हाथरस पीडितेच्या कुटुंबाला मेडिकल रिपोर्ट का मिळाला नाही? - ग्राऊंड रिपोर्ट

- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी, हाथरसहून
हाथरसमध्ये दलित तरुणीवर झालेल्या कथित बलात्कार आणि मृत्यू प्रकरणाची दखल अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने स्वतःहून घेत उत्तर प्रदेश सरकारला नोटीस दिली आहे.
या प्रकरणी 12 ऑक्टोबरला हायकोर्टात सुनावणी होईल. कोर्टाने गृह सचिव,पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलीस उपायुक्त(कायदा आणि सुव्यवस्था) आणि हाथरसच्या डीएमना या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच या पीडितेच्या कुटुंबालाही हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
"या तरुणीवर बलात्कार झाला नसून मानेवर झालेल्या गंभीर जखमेमुळे मृत्यू झाल्याचं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे." उत्तर प्रदेशाचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी म्हटलं होतं.
हा रिपोर्ट पीडितेच्या कुटुंबीयांना मिळालेला नाही. फोरन्सिक रिपोर्ट येण्याआधीच हाथरसच एसपी सांगत होते की तिच्यावर बलात्कार झाला की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या कथित गँगरेपच्या घटनास्थळापासून काही अंतरावर दोन तरूण उभे आहेत. हे दलित तरूण रागात आहेत. ते पीडितेला ओळखत नाहीत पण विचारल्यानंतर म्हणतात, "आमच्या बहिणीसोबत जे झालं ते पाहून आमचं रक्त उकळतंय. जेव्हापासून आम्ही सोशल मीडियावर याबद्दल वाचलंय तेव्हापासून प्रचंड अस्वस्थ झालोय. अशा घटना आता आम्ही सहन करणार नाही. निवडणुका येऊ द्या, याला सणसणीत प्रत्युत्तर देऊ."
घटनास्थळी अनेक पत्रकारांची ये-जा आहे. इथे भेटलेले काही स्थानिक पत्रकार म्हणतात की, "ही घटना इतकी मोठी नाहीये जितकी दाखवली जातेय. यातलं सत्य काहीतरी वेगळंच असू शकतं."
मी विचारलं जर सत्य काही वेगळंच असेल तर तुम्ही तशी तक्रार का नाही केलीत, यावर त्यांचं उत्तर होतं, "या घटनेवरून भावना इतक्या भडकल्यात. काही बोलून उगाच जोखीम कोण अंगावर ओढून घेईल?"

फोटो स्रोत, iStock
पण त्यांच्या बोलण्याच्या समर्थनार्थ त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते. याच गोष्टी पुढे गावातही ऐकायला मिळाल्या.
स्थानिक पत्रकारांशी जे बोलणं झालं ते तर अनौपचारिक होतं, पण हाथरसचे एसपी विक्रांत वीर यांनी आम्हाला सांगितलं की, "मेडिकल रिपोर्ट बनवणाऱ्या डॉक्टरांनी अजून बलात्कार झाल्याचं सांगितलं नाही. फॉरेन्सिक तपासणीच्या अहवालाची वाट पाहत आहोत, त्यानंतरच स्पष्ट काय ते कळेल."
या कथित गँगरेपची बळी ठरलेल्या पीडितेच्या कुटुंबाला अजूनही वैद्यकीय अहवाल दिला गेलेला नाही. पीडितेला जेव्हा दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होते तेव्हाही तिच्या कुटुंबाकडे मेडिकल रिपोर्ट नव्हता. पीडितेचे भाऊ सांगतात, "पोलिसांनी आम्हाला सगळी कागदपत्रं दिली नाहीत. आमच्या बहिणीचे रिपोर्ट आजही आमच्याकडे नाहीत."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पीडितेच्या कुटुंबाला रिपोर्ट का दिले नाहीत असं एसपी विक्रांत वीर यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "ही माहिती गोपनीच आहे आणि सध्या या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. आम्ही या घटनेशी संबंधित सगळे पुरावे गोळा करतोय."
पण मीडिया ज्याप्रकारे सांगतोय त्याप्रकारे पीडितेसोबत क्रुरकर्म झालेलं नाही हे त्यांनी वारंवार जोर देऊन सांगितलं. ते म्हणतात, "पीडितेची जीभ कापलेली नव्हती. पाठीचा कणाही मोडलेला नव्हता. गळ्यावर दबाव वाढल्याने तिचा गळ्याचं हाड मोडलं होतं ज्यामुळे मज्जासंस्था प्रभावित झाली."

