मंत्रिमंडळ विस्तार: पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिपद का मिळालं नाही?

ठाकरे सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, ठाकरे सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण
    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"नव्या सरकारमध्ये तुमचं स्थान काय असेल?" तीन आठवड्यांपूर्वी बीबीसी मराठीनं असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांना विचारला होता. त्यावेळी ते म्हणाले होते, "माझं स्थान माझा पक्ष ठरवेल."

ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात महाविकास आघाडीतले काही नेते मंत्रिपदाची शपथ घेत आहेत, मात्र यापैकी काँग्रेसच्या यादीत 'पृथ्वीराज चव्हाण' हे नाव नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसंच, 'मिस्टर क्लीन' म्हणूनही त्यांना संबोधलं जातं. अशा नेत्याला मंत्रिपद न मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या सगळ्यांवरून दोन प्रश्न प्रामुख्यानं समोर येतात, एक म्हणजे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रिपद का मिळालं नाही? आणि दुसरा प्रश्न म्हणजे, मंत्रिमंडळात नाहीत, मग पक्षसंघटनेत जबाबदारी मिळेल का?

या दोन्ही प्रश्नांचा आढावा बीबीसी मराठीनं घेतलाय.

काँग्रेस आमदारांनाच पृथ्वीराज चव्हाण नकोसे झाले होते - प्रमोद चुंचूवार

काँग्रेस आमदारांनाच पृथ्वीराज चव्हाण नकोसे झाले होते, असं फ्री प्रेस जर्नलचे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार म्हणतात : "मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीतली त्यांच्या कामाची शैली लोकांना आवडली होती. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून ते तडजोड करत नाही, हे मित्रपक्षांनाही कळलं होतं. स्वच्छ आणि कडक शिस्तीचं प्रशासन त्यांनी राबवलं. मात्र हे काँग्रेसच्या आमदारांना आवडलं नाही."

पृथ्वीराज चव्हाण

2014 साली सत्ता गेल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांसोबत कुणीही आमदार दिसायचा नाही. याचा संदर्भ देत प्रमोद चुंचूवार सांगतात, "किंबहुना जयकुमार गोरे, आनंदाव पाटील यांसारखे समर्थक आमदारांनीही पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडली आणि दुसऱ्या पक्षात गेले.

"पृथ्वीराज चव्हाण विद्वान असले तरी मतदारसंघाच्या बाहेर त्यांचा प्रभाव नाही, ते 'मास लीडर' नाहीत. त्यामुळं मास पॉलिटिक्ससाठी त्यांचा फायदा होईल, असं काँग्रेसला वाटलं नसावं. म्हणून त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं गेलं असावं," असं चुंचूवार म्हणतात.

यासंदर्भात महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक सुनील चावके म्हणतात, "पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना संघटनात्मक कौशल्य कुठं दिसलं नाही. सत्तेतील मुख्यमंत्र्याचा पक्ष पातळीवर चांगला संवाद, समन्वय असतो, तसा समन्वय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दिसला नाही."

पृथ्वीराज चव्हाण

फोटो स्रोत, Getty Images

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण नाहीत, हे आता निश्चित झाले आहे. मग पृथ्वीराज चव्हाणांसारख्या नेत्याला कुठलं पदं दिलं जाईल? याचीही चर्चा लगेच सुरू झालीय.

सुनिल चावके यांच्यानुसार पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेस मोकळं ठेवणार नाही, कुठलीतरी जबाबदारी निश्चितच देईल.

पण कुठली? याचाही कानोसा बाबीसी मराठीनं घेतला.

प्रदेशाध्यक्षपद की पुन्हा दिल्लीत?

यासंदर्भात सुनील चावके म्हणतात, "काँग्रेसच्या कार्यकरिणीत फेरबदल झाल्यास सरचिटणीस किंवा अन्य जबाबदारीसाठी पृथ्वीराज चव्हाणांना मोकळं ठेवलं असावं. प्रदेशाध्यक्षपद केलं जाईल अशी आता चर्चा आहे."

"2010 ते 2019 हा नऊ वर्षांचा कालावधी वगळला, तर त्यांची इतर कारकीर्द दिल्लीच्या राजकारणात गेलीय. त्यामुळं तुलनेनं दिल्लीचा अनुभव त्यांचा मोठा आहे," असं सुनील चावके म्हणतात.

मात्र, आता साताऱ्यातील कराड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रीय राजकारणात परततील का, हे पाहावं लागेल.

पृथ्वीराज चव्हाण

फोटो स्रोत, Getty Images

तूर्तास, पृथ्वीराज चव्हाणांसाठी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येण्याची शक्यता वर्तवली जातेय, कारण काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदी विराजमान झालेत.

पृथ्वीराज चव्हाणांना पक्षसंघटनेत पद दिलं तर पक्षाला नक्कीच फायदा होईल, असं प्रमोद चुंचूवार म्हणतात.

"ते राष्ट्रीय राजकारणत होते, त्यावेळी त्यांना काही राज्यांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी तिथं चांगली कामगिरी त्यांनी केली होती. संघटनेचा माणूस म्हणून ते ओळखले जातात. मात्र, प्रदेशाध्यक्षपद हे संघटनेसोबत मास लीडरचंही पद आहे. चांदा ते बांदा प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घ्याव्या लागतात," असं चुंचूवार म्हणतात.

"पण पृथ्वीराज चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर पक्षश्रेष्ठी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास, स्वत:ची स्वच्छ प्रतिमा या सगळ्याचा काँग्रेसला पक्ष संघटना बांधणीत मोठा फायदा होऊ शकतो. पक्षाला वाढवण्याची क्षमता त्यांच्यात नक्कीच आहे," असं म्हणत प्रमोद चुंचूवार सांगतात की, "ते प्रदेशाध्यक्ष झाल्यास त्यांनाही स्वत:ला फायदा होईल, कारण मास लीडर म्हणून त्यांना स्वत:ला समोर आणता येईल."

समन्वय समितीचं अध्यक्षपद मिळेल?

याच संदर्भात काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीनं ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांच्याशी बातचीत केली होती. त्यावेळी त्यांनी अंदाज वर्तवला होता की, पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं जाईल.

पृथ्वीराज चव्हाण

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, पृथ्वीराज चव्हाणांकडे कुठली जबाबदारी दिली जाईल, याबद्दलही प्रशांत दीक्षित यांनी भाष्य केलं होतं. दीक्षित म्हणाले होते, "पृथ्वीराज चव्हाणांची नियमाला धरून निर्णय घेण्याची सवय पाहता, त्यांना किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत स्थान दिलं जाईल. समन्वय समितीचं अध्यक्षपदही त्यांना मिळू शकेल."

"मार्गदर्शक मंडळासारखा त्यांचा वापर केला जाईल. बौद्धिक कामात पृथ्वीराज चव्हाणांचा वापर केला जाऊ शकतो," असंही दीक्षित म्हणाले होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)