राम मंदिर भूमिपूजन: अयोध्या राम मंदिर निर्माण ट्रस्टवर कुणाचा किती विश्वास?

राम मंदिर

फोटो स्रोत, Hindustan Times

    • Author, फैसल मोहम्मद अली
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्राचे महामंत्री चंपत राय यांनी सोमवारी (3 ऑगस्ट) दुपारी माहिती दिली की, भूमिपूजनचा कार्यक्रम आणखी भव्य बनवायचा होता. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे पाच ऑगस्टच्या कार्यक्रमात भारतातील 36 मुख्य परंपरांचे 135 संत-महात्मा आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींसह सुमारे पावणे दोनशे लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे.

बाबरी मशि‍दीचे पक्षकार इकबाल अन्सारी आणि अयोध्याचे सुपुत्र असलेले पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण दिल्याचे चंपत राय यांनी सांगितलं. नेपाळच्या जानकी मंदिरातूनही काही लोक भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला येतील. कारण सीतेमुळे जनकपूरचं अयोध्येशी जुनं नातं आहे, असं ते म्हणाले होते.

दुसरीकडे, राम मंदिर आंदोलनाशी जोडलेल्या अनेकांना भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नाही. कोरोनामुळे कमीत कमी लोकांना सहभागी करण्यावर भर दिला गेलाय, हे निश्चित. मात्र, तरीही निमंत्रितांच्या यादीवरून बऱ्याच उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यात.

अयोध्या

फोटो स्रोत, The India Today Group

राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रमुख पाहुणे असतील.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची सोमवारी घोषणा झाली, तेव्हा चंपत राय यांच्यासह अनेकजण व्यासपीठावर दिसले. मात्र, तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास व्यासपीठावर उपस्थित नव्हते.

महंत नृत्यूगोपाल दास हे अयोध्येतील सर्वांत मोठ्या आखाड्यांपैकी एक असलेल्या मनी रामदासजी छावणीचे पीठाधीश्वर आहेत. तसंच, राम मंदिर आंदोलनाशी ते अनेक वर्षांपासून जोडलेले आहेत. राम जन्मभूमि ट्रस्टचे ते प्रमुखही होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ट्रस्टच्या कामांबाबत ते फारच कमी बोलताना दिसतात.

नृत्यगोपाल दास हे विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहेत. मात्र, विश्व हिंदू परिषद किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता किंवा नेता म्हणून त्यांनी कधी काम केले नाही.

सरकारने स्थापन केलेल्या श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी बीबीसीशी बोलताना नृत्यगोपाल दास यांच्याबद्दलच्या चर्चांबद्दल म्हटलं की, "माध्यमं वेगवेगळ्या बातम्या तयार करतात. नृत्यगोपाल दास त्यांच्या आश्रमात होते. कारण त्यांना चालताना त्रास होतो."

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, FB/Janki Mandir

अयोध्या आणि हिंदुत्वावर अनेक पुस्तकं लिहिणारे धीरेंद्र झा म्हणतात, "राम मंदिर आंदोलनादरम्यानचे डर्टी जॉब आता संपलेत. आता सर्व गोष्टी कायद्याने होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सर्व आपल्या ताब्यात घेत आहे. चंपत राय हा त्यांचाच चेहरा आहे."

विश्व हिंदू परिषद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच एक शाखा आहे. विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष असलेले चंपत राय हे मंदिर निर्माण ट्रस्टचे महामंत्री बनले आहेत.

9 नोव्हेंबर 2019 रोजी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयात म्हटलं होतं की, बाबरी मशि‍दीच्या वादग्रस्त जमिनीतील 2.77 एकर जमीन श्रीराम जन्मभूमीला द्यावी, मशीद बनवण्यासाठी मुस्लिमांना वेगळी पाच एकर जमीन द्यावी आणि राम मंदिर बनवण्यासाठी तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 फेब्रुवारी 2020 रोजी लोकसभा सभागृहातच श्रीराम जन्मभूमिसाठीच्या ट्रस्टची घोषणा केली होती.

तीन दावेदार

ट्रस्ट स्थापनेचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. या ट्रस्टमध्ये सरकारी प्रतिनिधींसह एकूण 15 सदस्य आहेत.

मंदिर उभारणी आणि देखरेख कोण करेल, याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापासूनच राम जन्मभूमी ट्रस्ट, रामाल्या ट्रस्ट आणि मंदिर निर्माण ट्रस्ट यांच्याकडून आपापले दावे करण्यात येत होते.

राम जन्मभूमि ट्रस्ट विश्व हिंदू परिषदेशी पर्यायानं आरएसएसशी संबंधित आहे. मंदिर उभारणीसाठी कारसेवकपुरममध्ये 1990 च्या दशकात जी कार्यशाळा चालायची, ती विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गतच होती.

राम मंदिर

फोटो स्रोत, Hidustan times

रामालल्ला ट्रस्टची स्थापना माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या पुढाकाराने झाली होती आणि त्यात द्वारकापीठ शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांच्यासह इतर साधू होते.

मंदिर निर्माण ट्रस्टमधील कुणालाच सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टमध्ये सहभागी करून घेतलं गेलं नाहीय. केवळ आरएसएसशी संबंधितच नव्हे, तर आम्हालाही मंदिराशी संबंधित सर्व संघटनांमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व द्यावं, अशी मंदिर निर्माण ट्रस्टची मागणी आहे.

राम जन्मभूमीसाठी दशकांपासून आंदोलन करणाऱ्या निर्मोही आखाडा आणि हिंदू महासभा तर प्रतिनिधित्वासाठी आपले वेगळे दावे करत आहेत.