घटनेनंतर थोड्यावेळात रेकॉर्ड केलेल्या व्हीडिओमध्ये पीडितेने आपल्यासोबत बलात्कार झाल्याचं म्हटलं नाहीये. तिने या व्हीडिओत मुख्य आरोपीचं नाव घेतलंय आणि खूनाचा प्रयत्न केला असल्याचं म्हटलं आहे.
पण यानंतर हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड केलेल्या एका दुसऱ्या व्हीडिओत आणि पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडितेने आपल्यावर गँगरेप झाल्याचं म्हटलं आहे. या व्हीडिओत पीडिता म्हणतेय की मुख्य आरोपीने याआधीही तिचा विनयभंग केला होता आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. घटनेच्या दिवशी काय झालं याबद्दल सांगताना ती म्हणते, "दोन लोकांनी माझ्यावर बलात्कार केला. बाकीचे माझ्या आईचा आवाज ऐकून पळून गेले."
या दिवशी काय घडलं ते आठवताना पीडितेची आई सांगते की, "मी गवत कापत होते. मुलीला म्हटलं तू गवताचा भारा बांध. पण ती मला दिसली नाही. मी तिला तासभर शोधत फिरले. मला वाटलं ती घरी तर गेली नाही. मी तीन-तीनदा शेतात शोधलं. नंतर मला ती एका ठिकाणी पडलेली दिसली. ती बेशुद्ध होती आणि तिचे अंगावर कपडे नव्हते. तिच्या पाठीचा कणा मोडला होता, जीभ कापली होती, मरणासन्न अवस्थेत होती ती."

सफदरजंग हॉस्पिटलने पीडितेच्या पोस्टमॉर्टेमचा अहवाल जारी केली आहे. त्यात मृत्यूचं कारण "मानेपाशी मणक्याला मोठी दुखापत आणि त्यानंतर झालेले त्रास" असं दिलेलं आहे. रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की तिचा गळा दाबल्याच्या खूणा आहेत पण मृत्यूचं कारण हे नाहीये. मेडिकल रिपोर्टमध्ये हेही म्हटलंय की अजून व्हिसेरा रिपोर्ट येणं बाकी आहे आणि त्यानंतरच मृत्यूचं खरं कारण कळू शकेल.
14 सप्टेंबरला झालेल्या या कथित सामूहिक बलात्काराच्या केसमध्ये पोलिसांना एफआयआरमधल्या कलमांना तीनदा बदललं आहे. सुरुवातीला फक्त खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर सामूहिक बलात्काराची कलमं जोडली गेली. त्यानंतर दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर खूनाचं कलम लावलं गेलं.
पोलिसांनी या प्रकरणी पहिली अटक घटनेच्या 5 दिवसांनंतर केली. पोलिसांनी खरंच तपासात हलगर्जीपणा केला याबद्दल एसपी वीर म्हणतात, "14 सप्टेंबरच्या सकाळी जवळपास साडेनऊ वाजता पीडिता आपली आई आणि भाऊ यांच्यासोबत पोलीस स्टेशनला आली. पीडितेच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं की प्रमुख आरोपीने हत्या करण्याच्या हेतून पीडितेचा गळा आवळला होता. यानंतर साडेदहा वाजता आम्ही एफआयआर दाखल करून घेतली."
ते पुढे म्हणतात, "पीडितेला ताबडतोब जिल्हा रूग्णालयात पाठवलं गेलं. तिथून तिला अलिगढ मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केलं आणि तिच्यावर लगेचच उपचार सुरू झाले. पहिला एफआयआर कलम 307 आणि एससी-एसटी अॅक्टनुसार दाखल केला. त्यानंतर पीडिता जेव्हा काही बोलण्याच्या परिस्थितीत आली तेव्हा तिने अजून एका तरूणाचं नाव घेतलं आणि म्हणाली की तिचा विनयभंग झाला आहे. यानंतर अजून एका आरोपीचं नाव रिपोर्टमध्ये जोडलं गेलं."

