देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्रात भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. महाराष्ट्रात भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही- फडणवीस
जोपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार नाही, तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले, "मी मैदान सोडून पळणाऱ्यातला नाही. जोपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येणार नाही, तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपचं सरकार आल्याशिवाय दिल्लीवारी नाही".
"ठाकरे सरकार हे विश्वासघातकी सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही. हे सरकार प्रगती नाही, तर स्थगिती सरकार आहे," असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
2. हिंगणघाट: आरोपीला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी
हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणातील आरोपीला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी मध्यरात्री न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयानं रात्री 12.25 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेतली आणि आरोपीला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

फोटो स्रोत, PRAVEEN MUDHOLKAR
हिंगणघाट येथे शिक्षिकेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला अगोदर 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
सध्या पीडित शिक्षिकेची तब्येत खालावली असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
3. अर्थव्यवस्था सांभाळण्यात मोदी सरकार सक्षम नाही: चिदंबरम
देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्यात मोदी सरकार असक्षम असल्याची टीका काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसकडून आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले, "हा अर्थसंकल्प म्हणजे एखादा रुग्णाची तब्येत अत्यंत खालावलेली आहे. पण, त्याला बरे करण्यात डॉक्टर मात्र सक्षम नाही."
"रोगाचं निदान करण्याची क्षमता ज्यांच्यात आहे, ते माजी आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांच्यासारख्यांना सरकारनं बाहेर काढलं आहे," असंही ते पुढे म्हणाले.
4. CAA: मुंबईतल्या 300 आंदोलकांवर गुन्हे दाखल
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NPR) यांच्याविरोधात गेल्या 2 आठवड्यांपासून मुंबईतल्या नागपाडा येथे आंदोलन करणाऱ्या 300 आंदोलकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. द वायरनं ही बातमी दिली आहे.
या आंदोलनाच्या आयोजकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी शुक्रवारी संध्याकाळी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे.
त्यामध्ये म्हटलं आहे की, आंदोलकांनी मोरलँड रोडवर एक व्यासपीठ तयार केलं आहे आणि रस्त्यावर खुर्च्या ठेवल्या आहेत. त्यामुळे भागातील वाहतूक व्यवस्था डिस्टर्ब झाली आहे.
5. उद्योगपती काकासाहेब चितळे यांचे निधन
उद्योगपती आणि चितळे उद्योग समूहाचे संचालक काकासाहेब चितळे (वय 79) यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं शनिवारी निधन झालं. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
चितळे यांना मिरजेच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.
मॅकेनिकल इंजिनिअरचं शिक्षण घेतल्यानंतर ते वडील बाबासाहेब चितळे आणि भावंडांसोबत चितळे उद्योग समूहामध्ये कार्यरत राहिले.
चितळे डेअरी ही दुग्धोत्पादक संस्था सांगलीतील पलूस तालुक्यातील भिलवडी गावात 1939मध्ये सुरू झाली. भास्कर चितळे यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्यासोबतीला दुसऱ्या पिढीतीले भाऊसाहेब आणि काकासाहेब चितळे यांनी हा व्यवसाय आणखी वाढीस नेला.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









