कोरोना व्हायरस : एअर इंडिया कंपनीच्या विमान कर्मचाऱ्यांना कसा त्रास होतोय?

AIR INDIA

फोटो स्रोत, GETTY Images

फोटो कॅप्शन, AIR INDIA
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

"लढाया लढणारे सगळेच युद्धभूमीवर जात नाहीत. काहीवेळा जिंकण्यासाठी फक्त तुमची कर्तव्य पार पाडणं पुरेसं असतं. मग आमच्यापैकी काही जणांना ते कर्तव्य बजावण्याची शिक्षा का भोगावी लागते आहे?"

एअर इंडियाच्या केबिन क्रूमधील सदस्यानं हा प्रश्न विचारला आहे. त्यामागचं कारण आहे, गेल्या काही दिवसांत त्याच्या काही सहकाऱ्यांना त्यांच्या इमारतीतील लोकांकडून झालेला त्रास.

खरं तर 22 मार्चच्या मध्यरात्रीपासून भारतातले विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांसाठी बंद झाले होते आणि 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूकही बंद आहे. केवळ गरजेची मालवाहतूक करणारी विमानं आणि मदत पुरवणारी किंवा अडकलेल्या लोकांना घेऊन येणाऱ्या विशेष विमानसेवा सुरू राहणार आहेत.

पण या अखेरच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर गेलेले विमान कर्मचारी खबरदारी म्हणून घरीच विलगीकरणाचे नियम पाळत आहेत. त्यातल्याच काही पायलट आणि फ्लाईट अटेंडंटना शेजाऱ्यांनी वाळीत टाकण्याच्या किंवा त्यांची पोलिसांत तक्रार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

कोरोना
लाईन

सरकारी मालकीची कंपनी असलेल्या एअर इंडियानं त्यानंतर रविवारी (22 मार्च) एक निवेदन जाहीर केलं. "अनेक ठिकाणी रहिवासी कल्याण संस्था (RWA) आणि शेजारी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना देत असलेली वागणूक चिंताजनक आहे. कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे, पोलिसांना बोलावणे असे प्रकार होतायत कारण त्यांचं कर्तव्य बजावताना ते परदेशात जाऊन आले आहेत."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी या घटनांची दखल घेतली आहे. "मी आपल्या कर्मचाऱ्यांची निष्ठा, निस्वार्थपणा आणि निर्धार यांचा आदर करतो. त्यांच्या आणि त्यांच्या कुटूंबियांच्या संरक्षणासाठी, संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी मदत करावी अशी मी विनंती करतो." अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही अशाच अनुभवांना समोरं जावं लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशाप्रकारे कोरोनाशी लढणाऱ्यांसोबत भेदभाव केला जाऊ नये, असं स्पष्ट केलं होतं.

भाजपनंही संकटकाळात आपल्या संवेदना जागृत ठेवायला हव्यात, असं ट्वीट केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

पण तरीही एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसोबत हा घडलेला सगळा प्रकार पाहून कर्मचाऱ्यांपैकी काहींना धक्का बसला आहे आणि त्यांनी दुःखही व्यक्त केलं आहे.

एअर इंडियाच्या विमान कर्मचाऱ्यांना कसा त्रास होतोय?

नवी मुंबईत राहणाऱ्या एका फ्लाईट अटेंडंटनं काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-मुंबई विमानात ड्यूटीवरून परतल्यावरचा आपला अनुभव सहकाऱ्यांना सांगितला आहे. तिच्यात आजाराची कुठलीच लक्षणं नाहीत पण, खबरदारीचा उपाय आणि नियमानुसार तिनं काही दिवस घरी विलगीकरणात राहायचं आहे, असं तिला एअरपोर्टवरच तपासणी करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. तेव्हापासून तीच नाही, तर तिचं अख्खं कुटूंबच घराबाहेर पडलेलं नाही.

एअर इंडिया

फोटो स्रोत, Twitter / @AirIndiaIn

पण तरीही एका रात्री त्यांना पोलिसांचा फोन आला. तुम्ही परदेशातून आल्याचं का लपवलं आणि स्वयंतपासणीसाठी हजर का झाला नाहीत, असा जाब पोलिसांनी विचारला. त्याच रात्री पोलिसांची एक टीमही त्यांच्या घरी आली.

"आमच्या घरी आलेले अधिकारी फोनवर बोलणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा जास्त समजूतदार होते. त्यांनी माझी सगळी माहिती घेतली आणि मी त्यांच्या संपर्कात राहायचं आहे असं सांगितलं. त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशीनी फोनवरून माझ्याशी बातचीत केली."

घडला प्रकार तिनं एअर इंडियामधल्या आपल्या वरिष्ठांना कळवला, ज्यांनी त्या भागातील पोलिसांशी संपर्क साधला. पुढे काय होणार आहे, याचा विचार करत, चिंतेतच अख्खी रात्र गेली. दुसऱ्या दिवशी एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं त्यांच्याशी बातचीत केली. "त्यांनी घडल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला आणि हे सगळं कशामुळं झालं असावं याचा विचार करू लागलो."

स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांनुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समितीनं गेल्या चौदा दिवसांत परदेश प्रवास करून आलेले रहिवासी आणि पाहुणे यांची माहिती पोलिसांना देणं आवश्यक आहे. पण विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियमांत स्पष्टता नाही. पण आमचं म्हणणं समजून न घेता तक्रारी झाल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.