"यानंतर 22 तारखेला पीडितेने आपल्यावर चार लोकांनी सामूहिक बलात्कार केल्याचं सांगितलं. जेव्हा तिला विचारलं की तिने आधी फक्त दोन लोकांचंच नाव का घेतलं तेव्हा ती म्हणाली की तिला आधी शुद्ध नव्हती. पीडितेच्या या जबाबानंतर रिपोर्टमध्ये सामूहिक बलात्काराची कलमं जोडली गेली. आरोपींच्या अटकेसाठी विशेष टीम्स बनवल्या गेल्या. शक्य तितक्या लवकर इतर तीन आरोपींना अटक केली," वीर सांगतात.
पीडितेने हॉस्पिटलमध्ये दिलेल्या आपल्या जबाबात सामूहिक बलात्काराचा उल्लेख केला आहे. पण मेडिकल रिपोर्टमधून ही घटना घडल्याचं स्पष्ट होतंय का? यावर विक्रांत वीर म्हणतात, " मेडिकल रिपोर्ट एक महत्त्वाचा पुरावा आहे. आता जे रिपोर्ट आम्हाला मिळालेत त्यातून सेक्शुअल असॉल्ट म्हणजेच लैंगिक अत्याचारांची पुष्टी झालेली नाही. डॉक्टर अजून फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहात आहेत. त्यानंतर ते आपलं स्पष्टीकरण देतील. पीडितेच्या गुप्तांगांवर कोणत्याही प्रकारच्या जखमा असल्याचा उल्लेख नाहीये. हा मेडिकल रिपोर्ट आमच्या केस डायरीचा एक भाग असेल."
रात्रीच केले अंत्यसंस्कार
पोलिसांनी 29 सप्टेंबरला रात्री उशिरा पीडितेचे अंत्यसंस्कार केले. नातेवाईकांचा आरोप आहे की त्यांना घरात कोंडून जबरदस्ती अंत्यसंस्कार केले गेले आहेत. मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की हे अंत्यसंस्कार नातेवाईकांच्या उपस्थितीतच केले आहेत.
पीडितेच्या भावाने बीबीसीला सांगितलं, "आमच्या नातेवाईकांना मारहाण केली गेली. तिला जबरदस्तीने जाळून टाकलं गेलं. आम्हाला माहितीही नाही की पोलिसांनी नक्की कोणाचा अंत्यसंस्कार केला. शेवटचा चेहराही तिचा पाहू दिला नाही. पोलिसांना अशी काय घाई होती?"

जेव्हा आम्ही हाच प्रश्न एसपींना विचारला तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की, "मृत्यू होऊन बराच वेळ झाला होता. पोस्टमॉर्टेम आणि पंचनाम्याची कारवाई होता होता रात्रीचे 12 वाजले होते. काही कारणांमुळे पीडितेचं शव लगेच आणता आलं नाही. तिचे वडील आणि भाऊ शवासोबतच आले होते. नातेवाईकांनी रात्रीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी त्यासाठी लाकडं आणि इतर गोष्टी एकत्र करण्यासाठी मदत केली. अंत्यसंस्कार मात्र नातेवाईकांनीच केला."
आरोपीच्या घरच्यांचं म्हणणं काय?
पीडितेचं घर आरोपीच्या घरापासून फार लांब नाहीये. एक मोठ्या संयुक्त घरात तिन्ही आरोपींची कुटुंब राहातात. जेव्हा मी त्यांच्या घरी पोहचलो तेव्हा घरात फक्त महिलाच होत्या. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या मुलांना या प्रकरणात अडकवलं जातंय.
एक आरोपी 32 वर्षांचा आहे आणि तीन मुलांचा पिता आहे. दुसरा आरोपी 28 वर्षांचा आहे आणि त्याला 2 मुलं आहेत. बाकी दोघांची वय विशीच्या आसपास आहेत आणि त्यांचं लग्न झालेलं नाही.
जेव्हा आरोपींच्या आयांना विचारलं की त्यांच्या मुलांनी हा गुन्हा केलेला नाही मग त्यांचं या प्रकरणी नाव कसं आलंय, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, "फार जुना वाद आहे. या लोकांचं कामच आहे खोटे आरोप लावा आणि त्यानंतर पैसे घ्या. सरकारकडूनही नुकसानभरपाई घेतात आणि लोकांकडूनही.

नातेवाईकाचं म्हणणं आहे की पोलिसांनी त्यांच्या मुलांना अटक केली नाही तर स्वतःहून त्यांच्याकडे हजर केलं. एक महिला म्हणाली, "जेव्हा आमच्या मुलांची नावं आली तेव्हा आम्ही स्वतःहून मुलांना पोलिसांकडे स्वाधीन केलं."
एका आरोपीची आई म्हणते की तिचा मुलगा दुध डेअरीवर काम करतो आणि घटनेच्या दिवशी तो तिथेच होता. त्याची त्यादिवशीची हजेरी तपासली जाऊ शकते.
आरोपींचे नातेवाईक वारंवार आपल्या ठाकुर असण्याचा आणि पीडितेच्या कुटुंबाच्या दलित असण्याचा उल्लेख करत होते. आरोपीची आई म्हणते, "आम्ही ठाकुर आहोत, ते हरिजन. आम्हाला त्याच्याशी काय देणंघेणं. ते रस्त्यात दिसेल तरी आम्ही लांब सरकतो. आम्ही कशाला त्यांना हात लावू, त्यांच्याकडे कशाला जाऊ?"
आरोपींविषयी काय म्हणणं आहे गावातल्या लोकांचं?
गावात आरोपीच्या परिवाराशी ज्याचे जसे संबंध त्याची तशी मतं आहेत. जवळच राहाणाऱ्या ठाकुर कुटुंबातल्या काही महिला म्हणतात की आरोपी आधीपासूनच असा होता. रस्त्यातून चालणाऱ्या मुलींची छेड काढायचा.
आपल्या शेतात काम करणाऱ्या काही ठाकुर तरूणांचंही हेच म्हणणं आहे. "हे कुटुंब असंच आहे. नेहमीच भांडण-मारामाऱ्या करत असतात. यांचा कुटुंबकबिला मोठा आहे त्यामुळे भीतीपोटी यांच्याबद्दल कोणी बोलतही नाही. यांचा दबदबा आहे, गावात यांच्याविरोधात कोणी काही बोलणार नाही."

