भिवंडी इमारत दुर्घटना : ढिगाऱ्याखालचे 'ते' 10 तास...

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
- Author, शाहीद शेख
- Role, बीबीसी मराठीसाठी
खालिद खान ऊर्फ केके...भिंवडीमध्ये मोबाईल रिपेअरिंगचं काम करणाऱ्या 42 वर्षांचे खालिद सोमवारी (21 सप्टेंबर) पहाटे 3 च्या सुमारास पाणी प्यायला उठले. पाण्याची बाटली हातात घेईपर्यंत होत्याचं नव्हतं झालं. ते राहत असलेली 'जिलानी मंजिल' इमारत कोसळली आणि खालिद ढिगाऱ्याखाली अडकले.
पुढचे तब्बल 10 तास खालिदनी ढिगाऱ्याखाली काढले. आता आपण यातून वाचत नाही, असं वाटून त्यांनी मोबाईलमध्ये पत्नीसाठी एक शेवटचा निरोपाचा व्हीडिओही शूट करून ठेवला. तब्बल 10 तासांनी NDRF च्या जवानांनी खालिदची ढिगाऱ्याखालून सुटका केली.
ढिगाऱ्याखालच्या त्या 10 तासांचा अनुभव खालिद यांच्याच शब्दांत...
"मी गेल्या 12-15 वर्षांपासून या बिल्डिंगमध्ये राहतोय. घरी माझी बायको, 3 मुलं आणि मी. सुदैवाने महिन्याभरापूर्वी मी बायको आणि मुलांना गावी पाठवून दिलं. घरी मी एकटाच होतो. रोज रात्री मी अम्मीच्या घरी जेवून माझ्या घरी येऊन झोपायचो. त्या दिवशी रात्री मी 2 वाजता घरी आलो. माझं वायफाय चालत नव्हतं म्हणून रेकॉर्डेड वेब सीरिज पहात होतो. 3 वाजता झोपायच्या आधी मी प्यायला उठलो. बाटली उचलायला गेलो आणि माझ्या अंगावर ढिगारा कोसळला. काही कळलंच नाही. फक्त इतकंच आठवतंय की उडी मारून मी पलंगाच्या खाली जायचा प्रयत्न केला. पुढच्या तासाभरातलं मला काही आठवत नाही.
"माझ्या डोक्याजवळ 2 फुटांवर एक बीम येऊन कोसळला होता. माझे दोन्ही पाय ढिगाऱ्याखाली अडकले होते. तासभर सगळीकडे धूळ होती. श्वास कोंडत होता. असं वाटलं की आता माझे दोन्ही पाय कामातून गेले. अल्लाला म्हटलं की माझं आयुष्य उरलं असेल तर मला वाचव, पण जर माझ्या नशिबी मृत्यू असेल तर अशी मौत नको...लगेच जीव जाऊ दे. तासाभरातने धूळ-माती खाली बसली. मग जरा मी आजूबाजूला पहात काय झालंय याचा अंदाज घेतला.

