CAA ला पाठिंबा नाही, पाकिस्तानी-बांगलादेशी घुसखोरांना विरोध- मनसेची भूमिका #5मोठ्याबातम्या

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. CAA ला पाठिंबा नाही, पाकिस्तानी-बांगलादेशी घुसखोरांना विरोध- मनसेची भूमिका

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आपलं समर्थन नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 9 फेब्रुवारीचा मोर्चा हा पाकिस्तानी-बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी आहे,नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी नाही, असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

News image

मनसेच्या महाअधिवेशनामध्ये राज ठाकरे यांनी घुसखोरांविरोधात मोर्चाची घोषणा केली होती. त्यानंतर मनसेचा CAA-NRC ला पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, प्रसारमाध्यमांकडून या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांनी 'कृष्णकुंज'वर मंगळवारी (29 जानेवारी) मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला पाठिंबा देण्यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नांदगावकर यांनी राज यांची भूमिका स्पष्ट केली.

2. शरजील इमाम कन्हैयाकुमारपेक्षा जास्त धोकादायक : अमित शाह

"शरजील इमामचे बोलणे कन्हैयाकुमारपेक्षा जास्त धोकादायक आहे. आता तो तुरुंगाची हवा खाईल," असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. छत्तीसगढमधल्या रायपूर इथं ते बोलत होते. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ही बातमी दिली आहे.

त्यांनी म्हटलं, की शरजीलचा व्हीडिओ पाहा, त्याचे भाषण ऐका. त्याने कन्हैयाकुमारपेक्षा खतरनाक वक्तव्यं केली आहेत. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला दिल्लीला आणलं जात आहे.'

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

"आज जे देशाची दिशाभूल करत आहेत, मी त्यांना सांगू इच्छितो, की असत्याला कधी पाय नसतात आणि असत्याचं आयुष्य दीर्घ नसतं. कितीही जोर लावला तरी अखेर विजय सत्याचाच होतो," असं अमित शाह यांनी म्हटलं.

3. वादग्रस्त घोषणेसाठी अनुराग ठाकूर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिलीये.

दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अनुराग ठाकूर आणि भाजप खासदार प्रवेश वर्मा यांच्याकडून आचार संहितेचा भंग झाल्याप्रकरणी अहवाल सादर केला आहे.

या अहवालानंतर निवडणूक आयोगाने या दोघांना नोटीस बजावली आहे. आपल्या वक्तव्याबद्दल या दोघांना 30 जानेवारी दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्टीकरण देण्याची मुदत देण्यात आली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दिल्लीतील रिठाला इथं आयोजित केलेल्या एका सभेमध्ये अनुराग ठाकूर यांनी व्यासपीठावरून "देश के गद्दारों को..." अशी घोषणा दिली होती. त्यानंतर त्यांच्या या घोषणेला जमावातून उत्तर आलं, "गोली मारो **** को."

त्यावर अनुराग ठाकूर यांनी पुन्हा म्हटलं की,"आवाज अगदी पाठीमागेही पोहोचला पाहिजे. गिरीराजजींना सुद्धा ऐकू आलं पाहिजे."

4. वुहानमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न

कोरोना व्हायरसने चीनमध्ये शंभरहून अधिक बळी घेतले असतानाच वुहानमध्ये काही भारतीय लोकही अडकून पडले आहेत. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना तेथून परत आणण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

दरम्यान भारतात अजून कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असं आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं आहे.

एस. जयशंकर

फोटो स्रोत, Getty Images

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सात विमानतळावर केली जात होती. आता वीस विमानतळावर ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यात विषाणूच्या संसर्गाचा अंदाज घेतला जातो. पुण्यातील एनआयव्हीशिवाय आणखी चार विषाणू तपासणी प्रयोगशाळा नमुने तपासण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या असल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.

5. शेतकरी कर्जमाफीची अमंलबजावणी होईपर्यंत व्याज आकारणी नाही

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिलासा दिला आहे. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या थकीत खात्यांवर 1 ऑक्टोबर 2019 पासून योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत व्याज आकारणी करू नये, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध सहकारी सोसायट्यांना राज्य सरकारने हे आदेश दिले असून त्यामुळे नव्याने कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना येणारी अडचण दूर होऊ शकते. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीये.

शेतकरी

फोटो स्रोत, Getty Images

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या आणि अशा कर्जाचं पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकीत दोन लाख रुपयांचं कर्ज माफ केले जाणार आहे.

घोषणा झाली असली तरी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम येण्यास वेळ लागणार असल्याने तोपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर व्याज आकारणी करण्यास सरकारने बँका, सोसायट्यांना मनाई केली आहे.

स्पोर्ट्सवुमन

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)