निर्मोही आखाड्याचे दिनेंद्र दास यांना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलंय. मात्र, निर्मोही आखाड्याचे प्रवक्ते कार्तिक चोप्रा यांनी बीबीसीचे प्रतिनिधी सलमान रावी यांच्याशी बोलताना सांगितलं की, "आखाड्याचे प्रतिनिधी म्हणून ज्यांना नेमलं आहे, ती नेमणूक कुठल्याची चर्चेविना झालीय आणि ते संघटनेचे प्रतिनिधीही नाहीत."

भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला केंद्र आणि राज्य सरकारने आरएसएस, व्हीएचपी, भाजप आणि उद्योगपतींपुरतं मर्यादित केलं, असा आरोप कार्तिक चोप्रा यांचा आहे.

शिवसेनेची भूमिका काय?

पीटीआयच्या वृत्तानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूमीपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अयोध्येत जाणार नाहीत.

गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरे बऱ्याचदा अयोध्येत जाऊन आले आहेत. राम मंदिरासाठीचं आंदोलन कुण्या एका राजकीय पक्षापुरते मर्यादित नव्हते आणि त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनाही कार्यक्रमाला बोलवायला हवं होतं, अशी शिवसेनेची भूमिका आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, The India Today Group

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागणी केली होती की, राम मंदिरासाठीच्या ट्रस्टमध्ये शिवसेनेच्या प्रतिनिधीचा समावेश असावा.

"मशीद पाडल्यानंतर 1992 साली राम मंदिर आंदोलनाचे हिरो समजले गेलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी 'आपल्या आयुष्यातील सर्वात दु:खद क्षण' असल्याचं म्हटलं होतं. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मशीद पाडण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली होती," याची आठवण प्रताप सरनाईक यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रातून करून दिली होती.

बाबरी मशीद पाडण्यासाठी सहभाग घेतला आणि रक्तही सांडलं. मात्र, राजकीय फायदा घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, असं शिवसेनेनं 'सामना'तील अग्रलेखात म्हटलं आहे.

याच अग्रलेखात असाही आरोप करण्यात आलाय की, मंदिरासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टमधील सदस्य एकतर नरेंद्र मोदींच्या जवळचे आहेत किंवा आरएसएसशी संबंधित आहेत आणि या सर्वाचा भाजप 2024 सालच्या निवडणुकीत फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

राम मंदिर आंदोलनातील मुख्य नेते लालकृष्ण अडवाणी आणि भाजपचे माजी अध्यक्ष मुरली मनोहर जोशी हेही भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत. तसंच, या आंदोलनातील प्रमुख नेत्या राहिलेल्या उमा भारती यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, त्या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणार नाहीत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

शरयू नदीच्या किनारी उपस्थित राहून उमा भारती पूजा करणार आहेत. त्यांनी तसं ट्वीट केलं आहे.

दलित व्यक्तीकडून भूमीपूजन?

काही दिवसांपूर्वी ट्विटरवर याबाबत चर्चा सरू होती की, मंदिराची पहिली वीट दलित व्यक्तीच्या हस्ते ठेवावी. या चर्चेला पार्श्वभूमी अशी होती की, 1989 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारने अयोध्येत बिहारमधील दलित कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते भूमीपूजन केलं होतं.

कामेश्वर चौपाल यांना ट्रस्टमध्ये सदस्यता देण्यात आली आहे. मंदिराच्या खाली 200 फूट खोल टाइम कॅप्सुल ठेवलं जाईल, जेणेकरून लोकांना या पवित्र स्थानाची खरी माहिती मिळेल, अशी बातमी चौपाल यांनी दिली होती. त्यामुळे ते मध्यंतरी चर्चेत आले होते.

मात्र, या दाव्याच्या दुसर्‍याच दिवशी चंपत राय यांनी स्पष्ट केलं की, कुठल्याही प्रकारची टाइम कॅप्सुल ठेवली जाणार नाही. या बातम्या खोट्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

राम जन्मभूमी ट्रस्टकडून जे सांगितलं जाईल, तेच खरं मानावं, असंही यावेळी चंपत राय यांनी म्हटलं होतं.

"साधू बनल्यानंतर व्यक्ती केवळ ईश्वराचा होऊन जाते. त्यामुळे इतर कुठल्या गोष्टींसाठी उपस्थित राहणं योग्य नाही," असं चंपत राय हे दलित व्यक्तीच्या हस्ते भूमीपूनजनाच्या मुद्द्यावर सोमवारी बोलले.

'माझ्याकडून कोणताच सल्ला घेतला नाही'

राम मंदिर भूमीपूजन पाच ऑगस्टला असून, दुपारी 12 वाजून 15 मिनिट आणि 15 सेकंद या वेळेचा मुहूर्त आहे. केवळ 32 सेकंदांपर्यंतच मुहूर्त आहे.

वाराणसीसह विविध ठिकाणांहून या कार्यक्रमासाठी पुजारी बोलावण्यात आले आहेत. कुठल्या देव-देवतांची पूजा होईल, हे त्यांनीच ठरवले आहे.

तात्पुरत्या स्वरूपात बनलेल्या राम मंदिरात 30 वर्षे पुजारी म्हणून काम केलेले सत्येंद्र दास म्हणतात, "भूमीपूजनावेळी होणार्‍या पूजेसाठी माझ्याशी कोणतीच चर्चा केली गेली नाहीय. भव्य राम मंदिर बनल्यानंतर मी राम जन्मभूमीच्या ठिकाणी पुजारी असेन की नसेन, हे श्रीरामालाच माहित."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)