कोरोना: 'शहरात भूकेने किंवा लाचारीने मरण्यापेक्षा गावात जाऊन मरू'

फोटो स्रोत, BBC/Pravin Thackeray
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
राबणाऱ्या हातांचे श्रमिक जेव्हा देश कापत जाणाऱ्या महामार्गांवरून पायी निघातात तेव्हा लक्षात येतो 'आत्मनिर्भर' या शब्दाचा अर्थ. कोणता राग नाही, कुणाविषयी तक्रार नाही, आपलं दुःख आपल्यापाशी ठेवत पोराबाळांना काखोटीला मारत निघतात हजारो किलोमीटर. कधी पायी, कधी जनावरांसारखे ठासून भरलेले ट्रकमध्ये तर कधी विनातक्रार उभे राहातात तासनतास बसच्या रांगेत.
रस्त्यात अनेक दानशूर भेटतात, जेवणाची पाकिट हातात सरकवतात, ज्या श्रमिकांनी आपल्या बळावर महानगरं उभी केली, देशाची अर्थव्यवस्था सावरली त्यांना दोन वेळेच्या जेवणासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागतंय. हात पसरताना सन्मान पणाला लागतो, पण मिटीमिटी डोळ्यांनी पाहाणाऱ्या उपाशी पोरांकडे पाहून अपमान गिळावा लागतो.
"गाव में जायेंगे, खेती कर के खायेंगे, पर शहर में रहे तो भूके मरेंगे, या शरम से," बसच्या लायनीत उभ्या असणाऱ्या पन्नाशीच्या गृहस्थांनी सांगितलं. इतके लोक दिसलेत, बोललेत, की सगळी नावं लिहायला जागा कमी पडेल. सगळ्यांचं एकच म्हणणं, आम्ही आता काय करायचं?
गेल्या कित्येक दिवसांपासून देशातला श्रमिक रस्त्यावर आहे, कोणी चेन्नई ते गोंदिया प्रवास करतोय, कोणती लेक हरियाणाहून बिहारपर्यंत बापाला सायकलवर आणतेय, कोणते बाबा पायाला हातभर जखम घेऊन पायी चालताहेत, कोणती पिटुकली पाय दुखले तर पेनकिलर घ्यायच्या तयारीत आहे आणि असेच शेकडो लोक दिसले आम्हाला आमच्या जवळपास 800 किलोमीटरच्या प्रवासात.

फोटो स्रोत, BBC/Pravin Thackeray
आधीचे दोन आठवडे रोजच मुंबई-आग्रा हायवेवरून येणारे श्रमिक पाहात होते, त्यातले कित्येक पायीच असायचे. नंतर गाड्यांची संख्या वाढली, सरकारने ट्रेन चालवल्या, बस सुरू केल्या पण त्या पुरेशा नव्हत्याच, मग जीवनावश्यक गोष्टी वाहाणारे ट्रक माणसांनी भरून वाहायला लागले.
लॉकडाऊनचे निर्बंध शहरात शिथिल व्हायला लागले, आणि हायवे जाम व्हायला लागला. दिवस जात होते, माणसांचे लोंढे कमी व्हायचं नावच घेत नव्हते. तेव्हा ठरवलं, या लोकांसोबत प्रवास करायचा. जितका शक्य होईल तितका. खरं सांगायचं तर या लोकांसारखा प्रवास करण्याची हिंमत, ताकद आणि दानत काहीही नव्हती, पण ज्यांना आपण सतत मजूर, श्रमिक म्हणतोय, त्यांच्या लोढ्यांची वर्णनं करतोय तीही माणसं आहेत आणि त्यांच्या माणूसपणाच्या गोष्टी शक्य तितक्या समोर आणाव्या वाटलं.


श्रमिकांसाठी पॅकेज घोषित करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणल्या होत्या, 'खरंतर या लोकांना पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं, आहात तिथेच राहा, पण (हे लोक) भावनावश झाले.'
कशाला निघतायेत मजूर, शहरांवर संकट आलं म्हणून गावांकडे धावत सुटलेत हे असं म्हणणारे अनेक लोक आहेत. यातल्या अनेक गोष्टी तुम्हीही सोशल मीडियावर ऐकल्या-वाचल्या असतील. पण दोन मिनिटं थांबवून विचारलं का निघालात बाबानो असं सगळं काही पणाला लावून?
कसारा घाटात भेटले मोहम्मद कासीम, त्यांना उत्तर प्रदेशातल्या बरेलीला जायचं होतं. घाटात रिक्षा चढणार नाहीच, तरी प्रयत्न करून करून चढवलेली. एका रिक्षात पोरबाळं धरून कमीत कमी 6 माणसं. सकाळी सहा वाजता सगळे धापा टाकत घाट चढत होते. घाट उतरला की पुन्हा रिक्षात बसणार. रिक्षात असणाऱ्या सामनाच्या बोचक्यात लोक बसू तरी कसं शकत होती देव जाणे.

