन होईल, याची संपूर्ण काळजी घेतली होती.

त्यावेळी बऱ्याच पत्रकारांनी लिहिलं होतं, "जेव्हा एका कमी उंचीच्या मुलीने जमावाकडे बघत गन उंचावून खाली ठेवली आणि हात जोडले त्यावेळी अनेकजण निराशा झाले. फूलनदेवी म्हणजे उंच, देखणी मात्र कुणालाही भीती वाटेल, अशी एखादी स्त्री असेल, असा त्यांचा समज होता."

जिला दरोडेखोरांची राणी म्हटलं गेलं ती अशी दिसत असेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती.

फूलन देवी (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

दरोडेखोरांची राणी ते तुरुंगवास ते संसद

इंडिया टुडेच्या एका पत्रकाराने फूलनदेवीला 'दस्यु सुंदरी' आणि 'दरोडेखोरांची राणी' असा किताब दिला होता.

मात्र, फूलनदेवीने आत्मसमर्पण केलं तेव्हा याच पत्रकाराने लिहिलं, "ती अत्यंत निरस होती, सावळ्या रंगाची, चंचल आणि पोरकट मुलगी होती. लहान-लहान गोष्टीवरून चिडायची आणि याच मुलीने चंबळ दणाणून सोडलं होतं."

फूलनदेवी खटला न चालवता जवळपास 11 वर्ष कैदेत होत्या. मुलायम सिंह मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सरकारी वकिलांना फूलनदेवीवर लावण्यात आलेले सर्व आरोप मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 1994 साली फुलनदेवीची सुटका झाली.

'खालच्या जातीतल्या' लोकांसाठी फुलनदेवीची सुटका म्हणजे त्यांच्यावर शतकानुशतकं अन्याय, अत्याचार केलेल्या 'सवर्णां'विरोधातली बंडखोरी होती. त्यांच्यासाठी फूलनदेवी जातीव्यवस्थेला आव्हान देण्याचं प्रतिक बनल्या.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दोन वर्षांनी फूलनदेवी यांनी मिर्जापूरमधून समाजवादी पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्या जिंकल्याही.

1999 साली त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवली आणि त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या. मात्र, वयाच्या 38 व्या वर्षी फूलनदेवींवर त्यांच्या दिल्लीतल्या घराबाहेर गोळी झाडण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

फूलन देवींचं गाव

फोटो स्रोत, CHINKI SINHA/BBC

न्यायाच्या प्रतिक्षेत बेहमई

बेहमई हत्याकांडात श्रीदेवी यांचे सासरे आणि दीर यांचाही मृत्यू झाला होता. त्यावेळी श्रीदेवी 24 वर्षांच्या होत्या. त्यांना 4 मुली होत्या. आपण फक्त वाट बघतोय. मात्र, न्याय मिळेल, असं वाटत नसल्याचं त्या म्हणतात.

त्या दिवशी काय घडलं हे सांगताना श्रीदेवी म्हणाल्या, "ते आमच्या घरच्या पुरुष मंडळींना कुठे घेऊन गेले, याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आम्ही तर संध्याकाळी त्यांचे मृतदेहच बघितले."

त्या विचारतात, "आता काय न्याय मिळणार? फुलनदेवी तर गेली. त्या दिवसाची आठवणही काढू नका. मनाला वेदना होतात. जुन्या जखमा पुन्हा ताज्या होत्यात."

दलितांवर अत्याचार वाढले

हा दलित-सवर्ण हा संघर्ष पूर्वीपासून चालत आला आहे. त्याचंच उदाहरण महिनाभरापूर्वी हाथरसमध्ये दिसलं. हाथरसमध्येही एका 19 वर्षाच्या दलित मुलीवर ठाकुरांनी कथित बलात्कार करून तिला ठार केलं.

मात्र, त्या मुलीवरच आरोप करण्यात आले. काहींनी तर घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनीच तिला ठार केलं, असंही म्हटलं.

गेल्या काही वर्षात दलित मुलींवर बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट होते.

गेल्या वर्षी देशात दररोज 10 दलित मुलींवर बलात्कार झाल्याची नोंद झाली. स्त्रियांवरील अत्याचार आणि मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत उत्तर प्रदेश देशात पहिल्या स्थानावर आहे.