बचाव मोहिमेवर निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातले कर्मचारी

फोटो स्रोत, Twitter / @AirIndiaIN

"मला इतकं निराश वाटलं,की मी माझं कर्तव्य केल्यावर आणि समाजाविषयीची जबाबदारी ओळखून वागल्यावरही मला माझ्याच इमारतीतल्या लोकांनी गुन्हेगारासारखं वागवलं. विरोधाभास असा की काही तास आधीच सगळा देश माननीय पंतप्रधानांनी सांगितलेलं ऐकत आमच्यासाठी टाळ्या वाजवत होता."

कर्मचाऱ्यांना काय त्रास होत आहेत?

हा मुद्दा फक्त विमानातले कर्मचारी आणि गृहनिर्माण संस्थांपुरता मर्यादित नाही. दिल्ली आणि मुंबईत लॉकडाऊन सुरू झाल्यावर विमानतळावर काम करणाऱ्या अन्य अनेक व्यक्तींनाही घरातून विमानतळापर्यंत प्रवासात अडथळे आले. काहींना अडवण्यात आलं.

दिल्लीत स्थानिक यंत्रणेनं घरी विलगीकरणात असलेल्या लोकांच्या दरवाजावर स्टिकर्स लावले आहेत, जेणेकरून लोक त्या घरातल्यांपासून दूर राहतील. पण या स्टिकर्समुळे उलट विमान कर्मचाऱ्यांना भेदभावाला सामोरं जावं लागत असल्याचा व्हीडिओ एकानं शेअर केला आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

प्रश्न फक्त एअर इंडियापुरता मर्यादित नाही. कोलकात्यात इंडिगोच्या एका फ्लाईट अटेंडंटनं तिचा अनुभव काही दिवसांपूर्वीच व्हीडियोद्वारा सोशल मीडियावर मांडला होता. गाडीतून जाताना रडू आवरत ती म्हणते, "आमची आंतरबाह्य तपासणी झालेली आहे आणि आम्ही तुमच्यापेक्षा जास्त सुरक्षित आहोत. आम्ही जास्त काळजीही घेत आहोत.

"जिथे बऱ्याच जणांना आजाराची लागण झाली असू शकते अशा जागी असूनही आम्हाला माहीत असतं आम्ही काय करायला हवं. मला लागण झाली असेल तर मी कामावर जाण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये जाईन. मला माझं शरीर काम करू देणारच नाही. माझी विनंती आहे, की आम्ही कोरोना विषाणू पसरवतो अशा अफवा पसरवू नका."

या घटनेनंतर इंडिगोनंही एक पत्रक जाहीर केलं आणि कंपनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत असल्याचं सांगितलं. तसंच लोकांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना विषाणूविरोधातल्या लढाईत आघाडीवर असलेल्यांसाठी टाळ्या वाजवल्या, त्यात विमानसेवेतील लोकांचाही समावेश होतो, याकडे लक्ष वेधून घेतलं.

हा व्हीडिओ व्हायरल झाल्यावर कोलकाता पोलिसांनाही कारवाई केली आहे आणि तिला सुरक्षिततेची ग्वाही दिली आहे.

विमान कर्मचारी सुरक्षिततेची काळजी कशी घेतात?

रविवारी जाहीर केलेल्या निवेदनातच एअर इंडियानं अशा वैश्विक साथीच्या संकटकाळात विमानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणती काळजी घ्यावी लागते, याविषयी माहिती दिली आहे.

"प्रभावित देशांतून आलेले कर्मचारी घरी विलगीकरणात राहतात किंवा तपासणीसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. आपलं कर्तव्य बजावणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी आम्ही घेत असतो."

एखाद्या विमानात कोव्हिड-19 चे संशयित रुग्ण असतील तर कर्मचारी संपूर्ण शरीर झाकणारा हॅजमट सूटही घालतात.

एअर इंडिया

फोटो स्रोत, Twitter / @AirIndiaIn

"अशा प्रसंगी देशाला मदत करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. परदेशातून आपल्या लोकांना परत आणण्यात आम्ही पहिला आणि मोठा वाटा उचलतो. एअर इंडिया सगळी खात्री करूनच आम्हाला अशा मोहिमानंवर पाठवते. कर्मचाऱ्यांना त्यासाठी योग्य ट्रेनिंग आणि घरी आल्यावर त्यांनी काय करायचं या नियमांची माहिती दिलेली असते आणि आम्ही ते सर्व नियम कटाक्षानं पळतो," एअर इंडियाच्या एका माजी पायलटनं नाव न घेण्याची विनंती करत हे सांगितलं.

लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे एअर इंडिया आर्थिक संकटातून जाते आहे आणि तिच्या खासगीकरणाची चर्चा सुरू आहे. पण देशातली सार्वजनिक मालकीची एकमेव विमानसेवा म्हणून एअर इंडियानं कोव्हिड-19 च्या साथीदरम्यान चीन, जपान, इटली, इराण आणि इतर ठिकाणी अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

याआधीही अनेकदा एअर इंडियानं लोकांना सुरक्षित घरी आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 1991 साली आखाती देशांत युद्धादरम्यानच्या 'एअरलिफ्ट' वर तर एक बॉलिवुडपटही बनवण्यात आला आहे.

2003चं इराक युद्ध असो, 2006 साली लेबनॉनमधलं युद्ध किंवा 2011 साली लिबियातलं युद्ध, अशा कठीण प्रसंगांत एअर इंडियानं भारतियांना सुखरूप मायदेशी आणलं आहे.

हेही नक्की वाचा -

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)