Sharjeel Imam: JNUच्या शरजील इमामला अटक झाली की त्याने शरणागती पत्करली?

शरजील इमाम

फोटो स्रोत, Reuters

    • Author, नीरज प्रियदर्शी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी काको (जहानाबाद) हून

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पीएचडी करणाऱ्या शरजील इमाम याला देशविरोधी आणि प्रक्षोभक भाषण देण्याच्या कथित आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे.

शरजीलला बिहारच्या जहानाबादमध्ये त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी शरजीलला अटक केली, असं माध्यमांमधून सांगितलं जात आहे. मात्र दिल्ली पोलिसांना घरी बोलावून त्यानं आत्मसमर्पण केलं, असं शरजीलच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

शरजीलची आई अफसां रहीम यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "जर आम्हाला शरजीलबद्दल काही समजलं तर आम्ही स्वतः त्याला तुमच्या ताब्यात देऊ, असं आम्ही पोलिसांना सांगितलं होतं.

"शरजील दिल्लीतील त्याच्या मित्रांसोबत घरी आला. मला भेटला. घरातील सगळ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर आम्ही दिल्ली पोलिसांना त्याच्याबद्दल सांगून इथं बोलावून घेतलं. शरजीलनं त्यानंतर आत्मसमर्पण केलं."

News image

दिल्लीचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) राजेश देव यांनी शरजीलच्या अटकेनंतर एक व्हीडिओ प्रसिद्ध करत म्हटलं, "शरजीलला त्याच्या घराजवळून अटक करण्यात आली आहे. आपण सरेंडर केल्याचं शरजीलनं म्हटलं आहे. मात्र यामध्ये काही तथ्यं नाही, कारण सरेंडर कोर्टात केलं जातं.

शरजीलच्या अटकेबद्दल बोलताना बिहारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जितेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे, की ही दिल्ली पोलीस, अलीगढ पोलीस आणि बिहार पोलिसांची संयुक्त कारवाई होती. यामध्ये बिहार पोलिसांनी पूर्ण सहकार्य केलं आहे.

शरजीलच्या विरोधात दिल्ली, आसाम आणि अलिगडमध्ये देशद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. दिल्लीतील शाहीनबागमध्ये सुरू असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधातील आंदोलनात भाषण करतानाचा त्याचा एक वादग्रस्त व्हीडिओ व्हायरल झाला होता.

त्यात "जर आपल्याला आसामच्या लोकांची मदत करायची असेल तर त्याला बंद करून भारतापासून वेगळं करायलं हवं. आपण एकत्र आलो तर अख्खा ईशान्य भारत मुख्यभूमीपासून वेगळा करू शकतो. आसाम आणि भारत यांच्यातला संपर्क तुटेल तेव्हाच हे लोक आसामच्या लोकांचं म्हणणं ऐकतील," असं बोलताना तो या व्हीडिओत दिसत होता.

शरजीलला अटक झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं, "नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या शरजील इमाम याचं भाषण JNU विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याच्यापेक्षाही अधिक धोकादायक आहे."

नेमकं काय घडलं?

मंगळवारी (28 जानेवारी) सकाळी शरजील इमामचा मोठा भाऊ मुजम्मिल इमामला ताब्यात घेतलं गेलं होतं. सोमवारीही (27 जानेवारी) तीन लोकांना अटक करण्यात आली होती. मात्र चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आलं होतं.

मुजम्मिल इमामच्या अटकेनंतर दबाबात येऊन शरजील आत्मसमर्पण करेल, असा पोलिसांचा अंदाज होता.

जहानाबादच्या काकोमध्ये ज्यावेळी शरजील इमामला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते, त्यावेळी आम्हीही त्या गावात उपस्थित होतो.

काको बाजाराच्या जवळ NH 10 पासून जो रस्ता शरजीलच्या घराकडे जातो, त्या रस्त्याला त्याच्याच वडिलांचं नाव आहे - अकबर इमाम पथ.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

या रस्त्यावरून थोडं पुढं गेलं, की तोफेची एक प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. तिथे काही लोक उभे होते.

शरजीलचा पत्ता विचारल्यानंतर लोकांनी एका पडक्या घराकडे बोटं दाखवलं आणि सांगितलं, की आता इथं कोणीच राहत नाही.

लोकांनी सांगितलं, "याला घर नाही कोठी म्हणतात. ही कोठी शरजीलच्या वडिलांना, अकबर इमाम यांना फाळणीच्या वेळेस मिळाली होती. शरजील आणि मुजम्मिल तिथं नवीन बांधकाम करण्याची तयारी करत होते, म्हणूनच ही कोठी पाडण्यात आली."

शरजीलची आई गावी आली असल्याची माहिती आमच्याकडे होती. त्याबद्दल विचारल्यावर गावकऱ्यांनी म्हटलं, की त्या बोलण्याच्या अवस्थेत नाहीयेत.

