पंकजा मुंडे सावरगाव: भगवानगड आणि गोपीनाथगडाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही वर्षांमध्ये भगवानगड आणि गोपीनाथगड ही दोन नावं विशेष चर्चेत येऊ लागली आहेत. एकेकाळी भगवानगड हे नाव मराठवाडा वगळता फारसं लोकांच्या चर्चेत नसायचं.
त्यातल्या त्यात मुंबईमध्ये टॅक्सीमागे मोठ्या अक्षरांमध्ये बांद्रा, अजिंक्यतारा, भगवानगड अशी नावं लिहिलेली असल्यामुळं भगवानगड हे फक्त नाव वाचलेलं असण्याची शक्यता आहे. मात्र त्यापलीकडे उर्वरित महाराष्ट्रात हे नाव अनोळखीच होतं.
भगवानगड हे वारकरी संप्रदायाचं एक पवित्र स्थान मानलं जातं. त्याचबरोबर बीड, लातूर, परभणी जिल्ह्यातील सर्व जाती-जमातीचे लोक भगवानगडावर दर्शनासाठी जातात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
भगवानडाचं नाव भगवानबाबा या 60च्या दशकात प्रसिद्धी पावलेले कीर्तनकार आणि प्रवचनकारांच्या नावावरुन पडलं आहे. अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर खरवंडी गावाजवळ हा गड आहे.
भगवानबाबा कोण होते?
या जागेला भगवानगड म्हणून ओळखलं जाण्यापूर्वी त्याला धौम्यगड किंवा धुम्यागड म्हणून ओळखलं जायचं. धौम्य ऋषींच्या नावावरुन हे नाव आलं होतं. भगवानबाबा या गडावर आले आणि त्यांनी गडाच्या बांधकामाला सुरुवात केली आणि त्यातूनच या गडाला भगवानगड नाव मिळालं. या गडाचं उद्घाटन महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1958 साली झालं होतं.

फोटो स्रोत, FACEBOOK/Bhagwangad Sansthan
भगवानबाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट इथं त्यांचं वास्तव्य होतं. वारकरी संप्रदायातल्या भगवानबाबांनी धौम्यगडावर येऊन कीर्तन, प्रवचन, दिंडी सोहळ्यांचे कार्यक्रम ते करू लागले.
1965 साली त्यांचं निधन झाल्यावर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून भीमसेन महाराज काम पाहू लागले. तर 2003 पासून नामदेव महाराज शास्त्री या गडाचे कार्य करत आहेत. दरवर्षी दसऱ्याला इथं लाखो लोक जमतात.

फोटो स्रोत, bhagwangad.weebly.com
गोपीनाथ मुंडे, भगवानगड आणि दसरा मेळाव्याचा वाद
भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे अनेक वर्षे दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे. त्यांना मानणारा बीड जिल्ह्यातला वंजारी समाज मोठ्या संख्येने त्याला उपस्थित असायचा. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ही परंपरा सुरू ठेवली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळीमध्ये गोपीनाथगड नावाचे स्थळ उभारण्यात आले. त्यानंतर नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला.
2016 साली गडाचे उत्तराधिकारी नामदेवशास्त्री यांनी गडावर दसरा मेळावा होणार नाही अशी भूमिका घेतली आणि परवानगी नाकारली. त्यानंतर या दोघांनीही आपल्यामध्ये वाद नाहीत असं आपापल्या बाजूने सांगितलं असलं तरी त्यांची एकमेकांना दिलेली उत्तरं-प्रत्युत्तरं बातम्यांमध्ये चांगलीच गाजली.

फोटो स्रोत, FACEBOOK/Bhagwangad Sansthan
पंकजा मुंडे यांना राजकीय भाषणाला परवानगी का नाकारली हे नामदेवशास्त्री यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. त्यामध्ये ते म्हणाले होते, "भगवानगडाची गादी वारकरी संप्रदायाची आहे. हे धार्मिक स्थान आहे. इथं जातीपातीची, राजकारणाची परंपरा नाही. गोपीनाथराव मुंडे इथं भाषण करत असत म्हणजे ती परंपरा पुढे चालवली जावी असं नाही.

फोटो स्रोत, facebook
गोपीनाथराव गेल्यानंतर गोपीनाथगडाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे राजकारणाचं स्वतंत्र अस्तित्व त्या गडाच्या रूपाने पुढं आलेलं आहे. मग गोपीनाथगडावर कीर्तन आणि इथं राजकारण असं कसं चालेल? भगवानगडाचं क्षेत्र अध्यात्मिक आहे. ही राजकारणाची जागा नाही असं नामदेवशास्त्रींनी जाहीर केलं होतं. गडाला गुरु मानत असाल तर गडाचा आदेश पाळा असं त्यांनी स्पष्ट केलं. गोपीनाथगडाची स्थापना झाली हे आपल्याला खटकलेलं नाही. बापाचं अस्तित्व त्यामुळे त्यांनी निर्माण केलं. ते कसं वाढवायचं हे त्यांनी पाहावं."