फोटो स्रोत, BBC/Pravin Thackeray
मोहम्मद कासीम यांचा परिवार दोन दिवस झाले घराबाहेर आहे. घरमालकाने भाडं नाही म्हणून घराबाहेर काढलं. आता त्यांना मुंबईत राहायला घर नाही. रात्री 12 वाजता त्यांनी प्रवास सुरू केला. घाट संपल्यावर थोडं पुढे जाऊन रिक्षा लावली. कुटुंबातले मेंबर चटई पसरून पडले. पुढे कमीत कमी 1500 किमीचा प्रवास त्यांना असंच अंग आंबवून करायचा होता. दोन-दोन, तीन-तीनचा गट करून रिक्षावाले निघालेत. रस्त्यात रिक्षा खराब झाली तर ती नीट कशी करायची, रस्त्यात खायचं काय याचा काही अंदाज नाही फक्त निघालेत. का ? कारण मुंबईत राहायला डोक्यावर छप्पर नाही.
तिथून थोडं पुढे दोन टॅक्सीवाले आणि त्यांची कुटुंब दिसली. अशीच कोंबून कोंबून गाडीत भरलेली. एकाची गाडी खराब झाली म्हणून गाडी साईडला लावून मेकॅनिकची वाट पाहात होते. त्यांना विचारलं तुम्ही का जाता आहात गावाकडे मुंबई सोडून, भीती नाही वाटतं, तर म्हणे वाटते ना, पण करणार काय? आशिषकुमार पांडे 22 वर्षांपासून मुंबईत राहातात. मुंबईतल्या चाळीत त्यांची एक खोली आहे. याच लोकांविषयी सोशल मिडियावर मेसेज फिरत होते, इतके वर्ष मुंबईच्या जीवावर काढून आता संकटकाळात मुंबई सोडून पळतायत.
"2 महिन्यांपासून टॅक्सी बंद आहे, काम नाहीये, हातातला पैसा संपला. मुंबईत राहायचं म्हटलं तर सगळंच महाग. दुध, भाजी परवडेनास झालं. मुलांच्या शाळा बंद आहेत. आम्ही राहात होतो तो भाग कंटेन्मेंट झोन होता. तिथे एकदाच फवारणी करायला आले फक्त. खायचे वांधे आहेत, जगणं अशक्य झालंय. घरी जाणार नाही तर काय करणार," त्यांची बायको एका दमात सांगून टाकते. गावी गेलात तर सगळं मिळेल का मग, असं विचारलं तर म्हणते, "आमची शेतीवाडी काही नाही, पण गावात निदान धान्य, भाजी मिळेल. देतात लोक अडचण पाहून. इथे कोण देणार?"
आपलं इतक्या वर्षांचं घर, त्यात पैपै करून घेतलेलं सामान सगळं दुसऱ्याच्या जीवावर टाकून आलेत ते. तो दुसराही जाणार आहे गावाला. मुंबई रिकामी होतेय.

फोटो स्रोत, BBC/Pravin Thackeray
मुंबईतूनच नाही, इतरही शहरांमधून लोक परत जात आहेत. नाशिकच्या सातपूर MIDC मध्ये काम करणारा चंद्रहास मुळचा कटनी, मध्यप्रदेशचा. अगदी तरूण. बायको तीन महिन्यांची गरोदर पण तरी निघालाय. कारण तेच घरभाडं द्यायला पैसै नाहीत आणि काम नाही तर शहरात राहून करणार काय. एसटी बस यायची वाट पाहात थांबलेले होते दोघं. बराच वेळ बस आली नाही तर ट्रकवाल्याशी बोलायला गेले, तिथेही बात जमली नाही.
"एका माणसाचे दोन हजार रूपये मागत होते ट्रकवाले. पैसे असते तर लोकांकडून फुड पॅकेट घेऊन खाल्लं असतं का," तो विचारतो. गाडी मिळाली तर ठीक नाहीतर पायी जाणार तो निक्षून सांगतो. गरोदर बायको मान डोलावते.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

परप्रांतीयांना घेऊन एसटी बसेस मध्यप्रदेशच्या बॉर्डरवरती सोडतात. सकाळी 6 पासूनच तिथे लाईन लागायला सुरुवात होते. बस येईपर्यंत प्रचंड गर्दी असते, प्रत्येकाला बस मिळतेच असं नाही. नाशिकमधल्या बस थांब्यावर आम्हाला एजंटही दिसले. बसची वाट पाहात ताटकळत उभ्या असणाऱ्यांना ट्रकमध्ये भरून द्यायचं की चालले. एकेका ट्रकमध्ये 50-70 माणसं.
रोज बातम्या ऐकतो ना, अपघातात इतके मजूर ठार, तितके मजूर ठार... त्यांचं मेकिंग ऑफ बघत होतो. इतक्या धोकादायक अवस्थेतले ट्रक, किती जण 'अपनी मंझिल तक सहीसलामत' पोहचतील माहिती नाही. अडल्यानाडलेल्यांना लुटायचा धंदा जोरात चालू आहे. माणूस पण एक अजब प्राणी आहे, संकटात संधी शोधतो खरा, पण कधी कधी दुसऱ्याला संकटात लोटून.
अर्थात सगळंच चित्र इतकं वाईट नाहीये. माणसंच आहेत माणसांना आधार देणारे. धुळ्यात जिथे एसटी बसेस थांबत होत्या तिथे मोठा मंडप टाकला होता. एका संस्थेने श्रमिकांची जेवायची आणि राहायची सोय केली होती. नाशिकपासून मध्यप्रदेशातल्या सेंधवापर्यंत लोकांच्या खाण्याची व्यवस्था होती, अनेक स्वयंसेवी संस्था होत्या, लंगर होते. कोणी उपाशी जाणार नाही याची काळजी घेतली होती.
घरी जायचंच बस्स, एवढं एकच वाक्य वारंवार कानावर पडत होतं. घरी जाऊन तरी काय करणार, घरी असं काय आहे, आणि होतंच तर शहरात कशाला आलात असे प्रश्न मीही विचारले. 'मरायचं असेल तर तिथे मरू सुखाने चार माणसं तरी सोबत असतील, इथे मेलो तर बेवारस कुत्र्यासारखी विल्हेवाट लावतील आणि घरच्यांना कळणार पण नाही.'

