देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना चुचकारण्याचा प्रयत्न? त्यासाठी राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा आधार?

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्र सरकारमध्ये आमच्याकडे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार नाहीत, या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा अधार घेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे का, याची सध्या चर्चा सरू आहे.

राहुल गांधी यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार नाहीत, असं वक्तव्यं केलं होतं. आम्ही राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब आणि पाँडेचरीमध्ये स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये आहोत. सरकार चालवणं आणि एखाद्या सरकारला पाठिंबा देणं यामध्ये हाच फरक आहे, असं राहुल यांनी म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

"राहुल गांधींनी म्हटलं, की आम्ही सरकारमध्ये असलो, तरी निर्णय प्रक्रियेत आम्हाला संधी नाही. आमचं या सरकारमध्ये ऐकलं जात नाही. हे विधान आश्चर्यकारक आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे - कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जातेय हे लक्षात आल्यानंतर हे खापर शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर फोडलं जात असल्याचा यातून गंध येतोय," असं देवेंद्र यांनी म्हटलं.

तुम्ही सरकारमध्ये आहात, बाहेरून पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे जबाबदारी झटकता येणार नाही. राहुल गांधींचं वक्तव जबाबदारी झटकणारं आणि सरकारची साथ सोडणारं दिसतंय, असा टोलाही त्यांनी लगावला.

'सरकार स्थापनेची घाई नाही'

भाजप नेते नारायण राणे यांनी सोमवारी (25 मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. या भेटीनंतर राणे यांनी ठाकरे सरकारला नारळ द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं विधान केलं होतं.

लाईन

लाईन

त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, की भाजपला आता राजकारणात रस नाही. सरकार बनवण्याची आम्हाला घाई नाही. कोरोनाशी लढण्यावर आमचा फोकस आहे. आता जी चर्चा सुरू आहे, त्यामध्ये आम्ही सामील नाही. कोरोनाची लढाई इफेक्टिव्ह व्हावी, यासाठी आम्ही दबाव तयार करू.

"सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही. हे सरकार अंतर्गत वादांमुळेच पडेल. सरकारला जागं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पळवून लावण्याचा नाही," असंही देवेंद्र यांनी म्हटलं.

केंद्राची राज्याला जास्त मदत - फडणवीस

केंद्र सरकार महाराष्ट्राला काही देत नाही, असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र केंद्राकडून सगळ्या राज्यांना जे मिळतं ते किंवा त्यापेक्षा जास्त महाराष्ट्राला मिळत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्राकडून महाराष्ट्राला आतापर्यंत मिळालेल्या मदतीची आकडेवारी सादर केली. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग रोखण्याबद्दल उद्धव ठाकरे सरकार करत असलेल्या उपाययोजना आणि राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केलं.

महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती वाईट आहे. रुग्ण आणि मृत्यूसंख्या सर्वांत जास्त आहे. गेल्या महिन्याभरात मुंबईत सरासरी 3500 टेस्ट दररोज करण्यात आल्या. यापैकी 32% टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत. गेल्या 3-4 दिवसांत हे प्रमाण 40% पेक्षा जास्त असल्याचं देवेंद्र यांनी म्हटलं.

राज्य सरकार केंद्राकडून आलेले पैसे खर्च करू शकलेलं नाही. सरकारमध्ये समन्वय नाही. त्यांचं प्राधान्य वेगळ्या गोष्टींना आहे. उद्धव ठाकरेंचं मूल्यमापन मी करणार नाही. राज्याला आता assertive भूमिकेची गरज आहे. बोल्ड निर्णय घेण्याची अपेक्षा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

कोरोना
लाईन

'सरकारनं विरोधकांना विश्वासात घेतलं नाही'

राज्य सरकारने विरोधकांना कधी विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

"दोन महिन्यांपूर्वी बैठक झाली होती, त्यानंतर बैठक झाली का? आम्ही मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलं होतं. पण आम्हाला ऑटो जनरेटेड रिप्लाय आला," असं फडणवीस यांनी सांगितलं.

हे एकतर्फी चालल्याचा आरोप करत फडणवीस यांनी म्हटलं, की विरोधकांना विश्वासात घ्यायचं नाही आणि विरोधकांनी सल्लाही द्यायचा नाही,असं चाललंय. आपण रोज राजकारण करायचं, आणि विरोधकांना राजकारण करू नका असा सल्ला द्यायचा, हे खपत नाही.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

"विरोधी पक्ष आपला कोरोनापेक्षा मोठा शत्रू असल्याचं सरकार समजतंय. विरोधी पक्षाविरुद्ध त्यांनी पेड कॅम्पेन करून घेतलं. त्यापेक्षा विरोधकांना सोबत घेतलं तर ते राज्यासाठी चांगलं होईल."

लॉकडाऊन आवश्यक आहे, पण पूर्णवेळ राहू शकत नाही. त्यासाठीच्या एक्झिट स्ट्रॅटेजीचा विचार होताना दिसत नसल्याचं त्यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतले अन्य महत्त्वाचे मुद्दे-

  • गरीब कल्याण पॅकेज - अन्नधान्य देण्याचा निर्णय - एकूण तीन महिन्यांत सरासरी 4592 कोटी रुपयांचं अन्नधान्य केंद्राने राज्याला दिलंय.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 1726 कोटी, जनधन - महिलांच्या खात्यात 1308 कोटी आतापर्यंत गेले, अधिक ६५० कोटी जातील. विधवा, ज्येष्ठ नागरिक - 16 कोटी. असे 3800 कोटी रुपये थेट ट्रान्सफर केलं.
  • उज्ज्वलाद्वारे 1625 कोटी मूल्याचे सिलेंडर्स दिले.
  • आरोग्यविषयक आवश्यक बाबी खरेदी करण्यासाठी केंद्राने 2059 कोटी दिले.
  • 5648 रुपयांचा कर परतावा केंद्राने राज्याला दिला.
  • बजेट सादर करताना धरण्यात आलेल्या अपेक्षित करानुसार केंद्राने राज्याला कर परतावा दिला.
  • कापूस खरेदीसाठी 5647 कोटी, तांदूळ खरेदी 2311 कोटी, तूर खरेदी 593 कोटी,चणा-मका 125 कोटी, पीक विमा - 403 कोटी केंद्राने दिले आहेत.
  • केंद्र सरकारने जीडीपीच्या 5% कर्ज घेता येईल असा निर्णय घेतला आणि 10,69,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्याची व्यवस्था निर्माण केली. यापैकी महाराष्ट्राला 1,60,000 कोटी रुपये मिळू शकतात.
  • राज्य सरकारने बोल्ड पावलं घेण्याची आवश्यकता आहे. पैसे नाही म्हणून मदत न करण्याची भूमिका घेता येणार नाही.
  • MSME चं पॅकेज 3,70,000 कोटींचं आहे. महाराष्ट्रात50 लाख MSME रजिस्टर्ड आणि कार्यरत आहेत. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातलया उद्योगांना 35 हजार कोटी रुपये मिळू शकतात.
  • 70 हजार कोटींची सबसिडी गृहनिर्माणासाठी देण्यात आलीय. रजिस्टर्ड प्रकल्पांपैकी 40% प्रकल्प महाराष्ट्रात आहेत.
  • राज्याच्या वीज वितरण कंपन्यांवर ताण येऊ नये यासाठी महावितरणला 9 हजार कोटी उपलब्ध
  • नरेगा - 1 लाख कोटी, रजिस्ट्रेशनमध्ये दीड पटींनी वाढ आहे. यापैकी 5 हजार कोटी महाराष्ट्राला मिळू शकतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)