सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामींना अटक केली होती तेव्हा...

फोटो स्रोत, Ani
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना चॅनेलचे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
या प्रकरणात 4 नोव्हेंबर दिवसभर अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. सकाळी अर्णब यांच्या अटकेपासून सुरू झालेला घटनाक्रम कोर्टात त्यांना पोलीस कोठडीची सुनावणी होईपर्यंत सुरू होता.
कोर्टात हातवारे करणाऱ्या अर्णब यांना कोर्टाने सक्त ताकीद दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं. हातवारे करू नका, नीट उभे राहा, असं कोर्टाने म्हणल्यानंतर अर्णब गोस्वामी हे शांत बसून राहिले, हे विशेष.
या प्रकरणात बुधवारी नेमकं काय घडलं याचं संपूर्ण वार्तांकन बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांनी घटनास्थळाहून केलं आहे. या प्रकरणाचा हा ग्राऊंड रिपोर्ट...
अर्णब गोस्वामी यांचं मुंबई येथील निवासस्थान
बुधवारी सकाळी सहा वाजता रायगड पोलिसांचं पथक अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोहोचलं. त्यांच्या सोबतीला सहकार्यासाठी मुंबई पोलिसांचं पथकही होतं. तिथे अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आलं. अर्णब यांना घेऊन पोलीस रायगडच्या दिशेने रवाना झाले.
अलीबाग पोलीस ठाणे
सकाळी दहा-अकरा वाजण्याच्या सुमारास अर्णब यांना घेऊन पोलीस रायगड पोलीस ठाण्यात दाखल झाले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तिथं पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अर्णब यांना रायगडच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं.
रायगड जिल्हा न्यायालय
अर्णब गोस्वामी यांना दुपारी 1 वाजण्याच्या आसपास गोस्वामी यांना कोर्टासमोर सादर करण्यात आलं.
कोर्टात माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता. फक्त आरोपी, पोलीस आणि त्यांचे वकील यांनाच कोर्टात प्रवेश देण्यात येत होता.
मुख्य न्यायदंडाधिकारी सुनन्या पिंगळे यांच्या कोर्टात त्यांची सुनावणी सुरू करण्यात आली. पण कोर्टात आल्यानंतर पोलिसांवर आरोप करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचं त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोर्टाने गोस्वामी यांचे आरोप लक्षात घेऊन पुन्हा वैद्यकीय तपास करण्याचे आदेश दिले. दुसऱ्यांदा वैद्यकीय तपासणी करताना सरकारी वकील तसंच आरोपीच्या वकिलांसमोर ही तपासणी करण्यात यावी, असं कोर्टाने सांगितलं. तसंच हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील सुनावणीसाठी कोर्टात या, अशी सूचना पोलिसांना करण्यात आली.
त्यामुळे अर्णब यांना पुन्हा अलीबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथं पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर अर्णब यांना दुपारी चार-साडेचारच्या सुमारास पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं.
यावेळी अर्णब यांनी केलेल्या आरोपांवर प्रथम सुनावणी झाली.
कोर्टाने सरकारी वकील, पोलीस आणि अर्णव गोस्वामी यांच्या वकीलांची बाजू ऐकून घेतली. वैद्यकीय तपासणी करणार्या डॉक्टरचेही मत कोर्टाने ऐकून घेतलं.
हातवारे बंद करून नीट उभे राहा, कोर्टाची अर्णब यांना ताकीद
वैद्यकीय अहवालावर जवळपास 1 ते दीड तास सुनावणी सुरू होती. यावेळी अर्णब यांनी हातवारे करून काही सांगण्याचा प्रयत्न केला असता कोर्टाने त्यांना ताकीद दिली.

फोटो स्रोत, Getty Images
कोर्टात नीट उभे रहा आणि हातवारे बंद करून उभे रहा अशी ताकीद दिली. कोर्टाने नीट उभे रहा, अशी समज दिल्यानंतर अर्णव कोर्टात शांत बसून होते.
"आरोपीने पोलिसांवर केलेल्या मारहाणीच्या आरोपांची तक्रार मी विचाराधीन घेत नाही. आरोपीने पोलिसांवर केलेल्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळून येत नाही," असं कोर्टाने म्हटलं.
अर्णब गोस्वामींबाबत मॅजिस्ट्रेट कोर्टाने काय म्हटलं?
'आरोपींकडून काहीही जप्त करण्यात आलेलं नाही. तथाकथीत गुन्ह्याची पार्श्वभूमी प्रथमदर्शनी सिद्ध होत नाही. आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी त्यांचा घटनेशी असणारा संबंध जोडणारी श्रृंखलासुद्धा प्रथमदर्शनी प्रस्थापित होत नाही.
घटनेबाबत कोणताही पुरावा आलेला नसल्यामुळे अ-समरी अहवाल स्वीकारला जातो. सदरचा अहवाल आजतागायत अस्तित्वात असताना सदरच्या खटल्याबाबत पुन्हा तपास सुरू होतो, यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीचं समर्थन करणारं कोणतंही योग्य, संयुक्तिक आणि कायदेशीर कारण आढळत नाही.
या पूर्वी करण्यात आलेला तपास अपूर्ण होता का? त्यात कशा प्रकारे त्रुटी राहिल्या आहेत? त्या का राहिल्या? याबाबत अभियोग पक्षाकडून कोणतंही सबळ कारण आणि पुरावा मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे आरोपी क्रमांक 1 ते 3 बाबतच्या पोलीस कोठडीचं समर्थन करता येत नाही.
अन्वय नाईक प्रकरणाची सुनावणी
यानंतर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. यादरम्यान सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद खालीलप्रमाणे -
•अर्णब गोस्वामी एका प्रस्थापित न्यूज चॅनलचे संपादक असून त्यांचा सामान्यांवर प्रभाव आहे.