खरंतर यातले अनेक लोक शरजील-मुजम्मिलचे नातेवाईक आणि शेजारीपाजारी होते. पण ते मोकळेपणानं बोलायला घाबरत होते, कारण पोलिसांनी मुजम्मिलला ताब्यात घेतलं होतं.

पोलीस स्टेशनबाहेर जमलेली गर्दी

फोटो स्रोत, NEERAJ PRIYADARSHY /BBC

फोटो कॅप्शन, पोलीस स्टेशनबाहेर जमलेली गर्दी

शरजीलचा चुलत भाऊ सज्जादने सांगितलं की "पोलीस कुणालाही ताब्यात घेत आहे. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांना तर पकडत नाहीयेत. पण ज्यांचा त्या आरोपांशी काहीही संबंध नाही, त्यांना मात्र ताब्यात घेतलं जातंय. आम्ही काही बोललो तर आम्हालाही पकडतील."

शरजील इमामबद्दल त्यांना काय वाटतं, हे विचारल्यावर सज्जाद यांनी म्हटलं, "शरजीलसारख्या मुलावर देशद्रोहाचे आरोप लागल्यामुळे आम्हाला धक्काच बसला आहे. तुम्ही काकोमधल्या कोणालाही विचारा, मग तो हिंदू असो वा मुसलमान, सगळेजण त्याच्याबद्दल चांगलंच बोलतील.

"IITमधून इंजिनीअर बनलेला तो तालुक्यातील पहिला मुलगा होता. ऑल इंडिया कॉम्पिटिशनमध्ये त्याचा 208वा क्रमांक होता. त्याच्याकडून प्रेरणा घेत काकोमध्ये अनेक लोक इंजीनिअर बनले होते. आजही इथली मुलं त्याला आदर्श मानतात," असं सज्जादने सांगितलं.

कोण आहे शरजील इमाम?

शरजीलचे वडील अकबर इमाम यांचीही या भागातील प्रतिमा चांगली आहे. त्यांनी दोन वेळा विधानसभेची निवडणूकही लढवली होती.

2005 मध्ये त्यांनी जनता दला युनायटेडच्या (JDU) तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते 2,250 मतांच्या फरकानं पराभूत झाले होते.

शरजीलच्या आत्याचे पती मुमताज उल् हक सांगतात, "अकबर यांनी 2005 साली जेव्हा निवडणूक लढली होती, तेव्हा बिहारमध्ये JDU आणि भाजपनं मिळून निवडणूक लढवली होती. भाजपनं इथून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणाही केली होती. मात्र अकबर यांची प्रतिमा अशी होती, की ही जागा भाजपला JDU साठी सोडावीच लागली. अरुण जेटलींनी त्यांचं कौतुक केल्याचं मी स्वतः पाहिलं आहे."

शरजीलचे काका अरशद इमाम

फोटो स्रोत, NEERAJ PRIYADARSHY /BBC

फोटो कॅप्शन, शरजीलचे काका अरशद इमाम

वडिलांच्या मृत्यूनंतर शरजीलचा भाऊ मुजम्मिलने तिथल्या राजकारणाची धुरा सांभाळली. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ते JDU मध्ये सक्रीय होते.

मात्र शरजीलनं कधीच स्थानिक राजकारणात भाग घेतला नाही. त्याचा चुलत भाऊ दानिश सांगतो, "एकतर तो गावाकडे कमीच यायचा. आमच्या गल्लीतील अनेक तरुण मुलं त्याला चेहऱ्यानं ओळखतही नाहीत. त्यानं जेव्हा IIT मध्ये प्रवेश घेतला, तेव्हाच आम्हाला त्याच्याबद्दल कळलं."

शरजीलचं प्राथमिक शिक्षण काकोमधूनच झालं. त्यानंतर त्यानं पटनामध्ये सेंट झेव्हिअर्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तिथून DPS वसंत कुंज आणि त्यानंतर IIT पवईमधून कॉम्प्युटर सायन्समधून इंजिनिअरिंगचं शिक्षण, असा त्याचा प्रवास होता. त्यानंतर त्यानं JNU मध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेतला.

पोलीस येणार याची माहिती लोकांनी मिळाली होती. त्यामुळे ते अधिक काही बोलायला तयार नव्हते.

दानिश सांगतो, "आता दिवस आहे, त्यामुळे आम्हाला कळलं की पोलीस येत आहेत. मात्र ते रात्रीही फौजफाटा घेऊन येतात, घरात घुसून तपास करतात."

शरजील इमामची आई
फोटो कॅप्शन, शरजील इमामची आई

त्यानंतर सगळे लोक तिथून आपापल्या घरी गेले. दानिश आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले. तिथे शरजीलची आई होती. शरजीलचे काका अरशद इमाम यांचं ते घर होतं.

