उद्धव ठाकरे सरकारचा कारभार आणीबाणीसारखा - स्मृती इराणी #5मोठ्याबातम्या

स्मृती इराणी

फोटो स्रोत, Getty Images

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1) ठाकरे सरकारचा कारभार आणीबाणीसारखा - स्मृती इराणी

केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केलीय. ठाकरे सरकार आणीबाणीसारखा असल्याचं इराणी म्हणाल्या. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

"महाराष्ट्र सरकार म्हणतं, सोशल मीडियावरून व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या, सरकारचा विरोध करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करू. यावरून काँग्रेसची जी संस्कृती आणीबाणीच्या काळात दिसली, तशीच संस्कृती महाराष्ट्रातील जनतेला आता दिसतेय," असं स्मृती इराणी म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter/@Dev_Fadnavis

भाजपनं व्हर्च्युअल जनसंवाद रॅली आयोजित केली होती. या रॅलीतून काल (29 जून) स्मृती इराणींनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना मार्गदर्शन केलं.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली. "महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. मात्र, या संकटाच्या काळातही भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर येत आहेत. कोरोनाच्या लढाईत आणि खरेदीत भ्रष्टाचार होत असेल तर ईश्वरचं मालक आहे," असं फडणवीस म्हणाले.

कोरोना
लाईन

दरम्यान, फडणवीसांच्या या आरोपावर महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाहीय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

2) तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा घेणं शक्य - भगतसिं कोश्यारी

परीक्षा न घेता विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर त्याचे त्यांनाही समाधान मिळणार नाही. आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा घेणं शक्य आहे, असं मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

अकादमीस्थान फाऊंडेशन या उच्चशिक्षण संस्थांमधील शिक्षकांसाठी ऑनलाईन व्यासपीठाचं काम करणाऱ्या संस्थेनं रविवारी (29 जून) 'ऑनलाईन अध्यापनाकरिता नव-युगातील साधने' या विषयावर चर्चा आयोजित केली होती. या चर्चेचं उद्घाटन राज्यपालांनी केलं.

भगतसिंग कोश्यारी

फोटो स्रोत, Twitter/@BSKoshyari

महाविद्यालयं आणि उच्च शिक्षणसंस्थांनी आधुनिक डिजिटल साधनांचा स्वीकार करावा. मात्र, नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित आणि व्यवहार्य असावे आहे का, याचादेखील विचार करणं आवश्यक आहे, असंही राज्यपाल म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं पदवीच्या अंतिम परीक्षा रद्द केल्या. मात्र, या परीक्षा घेण्यासाठी राज्यपाल आग्रही होते. याचाच अप्रत्यक्ष पुनरुच्चार राज्यपालांनी या चर्चेदरम्यान केला.

3) जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत तीन कट्टरतावाद्यांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पहाटे भारतीय जवान आणि कट्टरतावाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन कट्टरतावाद्यांचा मृत्यू झाला. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.

काश्मीर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

दक्षिण काश्मीरमधील खुलचोहरमध्ये कट्टरतावादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. त्याच दरम्यान कट्टरतावाद्यांनी सर्च ऑपरेशन करणाऱ्या टीमवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि मग याचं चकमकीत रुपांतर झालं.

या कट्टरतावाद्यांकडून एके-47 रायफल आणि दोन पिस्तुल जप्त केल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली.

कोरोना
लाईन

4) आसाममधील पुराचा 9 लाखांहून अधिक लोकांना फटका, दोघांचा मृत्यू

आसाममधील पुरानं भयंकर रूप धारण केलंय. जवळपास 9 लाख 30 हजार लोकांना या पुराचा फटका बसलाय. आतापर्यंत दोघांचा मृत्यूही झालाय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

आसाममधील 23 जिल्ह्यांमध्ये पुरानं थैमान घातल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं (ASDMA) दिली.

आसाम पूर

फोटो स्रोत, Twitter/@SBhttachrya

बारपेटा जिल्ह्यात जवळपास दीड लाख, धेमाजी आणि नलबारी जिल्ह्यात जवळपास एक लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.

ASDMA च्या माहितीनुसार, 2 हजार 71 गाव अजूनही पुराच्या पाण्यात आहेत, तर 68 हजार 806 हेक्टर शेतजमीन पुराच्या पाण्याखाली गेलीय.

5) यशवंत सिन्हा बिहार निवडणुकीच्या मैदानात उतरले

काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे माजी नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा उतरले आहेत. द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

यशवंत सिन्हा

फोटो स्रोत, Getty Images

'इस बार बदलें बिहार' म्हणत यशवंत सिन्हा यांनी 'राष्ट्र मंच' या नव्या संघटनेची घोषणा केलीय. या संघटनेद्वारे ते बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

दोनच वर्षांपूर्वी यशवंत सिन्हा यांनी भाजपला राम राम ठोकला होता. त्यानंतर देशभर फिरून त्यांनी मोदी सरकारविरोधात प्रचार केला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)