कोरोना महाराष्ट्र : 'मोलकरणींना घरात बोलवायचं कसं, जर सरकारच लॉकडाऊन कडक करतंय?’

मास्क आणि ग्लोव्ह्स लावून काम करताना
फोटो कॅप्शन, शोभा कांबळे
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

एकीकडे महाराष्ट्र सरकार पुनश्च हरीओम म्हणत 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत कामकाज सुरू करत आहेत. तर दुसरीकडे राज्यातला लॉकडॉऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.

शिवाय, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथसारख्या शहरांमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आलाय. यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमात अडकल्या आहेत राज्यातल्या हजारो मोलकरणी.

त्यांना घरकामासाठी इमारतीमध्ये प्रवेश द्या अशा सूचना सहकार खात्यानं दिल्या आहेत.

26 जून 2020 रोजी सरकारने सहकार विभागाला एक पत्रक पाठवून स्पष्ट केलंय की, कोव्हिड-19च्या पार्श्वभूमीवर लॉकडॉऊनमध्ये सरकारकडून घरकामासाठी येणाऱ्या महिलांना इमारतीत प्रवेशापासून प्रतिबंधित केलेले नाही, "काही गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी संस्थेच्या स्तरावर शासनाच्या निर्देशाच्या विपरित नियमावली तयार करत असल्याचं शासनाच्या निदर्शनास आलं आहे. तरी या सूचनांच्या विपरीत गृहनिर्माण संस्थांनी नियम तयार करू नयेत," अशी सूचना गृहनिर्माण संस्थांना देण्यात आली आहे.

पण यामुळे हाऊसिंग सोसायट्यांच्या कमिट्या संभ्रमात आहेत. एखाद्या भागात रुग्णसंख्या वाढत असली आणि बाहेरून येणाऱ्या मोलकरणींना परवानगी दिली तर रहिवासी आणि मोलकरीण अशा दोघांचं आरोग्य धोक्यात येईल, असं काही सोसायट्यांचं म्हणणं आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Alamy

लाईन

दुसऱ्या बाजूला गेल्या तीन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने मोलकरणींच्या घरातली आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. त्यामुळे राज्यातल्या या 25-30 हजार मोलकरणी आता आपल्या समस्या मांडणारी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोस्टाद्वारे या आठवड्यात पाठवणार आहेत.

मोलकरणींचे प्रश्न

साधारण मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून लोकांनी मोलकरणींना कामावर येऊ नका, असा निरोप दिला. याला आता तीन महिने उलटले आणि सरकारनेही आता बऱ्यापैकी दुकानं-कार्यालयं सुरू करण्याला परवानगी दिली आहे. मात्र मोलकरणींच्या बाबतीत काही निर्णय आले, तर काही प्रमाणात संभ्रम कायम आहे. त्यातच त्यांच्या घरातली आर्थिक आणि मानसिक परिस्थिती आता बिकट होऊ लागली आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोलकरणींच्या रोजगारावर गदा आली आहे.

मोलकरणींना घरकामासाठी जाता येत नसल्याची तीन प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे, स्वत: घर मालक त्यांना कामावर बोलवत नाहीत. दुसरं म्हणजे, हाऊसिंग सोसायट्या इमारतीमध्ये मोलकरणींना प्रवेश देत नाहीत. तिसरं कारण, म्हणजे मोलकरीण कंटेनमेंट झोनमध्ये वास्तव्यास असेल तर तिला तिथून बाहेर पडण्याची परवानगी नाही.

यापैकी सर्वाधिक आक्षेप घेतला जातोय हा दुसऱ्या कारणावर, म्हणजेच घरमालकांची परवानगी असूनही एखाद्या सोसायटीच्या इमारतीत प्रवेश नाकारणं. हा नियम सरकारच्या सूचनांना विसंगत आहे.

मोलकरणींचं उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई शहर आणि उपनगरात हजारो हाऊसिंग सोसायट्या आहेत. यापैकी 70 टक्के हाऊसिंग सोसायट्या मोलकरणींना इमारतीमध्ये प्रवेश देत नसल्याचा दावा सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेनं केलाय. या संघटनेच्या अंतर्गत 25 हजार मोलकरणी या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोस्टाद्वारे पत्र पाठवणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुभाष मराठे यांनी दिलीय.

