इंदुरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्याला शास्त्राचा आधार आहे का?

इंदुरीकर महाराज

फोटो स्रोत, Facebook

    • Author, श्रीकांत बंगाळे आणि प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

'स्त्रीसंग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते,' या वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर गर्भलिंग निदान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. त्यावर आज (7 ऑगस्ट 2020) संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. हा वाद नेमका काय आहे यासंदर्भात बीबीसी मराठीने आधी केलेली बातमी पुन्हा शेअर करत आहोत.

महिलांविषयी केलेल्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी अहमदनरगच्या PCPNDT समितीनं त्यांना नोटीस पाठवली होती. हे विधान करताना इंदुरीकरांनी पुराणातले दाखले दिले. या वक्तव्याला गुरुचरित्राचा आधार आहे, असं त्यांच्या अनेक पाठीराख्यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.

इंदुरीकरांच्या वक्तव्याला शास्त्राचा आधार आहे का, हे आपण तपासून पाहणार आहोत. पणृ त्याआधी इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणाले ते पाहूया. नवी मुंबईतल्या उरण येथे जानेवारी महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला. 2 जानेवारीला झालेल्या किर्तनात इंदुरीकर महाराजांनी हे वक्तव्य केलं होतं.

ते म्हणाले होते, "कपाळ म्हणजे काय याचं उत्तर सांगतो. स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्रीसंग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. याचा पुरावा विचाराल तर पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीसोबत सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले आणि आदिती नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संग केला, तर त्याच्यापोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूनं नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला."

इंदुरीकर महारांजांनी पहिल्यांदाच असं वक्तव्य केलंय असं नाही. त्यांनी आपल्या कीर्तनांत यापूर्वीही अशी विधानं केली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेलदमध्ये फेब्रुवारी 2019मध्ये केलेल्या कीर्तनात त्यांनी हेच वक्तव्य केलं होतं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

त्यावेळी ते म्हणाले होते, "आता डॉक्टर 3 महिन्यांनतर चेक करतो की होणारं बाळ पोरगं आहे की पोरगी आहे. एका मिनिटात सांगूनच टाकतो तुम्हाला पोरगा पाहिजे की पोरगी. स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्रीसंग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. टायमिंग हुकला की क्वालिटी खराब."

याच कीर्तनात त्यांनी पुढे हेसुद्धा म्हटलंय की, "सोमवारी, एकादशीला स्त्रीसंग करणाऱ्या माणसाला क्षयरोग होतो."

इंदुरीकरांच्या वक्तव्यावर टीका व्हायला लागल्यानंतर आणि त्यांना अहमदनरगच्या PCPNDT समितीनं नोटीस पाठवल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून एक फोटो व्हायरल करण्यात आला आहे. त्यात इंदुरीकरांचं वक्तव्य हे गुरुचरित्रातल्या 37व्या अध्यायातील आहे, असं सांगण्यात आलं आहे.

गुरुचरित्र

गुरुचरित्रातल्या 37व्या अध्यायात म्हटलंय की,

ऋतु देता चतुर्थ दिवसी । पुत्र उपजे अल्पायुषी । कन्या होय पाचवे दिवसी । सहावे दिनी पुत्र परियेसा ॥

विषम दिवसी कन्या जाण । सम दिवसी पुत्र सगुण । दहा दिवस ऋतुकाळ खूण । चंद्रबळ असावे ॥

या संदर्भाविषयी अधिक जाणून घेण्याकरता आम्ही गुरुचरित्राचे अभ्यासक आणि राशिचक्रकार शरद उपाध्ये यांच्याशी संपर्क साधला.

शरद उपाध्ये म्हणतात की इंदुरीकरांनी जे वक्तव्य केलं त्याचा संदर्भ गुरुचरित्रात आहे, पण जर तो संदर्भ इंदुरीकरांनी संदेश म्हणून दिला असेल, तर ते चुकीचं आहे.

इंदुरीकर महाराज

फोटो स्रोत, KIRAN GUJAR

फोटो कॅप्शन, इंदुरीकर महाराज

उपाध्ये म्हणतात, "इंदुरीकरांनी जे वक्तव्य केलं, त्याविषयी गुरुचरित्रात लिहिलं आहे. पण इंदुरीकरांनी जसं सांगितलं त्यातून लोकांनो तुम्ही कृती करा, असा अर्थ होतो आणि तो चुकीचा आहे.