"पायातून रक्त वाहात असल्यासारखं वाटत होतं. दोन्ही पाय अडकलेले होते. म्हणून हातांनी आजुबाजूला चाचपडून पाहिलं. माझा हात पुढपर्यंत जात होता. मग मी हळूहळू हाताने एकेक वीट करत पायांवरचा ढीग हटवायला सुरुवात केली. हळुहळू पाय मोकळे झाले. हाताने माझ्या आजूबाजूच्या गोष्टी काढून मी त्या पुढे ढकलून दिल्या. शेवटी मला दोन्ही पाय काढून घेता आले. पाय मोडला तर नाही ना, हे तपासलं. मग जरा बरं वाटलं.
"मग नंतर मी माझा मोबाईल शोधू लागलो. कारण मग मदतीसाठी कोणाला कॉल करता आला नसता. माझ्या बेडवर आख्खा स्लॅब कोसळून आला होता. बेड आणि बीम यांच्यामध्ये एक पोकळी तयार झाली होती आणि मी त्यात होतो. हाताने चाचपडत मी बेडवरचा मोबाईल शोधला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"मोबाईलच्या स्क्रीनला हात लागताच स्क्रीन उजळला. त्यावेळी इतका अंधार होता की मला माझा हातही दिसत नव्हता. पण त्या उजेडाने मला इतकं बरं वाटलं...माझ्या आशा जाग्या झाल्या. मोबाईल हातात घेऊन पाहिला. टचस्क्रीन व्यवस्थित चालत होता, स्क्रीन सुस्थितीत होता. मी टॉर्च ऑन करून आजूबाजूला पाहिलं...माझं सगळं घर 2 फुटांचं झालं होतं.
"मोबाईलचं नेटवर्क येतंय का हे तपासायचा प्रयत्न केला...मी मोबाईल रिपेअर करतो. ऑटोमॅटिक मोडला फोन 4Gच शोधत राहील हे मला माहिती होतं. म्हणून मी आधी 2G शोधलं...मग 3G...मग 4G…नेटवर्क येणार नाही, हे मला समजलं.
"तेवढ्यात लक्षात आलं की आपण पाणी प्यायला उठलो होतो. म्हणून पाण्याची बाटली शोधायला सुरुवात केली. ढिगाऱ्यात मला पाण्याची बाटली सहीसलामत सापडली...त्यात पूर्ण 1 लीटर पाणी होतं. 1 लीटरची ती पाण्याची बाटली मिळाल्यावर वाटलं, की आता कदाचित मी वाचू शकतो. श्वास घेता येत होता, जवळ पाणी होतं...मग मी घोटभर पाणी पिऊन जरा रिलॅक्स झालो.
"NDRF वाले कधी माझ्यापर्यंत पोहचणार...मी पहिल्या मजल्यावर होतो. ते आधी तिसरा मजला साफ करणार, मग दुसरा आणि मग माझ्यापर्यंत येणार...मला वाटलं की ते माझ्यापर्यंत पोहोचायला 2 दिवस लागतील. तोपर्यंत हे पाणी मला पुरवायचं होतं. तेव्हा मला पाण्याचं महत्त्वं समजलं.

"बाहेर पडायला कुठून जागा आहे का, याचा मी अंदाज घेत होतो. पण खूप ढिगारा होता. बाहेर पडायला जागा नव्हती, पण बरीच मोकळी हवा होती. श्वास कोंडत नव्हता. मी अगदी आरामात बसू शकत होतो. काही काळाने मला लोकांचे आवाज यायला लागले...
"माझ्या वरच्या मजल्यावर राहणारे बेकरीचा व्यवसाय करणारे 2 लोक माझ्याशी ओरडून बोलत होते. काही काळाने त्यांचा आवाज येणं बंद झालं. म्हणजे त्यांची सुटका करण्यात आली असावी...NDRFची टीम यायची होती तेव्हा. आलम भाईंच्या संपूर्ण कुटुंबाचे विव्हळण्याचे आवाज येत होते. ते फार क्लेशदायक होतं.
"आलमभाईंचा आवाज आला, 'कोई है...' मी म्हटलं 'के के मोबाईलवाला'...ते म्हणाले माझी नानी, माझी बहीण खूप वेदना सहन करतायत...दुआ करो...मी त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला.
"त्यानंतर कुत्र्याचा आवाज यायला लागला...म्हणजे NDRFची टीम पोहोचली असावी. सकाळी 9 किंवा 10 वाजता त्यांनी आलमभाईंच्या इथे खोदलं असावं. कारण मला उजेड दिसतोय, असं आलमभाईंनी ओरडायला सुरुवात केली. NDRFच्या टीमने त्यांना शांत केलं. मी आलमभाईंना म्हटलं, त्यांना सांगा एक केके मोबाईलवाला आत अडकलाय. त्यांना माझं लोकेशन सांगा. आलमभाईंना NDRF ने काढलं तेव्हा त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती, की त्यांनी NDRFला सांगितलं की नाही, मला माहीत नाही. बहुतेक नाही सांगितलं.
"माझ्या आशा मावळत होत्या...पण असंही वाटत होतं की जर त्यांना काढलंय तर कदाचित मलाही काढतील. मी आतून ओरडत होतो...काही तासांनी पाण्याचा एखादा घोट घेत होतो.

