कोरोना व्हायरस : भारतातलं कोणतं शहर लॉकडाऊन झालंय?

फोटो स्रोत, ARUN KULKARNI/BBC
कोरोना व्हायरसमुळे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं कलबुर्गी हे भारतातलं पहिलं शहर बनलं आहे. उत्तर कर्नाटकमधल्या याच शहरात Covid-19 मुळे पहिला बळी गेला होता.
मृत व्यक्ती काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियामधून परतले होते. सरकारनं त्यांच्या संपर्कात आलेल्या दोनपेक्षा अधिक व्यक्तींना शोधून काढलं आहे.
76 वर्षीय वृद्ध गृहस्थ सौदी अरेबियामधून धार्मिक यात्रा करून परतले होते. त्यानंतर तब्येत बिघडल्यावर आधी त्यांच्यावर कलबुर्गीमधल्या घरी आणि नंतर हैदराबादमधल्या एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना हैदराबादहून कलबुर्गीमधल्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणलं जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्यांचे रिपोर्ट समोर आले. त्यामध्ये त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं.
कोरोनामुळे देशातला पहिला मृत्यू झाल्यानंतर सगळं शहर जवळपास ठप्पच झालं. राज्यसभेचे माजी खासदार असलेल्या 82 वर्षीय केबी शनप्पांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कलबुर्गीमध्ये असं काही घडल्याचं पाहिलं नाहीये. सगळीकडे प्रचंड सामसूम आहे. असं वाटतंय, की कर्फ्यू लागला आहे.

- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा -वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात

माजी पत्रकार आणि शहरातील विद्यापीठात शिकवणारे टी.व्ही. शिवानंद सांगतात, "सरकारी कार्यालयं बंद आहेत. केवळ नगर परिषदेच्या काही महत्त्वाच्या सेवा सुरू आहेत. दुकानं आणि उद्योग बंद आहेत. पण अगदी चहाची दुकानंही बंद आहेत. किराणा मालाची दुकानं मात्र अजूनही सुरू आहेत."
Covid-19 च्या रुग्णावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांचीही कोरोनाची चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याचबरोबर Covid-19 च्या रुग्णाच्या मुलीचीही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
कलबुर्गीचे उपायुक्त शरत बी यांनी सांगितलं, की चार अजून सँपल्सचे रिपोर्ट येणं बाकी आहे.
शरत बी यांनी सांगितलं, "शहर आणि जिल्ह्यामधल्या सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीची सेवा मर्यादित करण्यात आली आहे. सरकारी आणि खाजगी कार्यालयं बंद करण्याचे आदेश आधीच देण्यात आले आहेत.
मशिदीमधून करण्यात आली सूचना
Covid-19 मुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 71 आणि त्यानंतर अन्य 243 लोकांचाही शोध घेतल्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. शहर आणि जिल्ह्यामध्ये या व्यक्तींना शोधण्यासाठी घोषणा देण्यात आल्या, त्यासाठी मशिदींचा वापर झाला.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्यानं सांगितलं, "सौदी अरेबियामधून परत आल्यावर संबंधित व्यक्ती नेमकी कोणाकोणाला भेटली याचा तपास लावणं तसं कठीण होतं. म्हणूनच आम्ही त्यासाठी मशिदीमधून घोषणा दिली.

फोटो स्रोत, ARUN KULKARNI/BBC
उपायुक्त शरत बी यांनी सांगितलं, "एकूण 516 लोकांना त्यांच्याच घरात देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे."
या 516 लोकांपैकी 202 लोक नुकतेच परदेशातून परत आले आहेत.
अर्थात, कलबुर्गीमध्ये अधिकृतरित्या कलम 144 लागू करण्यात आलं नाहीये.
'1993 नंतर पहिल्यांदाच कर्फ्यूसारखी परिस्थिती'
आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "शटडाऊनचा निर्णय जिल्हा प्रशासनचा आहे. Covid-19 ला रोखण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत."
आमदार आणि माजी मंत्री प्रियांक खरगेंनी सांगितलं, की अशापद्धतीनं कठोर पावलं उचलणं ही सध्याच्या परिस्थितीतली महत्त्वाची गरज होती.

फोटो स्रोत, ARUN KULKARNI/BBC
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायुक्तांनी वेगवेगळ्या समुदायाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
उत्तर कर्नाटकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, "कोणत्याही नियमांचा धाक दाखवण्याची गरज नाहीये. जर तुम्ही स्थानिकांशी संवाद साधला आणि प्रत्येक भागाभागात सूचना केल्या तर सकारात्मक संदेश जाऊ शकतो. कलबुर्गीमधल्या लोकांनीही आमचं ऐकत परिस्थितीचं गांभीर्य समजून घेतलं आणि घरांमध्येच राहण्याचा निर्णय घेतला."
शिवनंदन यांनी सांगितलं, "1993 च्या दंग्यांनंतर हे शहर असं कधीच बंद झालं नव्हतं. कर्फ्यू न लावताही कलबुर्गीमध्ये कर्फ्यूची परिस्थिती निर्माण झालीये."
भारतात दुसरी स्टेज
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर आरोग्य विभागाच्या कर्माचाऱ्यानं सांगितलं, "हा बंद आवश्यक होता. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखणं खूप आवश्यक होतं. नाहीतर आपण Covid-19 च्या तिसऱ्या स्टेजवर पोहोचू."
याच आठवड्यात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने म्हटलं होतं, की भारत सध्या Covid-19 च्या दुसऱ्या टप्प्यावर आहे.
सध्याच्या घडीला परदेशातून आलेल्या लोकांमध्येच मुख्यतः कोरोनाचा संसर्ग पाहायला मिळत आहे. त्यांच्या संपर्कात पहिल्यांदा जे लोक आले त्यांचं अलगीकरण करण्यात आलं आणि जे सेकंडरी कॉन्टॅक्ट होते, त्यांना 14 दिवसांपर्यंत घरातच राहण्यासाठी सांगितलं गेलं.
तिसऱ्या स्टेजमध्ये विषाणूचा संसर्ग स्थानिकांमध्ये पसरायला लागतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