"अलीकडच्या काळात मुली इतक्या उत्तम काम करत आहेत की कुणी मुलगा व्हायची अपेक्षाही करणार नाही. पण अशा पद्धतीनं कीर्तनकार लोकांना मुलगा व्हायचा संदेश देत असेल तर तो चुकीचा आहे. अशा प्रकारचा संदेश देऊ नका, अशी वॉर्निंग शासनानं त्यांना द्यायला हवी."

आयुर्वेद अभ्यासातही मुलगा-मुलगी भेद

याशिवाय आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातही लिंगनिदानाचा संदर्भ आढळतो. आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातील सार्थ वाग्भट संहितेतील शरीरस्थान अध्यायात याचा समावेश करण्यात आला आहे.

त्यात लिहिलंय, "ऋतुकाळाची मर्यादा 12 रात्री, त्यात पहिल्या 3 आणि 11वी रात्र संभोगसुखास वर्ज्य आहे. सम रात्री (4,6,8,10,12) संभोग केला असता पुत्र होतो आणि विषम रात्री (5,7,9) संभोग केल्यानं कन्या होते."

आयुर्वेद अभ्यासक्रम, इंदुरीकर

आयुर्वेदात अभ्यासक्रमातील या संदर्भाविषयी आयुर्वेदाचे डॉ. संदीप कोतवाल सांगतात, "इंदुरीकर महाराजांनी मुलगा आणि मुलीच्या जन्माचा दिलेला रेफरन्स आयुर्वेदातला आहे. आयुर्वेदाच्या पदवी आणि पदव्युत्तरच्या अभ्याक्रमातही त्याचा समावेश आहे. परीक्षेतही याबाबत विचारलं जातं."

पुत्रप्राप्तीसाठी प्रोत्साहन देणं योग्य वाटतं का, याविषयी ते सांगतात, "आयुर्वेद शास्त्रात 5000 वर्षांपूर्वी लिंगनिदानाच्या पद्धती दिल्या आहेत. त्याकाळी उपयोगात आणलेल्या गोष्टी आज तंतोतंत उपयोगात आणल्या जाऊ शकत नाही.

"इंदुरीकरांनी दिलेला संदर्भ आयुर्वेदातला आहे असं सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी होत आहे. पण, या कायद्याअंतर्गत इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही. कारण, आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमाचा PCPNDT कायद्यात समावेश नाहीये. गुन्हा दाखल करायचा असेल, तर आधी केंद्र सरकारच्या मंजुरीनं हा अभ्यासक्रम PCPNDT कायद्यात आणावा लागेल," असंही ते सांगतात.

भाकडकथा?

लिंगनिदानाविषयी अशा पद्धतीचं वक्तव्य म्हणजे भाकडकथा आहेत, असं मत स्त्रीहक्क कार्यकर्त्या किरण मोघे मांडतात.

त्या म्हणतात, "इंदुरीकर महाराजांनी केलेलं वक्तव्य कालबाह्य आहे. सध्या आपण आधुनिक युगात राहतो. जिथं विज्ञानानं सिद्ध केलं आहे की, मुलगा कशामुळे होतो आणि मुलगी कशामुळे होते. बाकी सगळ्या भाकडकथा आहेत."

"आयुवेर्दाचं म्हणाल तर आयुर्वेदातल्या अनेक गोष्टी अजून सिद्ध झालेल्या नाहीयेत. कुणा एका दिवशी स्त्रीसंग केल्यास पुत्रप्राप्ती होते, हे सिद्ध करण्याइतपत सखोल अभ्यास कुणी केलेला नाहीये. त्यामुळे या गोष्टीला वैज्ञानिक आधार नाहीये," त्या पुढे म्हणतात.

इंदुरीकर महाराज

फोटो स्रोत, KIRAN GUJAR

वडाच्या पारंब्यांचा वापर करून पुत्रप्राप्ती होते, असंही आयुर्वेदातील प्रसूतिशास्त्राच्या अभ्यासक्रमात सांगण्यात आलं आहे. यावरून वाद झाला आहे. अभ्यासक्रमातून हा भाग वगळण्यात यावा, अशी मागणी त्यावेळी जोर धरली होती. याविषयी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.

या पूर्ण प्रकरणाविषयी आम्ही इंदुरीकर महाराजांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)