हिंगणघाट : 'त्या' मुलालाही तशीच कठोर शिक्षा व्हावी - पीडितेच्या आईची व्यथा

हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून पेटविण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती चिंताजनक असून पुढचे 72 तास तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर दर्शन रेवनवार यांनी दिली.
या पीडित तरुणीच्या चेहेऱ्याला आणि श्वसननलिकेला गंभीर इजा झाली आहे. त्वचेचे पाचही थर जळाल्यामुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका आहे. त्याबाबत येत्या 1-2 दिवसात अंदाज येईल. तिला देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनच्या मात्रेत वाढ केली असून तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू या पीडित तरूणीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
"त्या मुलाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितेच्या आईनं केली आहे. काही दिवसांपूर्वी त्या मुलाला समज दिली होती. मात्र त्यानं आमचं ऐकलं नाही. त्यानंतर असं काही होईल हे आम्हाला वाटलं नव्हतं," असंही पीडितेच्या आईनं सांगितलं.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
"माझ्या मुलीचा चेहरा पूर्ण खराब झाला आहे. शासनाने आम्हाला उपचारासाठी पूर्ण मदत द्यावी," अशी पीडितेच्या आईची मागणी आहे.
एक सामान्य शेतकरी असल्याने रुग्णालयातील उपचाराचा खर्च झेपणारा नसल्यानं शासनाने काही मदत करावी अशी मागणी पीडितेच्या वडिलांनीही केली आहे. तसंच आरोपीवरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशीही त्यांची मागणी आहे.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनीही लोकसभेत हा मुद्दा मांडला. आपण बेटी बचाओ, बेटी पढाओ असं म्हणत आहोत. पण खरंच रस्त्यावर मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
नेमकं काय घडलं होतं?
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातली 'ती' 25 वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. आपल्या पाठलागावर कोणी आहे, याची तिला जाणीवही नव्हती.
'ती' हिंगणघाटातील नंदेरी चौकात पोहोचली, तेव्हा मागावर असणाऱ्या तरुणानं तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि तिला पेटवून दिलं. त्यानंतर जराही न थांबता हा आरोपी तिथून फरार झाला.
या घटनेत पीडिता 32 ते 40 टक्के भाजली आहेत. तिच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव भिकेष उर्फ विक्की नगराळे (27 वर्ष) असं आहे. पोलिसांनी आरोपी विक्कीला टाकळघट परिसरातून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी विक्कीवर कलम 307 अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी मातोश्री आशाताई कुमावार महिला महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापिका आहे.
हा आरोपी नेहमी तरुणी ज्या बसने हिंगणघाटला येत असे त्याच बसमधून प्रवास करत असे. सोमवारी (3 फेब्रुवारी) मात्र त्याने बसने प्रवास केला नाही. तो तरुणीच्या आधीच घटनास्थळी दाखल झाला असावा, असं सांगण्यात येत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हिंगणघाट चौकात उतरल्यानंतर ही तरुणी काही अंतरावर असलेल्या महाविद्यालयात पायी जात असे. ही घटना घडल्यानंतर आजुबाजूच्या लोकांनी धाव घेतली. आरडाओरडा ऐकून आजुबाजूच्या लोकांनी तातडीने पीडित तरुणीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी नंतर पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिंटी हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे. तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. या हल्ल्यात तिचा चेहरा पूर्णत: भाजला असून तिची वाचाही गेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चेहरा, मान भाजल्यामुळे पीडितेला गंभीर दुखापत झाली असून तिच्या श्वसननलिकेलाही त्रास झाल्याचं डॉ. अनुप मरार यांनी सांगितले. तिच्यावर उपचारासाठी डॉक्टरांची विशेष टीम ठेवण्यात आली आहे.
एकतर्फी प्रेमातून हल्ला?
पीडित तरुणी आणि आरोपी दोघेही एकाच दारोडा गावाचे रहिवाशी आहेत. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विक्की आणि पीडित तरुणीचा तीन महिन्यांपूर्वी बसमध्ये वाद झाला होता. पीडित तरुणीची इच्छा नसताना विक्की तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तरुणीने याबाबत आपल्या कुटुंबियांना कळवलं होतं.
आरोपी विक्कीने शांत डोक्याने नियोजन करुन तरुणीवर हल्ला केल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस महानिरिक्षक मलिक्कार्जुन प्रसन्ना आणि वर्ध्याचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळ गाठून आरोपीची चौकशी सुरू केली आहे.
वर्धा हिंगणघाट प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.
"हिंगणघाटमधील महिला प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार म्हणजे क्रूरतेची परिसीमा आहे. शिक्षणाचा टक्का वाढला तरी महिलांना खाजगी मालमत्ता समजणे, त्यांना धमकवणे आणि जर त्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या असतील, 'ऐकण्यात' नसतील तर त्यांना 'अद्दल घडवणं' आणि प्रसंगी त्यांना गंभीर इजा होईल असं कृत्य करण्याचे प्रमाण वाढत आहे," असं वी 4 चेंजच्या डॉ. रश्मी पारसकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.
महाराष्ट्र खरंच प्रगतिशील आहे, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी पारसकर यांनी म्हटलं, की आई नसलेल्या मुलीवर वडील, भाऊ, मावशीच्या नवऱ्यानं वारंवार बलात्कार करण्याचं प्रकरण समोर आलं. त्याआधी एका कामगार महिलेवर बलात्कार करून तिला इजा करण्याचं प्रकरण समोर आलं होतं.
"महिलांवर अत्याचार करताना पुरुषांना भीती वाटत नाही हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना क्लिष्ट न्यायालयीन प्रक्रियेमुळे अजूनही फाशी झाली नाही. मग बलात्कार करताना, बाईला जळताना, अॅसिड फेकताना कोण घाबरणार?" असं पारसकर यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