पण लांब दुसऱ्या शेतात काम करणारा एक तरूण म्हणतो, "तुम्ही जसं समजताय तसं काही नाहीये. आता एसआयटी तपास करेल. एका आठवड्यात कळेल की नक्की काय झालं होतं. तुम्ही पाहात रहा."
बाजूच्याच एका दलित परिवारातले एक जेष्ठ व्यक्ती सांगतात, "हे असं पहिल्यांदाच होत नाहीये. आधीही आमच्यावर असे हल्ले केले गेलेत. आमच्या मुली-सुना एकट्या शेतावरही जाऊ शकत नाहीत. आणि ही मुलगी तर आई, भाऊ यांच्याबरोबर गेली होती तरी असं झालं. या लोकांनी आमचं आयुष्य नरक बनवून टाकलं आहे. या नरकात आम्ही कसे राहातोय आमचं आम्हालाच माहिती."
गावात जातीयवाद
देशाची राजधानी दिल्लीपासून 160 किमी अंतरावर वसलेल्या या गावात जास्तकरून ठाकुर आणि ब्राम्हण कुटुंबच राहातात. दलितांची साधारण डझनभर घर आहेत जी एकमेकांच्या जवळपासच आहेत.
गावात दलित आणि इतर लोकांमध्ये काही संबंध आहेत असं दिसत नाही. या घटनेनंतर गावातल्या तथाकथित उच्च जातीच्या लोकांनी पीडितेच्या घरी जाऊन सांत्वन केलेलं नाही. पीडितेच्या नातेवाईकांचंही हेच म्हणणं आहे की दुसऱ्या जातीच्या लोकांशी त्यांचा काही संबंध नाहीये.
दलितांमध्ये वाढता असंतोष
पोलिसांनी गावात जाण्याच्या सगळ्या रस्त्यांवर बॅरिकेटिंग केलं आहे. जास्तीत जास्त लोकांना बाहेरच थांबवलं जातंय. पत्रकारांनाही पायीच गावात जायला सांगितलं जातंय. दलित समुदायाचे लोक पीडितेच्या घरी जाऊन सांत्वन करू पाहात आहेत पण त्यांना पोलीस बाहेरच थांबवत आहेत.

उत्तराखंडहून आलेल्या एका दलित शिष्टमंडळालाही पोलिसांनी बाहेरच थांबवलं होतं. यात सहभागी असलेले लोक म्हणतात, "सरकार आमच्यावर अन्याय करतंय. आम्ही आता सहन करणार नाही. आम्ही आमच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना आधारही देऊ शकत नाही."
एसआयटीचा तपास
सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम स्थापन केली आहे. 30 सप्टेंबरला ही टीम हाथरसला पोहचली. आता गावाची सीमा मीडिया प्रतिनिधींसह सगळ्यांसाठी सील केली आहे. म्हणजे आता गावात कोणालाही प्रवेश नाहीये. एसआयटीचा तपास सुरू झाला आहे. त्यांना आपला रिपोर्ट एका आठवड्याच्या आत सबमिट करायचा आहे. या तपासात पूर्ण सत्य पुढे येईल अशी आशा आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासावर आता अनेक गंभीर प्रश्न उठत आहेत. या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाही.
1. पोलिसांनी घटनास्थळ सील का केलं नाही? घटनेच्या सुरुवातीच्या दिवसात तिथून पुरावे का गोळा केले नाहीत?
2. पोलिसांनी रात्रीच्या अंधारात जबरदस्ती अंत्यसंस्कार का केले?
3. पीडितेच्या परिवाराला मेडिकल रिपोर्ट का दिला नाही?
4. तांत्रिक पुरावे का गोळा केले नाहीत? आरोपींच्या अटकेला उशीर का झाला?
पण या सगळ्या प्रश्नांवर एसपी विक्रांत वीर यांचं म्हणणं आहे की, "पोलिसांनी आपल्या कामात हलगर्जीपणा केलेला नाही. सगळे पुरावे मिळवण्याचं काम सुरू आहे, आणि ते मिळतील. कोणताही आरोपी यातून सुटणार नाही आणि कोणत्याही निरपराध माणसाला यात अडकवलं जाणार नाही. याची चौकशी वेगाने सुरू आहे आणि आम्ही ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला न्याय देऊ."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