फोटो स्रोत, FACEBOOK/Bhagwangad Sansthan
त्यानंतर पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याला दसरा मेळावा घेऊन लोकांना संबोधित केलं होतं. या वादानंतर भगवानगड हे नाव सर्वांच्याच लक्षात राहिलं. भगवानगडाच्या पायथ्याला पंकजा मुंडे यांनी मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केलं होतं. निवडणुकीच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बीडमध्ये आलेले असताना प्रचारसभेमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं भगवानगडासंदर्भातलं शेवटचं भाषणही ऐकवण्यात आलं होतं.
त्यामध्ये गोपीनाथ मुंडे लोकांना उद्देशून, "आपण सर्व बाबांचे भक्त आहोत म्हणजे गुरुबंधू आहोत. या गडाचं महत्त्व राज्याला समजलंय आता केंद्राला समजण्यासाठी प्रयत्न करू. मी भीमसेन महाराज आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घडवून आणली होती. आता न्यायाचार्य (नामदेवशास्त्री) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून पंतप्रधानांना भगवानगडावर आणण्यासाठी प्रयत्न करू" असे सांगितले होते. यावरुन गोपीनाथ मुंडे यांच्या एकूणच राजकीय प्रवासात तसेच सार्वजनिक जीवनात गडाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं दिसून येतं.
गोपीनाथगड
गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 18 एकर जागेवर गोपीनाथगड हे स्मारक साकारण्यात आले. इथं गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.
या गडाचं म्हणजेच स्मारकाचं लोकार्पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर हे स्मारकस्थळ एकप्रकारे पंकजा मुंडे तसेच त्यांची बहिण खासदार प्रीतम मुंडे यांच्या राजकारणाचं केंद्र झालं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/Pankaja Gopinath Munde
ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान
भगवानगडच्या भाविकांबद्दल बोलताना अहमदनगरमधील दै. सकाळचे पत्रकार सूर्यकांत नेटके यांनी राज्यभरातून इथं भक्त येतात तसेच ऊसतोडणी मजुरांचे हे श्रद्धास्थान असल्याचं सांगितलं.
ते म्हणाले, "भगवानगडाला धार्मिकस्थळ म्हणून पाहिलं जातं. ऊसतोडणी मजुरांचा इथं दरवर्षी मेळावा होतो. ऊस तोडायला जाण्यापूर्वी आपलं काम पूर्णत्वास जातं अशी प्रार्थना करण्याची त्यांची इच्छा असते. त्याचप्रमाणे भगवानगडाला मानणारा वंजारी समाजही मोठ्या संख्येने राज्यभरात दिसून येतो."
ऊसतोडणी कामगारांना मिळाला धार्मिक आणि राजकीय चेहरा
भगवानगड आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निमित्ताने ऊसतोडणी कामगार आणि वंजारी समुदायाला धार्मिक आणि राजकीय चेहरा मिळाला असं बीड जिल्ह्यातील पत्रकार वसंत मुंडे सांगतात.
ते म्हणाले, "भगवानबाबांनी गडाची स्थापना केल्यावर वंजारी समाजाला एक धार्मिक स्थान मिळालं आणि राजकीय पातळीवर गोपीनाथ मुंडे यांचा चेहरा मिळाला. गोपीनाथ मुंडे यांचा या समुदायावर प्रभाव होता. त्यांचा शब्द मानला जाऊ लागला. राज्यभरामध्ये त्यांचे कार्यकर्ते तयार झाले. भगवानगडाचे भक्त राज्यातल्या 40 ते 45 मतदारसंघात आहेत. त्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून त्याला महत्त्व निर्माण झालं.

फोटो स्रोत, bhagwangad.weebly.com
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत एक दसरा मेळावा झालाही. परंतु नंतर गोपीनाथ गडाची स्थापना झाल्यावर मात्र वादाची ठिणगी पडली. त्यानंतर दसरा मेळाव्यात राजकीय भाषणाला परवानगी नाकारली गेली. पंकजा मुंडे यांनी गेली तीन वर्षे सावरगाव घाट म्हणजे भगवानबाबांच्या जन्मस्थानी मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्याला भगवानभक्तीगड असं म्हटलं जातं. त्यामुळे भगवानगडावर अध्यात्मिक, धार्मिक भावनेने जाणारे भक्त, गोपीनाथगडावर जाणारे गोपीनाथ मुंडे समर्थक असे झाले आहे आणि भगवानभक्ती गडावर पंकजा मुंडे समर्थक जातात असं म्हणतात येईल. अर्थात हा सगळा एकच गट आहे. भगवानगडावरही जाणारे आणि इतर दोन ठिकाणीही जाणारे लोक आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