"काही वेळाने आवाज आला... 'शाहीद...शाहीद..' इरफानचा आवाज होता. तो माझ्या भावाला शोधत होता. माझा भाऊ दुसऱ्या मजल्यावर होता. पण तो बहुतेक बिल्डींग कोसळली तेव्हाच मरण पावला होता. सगळेजण त्याला शोधत होते. केके वाचला असेल, अशी त्यांना अपेक्षाही नसावी. त्याचा आवाज ऐकून माझ्या जीवात जीव आला.
"मी ओरडून सांगितलं 'मी खालिद बोलतोय...' मी त्यांना म्हटलं तुमच्या वायफायचा हॉटस्पॉट द्या मला...मी माझं लोकेशन शेअर करतो. त्याने हॉटस्पॉट सुरू केला, पण तो कनेक्ट झाला नाही. मग NDRFचे लोक माझ्याशी बोलू लागले. त्यांनी माझी माहिती घेतली.
"ते होते तिथपासून मी साधारण पाच फूट पुढे होतो. तिथून काढणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले आम्ही इथे भोक पाडलं तर तुम्ही इथे येऊ शकाल का? मी हो म्हटलं.
"त्यांनी तिथे खोदून आत टॉर्च मारला. माझा हात त्यांना दिसला. मला म्हणाले तुम्ही तिथेच शांत बसा. तेव्हा माझी खात्री पटली, की आता नक्की माझी सुटका होणार. मग मी माझ्याकडचं उरलेलं सगळं पाणी घटाघट पिऊन टाकलं.

"त्यानंतर त्यांना जवळपास अर्धा - पाऊण तास लागला. खोदल्यानंतर माझ्या अंगावर गोष्टी कोसळू नयेत म्हणून त्यांनी बांबू लावले. मग मला सरपटत तिथे यायला सांगितलं. मी रांगात तिथे जायला लागलो, पण अडकत होतो. मग मी खोलीतली एक लादी उखडून काढली...मग थोडी जागा झाली. तिथून मग मी जिथे त्यांनी उघडी जागा केली होती तिथे पोहोचलो आणि त्यांनी मला बाहेर काढलं.
"मला हे माहित नव्हतं की फक्त अर्धी बिल्डिंग पडली. मला वाटत होतं की आख्खी बिल्डींग पडलीय. माझं सगळं कुटुंब - भाऊ, बहीण, अम्मी - अब्बा सगळे याच इमारतीत होते. बाहेर काढल्यानंतर समजलं की अर्धी इमारत पडली.
"माझा भाऊ दुसऱ्या मजल्यावर होता. भाऊ, वहिनी आणि पुतण्या. वहिनी पळत तिसऱ्या मजल्यावर अम्मी - अब्बांना सावध करायला गेली होती. भावाचा मृतदेह मिळाला तेव्हा त्याने टी-शर्ट घातलेला होता. आधी तो उघडा होता. त्याची हीच चूक झाली बहुतेक. टी-शर्ट घालायच्या नादात तो कदाचित मुलापर्यंत पोहोचलाच नाही. सगळा ढिगारा त्यांच्या अंगावर आला. त्याचा मृतदेह ढिगाऱ्याखालून काढायला NDRF ला 3 तास लागले...इतका तो दबला होता. बाजूलाच त्याच्या मुलाचाही मृतदेह सापडला. तो तर झोपलेला होता."
"मोबाईलचं नेटवर्क आलं नाही... कॉल करता येत नव्हता. तेव्हा वाटायला लागलं होतं की मी वाचतो की नाही...म्हणून मी माझ्या बायकोसाठी शेवटचा व्हिडिओ करून ठेवला. विचारला केला हा मोबाईल मी माझ्या खिशात ठेवून देईन...म्हणजे जरी मेलो तरी हा फोन आणि व्हिडिओ माझी बायको आणि माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचेल…
"माझं सगळं सामान गेलं...आख्खी बिल्डिंगच गेली. मला स्वतःचा जीव वाचल्याचा आनंद नाही. इतके लोक मारले गेलेयत...असं वाटलं की हे जे सामान आहे, आपण जे आयुष्यात उभं करतो त्या गोष्टी...एका आयुष्यासमोर पूर्ण बिल्डिंगची काही किंमत नाही. ते सामान पहायलाही मी गेलो नाही...गोष्टी पुन्हा उभ्या राहतील. आपण जिवंत राहिलो तर ते सगळं पुन्हा करता येईल...
"पैसा, दौलत, बिल्डींग, प्रॉपर्टी याला काहीच मोल नाही हे लक्षात आलं...आपली लोकं महत्त्वाची. माझे जे लोक मारले गेले, त्यांच्या विचारानेच मी सुन्न होतो...आयुष्यापुढे इतर काहीच महत्त्वाचं नाही.
"एक 'जान' वाचवणं हे माणुसकी वाचवण्यासारखं आहे...ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी जी NDRF टीम काम करत होती, ती कोणासाठी काम करत होती? ते ना मला ओळखत होते, ना मी त्यांना ओळखत होतो. त्यांनी मला का वाचवलं? माणुसकी म्हणून...माणसाने माणसाच्या कामी येणं, हेच शेवटी एकमेव सत्य आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









