सहावी मुलगी होणार या शंकेने नवऱ्याचा बायकोचे पोट फाडण्याचा प्रयत्न

हल्ला, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, CHITRANJAN SINGH/BBC

फोटो कॅप्शन, अनिता यांच्यावर हल्ला करण्यात आला.
    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

पत्नीच्या पोटातला गर्भ मुलगा आहे की मुलगी हे पाहण्यासाठी नवऱ्याने तिचं पोट फाडण्याचा अमानुष प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातल्या बदायू जिल्ह्यात नवऱ्याने बायकोवर असा हल्ला केला.

जखमी अवस्थेतील या महिलेवर दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोर पतीला अटक केली आहे.

बदायूंचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी या घटनेसंदर्भात बीबीसीला माहिती दिली. ते म्हणाले, "जखमी महिलेच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार भारतीय दंड संहिता कलम 307 अंतर्गत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. नक्की काय घडलं यासंदर्भात माहिती घेऊन तपास सुरू आहे. त्यानुसार पुढची कार्यवाही करण्यात येईल."

बदायूं जिल्ह्यातील सिव्हिल लाईन्स थाना क्षेत्रातील नेकपूर मोहल्ला इथं राहणाऱ्या पन्नालाल यांनी शेतात कापणीसाठी वापरल्या जाणाऱ्या हत्याराने बायकोच्या पोटावर वार केल्याचा आरोप आहे.

"त्याला हे पाहायचं होतं की पोटात वाढणारा गर्भ मुलगा आहे की मुलगी? पन्नालाल आणि त्याच्या पत्नीला पाच अपत्यं असून, पाचही मुलीच आहेत. आणखी एक मुलगी नको असं पन्नालालला वाटत होतं," असं पीडितेची बहीण रेखा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

हल्ला, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, CHITRANJAN SINGH/BBC

फोटो कॅप्शन, पन्नालाल आरोपी आहेत.

या विषयावर पन्नालाल आणि बायकोचं भांडण होत असे. अनिताला तो मारहाणही करत असे. शनिवारीही पन्नालालने तिला बेदम मारलं आणि नंतर धारदार हत्याराने तिच्या पोटावर वार केले.

अनिता यांचे बंधू राजीव यांच्यानुसार, बरेलीतील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रविवारी अनिता यांना दिल्ली येथे आणण्यात आलं. कारण त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजीव त्यांच्याबरोबर आहेत. अनिता यांच्या पोटातील गर्भ मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्यासाठीच पन्नालालने हा हल्ला केला.

पन्नालालने केला इन्कार

अटकेत जात असताना पन्नालालने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "अनिता आणि माझं भांडण झालं. रागाच्या भरात धारदार चाकू मारला. मात्र अनिताच्या पोटात मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्यासाठी असं केलं नाही, जसा आरोप केला जात आहे".

पन्नालाल यांनी सांगितलं की मला पाच मुली आहेत. एक मुलगा जगू शकला नाही. मुलं ही देवाचा आशिर्वाद असतो. मुलगा-मुलगी जे काही होईल ते होईल. माझी बायको माझ्याशी सतत भांडत असे. शनिवारीही आमचं भांडण झालं. रागात मी चाकू फेकला. त्यामध्ये ती इतकी गंभीर जखमी होईल याची मला कल्पना नव्हती.

हल्ला, उत्तर प्रदेश

फोटो स्रोत, CHITRANJAN SINGH/BBC

फोटो कॅप्शन, अनिता यांना बरेलीहून दिल्लीला आणण्यात आलं.

पन्नालालच्या शेजाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की या सगळ्यामागे दुसरंच कारण आहे. "एका पंडितांनी अशी भविष्यवाणी केली होती की बदायूं जिल्ह्यात एका माणसाच्या घरी सहावी मुलगी जन्माला येईल. हे ऐकून पन्नालाल घाबरला. त्याने बायकोला गर्भपात करायला सांगितलं. बायकोने गर्भपाताला नाही म्हटलं, यावरूनच त्यांचं भांडण झालं आणि हा प्रकार घडला", असं त्यांनी सांगितलं.

पोलिसांच्या मते पन्नालालच्या मुली आणि नातेवाईकांच्या मते अनितावर हल्ला होण्याचं कारण हे नाही जे मीडियाने समोर आणलं आहे.

वरिष्ठ अधीक्षक संकल्प शर्मा म्हणाले, "पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली. आरोपी पन्नालालच्या नातेवाईकांशीही बोलले. आरोपी पन्नालालच्या मुली मोठ्या आहेत, त्यांनाही विचारलं. पन्नालाल आणि पत्नी यांच्यात भांडण झालं होतं. मात्र शनिवारी असं काही घडलं नव्हतं. तपास सुरू आहे, लवकरच खरं काय ते स्पष्ट होईल".

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)