"मोलकरणींच्या घरातली आर्थिक, मानसिक परिस्थिती ढासळत चालली आहे. तीन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने घर कसं चालवायचं हा प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विचारतोय. नियमात नसूनही हाऊसिंग सोसायटी मनमानी कारभार करत आहेत. त्याविरोधात कारवाई होणं गरजेचं आहे," सुभाष मराठे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

d

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये पूर्णपणे लॉकडॉऊन जाहीर केलेला नाही. त्यामुळे तिथे 100 टक्के सर्व काही ठप्प नाहीय. आता सलूनही उघडायला परनवागी दिलीय. तसंच सर्वठिकाणी बाजारपेठा सुरू आहेत.

"लोक बाजारात जात आहेत. अत्यावश्यक सेवेचे कर्मचारीही बाहेर पडत आहेत. मग मोलकरणींना परवानगी का दिली जात नाही हा प्रश्न आहे. नोकरदार पती-पत्नी घराबाहेर कामासाठी जातात. त्यावेळी त्यांचं घर मोलकरीणच सांभाळते. तेव्हा राज्याच्या, देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये मोलकरणींचा वाटाही मोठा आहे. त्यांना अशी अस्पृश्यतेची वागणूक का दिली जातेय? " असा प्रश्न मराठे यांनी उपस्थित केलाय.

'कोरोनाची रुग्णसंख्या वाढवायची आहे का?'

मोलकरणींना परवानगी देण्याच्या सूचना राज्य सरकारने सोसायटी कमिट्यांना दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात सोसायट्यांमध्ये काय परिस्थिती आहे, हेदेखील पाहण्याची गरज आहे.

अनेक सोसायट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत तसंच काही ठिकाणी परिसरात रुग्णसंख्या वाढते आहे. ठाण्यातल्या एका सोसायटीच्या सचिवांशी आम्ही याविषयी बोललो, जे स्वतः कोव्हिड-19चे डॉक्टरही आहेत.

"सरकारकडून स्पष्ट सूचना येत नाहीत. मोलकरणींना इमारतीत परवानगी न देण्याबाबत माझा वैयक्तिक काय फायदा असू शकतो? आमच्या सोसायटीमध्ये 4-5 हजार फ्लॅट्स आहेत. जवळपास 20 हजार रहिवासी या ठिकाणी राहतात. तेव्हा इथे संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

मोलकरीण

फोटो स्रोत, Getty Images

"रोज नवीन रुग्ण इथे आढळतो. आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय, 30 जण कोरोनाचे रुग्ण आहेत. 30 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत, 250 कुटुंबं क्वारंटाईनमध्ये राहत आहेत. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये बाहेरून आलेल्या मोलकरणींना कशी परवानगी द्यायची?" असं डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलाताना सांगितलं.

मोलकरणींना बोलावलं तर केवळ रहिवाशांनाच धोका नाही, तर मोलकरणींनाही त्याचा धोका आहे.

राज्य सरकार एका बाजूला ठाण्यासारखं संपूर्ण शहर पूर्ण लॉकडाऊन करतं. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याचं स्पष्टच आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मोलकरणींना प्रवेश द्या, या सरकारच्या सूचनेबाबत संभ्रम निर्माण होतो.

"आम्ही याबाबत आता सर्वेक्षण करायचं ठरवलं आहे. रहिवाशांचे मत विचारात घेतलं जाईल. पण काळजी घ्यावी लागणार आहे. तेव्हा सरकारने एक इमारत आणि कॉम्प्लेक्स, याबाबत वेगळे नियम करावेत," असंही डॉ. गायकवाड यांनी सांगितलं.

'मोलकरणींना कामावर बोलवायचं धाडस होत नाही'

"घर कामासाठी मदतीची अत्यंत गरज आहे. माझ्या कुटुंबात 5 सदस्य आहेत. घरकाम करण्यातच संपूर्ण दिवस जातो. अशी परिस्थिती असली तरी मोलकरणींना कामावर बोलवायचं धाडस सध्यातरी होत नाहीय," असं दादरमध्ये राहणाऱ्या सीमा पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

लोकांच्या मनात कोरोनाची भीती कायम आहे. मोलकरणींना हाऊसिंग सोसायटीच प्रवेश देत नाहीत, हे एक कारण असलं, तरी घर मालकांचीही अजून मोलकरणींना घरी येऊ देण्याची तयारी नाही.

"मोलकरीण दाटीवाटीच्या भागात राहणारी असल्याने तिला घरी बोलवायला अजूनही भीती वाटते. आमचं नऊ जणांचं कुटुंबं, त्यामुळे घर कामाला मदतही होत आहे. सगळे मिळून काम करतोय. आता घरात काम करण्याची सवय प्रत्येकाला होतेय. त्यामुळे कोरोनाचा धोका पत्करून मोलकरणींना बोलवावं, असं वाटत नाही," असं ठाण्यात राहणाऱ्या अमृता संभुसे सांगतात.