फोटो स्रोत, BBC/Pravin Thackeray
घरी जायचंय कारण एकटं राहायचं नाहीये, एकटं मरायचं नाहीये.
मुंबई काम करणारे कित्येक श्रमिक एका खोलीत 10 जणांच्या ग्रुपने राहातात. 2 महिने एका 10 बाय 10 च्या खोलीत 10 लोकांबरोबर कोंडून घेतंलय कधी? जेलमध्ये तरी पाय मोकळे करायला जागा मिळते. इथे तेही नाही, बाहेर पडताच येत नाही. पूर्ण पाय लांब करून झोपलं तर किमान तिघांना पाय लागणार अशी अवस्था. निदान गावात शरीराला लागते तेवढी 6 फुटाची जमीन तरी मिळेल, म्हणून जायचंय.
महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केली की बिजासनी घाट लागतो. तिथे बिजासनी मातेचं मंदिर आहे. सध्या त्याची दारं बंदच. पण मंदिराबाहेर श्रमिकांची ही गर्दी. घाटात वाहनांचा ट्रॅफिक जाम. लोक गोंधळलेले.
गुजरातहून आली होती पन्नास माणसं, जायचं होतं छत्तीसगडला म्हणजे महाराष्ट्राच्या बसने त्यांना गोंदियाला (राज्याची त्याबाजूची सीमा) सोडणं अपेक्षित, त्यांना आणून सोडलं मध्यप्रदेशात. आता गर्दीत ती लोक हरवली आहेत. मध्यप्रदेशवाले म्हणतात आम्ही देवास किंवा गुनाला नेऊन सोडू, म्हणजे उत्तर प्रदेशच्या बाजूला. म्हणजे घरापासून दुप्पट लांब. डोक्याला हात लावून बसलीत ती माणसं. "एका बसचा ड्रायव्हर आला आणि म्हणाला 34 हजार द्या मी तुम्हाला गावी नेऊन सोडतो. पैसै कुठून आणायचे आम्ही," एक बाई हताशपणे विचारते.
तीन राज्यांच्या एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात शेकडो लोकांचे हाल होतायत. कोणी विचारत नाही नक्की कुठे जायचंय. आला की बसवला गाडीत की आपली जबाबदारी संपली असाच अप्रोच.

फोटो स्रोत, BBC/Pravin Thackeray
जसंजशी गावं मागे पडतात, कसारा, नाशिक, मालेगाव, धुळे, शिरपूर, सेंधवा तसतसा पारा वाढत जातो. इतक्या उन्हात ही माणसं धक्के खात असतात. कोणी 2दिवसांपूर्वी निघालंय, कोणी 3 दिवसांपूर्वी आणि आता बिजासनी घाटात येऊन थांबलेत. जेवढं अंतर आलेत, त्याहून दुप्पट अंतर त्यांना पुढे जायचंय. कसं जाणार, कोण नेणार, किती दिवस लागणार काही माहिती नाही... गावापाशी पोहचलोच तरी गावात घेतील, आपल्या राज्याजवळ पोहचलो तरी राज्यात येऊ देतील याची शाश्वती नाही, तरी निघालेत
परतीच्या प्रवासात संपूर्ण रस्ताभर दिसत राहिले रिकामे ट्रक, टेम्पो आणि ट्रॅक्स. उद्या सकाळी पुन्हा शहरांमधून भरून भरून येतील. रात्री दोन वाजता नाशकात एक कुटुंब हायवेच्या बाजूला बोचकी घेऊन कोणीतरी पुढे नेऊन सोडेल याची वाट पाहात होतं.
असं म्हणतात की ही पृथ्वी शेषनागाच्या नाही, श्रमिकांच्या डोक्यावर उभी आहे. खरं असावं ते. रस्त्यांने जाणारे श्रमिक, ज्यांच्या डोक्यावर प्लास्टिकच्या जुन्या पाण्याच्या बाटल्या आहेत, मळकट बोचकी आहेत, खांद्यावर पोरं बसवली आहेत, कडेवर म्हातारी घेतली आहेत... आपली दुनिया अशीच असावी कदाचित.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








