हरसिमरत कौर : 'कृषी विधेयकं संख्याबळाच्या जोरावर लादली जात असल्याचं पाहून राजीनामा'

हरसिमरत कौर, कृषी विधेयकं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हरसिमरत कौर

कृषी सुधारणांशी संबंधित दोन विधेयकं रविवारी (20 सप्टेंबर) राज्यसभेत मंजूर झाली. आवाजी मतदानानं ही विधेयकं मंजूर करण्यात आली. यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला.

या गोंधळातच शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक 2020 आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक 2020 ही विधेयकं मंजूर करण्यात आली.

लोकसभेत हे विधेयक आधीच मंजूर झालं आहे. लोकसभेत या विधेयकावरील चर्चेदरम्यान हरसिमरत कौर यांनी विधेयकाबद्दल नाराजी व्यक्त केली.

या विधेयकामुळेच शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिम्रत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

आपल्या राजीनाम्याबद्दल हरसिमरत यांनी ट्वीट करून म्हटलं, "शेतकऱ्यांच्या विरोधातल्या विधेयकाच्या विरोधात मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. शेतकऱ्यांची मुलगी आणि बहीण म्हणून त्यांच्यासोबत असल्याचा मला अभिमान आहे."

या पार्श्वभूमीवर बीबीसीनं हरसिमरत कौर यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न - तुमचा राजीनामा 'टू लिटिल, टू लेट' आहे, असं पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे, काय सांगाल?

उत्तर - मी राजीनामा दिला आहे. आता तुम्ही काहीही करा. तुमचे खासदार राजीनामे देणार आहेत काय? मी काहीतरी करून दाखवलं आहे. कॅप्टन साहेब, तुम्ही खोटी आश्वासनं दिल्याशिवाय काय केलंय?

प्रश्न - तुम्ही राजीनामा का दिला?

उत्तर - मी पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी राजीनामा दिला आहे. शेतकऱ्यांना ज्या शंका आहेत, त्या दूर केल्या जाव्यात याविषयी मी गेल्या अडीच महिन्यांपासून प्रयत्न करत होते. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांच्या मनात या अध्यादेशांविषयी शंका होत्या. त्यामुळे असा कायदा आणावा, ज्यामुळे या शंका दूर होतील, असं माझं म्हणणं होतं.

हरसिम्रत कौर, कृषी विधेयकं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हरसिम्रत कौर

पण, अनेक प्रयत्न करूनही मी शेतकऱ्यांना समजावून सांगू शकले नाही आणि मला वाटलं की, संख्याबळाच्या जोरावर असे कायदे शेतकऱ्यांवर लादले जात, तेव्हा मी अशा सरकारचा भाग बनू शकत नाही, असा निर्णय मी घेतला. या कायद्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांचं भविष्य खराब होणार आहे.

प्रश्न - यापूर्वी तुम्ही आणि तुमच्या पक्षानं या विधेयकांना पाठिंबा दिला होता. पण, आता यू-टर्न घ्यायचं कारण काय?

उत्तर - हा यू-टर्न नाहीये. मी लोक आणि सरकारमध्ये एक दुआ म्हणून काम करते. लोकांच्या शंका सरकारपर्यंत पोहोचवणं माझं काम आहे. यासाठी खूप प्रयत्न केले, शेतकऱ्यांचं म्हणणं सरकारसमोर मांडलं.

प्रश्न - ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही राजीनामा दिला आहे, त्यांचं असंही म्हणणं आहे की, तुम्ही भाजपबरोबरचे संबंध संपुष्टात आणा, एनडीएमधून बाहेर पडा. तुम्ही असं करणार का?

उत्तर - मी पक्षाची एक सामान्य कार्यकर्ती आहे. यापद्धतीचे निर्णय पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व आणि कोअर कमिटी करत असते. पण, तीन दशकांपूर्वी प्रकाश सिंह बादल आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यामध्ये ही आघाडी झाली होती, तेव्हा ती शेजारील देशाच्या वाईट हेतूंना आळा घालून पंजाबच्या हितासाठी झाली होती. हीच बाब आम्ही आजही पाळत आलो आहोत. आजही शेजारील शत्रू तशाच कारवाया करत आहे.

त्यामुळे पंजाबमध्ये शांतता नांदणं खूप गरजेचं आहे. पण, त्याहीपेक्षा अधिक पंजाबमधील शेती टिकणं हे आहे.

हरसिम्रत कौर, कृषी विधेयकं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हरसिम्रत कौर

प्रश्न - जसं तुम्ही म्हणताय की बंधुत्वाची गरज आजही आहे, तर मग भाजपसोबतची आघाडी आजही गरजेची आहे का?

उत्तर - पंजाबमध्ये शांतता नांदावी यासाठी ही आघाडी तयार करण्यात आली होती. पण, जेव्हा पंजाबमधील शेतकऱ्यांशी संबंधित विषय येईल तेव्हा अकाली दलाला त्याविषयी विचार करण्याची गरज पडणार नाही. अकाली दलासाठी तो निर्णय स्पष्ट असेल. पण, हा निर्णय घेण्याचं काम माझं नाही, पक्षाच्या नेतृत्वानं निर्णय घेणं अपेक्षित आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट पाहू.

प्रश्न - राज्यातील शेतकरी सध्या रागात आहेत. रस्त्यावर उतरले आहेत आणि तुमच्या घराबाहेरही निदर्शनं करत आहेत. तुम्ही या निदर्शनांमध्ये सहभागी होणार का?

उत्तर - नक्कीच. मी राजीनामा कशासाठी दिला आहे? याआधी सरकारमध्ये राहून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणं माझं कर्तव्य होतं, पण त्यात मी अयशस्वी झाले आहे तर आता शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून या लढाईत सहभागी होईन.

हरसिम्रत कौर, कृषी विधेयकं

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, हरसिम्रत कौर

प्रश्न - तुमच्या पक्षाचे भाजपसोबत जुने संबंध आहेत. हे विधेयक काही कालांतरानं मांडावं अशी तुमची मागणी होती, ती स्वीकारण्यात का आली नाही?

उत्तर - ही गोष्ट मलाही समजली नाही. ज्या अधिकाऱ्यांनी बंद खोलीत हे कायदे बनवले आहेत, त्यांना जमिनीवरील गोष्टी माहिती नाहीत. तसंच विरोध करणाऱ्यांमधील अनेक जण असेच आहेत. त्यांच्यातही विरोधाचं कारण सांगण्यात कमी राहिली. जमीन स्तरावर कनेक्ट नसल्यामुळे हे असं झालं.

प्रश्न - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली जात आहे आणि ही विधेयकं शेतकऱ्यांच्या भल्याची आहेत, ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे का?

उत्तर - मी राजीनामा देणार होते तेव्हा मला सांगण्यात आलं की, शेतकरी काही दिवसांमध्ये शांत होतील. हे तुम्ही अडीच महिन्यांपासून म्हणत आहात, असं मी त्यांना म्हटलं. ही आग संपूर्ण देशात पसरेल, आपल्याला अशा कायद्याची गरज काय? हा तुमचा गैरसमज आहे. मी राजीनाम्याच्या एक दिवस आधीपर्यंत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

एखाद्याच्या नादी लागून शेतकरी विरोध करत आहे, असं जरी समजलं तरी आपण त्यांना शांत नक्कीच करू शकतो.त्यांना कुणी चुकीचं सांगत असेल तर बरोबर काय ते तुम्ही सांगा. सरकार चालवण्याची पद्धत अशी नसते. ज्या लोकांनी आम्हाला निवडून इथं पाठवलं त्यांच्यासाठी आम्ही काय करत आहे?

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)