मोदी 2.0 वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधानांचं देशवासीयांना पत्र: 10 महत्त्वाचे मुद्दे

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या वर्षी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार दुसऱ्यांदा स्थापन झालं होतं. या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेचं आभार मानणारं एक पत्र लिहिलं आहे.

कोरोनाची साथ पसरल्यामुळे बिकट परिस्थिती आहे. त्यामुळेच देशवासीयांसाठी हे पत्र लिहावं लागत असल्याचा उल्लेख मोदींनी पत्राच्या सुरुवातीला केला आहे.

अनेक दशकांनंतर जनतेने भारतातील एखाद्या सरकारला सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमत देऊन जबाबदारी सोपवली होती. हा भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला अध्याय आहे, असं ते म्हणाले.

या पत्रात मोदींनी आपल्या सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांचा उल्लेख केला आहे. कोरोना संकटाकडे लक्ष वेधत मोदींनी लिहिलं की, "कोणतीही कठीण परिस्थिती आपल्या भविष्याबाबतचा निर्णय करू शकत नाही."

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, ANI

मोदींच्या पत्रातील 10 महत्त्वाचे मुद्दे -

1. जनतेने 2014च्या निवडणुकीत देशाचं धोरण आणि कार्यपद्धती बदलण्यासाठी मतदान केलं होतं. या पाच वर्षात देशाने शासनयंत्रणेला भ्रष्टाचाराच्या दलदलीतून बाहेर निघताना पाहिलं आहे. शेवटच्या गरिबांचंही जगणं सुसह्य बनवण्यासाठी प्रशासकीय कामकाजाची पद्धत बदलताना देशाने पाहिलं आहे.

2. तो कार्यकाळ देशातील अनेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित ठरला. गरिबांची बँक खाती, मोफत गॅस कनेक्शन, मोफत वीज कनेक्शन, शौचालयं, घर, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक झाल्या. वन रँक वन पेंशन, वन नेशन वन टॅक्स - GST, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं काम केलं गेलं.

3. राष्ट्रीय एकता-अखंडतेसाठी कलम 370 हटवण्यात आलं. अनेक वर्षांच्या संघर्षानंतरचा सुखद परिणाम म्हणजे राम मंदिराचं निर्माण, आधुनिक समाजाच्या संकल्पनेतील अडसर म्हणजे ट्रीपल तलाक, किंवा भारताच्या दयाभावनेचं प्रतिक असलेलं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, हे सगळं साध्य करणं तुमच्या आठवणीत आहे.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, REUTERS/ALTAF HUSSAIN/FILE PHOTO

4. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाच्या निर्मितीनंतर सैन्यातील समन्वय वाढलं आहे. तसंच मिशन गगनयानसाठी भारताने जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे.

5. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी, शेतमजूर, छोटे दुकानदार आणि असंघटीत क्षेत्रातील श्रमिक वर्ग या सर्वांसाठी 60 वर्ष वयानंतर 3 हजार रुपयांचं मासिक पेशन नियमितपणे मिळण्याची सोय झाली आहे.

6. सामान्य माणसाच्या हिताशी संबंधित अनेक कायदे बनवण्यात आले. यासाठी मागच्या वर्षी वेगाने कार्यवाही झाली. संसदेने कामकाजाबाबतचा अनेक वर्षं जुना रेकॉर्डही मोडला आहे.

भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणं

17656

एकूण प्रकरणं

2842

संपूर्ण बरे झालेले

559

मृत्यू

स्रोत- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

11: 30 IST ला शेवटचं अपडेट

7. देशवासीयांच्या आशा-अपेक्षांची पूर्तता करताना आपण वेगाने पुढे जात आहोत. पण यादरम्यान कोरोना व्हायरसचं मोठं आरोग्य संकट भारतावर आलं. कोरोना भारतात आल्यानंतर आपला देश जगासाठी संकट बनेल, अशी शंका अनेकांच्या मनात होती. पण आज सर्व देशवासीयांनी भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकला आहे.

टाळ्या-थाळ्या वाजवणं आणि दिवे लावण्यापासून भारतीय सैन्याने कोरोना वॉरियर्सचा केलेला सन्मान, जनता कर्फ्यू किंवा देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान नियमांचं पालन, प्रत्येक वेळी भारताचं श्रेष्ठत्व तुम्ही दाखवून दिलं आहे.

8. पण आपल्या जीवनात होत असलेली गैरसोय आपल्या आयुष्यातलं संकट बनू नये हे आपण लक्षात घ्यायला हवं. प्रत्येक भारतीयाने नियमावलींचं पालन करणं आवश्यक आहे. ही लढाई मोठी आहे. आपण विजयाच्या मार्गावर पुढे जात आहोत. विजयी होणं हेच आपलं ध्येय आहे.

कोरोना
लाईन

9. भारतासह इतर देशांची अर्थव्यवस्था पुन्हा कशी उभारी घेईल, याची चर्चासुद्धा आता होत आहे. पण आपण आपल्या पायांवर उभं राहिलंच पाहिजे, ही काळाची गरज आहे. आपल्याला आपल्या बळावरच चालावलं लागेल, यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे आत्मनिर्भर भारत.

नुकतेच आत्मनिर्भर भारत अभियानासाठी दिलेलं 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज या दिशेने उचललेलं मोठं पाऊल आहे. हे अभियान प्रत्येक देशवासीयासाठी, शेतकरी, श्रमिक, लघुउद्योजकांसाठी, स्टार्टअप करणाऱ्या तरूणांसह सर्वांसाठी एक नवी संधी घेऊन येईल.

10. हा जागतिक आरोग्य संकटाचा काळ तर आहेच. पण देशवासीयांसाठी ही संकल्प करण्याचीही घटिका आहे. कोणतंही संकट, कोणतीही आपत्ती 130 कोटी भारतीयांचं भविष्य निर्धारित करू शकत नाही, हे आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे.

हा व्हीडिओ नक्की पाहा :

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)