शरजीलच्या आईची तब्येत खरंच खूप बिघडली होती. त्या एकदम शांत बसून होत्या. दुपारचे तीन वाजत आले होते. शरजीलचा भाऊ मुजम्मिललाही पोलिसांनी सोडलं नव्हतं. पोलीस मुजम्मिलला अटक करणार नाहीत ना, अशी भीती त्यांना वाटत होती.

पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं?

पोलीस स्टेशनमध्ये काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही काको पोलीस स्टेशनमध्यो पोहोचलो. मात्र आवारात प्रवेश करायला मनाई आहे, असं सांगत पोलिसांनी आम्हाला अडवलं. पोलीस अधीक्षकांनीच आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं.

पोलीस स्टेशनच्या गेटवरच वाट पाहत असताना अचानक मोबाईलवर नोटिफिकेशन आलं, की शरजीलला काको पोलीस ठाण्याच्या हद्दीतच दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

थोड्याच वेळात स्थानिक माध्यमांचे लोकही हजर झाले. मात्र त्यांनाही पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश दिला नाही. दरम्यान, शरजीलला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली होती.

काको पोलीस स्टेशनबाहेर गर्दी जमली होती. नॅशनल मीडियापर्यंतही शरजीलच्या अटकेची बातमी पोहोचली होती.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

जवळपास दोन तास शरजीलला पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं. पोलीस ठाण्याच्या आवारात अधिकारी सोडून इतर कोणीही प्रवेश करू शकत नव्हतं.

पोलीस स्टेशनमधून शरजीलला जहानाबाद कोर्टात नेण्यात आलं. कोर्टाकडून ट्रान्झिट रिमान्डची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला दिल्लीला आणण्यात आलं.

मात्र शरजीलला केव्हा आणि कुठे पकडण्यात आलं? काही वेळापूर्वी मी शरजीलच्या कुटुंबीयांसोबतच होतो आणि पोलीस तर त्याला घरातून अटक करण्यात आल्याचं सांगत होते.

त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा शरजीलच्या घरी पोहोचलो. यावेळी जास्तच गर्दी जमली होती. जमलेले लोक त्याच्याबद्दलच बोलत होते.

"शरजीलला नेमकी कोठून अटक केली?" असं आम्ही त्याच्या काकांना अरशद यांना विचारलं.

शरजील इमाम

फोटो स्रोत, NEERAJ PRIYADARSHY /BBC

फोटो कॅप्शन, शरजील इमामला पोलिस कोर्टात घेऊन जाताना

त्यांनी सांगितलं, "तिथं आपण आता उभे आहोत, तिथूनच त्याला अटक केली. दिल्ली पोलिसांना इथंच बोलविण्यात आलं होतं. आम्हाला कोर्टात जायची भीती वाटत होती, कारण आजकाल परिस्थिती खूपच बिघडली आहे."

पण अटक झाली केव्हा? अटक झाल्याची जी वेळ सांगण्यात येत होती, त्यावेळेस तर आम्ही तिथेच होतो.

अरशदनं म्हटलं, "जेव्हा तुम्ही पोलिस स्टेशनला जाण्यासाठी निघाला तेव्हा अटक झाली असेल. पण अटक इथूनच करण्यात आली होती, हे आम्ही शपथेवर सांगतो. मीडियामध्ये त्याला अटक केल्याचं सांगितलं जातंय. पण आमच्या मुलानं आत्मसमर्पण केलं आहे."

शरजीलच्या नातेवाईकांशी बोलल्यानंतर समजलं, की ज्यावेळी आम्ही घराबाहेर होतो, तेव्हा शरजील शेजारच्याच घरात होते. त्यांच्यासोबत दिल्लीहून दोन वकीलसुद्धा आले होते, जे पूर्ण वेळ त्यांच्यासोबत होते.

पोलीस स्टेशनमधून कोर्टात नेताना शरजीलला पत्रकारांनी गाडीची काच खाली करण्याची विनंती केली. मात्र पुढे पोलीस अधिकारी बसले होते. शरजीलनं त्यांच्या दिशेनं खूण केली आणि हात जोडले.

पोलिसांचा ताफा शरजीलला घेऊन गेल्यानंतर आम्ही पुन्हा तिथं एकत्र जमलेल्या लोकांशी संवाद साधला.

त्यांच्यापैकी सर्वांनीच शरजीलच्या कुटुंबाबद्दल चांगल्याच गोष्टी सांगितल्या.

आम्हाला शरजीलच्या आईची एक गोष्ट राहून राहून आठवत होती. त्या म्हणत होत्या, "आज जर शरजीलचे वडील असते, तर हे सगळं घडलं नसतं."

स्पोर्ट्सवुमन

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)