जेव्हा खासगी कार्यालयं सुरू होतील तेव्हा घरातील महिला, पुरुष दोघांनाही कामावर रुजू व्हावं लागणार आहे. त्यावेळी घरकाम करण्यासाठी मोलकरीण, मुलांना सांभाळणाऱ्या महिला अशा सर्वांची गरज भासेल. "जेव्हा कामावर जाण्याची वेळ येईल, तेव्हा नक्कीच आम्ही मोलकरणीला बोलवू. तोपर्यंत एका 'न्यू नॉर्मल'ची सवय झाली असेल," अमृता म्हणाल्या.

मोलकरणींचे 'न्यू नॉर्मल'

मोलकरणींना इमारतीत प्रवेश न देणाऱ्या हाऊसिंग सोसायट्यांवर नियमानुसार कारवाई होऊ शकते. पण मुळात घर मालकांचीच परवानगी नसल्याने मोलकरणी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

मुंबई आणि उपनगरांमध्ये 20-25 टक्के सोसायट्यांमध्ये मोलकरणींना प्रवेश दिला जातोय. त्यातही अगदी मोजक्या ठिकाणी घरमालकांनी मोलकरणींना कामावर बोलवायला सुरुवात केलीय.

चेंबूर येथे राहणाऱ्या शोभा कांबळे या त्यापैकीच एक आहे. शोभा चेंबूरला अन्नपूर्णा सोसायटीजवळ राहतात. गेल्या 25 वर्षांपासून त्या मोलकरीण म्हणून काम करत आहेत. चेंबूरच्याच एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी कामाला जाण्यास सुरुवात केलीय. 1 जुलैपासून त्यांना घर मालकांनी कामावर बोलवलं.

मास्क आणि ग्लोव्ह्स लावून काम करताना

शोभा कांबळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, "मी या घरात गेल्या 16 वर्षांपासून काम करते आहे. घरातली आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली होती. या घरातही आजारी रुग्ण असल्याने त्यांनी मला कामावर बोलवलं. मी मास्क आणि हँड ग्लोव्ह्ज वापरते. इमारतीखाली सॅनिटायजर ठेवलेलं असतं. ते हाताला लावूनच आतमध्ये प्रवेश करते. धुणं-भांडी करते तसंच स्वयंपाकाची सगळी तयारी करते."

चार घरची कामं करणारी मोलकरीण आपल्या घरात आल्यावर संसर्गाचा धोका वाढेल, म्हणून मोलकरणींना परवानगी दिली जात नसली, तरी मोलकरणींनाही त्यांच्या जीवाची काळजी आहेच. इमारतीत गेल्यावर तिथूनही कोरोनाची लागण आपल्याला होईल अशी त्यांनाही भीती आहेच. "इमारतीत मोठ्या संख्येने रहिवासी राहतात. त्यामुळे प्रवेशद्वारावर दरवाजा उघडताना, लिफ्टमध्ये जाताना लोकांशी संपर्क आला की मलाही मनात भीती वाटते," शोभा सांगतात.

इतर महानगरांमध्ये मोलकरीण येतायत?

नाशिक, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी घरमालक मोलकरणींना कामावर घेत आहेत. मास्क, हँडग्लोव्ह वापरुन मोलकरणींनी कामाला सुरुवात केलीय.

औरंगाबाद शहरात राहणाऱ्या मीनाक्षी करोळे यांच्या घरात गेल्या आठवडाभरापासून मोलकरीण कामावर येत आहे. "ती सकाळी दहा वाजता येते. घरात येण्याआधीच आम्ही तिला सॅनिटायजर देतो. तिला मास्कही आम्ही दिले आहेत. तोंडावर मास्क लाऊन काम करणं बंधनकारक केले आहे. आम्ही इमारतीत राहत असलो तरी घरातल्या खोल्या वगळता धुणं, भांडी करण्यासाठी एक मोकळी जागा आहे. त्यामुळे मोलकरीण आली की थेट तिथेच जाते. बाकी घरात तिचा वावर नसतो."

खरं तर या जिल्ह्यांच्या शहरी भागात मोलकरीण घरी येण्याचं प्रमाण मुंबई, पुण्याच्या तुलनेने कमी आहे. तसंच घरं मोठी असल्याने स्वयंपाक वगळता इतर सर्व कामं एका विशिष्ट जागेत करता येतात. अनेक ठिकाणी तर घराच्या पुढच्या किंवा मागच्या अंगणात धुणी, भांडी केली जातात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याकरता शारीरिक अंतर राखणं शक्य होतं.

हेही वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)