फूलनदेवी निषाद जातीच्या होत्या. ही जात इतर मागासवर्ग गटात येते. मात्र, तरीही त्या ठाकूरांविरोधात बंडखोरी करणाऱ्या 'खालच्या जाती'च्या प्रतिक बनल्या.

फूलन देवी

फोटो स्रोत, CHINKI SINHA/BBC

संग्रहालय बनवण्याची गावकऱ्यांची इच्छा

अनिल कुमार सांगतात, "फुलनदेवींनी जो मार्ग स्वीकारला तो सोपा नव्हता. आमच्यासाठी त्या बंडखोर होत्या आणि बंडखोर तो असतो ज्याचं आयुष्य कठीण असतं. त्यांना न्याय मिळत नाही, म्हणून ते बंडखोर होतात. 'खालच्या जातीतल्या' लोकांनी ठाकूरांचे अनेक अत्याचार सहन केले. त्या सर्वांना ठाकूरांची ही दहशत संपवायची होती."

फूलनदेवीची हत्या झाली त्यादिवशी संपूर्ण गाव शोकाकुल झाल्याचं अनिल कुमार सांगतात. फूलनदेवीचं गाव आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. नदीवर पुल बांधणार होते. मात्र, ते कामही अजून झालेलं नाही. गावात महाविद्यालय असावं, ही गावकऱ्यांचीही मागणीही अजून पूर्ण झालेली नाही.

हे गाव फूलनदेवीच्या मतदारसंघात नव्हतं. मात्र, आज त्या हयात असत्या तर गावाला नक्कीच मदत केली असती. गावात फूलनदेवीचं संग्रहालय बनवण्याची गावकऱ्यांची इच्छा आहे. या संग्रहालयात फुलनदेवीची वर्दी, त्यांचा लाल गमछा, लाल शॉल, शूज, अशा सर्व वस्तू ठेवण्यात येतील.

गावकऱ्यांनी फूलनदेवीच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेवर गाणं लिहिलं आहे. प्रत्येक कार्यात ती गाणी गायली जातात. गावकरी सूड उगारणाऱ्या या बंडखोर महिलेच्या स्मृती जिवंत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात.

गावातल्या मुलींसाठीही फूलनदेवी शौर्याच्या प्रतिक आहेत. आपण फूलनदेवीच्या गावातल्या असल्याचा त्यांना अभिमान आहे. मात्र, काळानुरूप फूलनदेवीची शौर्यगाथा लोक विसरतील, अशी काळजी अनिल कुमार व्यक्त करतात.

फूलन देवी

फोटो स्रोत, Twitter @PhoolanTheMovie

फूलनदेवींचं कुटुंब

या गावात शंभरहून अधिक कुटुंबं आहेत. आपल्या मुलींना ते 'चिरैय्या' म्हणतात. फूलनदेवीच्या घरी त्यांचा पुतळा बसवला त्यावेळी माझी 'चिरैय्या' परतली, अशा भावना त्यांच्या आईने व्यक्त केल्या होत्या.

त्या आता फारसं बोलत नाहीत. फूलनदेवी एकूण चार बहिणी होत्या. त्यांची धाकटी बहीण आईची देखभाल करायची. मात्र, त्या आता हयात नाहीत. त्यांचा मुलगा आणि त्याची पत्नी दोघं या गावात राहतात. त्यांची थोरली बहीण रुक्मिणीदेवी आता राजकारणात सक्रीय आहेत आणि त्या ग्वाल्हेरमध्ये राहतात.

हाथरसमधल्या बलात्कार पीडित मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना देण्यात आला नव्हता. पोलिसांनीच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. तिच्या चितेची राख अजूनही तिथेच आहे. तर इकडे फूलनदेवीच्या गावात आजही गाण्यातून त्या जिवंत आहेत.

या दोन्ही गावात 5 तास आणि 40 वर्षांचं अंतर आहे. हे अंतर न्याय आणि अन्यायाच्या मधलं अतंर आहे. शेवटी सर्वकाही अंतरच असतं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणामधलं अंतर. न्यायालय आणि सामान्यांमधलं अंतर. दोन समाजांमधलं अंतर.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)