फोटो स्रोत, Anvay naik
•अन्वय नाईक यांची स्युसाईड नोट मृत्यूपूर्वीची जबानी म्हणून ग्राह्य धरण्यात आली आहे. आरोपींच्या कंपन्यांच्या मालकी/भागिदारीची कागदपत्र प्राप्त करून घ्यायची आहेत.
•नाईक यांच्या कंपनीतील साक्षीदारांचा तपास करायचा आहे. त्यावेळी अर्णव पोलीस कोठडीत असणे गरजेचं आहे. नाहीतर साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो.
•या गुन्ह्यांत नव्याने तपासामध्ये सकारात्मक माहिती मिळाली आहे. त्याचा तपास करायचा आहे.
•यापूर्वी केलेल्या तपासात कोणत्या वेंडर्सकडून कामं आरोपींनी पूर्वा करून घेतली याची माहिती नाही. त्यामुळे या वेंडर्सचा तपास करायचा आहे. त्यांना अटक करायची आहे.
•काम केल्याची कागदपत्र जप्त करायची आहेत.
•वर्क ऑर्डरपेक्षा जास्त काम केल्याचं साक्षीदीरांचं म्हणणं आहे. याचा तपास करायचा आहे.
•अन्वय नाईक यांनी वेळेत काम पूर्ण केले नाही, असा आरोपींचा दावा आहे. त्याची कागदपत्र जप्त करायची आहेत.
•नवीन तपासात काही कंपन्यांचे बॅंक अकाउंट नंबर मिळाले आहेत. त्यात आणखी काही अकाउंट आहे का, याची माहिती गोळा करायची आहे.
•काही साक्षीदारांचे 164 CRPC अंतर्गत जबाब नोंदवायचे आहेत. त्यासाठी गोस्वामी यांना पोलीस कोठडी गरजेची आहे.
•आरोपींकडून सादर करण्यात आलेली कागदपत्र बनावट आहेत का, याचा तपास बाकी आहे.
•आरोपींनी सादर केलेल्या डेबिट नोटवर मयत यांची किंवा त्यांच्या कंपनीची सही असल्याचा पुरावा नाही. त्यामुळे या एकतर्फी जारी करण्यात आल्या आहेत. याचा तपास पोलीस कोठडीत करायचा आहे.
•वादग्रस्त रक्कमेचा प्रश्न सोडवण्यासाठी आरोपी यांच्याकडून ठोस प्रयत्न नाहीत. त्यामुळे मयत मानसिक दडपणाखाली होते अशी साक्षीदारांकडून माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मयत व्यक्तीस आत्महत्या करण्यायोग्य परिस्थिती निर्माण केली आणि परिणामी मयत यांनी गळफास लावून आत्महत्या केली. याचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडी गरजेची आहे.
•नाईक यांच्या मुलीला पैसे स्वीकारावे आणि तक्रारी बंद कराव्यात यासाठी धमक्या देण्यात आल्या. त्यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गोस्वामी यांना नोटीस बजावलेली आहे.
•तत्कालीन तपास अधिकाऱ्यांकडून तपासामध्ये अनेक उणीवा. फौजदारी प्रक्रिया संहितेचे उल्लंघन याकारणासाठी "अ समरी" अहवालावर फिर्यादीने आक्षेप घेतला होता. त्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचं तपासात आढळून आलं आहे.
पोलीस कोठडीचा अर्ज फेटाळला
अर्णब यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयासमोर केली. या प्रकरणात आणखी तपास करायचा आहे. साक्षीदार तपासायचे आहेत, या बाबींचं कारण देत अर्णब यांना पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली.
जवळपास 8 ते 9 तास ही सुनावणी चालली. त्यानंतर कोर्टानं गोस्वामी आणि इतर आरोपींना 18 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रायगड पोलिसांचा पोलीस कोठडीचा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना रात्र जेलमध्येच काढावी लागली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








